पीटर द ग्रेट

पीटर द ग्रेट : (३० मे १६७२ – २८ जानेवारी १७२५). विख्यात रशियन सम्राट. मॉस्को येथे जन्म. झार अलेक्सिस आणि त्याची दुसरी पत्नी नताल्य नर्यश्‌किन यांचा पीटर हा मुलगा. फ्यॉदर झारने आपला वारस निवडला नव्हता. यामुळे त्याच्या मृत्यूनंतर वारसावाद निर्माण झाला. यातून तोडगा निघून पीटरच्या सॉफया या सावत्र बहिणीने आपल्या इव्हान या सख्ख्या भावास पहिला झार व पीटरला दुसरा झार नेमले आणि रीजंट म्हणून शासनाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली (१६८२). यानंतरची सु. १२-१३ वर्षे, काही काळ बहिणीच्या आणि काही काळ आईच्या जरबेखाली किंवा निदान त्यांच्या संमतीने कारभार पाहण्यात त्याला घालवावी लागली. ह्या काळातील ही वर्षे दिशाहीन उद्योगात गेली. तथापि याही वयात त्याने आरमार, लोहारकाम, सुतारकाम, छपाई इ. विषयांत रस घेऊन अभ्यास केला. या निमित्ताने त्याचा परदेशी प्रवाशांशी संबंध आला. त्यांच्याकडून रशियाबाहेरील जगताची त्याला चांगली माहिती मिळाली. त्याच्या या स्वच्छंद वर्तनाला आळा घालण्यासाठी त्याच्या आईने यूदॉक्सिआ लपूख्यिन या युवतीशी त्याचे लग्न केले (१६८९). तिच्यापासून त्यास मुलगा (अलेक्सिस) झाला तथापि त्याच्या एकूण वृत्तीत फारसा फरक पडला नाही. पुढे १६९५ मध्ये तो तुर्कस्तानबरोबरच्या ॲझॉव्ह युद्धात सहभागी झाला. याच सुमारास इव्हानही मरण पावला. साहजिकच राज्याची सर्व जबाबदारी त्याच्यावर पडली आणि १६९५ पासून पुढे तो अगदी स्वतंत्र असा सत्ताधीश झाला. त्याच्या स्वच्छंद वर्तनाला आळा बसला. १७२५ पर्यंत त्याने अनियंत्रितपणे राज्य केले. रशियात आमूलाग्र स्थित्यंतरे घडवून आणण्याच्या ईर्षेने तो तीस वर्षे प्रयत्नशील होता. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही फारच थोडे यश त्याच्या पदरी पडले. सेंट पीटर्झबर्ग येथे तो मरण पावला.

रशियाची सर्वांगीण प्रगती घडवून आणून यूरोपात एक समर्थ, समृद्ध आणि सुसंस्कृत राष्ट्र म्हणून त्याला स्थान प्राप्त करून द्यावे, अशी त्याची इच्छा होती. त्या दृष्टीने त्याने आपल्या परराष्ट्रीय व अंतर्गत धोरणाची आखणी केली. ॲझॉव्ह येथील युद्धात रशियाच्या सैन्यातील, विशेषतः नौदलातील दोष त्याच्या लक्षात आले. त्याने रशियाच्या नौदलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आपल्या लोकांना यूरोपीय देशांत अभ्यासासाठी पाठविले. शिवाय स्वतः त्याने यासंबंधीची सर्व माहिती जमा केली. हॉलंड, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया इ. देशांना त्याने भेटी दिल्या. या देशांतील एकूण जीवनमान व तांत्रिक प्रगती पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. १६९८ मध्ये रशियास नवी दृष्टी व नऊशे तंत्रज्ञ घेऊन परतल्यानंतर त्याने रशियन जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून आणले आणि नौदल सुसज्ज केले. शिवाय अनेक सशस्त्र नौका बांधल्या.

प्रायः भूवेष्ठित अशा रशियाला काही मोक्याची सागरी स्थळे मिळवून त्याला जलमार्गांनी बाह्य जगाशी जोडणे आवश्यक होते. त्याच्या आयुष्यभरच्या लढायांमागे हे एक कायम सूत्र होते. तो सर्वाधिकारी झाला तेव्हा रशियाचे तुर्कस्तानशी युद्ध चालूच होते. पीटरला प्रारंभी तुर्कस्तानकडून पराभव पतकरावा लागला परंतु अत्यंत परिश्रमाने कामगारांसमवेत स्वतः कामे करून त्याने नवे नौदल उभे केले आणि १६९६ मध्ये ॲझॉव्हची नाकेबंदी करून ते महत्त्वाचे ठाणे तुर्कस्तानकडून काबीज केले. तुर्कस्तानशी तह झाल्यावर १७०० नंतर बाल्टिक समुद्रावर डोळा ठेवून पीटर स्वीडनविरुद्ध उठला. १७०९ मध्ये पीटरने स्वीडनच्या बाराव्या चार्ल्सचा पराभव केला पण मध्यंतरी तुर्कस्तानशी पुन्हा युद्ध सुरू झाले. मिळविलेले सर्व गमावण्याच्या अवस्थेत पीटर होता. तथापि पुन्हा १७२१ च्या तहाने पीटर काही बाल्टिक प्रदेश पदरात पाडू शकला. एखाददुसरे बंदर आपल्याला मिळावे, म्हणून तुर्कस्तानप्रमाणे इराणशीही त्याने बखेडा मांडला आणि कॅस्पियन समुद्राकडे काही भूमी मिळविली. व्यापारी ठाणी आणि सुवर्ण ह्यांच्या शोधात आपली काही जहाजे त्याने पॅसिफिक महासागरातही सोडली. नीव्हा नदीच्या मुखाशी सेंट पीटर्झबर्ग (सध्याचे लेनिनग्राड) ही नवी राजधानी वसविण्यातला त्याचा हेतू रशियाला यूरोपशी जलमार्गांनी सांधून टाकणे हाच होता. सेंट पीटर्झबर्गला रशियाची ‘यूरोपकडे उघडणारी खिडकी’ असे सार्थपणे म्हटले गेले.


पीटरचे रशियाच्या इतिहासातील स्थान त्याला त्याच्या बहुविध सुधारणांमुळे प्राप्त झाले आहे. मागासलेल्या पौर्वात्य रशियाचे आधुनिकीकरण म्हणजे पश्चिमीकरण करण्याचा त्याने चंग बांधला. यासाठी त्याने सुधारणांचा एक कार्यक्रम आखला. त्यासाठी बाहेरून अनेक तज्ञ आणण्यात आले होते तसेच तरुण रशियनांना विविध प्रकारच्या विद्या, कला, व्यवसाय शिकण्यासाठी देशोदेशी पाठविण्यात आले. सर्व योजना आपल्या कल्पनेप्रमाणे अंमलात आणण्यासाठी एकहाती एकवटलेली, अनियंत्रित सत्ता त्याला आवश्यक वाटली. म्हणूनच सैन्याची आणि लोकांची अंतर्गत बंडे त्याने निर्दयतेने मोडून काढली. अर्थात अशा परिस्थितीतही शहरी भागात त्याने मर्यादित प्रमाणात जो स्थानिक स्वराज्याचा प्रयोग सुरू केला, तो मुद्दाम लक्षात घेण्यासारखा वाटतो. चर्चचाही त्याने आपल्या धोरणांना पोषक असा योग्य तो बंदोबस्त केला. ऑस्ट्रियासारखे सुसज्ज  भूदल, हॉलंडसारखे समर्थ नौदल आणि स्वीडनसारखी कार्यक्षम शासकीय यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने त्याने सबंध शासनव्यवस्थेची पुनर्रचना केली. युद्धाचे अफाट खर्च भागविण्यासाठी आणि देशात सुबत्ता आणण्यासाठी त्याला देशाच्या आर्थिक प्रगतीची गरज तीव्रतेने जाणवली. सरकारी किंवा खाजगी मालकीखाली जहाजे बांधणे, कागद कारखाने उभे करणे, कापड गिरण्या सुरू करणे इ. कार्यक्रम त्याने आखले. त्याने व्यापारासही प्रोत्साहन दिले. पीटरच्या शैक्षणिक व सांस्कृतिक स्वरूपाच्या सुधारणा तर क्रांतिकारक होत्या. देशाच्या कोनाकोपऱ्यातून प्राथमिक शाळा उघडण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. इतर अनेक प्रकारची विद्यालये स्थापन झाली. रशियन भाषेची वर्णमाला सोपी करून व अरबी अंकांचा स्वीकार करून शिक्षण अधिक सुलभ करण्यात आले. पीटरने निरनिराळ्या विषयांवर अनेक पुस्तके तयार करवून छापविली. रशियातील पहिले नियतकालिक पीटरनेच सुरू केले (१७०३). विज्ञान व तंत्राच्या विशेष अभ्यासासाठी त्याने एक अकादमी निर्माण केली. इतिहासादी मानव्यविद्यांतही त्याने पुष्कळच रस घेतला. दैनंदिन जीवनातील रीतिरिवाजांत, खाण्यापिण्यात आणि वस्त्रभूषणांच्या पद्धतींतही रशियाचे पश्चिमीकरण करण्याचा पीटरचा आग्रह होता. आपल्या देशातील लोकांच्या दाढ्याही त्याच्या नजरेला खुपू लागल्या आणि त्याने स्वतःच्या हाताने भर दरबारात सरदारांच्या दाढ्यांवर कातरी चालविली. दाढी वाढविण्यावर कर लादले. रशियाचे जीवन अगदी नखशिखांत नवीन, पश्चिमी तऱ्हेने पालटून टाकायचे, अशा हट्टालाच तो पेटला होता.  म्हणूनच त्याच्या दृष्टीने आधुनिक लोकहितपर अशा अनेक सुधारणांची त्याने आयोजना केली आणि त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तो आयुष्यभर प्रामाणिकपणे खपला.

रशियाचे असे संपूर्ण आधुनिकीकरण एकट्या पीटरच्या कुवतीबाहेरचे काम होते.  त्याच्या लढायांचा आणि प्रागतिक कार्यक्रमांचा अवाढव्य खर्च सरकारी खजिन्याला परवडण्यासारखा नव्हता.  अनेक नवे कर बसवावे लागले.  मारपीट करूनच त्रस्त रयतेकडून कर वसूल करावे लागले.  शासनातील लाचलुचपत, भ्रष्टाचार कमी करण्यात त्याला थोडे यश आले.  त्याचे आधुनिकीकरणाचे वेड जनतेला पटण्यासारखे व पचण्यासारखे नव्हते.  अगदी अल्पसंख्य उच्चवर्णीयांचे काहीसे पश्चिमीकरण झाले पण तेही बाह्य डामडौल आणि शिष्टाचार एवढ्यापुरतेच मर्यादित होते.  आपल्या वैयक्तिक जीवनातील अवगुणांनी पीटर अधिकच अप्रिय झाला.  त्याने आपल्या पहिल्या मुलाला तुरुंगात डांबून ठेवले आणि त्याच्यावर कटाचा आरोप केला.  तो तेथेच मरण पावला.  एवढा तो क्रूरकर्मा होता.  कुणालाही न जुमानता त्याने पहिली पत्नी यूदॉक्सिआ हिला घटस्फोट दिला व कॅथरिन ह्या रूपसंपन्न पण अव्यवहारी अशा एका युवतीशी दुसरे लग्न केले (१७१२).  तिला त्याच्यापासून एक मुलगा (पीटर प्यित्रॉव्ह्यिच) झाला  पण तो लहानपणीच वारला (१७१९).  पुढे त्याने तिला आपल्या गादीची वारस म्हणून जाहीर करून टाकले.

अखेरच्या दिवसांत पीटरला आपल्या नव्या रशियाच्या आदर्शांचा चक्काचूर होत असल्याचे स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे लागले. मात्र परिश्रमाच्या प्रमाणात पीटरला यश आलेले दिसत नसले, तरी त्याने त्या देशाला एका निराळ्या, नव्या उन्नतीच्या मार्गावर आणून सोडले ह्यात शंका नाही.  रशियाच्या इतिहासातील त्याचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आणि अविस्मरणीय आहे.

संदर्भ: 1. Bruce, P. H. Peter I, The Great Emperor of Russia, 1672-1725.

    2. Clarkson, J. D. History of Russia, Toronto, 1961.

    3. Grey, Ian, Peter the Great, Emperor of all Russia, London, 1960.

आठवले, सदाशिव