पाशुपत पंथ : अनेक माहेश्वर शैव पंथांपैकी एक पंथ. रुद्रशिव वा पशुपतीस आपले उपास्य दैवत मानणारा हा पंथ आहे. यजुर्वेदात स्वतंत्र ‘रुद्राध्याय’च आहे. त्यात पशुपती म्हणून रुद्र-शिवाचा उल्लेख आहे. यजुर्वेदकालापासून शिवाची परमेश्वर म्हणून उपासना सुरू झाली असावी, असे त्यातील शिवाच्या माहात्म्यावरून दिसते. यावरून शिवोपासक पंथाचे प्राचीनत्व लक्षात येते. श्वेताश्वतरोपनिषदात (३.४) रुद्रास विश्वाचा एकमेव शास्ता म्हटले आहे. महाभारतातही पशुपतीस उपास्य दैवत मानणाऱ्या पाशुपत पंथाचा उल्लेख आढळतो. पौराणिक कालात ईश्वर म्हणजे पती, हा त्याने निर्माण केलेल्या जीवांना म्हणजे ‘पशूं’ ना ह्या संसार’ ‘पाशा’तून मुक्त करतो असा विचार निर्माण झाला.
प्रत्यक्ष भगवान शिवाने पाशुपत पंथ स्थापन केला आणि पंथाची तत्त्वे विशिष्ट ऋषींना शिवाने गुप्तपणे उपदेशिली, असे या संप्रदायाच्या आगम ग्रंथात म्हटले आहे. दुसऱ्या एका कथेनुसार ब्रह्मचारी शिवाने स्मशानात जाऊन एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहात प्रवेश करून नवा अवतार धारण केला (लिंगपुराण २४ वायुपुराण २३). ह्या मृतदेहाशेजारी त्याचे लकुल (लाकुड) पडले होते. शिवाने मृतदेहात प्रवेश करताच तो मृतदेह जिवंत झाला. हाच शिवाचा अठरा अवतारांपैकी आद्य असा लकुलीश वा नकुलीश अवतार होय. लकुलीश वा नकुलीश (इ.स.सु. २००) हा गुजरातमध्ये कायारोहण (भडोचजवळील कारवान म्हणून प्रसिद्ध) क्षेत्रांत होऊन गेलेला पाशुपत मताचा अध्वर्यू असून त्यानेच प्रथम या पंथाचे तत्त्वज्ञान सुसूत्रपणे मांडले व त्याला दार्शनिक रूप दिले. लकुलीश व नकुलीश हा या पंथाचा आद्य प्रवर्तक मानला जातो. पाशुपत पंथ गुजरात व राजस्थानमध्ये मुख्यतः पसरला. पाशुपत सूत्राच्या संपादकांनी नकुलीशाची शिष्यपरंपरा नकुलीश ⇨ कौशिक ⇨ गार्ग्य ⇨ मैत्रेय ⇨ कौरुष ⇨ ईशान ⇨ परगार्ग्य ⇨ कपिलांड ⇨ मनुष्यक ⇨ कुशिक ⇨ अत्री ⇨ पिंगल ⇨ पुष्पक ⇨ बृहदार्य ⇨ अगस्ती ⇨ संतान ⇨ राशीकर वा कौंडिण्य ⇨ विद्यागुरू अशी दिली आहे. परंपरेतील सतरावे शिष्य राशीकर म्हणजेच कौंडिण्य असल्याचे संपादकांनी निश्चित केले. त्यांनी पाशुपतातील उपपंथ स्थापिले. माधवाचार्य (सु. चौदावे शतक) यांनी आपल्या सर्वदर्शनसंग्रहात पाशुपत पंथाचे तत्त्वज्ञान ‘नकुलीश दर्शन’ नावाने विस्ताराने मांडले आहे. गुणरत्न (सु. चौदावे शतक) याने तर वैशेषिकांना ‘पाशुपत’ म्हटले आहे. न्यायवार्तिककार उद्योतकराने स्वतःस ‘पाशुपताचार्य’ म्हटले आहे. पाशुपतांचा मूळ सूत्रग्रंथ माहेश्वररचित म्हणजेच आद्य शिवावतार नकुलीशरचित पाशुपत सूत्र हा असून, त्यावर कौंडिण्य (सु. चौथे ते सहावे शतक या दरम्यान) याने रचलेले पंचार्थीभाष्य आहे. ते राशीकरभाष्य वा कौंडिण्यमाष्य म्हणूनही ओळखले जाते. पाशुपत सूत्र हा ग्रंथ त्यावरील कौंडिण्यभाष्यासह संपादून १९४० मध्ये त्रिवेंद्रम विद्यापीठाने ‘ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी’च्या वतीने प्रकाशित केला आहे. उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या शैव पंथांत पाशुपत पंथ सर्वांत प्राचीन आहे. यालाच ‘आगमान्त संप्रदाय’ असेही म्हणतात.
मूळ पाशुपत सूत्रे व त्यावरील कौंडिण्यभाष्य यांत शैव पंथाच्या तत्त्वज्ञानापेक्षा विधीसंबंधीचाच अधिक ऊहापोह आहे. कदाचित शैव म्हणून समजल्या जाणाऱ्या नैयायिकांनी शैव पंथाला तात्त्विक अधिष्ठान दिले व पाशुपतांनी पंथाच्या विधियुक्त बाजूकडे विशेष लक्ष दिले असणे संभवते.
पाशुपतांचे तत्त्वज्ञान भेदाभेदवाद म्हणून ओळखले जाते. त्यात कार्य, कारण, भोग, विधी व दुःखान्त असे पाच पदार्थप्रकार मानले आहेत. कार्य म्हणजे सुख दुःखयुक्त संसार, कारण म्हणजे ईश्वर. पाशुपतांच्या मते योग म्हणजे पातंजल योगाप्रमाणे चित्तवृत्तिनिरोध नसून जीव व ईश्वर यांचे ऐक्य (आत्मेश्वर-संयोगो योग:) होय. चित्तशुद्धी घडवून आणणारा विधी म्हणून त्यांनी योग मानला आहे. योगाने घडवून आणलेले म्हणजे जीवाने आपले कार्य सोडून ईश्वरभिमुख होणे किंवा ईश्वर व जीव यांनी एकमेकांकडे येणे. ज्ञान, वैराग्यादींमुळे दुःखान्त होत नसून तो फक्त शिवाच्या प्रसादामुळेच होतो, असे कौंडिण्याने म्हटले आहे. ईश्वर सर्वतंत्र स्वतंत्र आहे. त्याची संकल्पशक्ती सर्वश्रेष्ठ असून तीमुळे तो कोणताही बदल घडवून आणू शकतो तथापि त्याच्या या क्रियेला एक मर्यादाही आहे. ती म्हणजे दुःखापासून कायम मुक्त झालेले मुक्तात्मे. शिव हाच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय घडवून आणतो. म्हणूनच ज्वाला दुःखान्त हवा त्याने शिवाची उपासना करावी. शिव हा फक्त निमित्त कारण आहे. आद्य शंकराचार्यांनी जो ईश्वरकारणवाद्यांचा निर्देश केला आहे, त्यांत पाशुपतही त्यांना अभिप्रेत आहेत. मुक्तीच्या अवस्थेत जीव हा शिवात विलीन होत नसून त्याच्या सतत संयोगात राहतो हेच ‘शिव सायुज्य’ होय.
पाशुपतांच्या धार्मिक आचारात भस्माला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या मते भस्मस्नान म्हणजे खरा यज्ञ. पाशुपत साधूंना सिद्धी प्राप्त झाल्या, तरी त्यांचा उपयोग करण्याने समाधीस व्यत्यय येतो. म्हणून सिद्धींच्या नादी लागणे अयोग्य मानले आहे. साधे संन्यस्त जीवन जगणे, लोभ व क्रोधत्याग करणे, क्षमाशील असणे, ओंकाराचा उच्चार करून व योग आचरून शिवाशी एकरूप होणे, अशी या पंथाची सुरुवातीची शिकवण होती.
पंथाची ही मूळ शिकवण व आचार पुढे अधोगतीस जाऊन ⇨ अघोरी पंथ व ⇨ कापालिक पंथ उत्पन्न झाले. पंथात अधिकाधिक बीभत्सपणा आणि अश्लीलता प्रविष्ट झाली. त्यामुळेच पुढे त्याची बदनामी होऊन तो केवळ चेटक्यांचा, विकृतांचा, मद्यप्यांचा, खुन्यांचा, नरमांसभक्षकांचा व वामाचाऱ्यांचा पंथ म्हणून हेटाळणीस पात्र ठरला. संभोगसूचन, अंगास चिताभस्म फासणे, प्रेतमांसभक्षण करणे, मानवी कवटीचा पानपात्र म्हणून उपयोग करणे, दंड वा लकुलप्रतीक म्हणून उत्थित लिंगाची पूजा करणे इ. बाबींचा पंथात प्रवेश झाला. लकुलीशमूर्ती भारतात सर्वत्र आढळतात. नग्न व ऊर्ध्वमेढ्र (उत्थितलिंग) अशा त्या आहेत. मोहें-जो-दडो येथेही पशुपतीच्या मूर्ती सापडल्या आहेत.
संदर्भ : 1. Bhandarkar, R.G. Vaisnavism, Saivism and Minor Religions Systems, Varanasi, 1965. 2. Dasgupta, S.N.A. History of Indian Philosophy, Vol. V, Delhi 1975.
सुर्वे, भा.ग