पालि साहित्य : भारतातील वैदिक भाषेचे पहिले अपभ्रष्ट रूप ‘पालि’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भाषेत दिसून येते. साहजिकच ह्या भाषेकडे पाहण्याचा आर्यांचा दृष्टिकोण तुच्छतेचा होता. तथापि गौतम बुद्धाने आपला संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ह्या भाषेचा किंवा ह्या भाषेच्या तत्कालीन स्वरूपाचा आधार घेतला, म्हणूनच बौद्ध धर्माच्या उदयाबरोबर पाली साहित्याचाही उदय झाला. बौद्धांचे बरेचसे धार्मिक साहित्य ह्या भाषेत आहे.
त्रिपिटक, अट्ठकथा आणि महत्त्वाचे धर्मग्रंथ : बौद्धांचे ⇨ त्रिपिटक हे पाली भाषेतील सर्वप्राचीन साहित्य. त्रिपिटक म्हणजे ⇨ विनयपिटक, ⇨ सु त्तपिटक व ⇨ अभिधम्मपिटक अशी तीन पिटके किंवा पेटारे. ह्या पिटकांपैकी प्रत्येक पिटकांतर्गत असे स्वतंत्र घटक ग्रंथ आहेत. बौद्ध संस्कृतात तसेच तिबेटी आणि चिनी भाषांतही त्रिपिटक अस्तित्वात आहे. तथापि पाली त्रिपिटक ह्या त्रिपिटकांहून प्राचीन आहे. इ.स.पू. सहाव्या शतकापासून इ.स.पू. तिसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंत पाली त्रिपिटकातील ग्रंथसंग्रह आणि महत्त्वाच्या ग्रंथांचे तोंडावळे तरी ठोकळ मानाने निश्चित केले होते, असे दिसते. गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांकरिता घालून दिलेले नियम, त्याचा उपदेश आणि तत्त्वज्ञान त्रिपिटकात अंतर्भूत आहे. विनयपिटकात पातिमोक्खाचा अंतर्भाव असलेल्या सुत्तविभंग, खंधक आणि परिवार ह्या मुख्य ग्रंथांचा समावेश आहे. सुत्तविभंगाचे ‘ पाराजिक’ आणि ‘पाचित्तिय’ असे दोन पोटविभाग आहेत. खंधकाचेही दोन पोटविभाग असून त्यांची नावे ‘महावग्ग’ आणि ‘चूलवग्ग’ अशी आहेत. बौद्ध भिक्षूंनी आणि भिक्षुणींनी पाळावयाचे नियम पातिमोक्ख ह्या ग्रंथात संगृहीत आहत. सुत्तविभंगाच्या उपर्युक्त ‘पाराजिक’ आणि ‘पाचित्तिय’ ह्या दोन पोटविभागांत पातिमोक्खात दिलेले नियम का व कसे अस्तित्वात आले, ह्यासंबंधीच्या कथा (त्यांत काही कल्पित कथाही आहेत) सांगन त्या नियमांचे स्पष्टीकरणही दिलेले आहे. खंधकाच्या पोटविभागांपैकी ‘महावग्गा’त बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यापासून सारिपुत्त आणि मोग्गल्लान त्याला येऊन मिळाल्यापर्यंतची जीवनकथा सांगितली आहे. बौद्ध संघात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेला दीक्षाविधी, संघातील उपवसथ आणि प्रवारणा ह्यांसारखे काही धार्मिक विधी, सांघिक जीवनात घडून येणारे प्रमाद आणि त्यांवरील उपाय ह्यांची माहिती दिलेली आहे. ‘चूलवग्गा’त भिक्षूंचे सांघिक जीवन, त्यांच्याकडून घडणारे प्रमाद आणि त्या संदर्भातील दंडयोजना, प्रायश्चित्ते वगैरे सविस्तरपणे सांगितली आहेत. ‘परिवार’ सिंहद्वीपात लिहिला गेला, असा तर्क आहे. सारांशात्मक, सूचिवजा असा हा ग्रंथ आहे.
सुत्तपिटक हे त्रिपिटकातील अत्यंत लोकप्रिय असे पिटक होय. गौतम बुद्धाच्या धर्माचा यथातथ्य परिचय घडविणे हा ह्या पिटकाचा हेतू. दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुक्तनिकाय, अंगुत्तरनिकाय आणि खुद्दकनिकाय अशा पाच निकायांचे मिळून सुत्तपिटक तयार झालेले आहे. पहिल्या चार निकायांची मांडणी संभाषणपद्धतीने केलेली आहे. खुद्दकनिकायात एकूण १५ ग्रंथांचा समावेश होतो.
अभिधम्मपिटकात धम्मसंगणि, विभंग, धातुकथा, पुग्गलपंजत्ति, कथावत्थु, यमक आणि पट्ठान असे एकूण सात ग्रंथ अंतर्भूत आहेत. मन, मनोवृत्ती, सभोवतालची बाह्य चराचर सृष्टी आणि निर्वाण ह्यांच्यासंबंधीचे अत्यंत पांडित्यपूर्ण पण क्लिष्ट असे विवेचन ह्या पिटकात आढळते. हे पिटक सर्वांत शेवटी रचिले गेले असून त्याचे काही भाग तरी सिंहलद्वीपात तयार झाले असावेत, असा विद्वानांचा तर्क आहे.
त्रिपिटकातील मूळ ग्रंथांवर भाष्यवजा अशा ज्या पहिल्या सविस्तर टीका लिहिल्या गेल्या त्या ⇨ अट्ठकथा म्हणून ओळखल्या जातात. ⇨ बुद्धघोष, ⇨ बुद्धदत्त, ⇨ धम्मपाल, उपसेन, महानाम अशा ज्ञानी भिक्षूंनी अट्ठकथा लिहून ठेविल्या आहेत. बुद्धघोषाच्या अट्ठकथा सर्वांत प्राचीन होत. अट्ठकथांतून त्रिपिटकातील मूळ पाली ग्रंथांतील शब्दांचा अथवा शब्दसमुच्चयांचा अर्थ दिलेला असतो वैदिक ब्राह्मणग्रंथांच्या अर्थवादाप्रमाणे इतिहास व आख्यानेही असतात, प्रसंगोपात्त पौराणिक, पारंपरिक आणि कल्पित कथाही येतात. अट्ठकथांचा काळ इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत असावा. बौद्धांच्या साहित्यात त्रिपिटकाच्या खालोखाल अट्ठकथांचे महत्त्व आहे. अट्ठकथांवरही टीका लिहिल्या गेल्या आहेत. उदा., सुत्तपिटकांतर्गत दीघनिकाय ह्या ग्रंथावरील सुमंगलविलासिनी ह्या अट्ठकथेवर लीनत्थपकासनी ही टीका आहे. काही टीकाग्रंथ नष्ट झाले असून त्यांची हस्तलिखितेही मिळत नाहीत. अभिधम्मपिटकावर आनंद ह्या भिक्षूने लिहिलेली मूलटीका (आठवे-नववे शतक) त्या पिटकावरील पहिला टीकाग्रंथ म्हणून समजली जाते.
त्रिपिटक आणि अट्ठकथा ह्यांखेरीज अन्य महत्त्वाच्या ग्रंथांत नेत्तिपकरण, पेटकोपदेस आणि मिलिंदपञ्ह ह्यांचा समावेश होतो. पहिले दोन महाकच्चायनाने लिहिले, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. नेत्तिपकरण हा ग्रंथ त्रिपिटकानंतरचा पण अट्ठकथांच्या पूर्वीचा. बौद्ध धर्मोपदशेकाला मार्गदर्शिकेसारखा उपयोगी पडावा, अशा प्रकारे ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. ‘नेत्ति’ ह्या शब्दाचा अर्थच ‘मार्गदर्शिका’ असा आहे. बुद्धाच्या उपदेशाचे त्यात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात १६ ‘हार’ (विषयमाला), ५ ‘नय’ (तात्पर्य-निर्णय करण्याच्या युक्त्या) आणि १८ ‘मूलपदे’ (मुख्य नैतिक विषय) ह्यांचा समावेश आहे. वेदांच्या संदर्भात यास्ककृत निरुक्ताचे जे महत्त्व, तेच त्रिपिटकाच्या संदर्भात नेत्तिपकरणाचे आहे, असे मानले जाते. पेटकोदेस हा ग्रंथही अशाच प्रकारचा आहे. नेत्तिपकरणातील विषयच त्यात जरा वेगळ्या प्रकारे मांडले आहेत. नेत्तिपकरणात संदिग्ध राहिलेल्या काही बाबींवर पेटकोपदेसात नवीन प्रकाश टाकून त्या स्पष्ट केल्याचे दिसते. चार आर्यसत्ये हा बौद्ध धर्माचा गाभा असल्याचे त्यात दाखवून दिले आहे तसेच विषयांचा विन्यास मुख्यतः ह्या आर्यसत्यांच्या दृष्टिकोणातून केलेला आहे. ह्या दोन ग्रंथांचा कर्ता मानला जाणारा महाकच्चायन म्हणजे बुद्ध हयात असताना त्याचा प्रत्यक्ष शिष्य झालेला महाकच्चायन नव्हे, हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.
इसवी सनाच्या सु. पहिल्या शतकात रचिला गेलेला ⇨ मिलिंदपञ्ह (संस्कृत रूप मिलिंदप्रश्न) हा ग्रंथही महत्त्वाचा आहे. ‘मिलिंद’ ह्या नावाने ओळखला जाणारा मीनांदर हा ग्रीक राजा आणि बौद्ध भिक्षू नागसेन ह्यांच्यातील संभाषणातून बौद्ध धर्माच्या संदर्भातील अनेक वादग्रस्त मुद्यांचा ऊहापोह ह्या ग्रंथात केलेला आहे. मिलिंदाने प्रश्न विचारावा आणि नागसेनाने त्याचे उत्तर द्यावे, अशी पद्धत ह्या ग्रंथात अवलंबिलेली आहे. ह्या ग्रंथाचा कर्ता अज्ञात आहे. हा मूळ ग्रंथ पालीत नव्हता तो संस्कृतात किंवा एखाद्या प्राकृत भाषेत असावा. तो आज उपलब्ध नाही. मिलिंदपञ्ह हे त्याचे सिंहलद्वीपात झालेले पाली भाषांतर होय. पाली भाषेतील उत्कृष्ट गद्याचा हा ग्रंथ म्हणजे एक नमुना आहे.
वंससाहित्य : बौद्धांच्या त्रिपिटकातील सुत्तपिटकात बुद्धवंसनामक एक ग्रंथ अंतर्भूत आहे. बारा कल्पांच्या कालावधीत एकूण २४ बुद्ध होऊन गेले, असे बौद्ध मानतात. ह्या २४ बुद्धांचा पद्य वृत्तांत बुद्धवंसात आलेला आहे. ह्या बुद्धवंसाच्या धर्तीवर पाली भाषेत पुढे अनेक वंसग्रंथ तयार झाले. त्यांपैकी ⇨ दीपवंस आणि ⇨ महावंस हे दोन विशेष महत्त्वाचे आहेत. पाली वंसग्रंथांचे स्वरूप काहीसे बखरींसारखे आहे. श्रीलंकेचा – विशेषतः तेथे झालेल्या बौद्धधर्मप्रसाराचा – इतिहास सांगणे, हा दीपवंसाचा हेतू आहे. हा ग्रंथ मुख्यतः पद्यमय असून त्यात अधूनमधून गद्याचे काही अवशेष मात्र दिसतात. सिंहलद्वीपातील बौद्धांमध्ये प्रचलित असलेली बरीचशी पारंपरिक माहिती ह्या ग्रंथात एकत्रित स्वरूपात पाहायला मिळते. दीपवंसकाराची भूमिका इतिहासकाराची दिसते तथापि त्यात मुख्यतः दंतकथा, पौराणिक कथा, दैवी चमत्कार इत्यादींचाच भरणा विशेष आहे. त्यांच्या तळाशी इतिहासाचे काही धागे मात्र जाणवतात. इसवी सनाच्या चौथ्या शतकात ह्या ग्रंथाची रचना झालेली असावी. महावंसाचे स्वरूप पाहता, त्याच्या रचनेमागे दीपवंसाचीच पुनर्रचना करण्याचा, तसेच त्यावर जाणीवपूर्वक भाष्य करण्याचा हेतू दिसून येतो. महावंसाच्या कर्त्याचे नाव महानाम. सिंहल देशाचा राजा धातुसेन (पाचवे शतक) ह्याच्या कारकीर्दीत हा ग्रंथ लिहिला गेला. दीपवंसाची लेखनशैली साधी, तर महावंसाची आलंकारिक. वंसत्थपकासिनी नावाची एक टीका महावंसावर असून ती कदाचित महानामानेच लिहिली असावी, असा तर्क आहे. मूळ महावंसात ३७ परिच्छेद असून, सदतिसाव्या परिच्छेदाच्या पन्नासाव्या गाथेशी तो संपलेला आहे. तथापि त्यात पुढे वेळोवेळी निरनिराळ्या लेखकांनी भर घातली. हा परिवर्धित भाग चूळवंस म्हणून ओळखला जातो. सिंहल देशाचा राजा महासेन ह्याच्या कारकीर्दीपर्यंत (इ.स.सु. ३२५-५२) दीपवंस आणि महावंस ह्या दोन्ही ग्रंथांतील निवेदन आलेले आहे, तर चूळवंसाचा आरंभ महासेनाचा पुत्र सिरिमेघवण्ण (श्रीमेघवर्ण) ह्याच्या कारकीर्दीपासून झालेला असून सिरिविक्कमराजसीहाच्या (श्रीविक्रमराजसिंह) कारकीर्दीपर्यंतचा वृत्तांत त्यात दिलेला आहे. पुढे सर्व राज्य इंग्रज लोकांच्या (इंगिरिसिनामका) हातात गेल्याचा उल्लेख ह्या ग्रंथाच्या शेवटी आढळतो.
ह्या विशेष महत्त्वाच्या वंसग्रंथांखेरीज अन्य उल्लेखनीय वंसग्रंथही आहेत. महाबोधिवंसात बोधिवृक्ष सिंहल देशात कसा आणला, याची कथा आहे. सिंहली भिक्षू उपतिस्स (उपतिष्य) हा ह्या ग्रंथाचा कर्ता अकराव्या शतकात होऊन गेला असावा असे गायगर ह्या विद्वानाचे मत आहे. थूपवंसात (स्तूपवंस, सु. तेरावे शतक) भगवान बुद्धाच्या पवित्र अवशेषांवर उभारलेल्या स्तूपांची-विशेषतः लंकाधिपती दुत्थगामनी ह्याने अनुराधपूर येथे उभारलेल्या महास्तूपाची-माहिती आहे. सिंहली भिक्षू सारिपुत्त ह्याचा शिष्य वाचिस्सर ह्याची ही रचना. दाठावंस (सु. तेरावे शतक) हा ग्रंथ धम्मकित्ती (धर्मकीर्ती) नावाच्या सिंहली भिक्षूने सिंहली भाषेतील एका ग्रंथावरून पालीत अनुवादिलेला असून बुद्धाचा दात त्या देशात कसा आला, ह्याचे वर्णन त्यात केले आहे. हत्थवनगल्लविहारवंसाचे ११ अध्याय असून पहिल्या ८ अध्यायांत राजा सिरिसंघबोधीचे वर्णन आहे. उर्वरित ३ अध्यायांत ह्या राजाने आत्मबलिदान केलेल्या जागेवर बांधलेल्या विहारांचा वृत्तांत आहे. साधी शैली हे ह्या ग्रंथाचे एक वैशिष्ट्य असले तरी, काही भागांत बाणभट्टाच्या कादंबरी ह्या ग्रंथांतील लेखनशैलीचे अनुकरण आहे. छ-केस-धातुवंस आणि नलाटधातुवंस (ललाटधातुवंश) हे आधुनिक (बहुधा एकोणिसाव्या शतकातील) ग्रंथ आहेत, असे दिसते. पहिल्याचा लेखक एक अज्ञात ब्रह्मदेशीय असून बुद्धाच्या पवित्र केसांवर उभारलेल्या स्तूपांचे वर्णन त्यात आहे. बुद्धाच्या कपाळाच्या इतिहासासंबंधीचा वृत्तांत दुसऱ्यात आहे. गंधवंस (ग्रंथवंश) व सासनवंस (शासनवंश) हे दोन ग्रंथ पाली साहित्येतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. गंधवंसात पाली भाषेतील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ दिले असून ज्यांचे ग्रंथकार अज्ञात आहेत, अशा ग्रंथांचीही नावे दिली आहेत. ह्याचा कर्ता ब्रह्मदेशीय असावा. ह्या
ग्रंथाचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही तथापि तो एकोणिसाव्या शतकात रचिला गेला असावा, असे म्हटले जाते. सासनवंसात (एकोणिसावे शतक) त्याच्या पज्जासामी (प्रज्ञास्वामी) ह्या ब्रह्मदेशीय कर्त्याने बौद्ध धर्माचा प्रसार विविध देशांत कसा झाला ह्याचे वर्णन केले आहे. बुद्धशासनाचा हा इतिहास आहे. अजातशत्रू, कालाशोक आणि धर्माशोक ह्यांच्या कारकीर्दीत झालेल्या तीन बौद्ध संगीतींचा वृत्तांतही त्यात आहे. थायलंडमध्ये अठराव्या शतकात संखीती वंस (संगिती-वंश) नावाचा एक ग्रंथ तेथील भदन्त वनरतन (सोमदेज वनरतन) ह्याने रचिला. त्यात बौद्धांच्या नऊ संगीतींचा उल्लेख आहे.
संखेप-संगह : मोठ्या विषयाचे थोडक्यात विवेचन करणारे संक्षेप-संग्रह-संकलन ग्रंथ पुष्कळ झाले. सच्चसंखेप (सत्यसंक्षेप) हा असाच एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ कोणाचा असावा, ह्याबद्दल विद्वानांत एकमत्य नाही. काहींच्या मते तो धम्मपालाचा असावा तर त्याचा कर्ता आनंद हा असावा, असे काही मानतात. अभिधम्मत्थसंगह हा अभिधम्माचा सारभूत ग्रंथ सिंहली भिक्षू अनिरुद्ध ह्याने लिहिला. आठवे ते बारावे शतक ह्या कालखंडात केव्हा तरी अनिरुद्ध होऊन गेला असावा. अभिधम्मत्थसंगहाला फार मोठी लोकप्रियता लाभली होती. त्यावर सिंहली भिक्षू सुमंगल ह्याची अभिधम्मत्थविभावनी आणि छप्पद किंवा सद्धम्मजोतिपाल ह्या ब्रह्मदेशीय भिक्षूची संखेपवण्णवा (बारावे शतक) अशा दोन टीका आहेत. सद्धम्मसंगह हा धम्मकित्ती महासामी (धर्मकीर्ती महास्वामी) ह्याचा ग्रंथ. तेराव्या-चौदाव्या शतकांतला हा बुद्ध-शासनाचा संग्रह आहे. पाली साहित्यातील अट्ठकथाकार, टीकाकार आणि इतर ग्रंथकार ह्यांची नावेही त्यांच्या ग्रंथांसह ह्यात आलेली आहेत. त्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
कथासाहित्य : पालीतील कथासाहित्य जातकांनी किंवा जातककथांनी संपन्न केलेले आहे. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बुद्धाच्या अनुयायांनी जातककथांचा उपयोग केला. व्यावहारिक नीतिकथा, दीर्घसाहसकथा, निखळ विनोदी कथा अशा विविध प्रकारच्या जातककथा आहेत. ह्या जातककथांतून बुद्ध हा बोधिसत्त (बोधिसत्त्व) ह्या नावाने कथानायक, कथेतील दुय्यम वा कथेतील घटनांचा एक प्रेक्षक म्हणून वावरलेला आहे. बुद्धघोषादी अट्ठकथाकारांनी आपल्या स्पष्टीकरणाच्या पृष्ट्यर्थ अधूनमधून जातककथा दिलेल्या आहेत. सिंहलीद्वीपात प्रचलित असलेले सीहलवत्थुप्पकरण, सहस्सवत्थुप्पकरण आणि रसवाहिनी हे ग्रंथही पाली कथावाङ्मयात मोडतात. सीहलवत्थुप्पकरण हा ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध झालेला असून त्याचा कर्ता धम्मनंदी (धर्मनंदी) हा सौराष्ट्रातील कट्ठसोलपट्टन येथे राहत असल्याचा उल्लेख त्या ग्रंथात आहे.
काव्य : तेलकटाहगाथा आणि पज्जमधु ही दोन लहानशी काव्ये उल्लेखनीय आहेत. त्यांवर संस्कृत काव्याचा प्रभाव दिसून येतो. त्यांतील काही शब्द आणि व्याकरणाची रूपेदेखील पाली व्याकरणाप्रमाणे नसून संस्कृत व्याकरणानुसार बनविलेली दिसतात. ह्या काव्यात १०० (काही संस्करणांत ९८) गाथा आहेत. केलणिया येथे राज्य करणाऱ्या कल्याणी तिस्स राजाला (कार. ३०६ – २०७ इ.स.पू.) आपल्या राणीशी कल्याणिय नावाच्या भिक्षूचा संबंध असल्याचा संशय आला. त्या भिक्षूला उकळते तेल असलेल्या कढईत फेकून देण्याची शिक्षा राजाने दिली. तथापि तो निरपराध असल्यामुळे तो त्या कढईत सुखरूप राहिला व हे काव्य त्याने रचिले, अशी आख्यायिका आहे. ते खरोखरी कुणी लिहिले, हे अद्याप अज्ञातच आहे. तथापि त्याच्या कर्त्याचा बौद्धांच्या धार्मिक साहित्याशी उत्तम परिचय असला पाहिजे, हे ह्या काव्यावरून दिसून येते. पालीतील शतकसाहित्याचेच हे एक उदाहरण म्हणता येईल.
पज्जमधु हे बुद्धस्तुतिपर काव्य १०४ गाथांचे आहे. रूपसिद्धि ह्या व्याकरणग्रंथांचा कर्ता बुद्धप्पिय ह्याने हे काव्य रचिले आहे. पहिल्या ६९ गाथांमध्ये बुद्धाच्या रूपश्रीचे वर्णन असून पुढे त्याची प्रज्ञा, शिकवण तसेच संघ आणि निर्वाण ह्यांचे स्तवन आहे. ह्या कवितेवर सिंहली भाषेत एक स्पष्टीकरणात्मक टिप्पणी आढळते परंतु ती फारशी समाधानकारक नाही. पज्जमधूची शैली कृत्रिम असून तीत कल्पनाशक्तीची चमक फारशी जाणवत नाही. जिनचरित हे आणखी एक उल्लेखनीय काव्य. विविध छंदांत रचिलेल्या ४७० गाथा त्यात आहेत. बुद्धाचे जीवन हाच ह्या काव्याचा विषय. जातक-निदान कथेच्या आधारे ते निवेदिलेले आहे. तथापि ह्या आधाराला फारच चिकटून राहिल्यामुळे कवीच्या मुक्ताविष्काराला काहीसा वाव असल्याचे जाणवते. काहीशी हलीकीफुलकीच पण मोहक भाषा, वेधक, संपन्न वर्णने ही ह्या काव्याची वैशिष्ट्ये विलोभनीय आहेत. संस्कृतातील अभिजात काव्याचा प्रभाव जिनचरितावरही आढळतो. बौद्धांच्या संस्कृत साहित्यात बुद्धचरिताचे जे स्थान तेच पाली साहित्यात जिनचारिताला दिले जाते. तथापि ह्या काव्याने बुद्धाच्या जीवनावर कोणताही नवा प्रकाश टाकलेला नाही. गंधवंस आणि सद्धम्मसंगह ह्या दोन्ही ग्रंथांत जिनचरिताचा कर्ता मेघंकर हा असल्याचे म्हटले आहे. तो एक सिंहली भिक्षू होता. ‘वनरतन मेघंकर’ ह्या नावाने तो ओळखला जाई. लंकाधिपती पहिला भुवनेक बाहू (तेरावे शतक) ह्याच्या कारकीर्दीत तो होऊन गेला. ज्ञानप्राप्ती होईपर्यंतचे बुद्धाचे जीवन जिनालंकारात (२५० गाथा) वर्णिले आहे. संस्कृत काव्याच्या प्रभावापासून हेही मुक्त नाही.
पाली साहित्यातील अन्य काव्यग्रंथांत अनागतवंस, सद्धम्मोपायन पंचगतिदीपन ह्यांचा समावेश होतो. अनागतवंसात भविष्यात (अनागत) उत्पन्न होणाऱ्या बुद्ध मैत्रेयाचे जीवन रंगविले आहे. अनागतवंसाचे वेगवेगळे पाठ मिळतात आणि ते एकमेकांशी जुळत नाहीत. एक पाठ गद्यपद्यमिश्रित आहे, एक पूर्ण पद्यमय आहे, तर एकात भविष्यकालीन दहा बुद्धांचे जीवन गद्यात लिहिलेले आहे. पाली काव्याच्या दृष्टीने येथे फक्त पद्य पाठाचाच विचार करावयाचा आहे. त्यात १४२ गाथा आहेत. गौतम बुद्ध आणि सारिपुत्त (सारिपुत्र) ह्यांचा हा संवाद. सारिपुत्ताच्या विनंतीवरून गौतम बुद्ध मैत्रेय बुद्धाविषयी सांगू लागतो. गंधवंसाने अनागतवंसाचा कर्ता म्हणून कस्सपाचे नाव दिले आहे परंतु ह्या माहितीच्या खरेपणाबद्दल शंका वाटते. सुत्तपिटकांतर्गत बुद्धवंसात बारा कल्पांच्या कालावधीत होऊन गेलेल्या २४ बुद्धांचा वृत्तांत आलेला आहे. गौतम बुद्ध हा पंचविसावा बुद्ध. २४ बुद्धांचे वर्णन केल्यानंतर गौतम बुद्धाचे जीवन सांगून बुद्धवंस समाप्त झालेला आहे. तेव्हा सव्वीसाव्या मैत्रेय बुद्धाचे जीवन सांगणारे अनागतवंस हे बुद्धवंसात भर घालण्यासाठी लिहिले गेले असावे, असे वाटते.
सद्धम्मोपायन हे बौद्ध धर्मावरील एक महत्त्वाचे उद्बोधक काव्य होय. त्यात ६२९ कडवी असून त्याला उपोद्धात-उपसंहार आहेत. उपोद्धातात ‘ब्रह्मचारी बुद्धसोमपिय’ असे स्वतःचे नाव ह्या काव्याच्या कर्त्याने नमूद केले आहे. हा कवी श्रीलंकेतलाच असावा. तथापि हे काव्य अभयगिरी कविचक्रवर्ती आनंद ह्याने लिहिले आणि ब्रह्मचारी बुद्धसोमपियाला ते केवळ स्नेहापोटी अर्पण केले आहे, असेही एक मत आहे. बुद्धाने सांगितलेला मार्ग (सद्धम्म) ह्यात विवेचिला आहे. ह्या काव्याचे सामान्यतः दोन भाग पाडता येतील. पहिल्यात दुराचाराचे दुष्परिणाम आणि दुसऱ्यात सदाचाराचे सुपरिणाम. बौद्ध धर्माच्या जवळजवळ सर्वच मौलिक सिद्धांतांचा अंतर्भाव ह्यात झालेला आहे. काव्याची शैली सुबोध पण सुंदर आहे. गायगरने सद्धम्मोपायनाचा काळ चौदावे शतक असा मानलेला आहे परंतु त्याबाबत एकमत्य नाही.
पंचगतिदीपनात पाच गतीचे किंवा योनींचे वर्णन ११४ गाथांमध्ये दिलेले आहे. कायिक, वाचिक वा मानसिक अशी जी बरीवाईट कृत्ये माणसांच्या हातून घडतात, त्यांनुसार त्यांना योग्य ती गती प्राप्त होते, असे ह्या काव्यात म्हटले आहे. संजीव, कालसुत्त, संघात, रौख, महारौख अशा विविध प्रकारच्या नरकांची नावे ह्यात नमूद आहेत. काव्याची शैली प्रासादिक आहे. ह्या काव्याचा काळ आणि कर्ता अज्ञात आहे. विदुरूपोलपियतिस्सकृत महाकस्सपचरित (महाकश्यपचरित्र) हेही एक उल्लेखनीय काव्य. नेक्खम्मचम्पू हे पालीतील चंपूकाव्य. बुद्धाचे आपल्या घरातून अभिनिष्क्रमण हा त्याचा विषय आहे. रतनपंज नावाच्या एका थाय भिक्षूने जिनकालमालिनी नावाचा एक गद्यपद्यमिश्रित ग्रंथ १५१६ मध्ये रचिला. त्यात बुद्धाच्या पूर्वपीठिकेसह बुद्धाचे हकीकत असून भारतातील तीन संगीती, श्रीलंकेत बौद्ध धर्माची प्रतिष्ठापना व तेथील चौथी संगीती, श्रीलंकेतील राजांची परंपरा, तिच्यातील प्रत्येक राजाच्या कारकीर्दीची वर्षे ब्रह्मदेश, लाओस आणि थायलंड येथील बौद्ध धर्मास श्रीलंकेकडून मिळालेली देणं इ. वृत्तांतही आहे.
व्याकरण –कोश : पाली भाषेच्या अध्ययनास उपयुक्त असे व्याकरणग्रंथ रचिले गेले. ⇨ कच्चायन हा पाली भाषेचा आद्य व्याकरणकार समजला जातो. पाचव्या शतकाचा पूर्वार्ध आणि बारावे शतक ह्या कालमर्यादेत कच्चायन केव्हा तरी होऊन गेला असावा. संधिकप्प, नामकप्प, आख्यातकप्प आणि किब्बिधानकप्प ही कच्चायनाच्या व्याकरणाची चार मुख्य प्रकरणे असून त्यांतील सूत्रे विविध संस्करणांनुसार ६७२ ते ६७५ च्या आसपास आहेत. वैदिक संस्कृतशी असलेल्या पाली भाषेच्या संबंधाची दखल कच्चायनाने घेतलेली नाही, असे गायगरसारख्या विद्वानाने दाखवू दिले आहे. कच्चायनाचे व्याकरण लक्ष्मीनारायण तिवारी आणि बिरबल शर्मा ह्या दोन विद्वानांनी संपादिले आहे (१९६२). कच्चायनाच्या व्याकरणावर विमलबुद्धीची न्यास नावाची टीका आहे. छप्पदकृत सुत्तनिद्देस आणि महाविजितावीकृत कच्चायनवण्णना हेही कच्चायनाच्या व्याकरणातील महत्त्वाचे ग्रंथ होत.
रूपसिद्धि हा कच्चायनाच्या व्याकरण-संप्रदायातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. दक्षिण भारतातील बालादिच्च नावाच्या विहाराचा अध्यक्ष बुद्धप्पिय दीपंकर हा त्याचा कर्ता. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा ग्रंथ रचिला गेला. त्या ग्रंथाची एकूण ७ प्रकरणे असून सूत्रसंख्या ६६८ आहे. ह्या ग्रंथात कच्चयनाच्या व्याकरणातील सूत्रेच प्रक्रियेनुसार निराळ्या क्रमाने दिली आहेत. कच्चायन व्याकरणावर आधारलेला बालावतार हा आणखी एक ग्रंथ होय. पाली भाषेवरील उपलब्ध व्याकरणग्रंथांत हा सर्वांत छोटा. त्याचा कर्ता धर्मकीर्ती. सद्धम्मसंगहाचा कर्ता धर्मकीर्ती महास्वामी व बालावतारकर्ता धर्मकीर्ती एकच होत, असे डॉ. गायगरसारख्या विद्वानाचे मत आहे. मात्र गंधवंसानुसार ही रचना वाचिस्सराची (वागीश्वराची). हा वाचिस्सर सारिपुत्ताच्या शिष्यांपैकी एक. धर्मकीर्ती महासामीने हा लिहिला, असे मानल्यास ह्याचा काळ तेरावे-चौदावे शतक असा ठरतो, तर वाचिस्सर हा ह्याचा कर्ता मानल्यास ह्या ग्रंथाचा काळ बारावे-तेरावे शतक असा मानावा लागेल.
मोग्गल्लान किंवा मौदगल्यायन हा पाली व्याकरणाची दुसरी परंपरा स्थापन करणारा व्याकरणकार. श्रीलंकेतील अनुराधपुर येथील थूपारामात तो राहत असे. आपला व्याकरणग्रंथ त्याने राज परक्कमभुज (पराक्रमबाहू, ११५३ – ८६) ह्याच्या कारकीर्दीत रचिला. पाणिनी, कातंत्र आणि चंद्रगोमी ह्या व्याकरणकारांच्या ग्रंथांचा आधार मोग्गल्लानाने घेतला होता. त्याच्या व्याकरणाची एकूण सहा कांडे असून सूत्रे निरनिराळ्या संस्करणांनुसार ८१० ते ८१७ आहेत. श्रीलंकेतील केलनिया (कल्याणी), येथील विद्यालंकार मठ-विद्यापीठाने मोग्गल्लानव्याकरणाची परंपरा आस्थेने टिकविली आहे. आपल्या व्याकरणावर मोग्गल्लानाने स्वतःच वृत्ती आणि पंचिका (टीका) लिहिली.
मोग्गल्लानाचा शिष्य पियदस्सी (प्रियदर्शी) ह्याने पदसाधन हा मोग्गल्लान-व्याकरणावर आधारित असा व्याकरणग्रंथ लिहिला. कच्चायन व्याकरण व बालावतार ह्यांचे जे नाते, तेच मोग्गलान-व्याकरण आणि पदसाधन ह्यांचे आहे, असे म्हटले जाते. वनरतन मेधंकराचा (तेरावे शतक) पयोगसिद्धि हा मोग्गल्लानप्रणीत व्याकरणसंप्रदायातील एक उत्तम ग्रंथ आहे.
अग्गवंसनामक एका ब्रह्मी भिक्षूने लिहिलेल्या सद्दनीति (शब्दनीती) ह्या व्याकरणग्रंथाने पाली व्याकरणाची तिसरी परंपरा प्रस्थापित केली. हा ग्रंथ बाराव्या शतकात
(इ.स.सु. ११५४) लिहिला गेला असे परंपरा मानते. अग्गवंस हा ब्रह्मदेशातील अरिमद्द नपुर (हल्लीचे पगान) येथे राहणारा असून त्या देशाचा राजा नरपतिसिथु ह्याचा गुरू होता. पदमाला, धातुमाला आणि सुत्तमाला (सूत्रमाला) असे सद्दनीतीचे तीन विभाग आहेत. अग्गवंसाने कच्चायन, पाणिनी आदींच्या ग्रंथसाहाय्याने आपल्या ग्रंथाची रचना केली. धावत्थदीपनी ह्या पद्यबद्ध धातुसूचीत सद्दनीतीला अनुसरून धातूंचे संकलन केलेले आहे. ह्या धातुसूचीचा कर्ता अज्ञात आहे.
अभिधानप्पदीपिका आणि एकक्खर-कोस हे पालीतील दोन प्रसिद्ध शब्दकोश होत. अभिधानप्पदीपिकेचा कर्ता मोग्गल्लान हा होय. व्याकरणावर मोग्गल्लानाहून हा भिन्न असावा. संस्कृतातील अमरकोशाची पद्धती अभिधानप्पदीपिकेत स्वीकारण्यात आलेली आहे. त्यात एकूण तीन कांडे असून पहिल्या सग्गकंडात (स्वर्गकांडात) देवता, बुद्ध, शाक्यमुनी, देव-योनी, इंद्र, निर्वाण आदी शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. भूकंडात (भूकांडात) पृथ्वी आदी विषयांशी संबंधित असलेले शब्द आहेत, तर सामञ्ञ–कंडात (सामान्य कांडात) संकीर्णविषयक शब्दांचे पर्याय संकलित केलेले आहेत. ह्या तीन कांडांचेही विभाग पाडलेले आहेतच. ह्या ग्रंथाच्या अखेरच्या भागात परस्पर असदृश वाटणारे परंतु एकार्थक असे शब्द नमूद केलेले आहेत.
एकक्खर-कोस (पंधरावे शतक) ही ब्रह्मी भिक्षू सद्धम्मकित्ती (सद्धर्मकीर्ती) ह्याची रचना. एकाक्षरात्मक शब्दांची ही पद्यबद्ध सूची आहे. पाली भाषेतील वुत्तोदय (वृत्तोदय, बारावे शतक) हा छंदशास्त्रावरील ग्रंथ उल्लेखनीय आहे. स्थविर संघरक्खित हा त्याचा कर्ता. ह्यानेच सुबोधालंकार हा काव्यशास्त्रविषयक ग्रंथही पाली भाषेत लिहिला आहे.
संदर्भ : 1. Bapat, P.V. 2500 years of Buddhism, Delhi, 1959. 2. Bode, Mable, Pali Literature in Barun in Burma, London, 1909. 3. Law, B.C. A History of Pali Literature, 2 Vols., London, 1933. 4. Malalsekara, G.P. Pali Literature in Ceylon, London, 1928.
बापट, पु. वि.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..