पारा : सर्वसाधारण तापमानाला द्रवरूप असणारी एकमेव धातू. रासायनिक चिन्ह Hg. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोट़ॉनांची संख्या) ८० अणुभार २००.५९ आवर्त सारणीतील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) दुसऱ्या गटातील आणि जस्त-कॅडमियम मालेदील किंचित निळसर झाक असलेले चांदीसारख्या पांढर्याम रंगाचे एक मूलद्रव्य वितळबिंदू –३८.८९ से. उकळबिंदू ३५७.२५ से. द्रवरूप स्थितीतील घनता (२०० से. ला) १३.५४६ ग्रॅ/घ.सेंमी. घनरूप स्थितीतील घनता (-३८.८७ से. ला) १४.१७ ग्रॅ/घ.सेंमी. स्थिर नैसर्गिक समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) अणुभार १९६ (०.१५%), १९८ (१०.०%), १९९ (१६.९%), २०० (२३.१%), २०१ (१३.२%), २०२ (२९.८%), २०४ (६.८%) (कंसातील आकडे निसर्गातील त्या त्या समस्थानिकाचे प्रमाण दर्शवितात) किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या ८) समस्थानिकांचे अणुभार १९७ व २०५ ह्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचे अर्धायुष्य (किरणोत्सर्गाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) काही सेकंदांपासून ५१.५ दिवसापर्यंत असून ते कृत्रिम रीत्या तयार करतात विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूतील मांडणी) २, ८, १८, ३२, १८, २ संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) १ व २.

इतिहास : इसवी सनापूर्वी ज्ञात असलेल्या सात धातूंपैकी पारा ही एक धातू होय. इ. स. पू. १५०० मधील ईजिप्तमधील थडग्यांमध्ये पारा आढळून आला आहे. फार प्राचीन काळापासून चिनी व हिंदू लोकांना पाऱ्याची माहिती होती. भारतीय वैद्यकशास्त्रात पाऱ्याचा उल्लेख पारद, रस वा रसोत्तम या नावांनी केलेला आढळतो (आयुर्वेदीय माहितीकरिता ‘पारद’ ही नोंद पहावी). इ. स. पू. ३५० च्या सुमारास ॲरिस्टॉटल यांनी पार्या२चा उल्लेख केला होता. ग्रीक वैद्य डायस्कॉरिडीझ (इ.स.पू. पहिले शतक) यांनी पार्या चा काही औषधी गुणधर्मांचे वर्णन केले होते. इ. स. १५०० पर्यंत पाऱ्याचा औषध म्हणून फारसा उपयोग होत नव्हता. त्यानंतर पॅरासेल्सस यांनी औषधांत पाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास प्रारंभ केला. सहाव्या शतकातील किमयागार पाऱ्या करिता mercurius ही संज्ञा वापरीत असत. ही संज्ञा त्यांनी मर्क्युरी (बुध) या ग्रहावरून घेतली असावी. Hydragyrum म्हणजे द्रव चांदी यावरून Hg ही संज्ञा आली आहे. पाऱ्या)ला त्याचा रंग व त्याची गतिशीलता यांवरून क्विक सिल्व्हर असेही म्हणतात.

इ. स. पू. ४००-१५० च्या सुमारास स्पेनमधील आल्मादेन येथील खाणीतून प्रथम⇨हिंगूळ (सिन्नाबार, रेड सल्फाइड HgS) बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सतत सु. २,१०० वर्षे त्या खाणीतून हिंगूळ काढूनही अद्यापिही ती खाण पाऱ्याच्या खनिजाचा एक प्रमुख उदगम मानली जाते. त्यातील धातुकात (कच्च्या स्वरूपातील धातूत) पाऱ्याचे प्रमाण सर्वांत जास्त असून ते सरासरी ०.५ – १.२ % असते पण काही वेळा ते १० % इतकेही आढळले आहे. यूगोस्लाव्हियातील (पूर्वी इटलीतील) ईंद्रीया येथील पाऱ्याच्या खाणीचा १४९० मध्ये शोध लागला. इटलीतील आब्बादीया सान साल्व्हातॉरे येथील खाणही महत्त्वाची मानली जाते. पेरू देशात १५६५ नंतर, अमेरिकेत कॅलिफोर्नियातील न्यू आल्मादेन येथे १८४५ नंतर पाऱ्याच्या खनिजाचे खाणकाम सुरू झाले. सोने-चांदी यांच्या खनिजांपासून त्या धातू मिळविण्यासाठी पारदमेलीय (पाऱ्याबरोबर मिश्रधातू तयार करण्याच्या) पद्धतीचा उपयोग करावा लागत असल्यामुळे तीमध्ये पारा हा अत्यावश्यक समजला जात असे [→चांदी].

इ. स. १७३६ मध्ये सायबीरियात तापमापकातील पारा गोठल्याचे आढळून आले. १७५९ मध्ये जे. ए. ब्राउन यांनी पारा गोठवून त्या स्थितीत तो वर्धनशील असतो असे सिद्ध केले. यावरून पारा धातू असल्याचे मान्य करण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी १९४१ मध्ये पाऱ्याचे जागतिक उत्पादन सु. ९,४६५ टन होते. महायुद्ध संपल्यानंतर उत्पादनात प्रचंड घट  होऊन १९४८ साली ते सु. ३,६८३ टन होते. जगातील प्रमुख उत्पादक देशांतील १९७१ व १९७५ सालचे पाऱ्याचे उत्पादन कोष्टकात दिले आहे.

आढळ : पारा निसर्गात मुक्त रूपात अल्प प्रमाणात आढळतो तथापि तो प्रामुख्याने संयुगांच्या स्वरूपातच उपलब्ध होतो. हिंगूळ हे पार्या्चे महत्त्वाचे खनिज असून त्याशिवाय सेलेनाइडे, टेल्युराइडे व क्लोराइडे या खनिजांमध्येही पारा आढळून येतो. आर्थिक दृष्ट्या हिंगूळ हेच महत्त्वाचे खनिज होय. अग्निज खडकांत पार्यावचे प्रमाण सु. १०-७% इतके असते. पृथ्वीच्या १६ किमी. जाडीच्या बाह्य स्तरातील पार्याचचे प्रमाण ५ X १०-५% असावे, असा अंदाज करण्यात आलेला आहे. स्पेन, इटली, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको, कॅनडा, ब्राझील, पेरू, चीन, जपान, रशिया, हंगेरी, यूगोस्लाव्हिया, जर्मनी इ. देशांत पाऱ्याची खनिजे आढळतात. पाऱ्याचे उत्पादन करण्यायोग्य असे पाऱ्याच्या धातुकांचे साठे भारतात सापडलेले नाहीत.

प्राप्ती : हिंगुळापासून पारा मिळविताना त्यावर पुढील क्रिया करतात. प्रथम हिंगुळाची बारीक पूड करून त्यातून पाऱ्याचे प्रमाण जास्त असलेला भाग वेगळा करतात व उरलेल्या भागापासून फेनप्लवन क्रियेने [→प्लवन] पाऱ्याचे प्रमाण वाढविलेला भाग तयार करतात. वरील सर्व भाग एकत्र करून उभ्या किंवा तिरप्या फिरत्या भट्टीत गरम हवेने भाजतात. पाऱ्याच्या उकळबिंदूपेक्षा जास्त तापमान झाल्यावर खनिजातील गंधक ऑक्सिजनाशी संयोग पावते व पाऱ्याचे बाष्प होते (HgS + O2→ Hg + So2). हे बाष्प शीतकातून नेऊन थंड करतात व तळाशी उघडी तोंडे असलेल्या नळ्यांतून पाठवून पाण्याच्या तळाशी पारा गोळा करतात. याबरोबर काजळी, डांबर इ. मलद्रव्ये असतात. त्यापासून पारा (कापडातून गाळून, निर्वात ऊर्ध्वपातन इ.) विविध प्रकारांनी शुद्ध करतात आणि ४५ सेंमी. लांब व १० सेंमी. जाड अशा विशिष्ट आकाराच्या लोखंडी पात्रांमध्ये भरतात. प्रत्येक पात्रात ३४.५ किग्रॅ. पारा असतो. गरम हवेने धातुक भाजण्याऐवजी धातुकामध्ये लोह घालून (HgS + Fe→ Hg + FeS) किंवा चुनकळी घालून (4HgS + 4CaO→ 4Hg + 3CaS + CaSO4)⇨क्षपणाने धातुरूप पारा मिळविला जातो.

गुणधर्म : पार्या4चा घनफळ प्रसरण गुणांक सापेक्षतः जास्त (०.०००१८) आहे. तसेच जसजसे त्याचे तापमान वाढत जाते तसतसा त्याचा बाष्पदाब जलद वाढत जातो. उदा., -३० से. ला ४.७८ X १०-६ मिमी. ० से. ला १.८५ X १०-४ मिमी. १००० से. ला २.७३ X १०-१ मिमी. व ३५६.९ से. ला ७६ मिमी. बाष्पदाब असतो. ० से. ला पाऱ्याची उष्णता संवाहकता चांदीच्या २.२ % असते, तर विद्युत् संवाहकता १.५८% असते. पाऱ्याचा पृष्ठताण पाण्याच्या जवळजवळ ६ पट असल्याने (५०५ डाइन/सेंमी.) संपर्क आलेल्या पृष्ठाशी तो चिकटत नाही, म्हणून पार्या.चा उपयोग तापमानाकरिता करतात [→तापमापन]. ८% थॅलियम व पारा यांच्या मिश्रधातूचा वितळबिंदू कमी असल्याने ती -६० से. पर्यंतचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. विद्युत् रोधाच्या आंतरराष्ट्रीय एककाची-ओहमची-व्याख्या पार्या च्या विद्युत् संवाहकतेवर आधारलेली आहे. उच्च घनता व कमी बाष्पदाब यांमुळे त्याचा दाबमापनासाठी उपयोग करतात [→दाब व दाबमापन]. पारा आणि त्याची लवणे प्रतिचुंबकीय [→चुंबकत्व] असतात. पार्यानचे घनीभवन केल्यास धातूचे आकुंचन होते व समांतर षट्फलकीय स्फटिक तयार होतात. या वेळी पारा अतिशय तन्य (ताणता येणारा) असतो.

शुद्ध पारा स्थिर असून सर्वसाधारण तापमानास त्यावर कोरड्या स्थितीतील हवा, ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड, अमोनिया वा नायट्रस ऑक्साइड यांचा परिणाम होत नाही. आर्द्र हवेत जास्त काळ पारा उघडा राहिल्यास त्यावर ऑक्साइडाचा पातळ थर तयार होतो. हवा वा ऑक्सिजन यांच्या सान्निध्यात पारा बराच काळ तापविल्यास लाल रंगाचे मर्क्युरी ऑक्साइड बनते व ५०० से. च्या पुढे त्याचे पारा व ऑक्सिजन यांत रूपांतर होते. गंधक व हॅलोजने यांच्याशी पाऱ्याची जलद विक्रीया होते. पाऱ्याची फॉस्फरसाबरोबर विक्रिया होत नाही. हवारहित स्थितीत पारा व हायड्रोक्लोरिक अम्ल यांची विक्रिया होत नाही. विरल (विद्रावात प्रमाण कमी असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लाचीही पाऱ्यावर विक्रिया होत नाही पण संहत (विद्रावात प्रमाण जास्त असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लाची पाऱ्याशी विक्रिया होते. संहत वा विरल नायट्रिक अम्लात पारा विरघळतो. अम्ल व पारा यांची विक्रिया होत असताना, पारा अतिरिक्त असल्यास वा उष्णतेचा वापर न केल्यास मर्क्युरस संयुगे आणि उष्णता वापरल्यास वा अम्ल अतिरिक्त असल्यास मर्क्युरिक संयुगे तयार होतात. पार्याआची बरीच संयुगे उत्प्रेरकीय (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविण्याचा) गुणधर्म दाखवितात. पारा वसेबरोबर (स्निग्ध पदार्थाबरोबर) खलून त्याचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण) बनविता येते.


अभिज्ञान : (अस्तित्व ओळखणे). पाऱ्याचे संयुग व क्लोराइड यांची विक्रिया होऊन पांढरा साका मिळतो. या साक्याची अमोनियाशी विक्रिया केल्यास तो काळा होतो. यावरून मर्क्युरस संयुगे ओळखता येतात. मर्क्युरस क्लोराइडाचा साका करून व तो वजन करून मर्क्युरस संयुगांचे परिमाणात्मक अभिज्ञान करतात. संयुगाचा हायड्रोक्लोरिक अम्लातील विद्राव व स्टॅनस क्लोराइड यांची विक्रिया करून पांढरा साका मिळतो व जादा स्टॅनस क्लोराइडामुळे साका करडा होतो. यामुळे मर्क्युरिक संयुगे ओळखता येतात. संयुगाचा सल्फाइड स्वरूपातील साका करून व वजन करून वा आयोडाइडाने⇨अनुमापन करून मर्क्युरिक संयुगाचे परिमाणात्मक अभिज्ञान केले जाते.

उपयोग : पाऱ्याच्या विद्युत् घटात [→विद्युत् घट] आणि इतर विद्युत् उपकरणांत [→उदा., विद्युत् स्विच, पारा बाष्प एकदिशकारक →एकदिशकारक], दाबमापकांत, तापमापकांत, इतर औद्योगिक व नियंत्रक उपकरणांत, विद्युत् विच्छेदनाने (विद्रावातून विद्युत् प्रवाह पाठवून घटक अलग करण्याच्या प्रक्रियेने) क्लोरीन व दाहक (कॉस्टिक) सोडा यांची निर्मिती करण्यामध्ये ऋणाग्र म्हणून, अणुकेंद्रीय अपशिष्ट द्रव्यांच्या (अणुकेंद्रीय विक्रियकांमध्ये निर्माण होणाऱ्या निरुपयोगी किरणोत्सर्गी द्रव्यांच्या) विद्युत् विच्छेदनीय शुद्धीकरणात इत्यादींसाठी पाऱ्याचा उपयोग करण्यात येतो. वायुरप पारा आयनीभूत (विद्युत् भारित अणूंमध्ये रूपांतरित) झाल्याशिवाय त्यातून विजेचे संवहन होत नाही. आयनीभूत पारा होण्यास १०.३९ व्होल्ट इतके वर्चस् (दाब) लागते. अशा वायुरूप पाऱ्यातून विद्युत् प्रवाह सोडल्यास त्यातून जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरण असणारा प्रकाश मिळतो. याशिवाय उच्च दाबाखाली असलेल्या  पार्या च्या बाष्पाचे दिवे रस्त्यांवर प्रकाशासाठी वापरतात [→विद्युत् दिवे]. इतर धातू व पारा यांपासून तयार केलेल्या⇨पारदमेलांचा उपयोग दात भरण्याच्या सिमेंटात, क्षपणकारक म्हणून इत्यादींसाठी करण्यात येतो. पारायुक्त⇨कवकनाशकांचा बीजसंरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो.

संयुगे : ज्या संयुगांत पाऱ्याची संयुजा एक असते त्यांना मर्क्युरस व ज्या संयुगांत त्याची संयुजा दोन असते त्यांना मर्क्युरिक संयुगे म्हणतात. सर्वसामान्यतः पाऱ्याची संयुगे ही तापविल्यास बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारी) व पारा देणारी अशी असतात, तर क्लोराइडांसारखी अपवादात्मक संयुगे अपघटन न होता (घटकद्रव्ये अलग न होता) संप्लवित होणारी (घनरूपातून एकदम वायुरूपात जाणारी) असतात. मर्क्युरस सल्फाइड व क्लोराइड वगळता पाऱ्या)ची इतर सर्व संयुगे विषारी असतात. मर्क्युरस संयुगे मर्क्युरिक संयुगांपेक्षा कमी विरघळणारी व कमी जलीय विच्छेदित होणारी (पाण्याच्या विक्रियेने घटकद्रव्ये अलग होणारी) असतात.

मर्क्युरस क्लोराइड (कॅलोमेल, Hg2Cl2) मोठ्या प्रमाणावर दोन पद्धतींनी तयार करतात. त्याची पांढऱ्या रंगाची पूड असून ती पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारी) आहे व तापविल्यास संप्लवित होते. त्याचा उपयोग⇨पीडकनाशक म्हणून तसेच जंतुनाशक मलमात करतात. ते एके काळी रेचक म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते [→कॅलोमेल]. मर्क्युरस क्लोराइड (करोझिव्ह सब्लिमेट, HgCl2) हे व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे संयुग आहे. त्याचे पांढरे स्फटिक असून ते ३०० से. ला संप्लवित होते. त्याचा उपयोग कवकनाशक, कार्बनी विक्रियांत उत्प्रेरक म्हणून, छायाचित्रणात, औषधात पूतिरोधक (सूक्ष्मजंतूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे) म्हणून तसेच काही पार्याहच्या संयुगांच्या निर्मितीत केला जातो. मर्क्युरस आयोडाइड (HgI) हे सतेज पिवळ्या रंगाच्या चूर्णरूपाचे असून⇨उपदंशांच्या चिकित्सेत त्याचा उपयोग करण्यात येतो. मर्क्युरस ब्रोमाइड (Hg2Br2) व आयोडाइड (Hg2I2) तयार करतात पण ती महत्त्वाची नाहीत. मर्क्युरस ब्रोमाइड (Hg2Br2) व मर्क्युरिक आयोडाइड (HgI2) यांचा उपयोग औषधांत केला जातो. मर्क्युरिक फ्ल्युओराइड (HgF2) हे संयुग तयार करता येते पण ते महत्त्वाचे नाही.

मर्क्युरस नायट्रेट [Hg2(NO3)2.2H2O] याचे पांढऱ्या रंगाचे स्फटिक असून ते पाण्यात विरघळत नाही. याचा उपयोग औषधांत व सौंदर्यप्रसाधनांत करतात. मर्क्युरिक नायट्रेट [Hg(NO3)2.2H2O] याचे पांढरे चिघळणारे स्फटिक असतात. त्याचा उपयोग औषधांत, फेल्ट निर्मितीत, मर्क्युरिक फल्मिनेट व इतर संयुगे तयार करण्यासाठी होतो.

मर्क्युरस ऑक्साइड (Hg2O) हे काळे चूर्ण असून ते विषारी आहे. मर्क्युरिक ऑक्साइड (HgO) हे पिवळ्या व लाल रंगात आढळते. पिवळे ऑक्साइड जंतुनाशक, कवकनाशक व पीडकनाशक असून ते इतर संयुगांच्या निर्मितीत वापरतात. लाल ऑक्साइडाचा उपयोग जंतुनाशक म्हणून व पाऱ्याचा इतर संयुगांच्या निर्मितीत करतात. तसेच त्याचा उपयोग विद्युत् घटात करतात. त्याचे हायड्रॉक्साइड व पेरॉक्साइड आढळत नाही.

औद्योगिक दृष्ट्या पाऱ्याची सल्फेटे महत्त्वाची नाहीत. मर्क्युरस सल्फेट (Hg2SO4) याचा उपयोग काही विद्युत् घटांत आणि मर्क्युरिक सल्फेट (HgSO4) याचा उपयोग उत्प्रेरक व काही वेळा पायराइटापासून सोने व चांदी यांच्या निष्कर्षणासाठी (धातू मिळविण्यासाठी) करतात. मर्क्युरस सल्फाइड (Hg2S) हे महत्त्वाचे संयुग नाही. मर्क्युरिक सल्फाइड (HgS) हे तीन रूपांत आढळते. ते व्हर्मिलॉन या नावानेही ओळखले जाते. हे निसर्गात हिंगुळाच्या स्वरूपात आढळते.

यांशिवाय मर्क्युरी अँझाइडे [HgN3 Hg(N3)2] व मर्क्युरी फल्मिनेट [Hg(ONC)2] या संयुगांचा उपयोग स्फोटक पदार्थ म्हणून करतात.

पाऱ्याची जटिल हॅलाइडे, जटिल सायनाइडे, जटिल सल्फाइडे आणि पारा-अमोनिया यांची संयुगे अशी जटिल संयुगे तयार होतात. मर्क्युरिक ॲसिटामाइड [Hg(NHCOCH3)2], मर्क्युरिक ॲसिटेट [Hg(CH3COO)2], मर्क्युरिक बेंझोएट [Hg(C7H5O2)2.H2O], मर्क्युरिक लॅक्टेट [Hg(C3H5O3)2], मर्क्युरिक ओलिएट, मर्क्युरिक ऑक्झॅलेट (HgC3O4), मर्क्युरिक सॅलिसिटेट इ. कार्बनी संयुगे तयार करण्यात आली आहेत. त्यांचा उपयोग उत्प्रेरक, औषधे इत्यादींसाठी करतात. पार्या ची विविध संयुगे सामान्यतः पूतिरोधके, मूत्रल (लघवी साफ करणारी) आणि उपदंशरोधक म्हणून औषधाच्या स्वरूपात. मरब्रोमीन (मर्क्युरोक्रोम, C20H7O5Br2HgOHNa2), थिमेरोसाल इ. पूतिरोधके म्हणून मर्क्युरिक सॅलिसिलेट व मर्क्युरिक सक्सिनिमाइड यांचा उपदंशरोधके म्हणून व मर्क्युमॅटिलीन इ. मूत्रल म्हणून वापरतात. धातुरूप पारा व त्याची अविद्राव्य संयुगे यांपासून तयार केलेली मलमे वापरात आहेत.

विषारीपणा : पारा व त्याची बहुतेक सर्व संयुगे मानवाला व प्राण्यांना विषारी आहेत. पाऱ्याचे बाष्प व धूळ नाकावाटे तसेच त्वचेवाटे शरीरात गेल्यास विपरीत परिणाम होतो. मर्क्युरिक आयन ज्या संयुगांमुळे शरीरातील कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) तयार होतात ती संयुगे विषारी असतात. मर्क्युरिक क्लोराइड हे सर्वांत जास्त विषारी संयुग आहे.

नैसर्गिक अवस्थेत वाढविलेल्या अन्नपदार्थांमध्ये अत्यल्प प्रमाणात पारा असतो. अन्न म्हणून वापरण्यात येणार्या् मांसात सरासरी दशलक्ष भागांमध्ये ०.०१ भागापेक्षा कमी पारा असतो असे आढळून आले आहे (अन्नामध्ये दर दशलक्ष भागांमध्ये ०.०५ भाग ही मर्यादा पाऱ्याकरिता सर्वसामान्यपणे ग्राह्य मानण्यात येते). माशांमध्ये पाऱ्याचे प्रमाण याच्या दुप्पट व वनस्पतींमध्ये दीडपट असल्याचे दिसून येते. काही शैवलांमधील पाऱ्याचे प्रमाण ती ज्या सागरी पाण्यात वाढतात त्यातील पार्यापच्या प्रमाणापेक्षा १०० पट असते. ही शैवले खाणारे मासे हा पारा अधिक संहत करतात व या माशांवर जगणारे प्राणी त्याचे प्रमाण आणखी वाढवितात.

मानवाच्या आहारात पाऱ्याचे अत्यल्प प्रमाण असलेल्या वनस्पती, प्राणी व मासे यांचा समावेश अनिवार्यपणे होत आलेला आहे. तथापि कोळसा व खनिज तेल यांसारख्या इंधनांच्या अमर्याद वापरामुळे वातावरणातील पाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय पीडकनाशके व कवकनाशके म्हणून पाऱ्याची विविध कार्बनी संयुगे वापरात आहेत. पाऱ्याची इतर संयुगेही बीजसंरक्षक व कवकनाशक म्हणून वापरण्यात येतात. या सर्वांमुळे सगळ्या पर्यावरणातील पाऱ्याचे प्रमाण वाढत चालले असून त्यामध्ये मानवाला सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या कार्बनी स्वरूपातील पाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. जेव्हा जलावरणात मूलद्रव्यरूपी (किंवा अकार्बनी) पारा सोडला जातो, तेव्हा त्याचा पाण्यातील सजीवांमुळे मिथिल वा इतर कार्बनी शृंखलांद्वारे संयोग होऊन त्याचे पाऱ्याच्या कार्बनी संयुगांत रूपांतर होते, असे सिद्ध झाले आहे.

पाऱ्याची चिरकारी (दीर्घकालीन) विषबाधा ही दीर्घकाल अल्प प्रमाणातील पाऱ्याशी सातत्याने संबंध येण्यामुळे होऊ शकते (उदा., ज्या उद्योगात पारा अथवा त्याची संयुगे वापरावी लागतात अशा उद्योगात). या विषबाधेमुळे हिरड्या लाल होऊन त्यांतून रक्त येणे, भूक मंदावणे, लाळ सुटणे, पचनक्रियेत अडथळा येणे, पांडुरोग (ॲनिमिया), मूत्रपिंडात बिघाड होणे, बहिरेपणा इ. लक्षणे आणि  केंद्रीय तंत्रिका तंत्रात [→तंत्रिका तंत्र] विकृती निर्माण झाल्याने बधिरता, अडखळती चाल, दृष्टिक्षेत्राचे आकुंचन (‘विवर दृष्टी’), अस्पष्ट बोलणे व कापरे भरणे ही लक्षणे आढळून येतात. अशा रुग्णाला पाऱ्याच्या वा त्याच्या संयुगांच्या संपर्कापासून दूर ठेवणे व त्याच्या पचनक्रियेत सुधारणा करणे अत्यावश्यक असते. काही वेळा अशा चिकित्सेचा परिणाम फार हळूहळू दिसून येतो.

पाऱ्याची विद्राव्य लवणे पोटात गेल्यास तीव्र विषबाधा होते. ही लवणे क्षोभकारक विषे असतात. मर्क्युरिक क्लोराइडाची विषबाधा झाल्यास शक्य तितक्या लवकर तज्ञ डॉक्टरांना बोलावणे इष्ट ठरते. मर्क्युरिक क्लोराइड ज्या प्रथिनांच्या संपर्कात येते त्या प्रथिनांचा अविद्राव्य साका बनतो आणि त्यामुळे तोंड व घसा राखी रंगाचे दिसू लागतात. हे लवण पोटात गेल्यावर सामान्यतः काही मिनिटांतच उलटी होते. उलटी होण्यापूर्वी गेलेला काळ व ती पुरती झालेली आहे की नाही हे चिकित्सा सुरू करण्यापूर्वी माहीत असणे आवश्यक असते. कच्च्या अंड्यातील बलक वा दूध यांच्या स्वरूपात प्रथिने देऊन नंतर पोटातील अद्याप शोषण न झालेल्या मर्क्युरिक आयनांचा निचरा करण्यासाठी अथवा ते निष्क्रिय करण्यासाठी उलटी होणारी औषधे देतात व पोट विशिष्ट नळीने साफ करतात. याकरिता प्राणिज कोळशाचाही उपयोग करतात. यानंतर सर्व शरीरावर होणाऱ्या विषबाधेच्या परिणामावर योग्य उपचार करावे लागतात.

पहा : पारद पारदमेल.

संदर्भ : 1. Bidstrup, P.L. Toxicity of Mercury and its Compounds, New York, 1964. 2. King, C. V. and others, Mercury and its Compounds, New York, 1957. 3. Partington, J. R. General and Inorganic Chemistry, London, 1966. 4. Rochow, E. G. Hurd, D. T. Lewis, R. N. Chemistry of Organo-metalic Compounds, New York, 1957. 5. Sidgwick, N. V. The Chemical Elements and their Compounds, Vol. I, London, 1950.                       

जोशी, भा. गो.