पाध्ये, प्रभाकर : (४ जानेवरी १९०९ – ). आधुनिक मराठी साहित्यिक, सौंदर्यमीमांसक, पत्रकार व विचारवंत. रत्नगिरी जिल्ह्यातील लांजे येथे जन्म. शिक्षण रत्नागिरी, मुंबई आणि पुणे येथे. १९३२ साली ते बी.ए. झाले. त्यानंतर प्रतिभा, चित्रा, धनुर्धारी (संपादक, १९३९–४५), दैनिक नवशक्ती (संपादक, १९४६–५३) ह्या नियतकालिकांत त्यांनी काम केले. नवशक्तीत असताना एक तडफदार व व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक झाला. तथापि नवशक्तीच्या संचालकांशी गंभीर मतभेद झाल्यामुळे ते त्या पत्रातून बाहेर पडले. त्यानंतर ‘इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’या संस्थेचे सचिव (१९५३–५४) व ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’चे आशियाई प्रतिनिधी (१९५५–६७) ह्या नात्यांनी त्यांनी काम केले. १९६७ पासून ‘सेंटर फॉर इंडियन रायटर्स’ ह्या संस्थेचे ते संचालक आहेत. कामाच्या निमित्ताने जगभरचा प्रवास त्यांना घडला.
आजकालचा महाराष्ट्र (१९३५) हे त्यांचे पहिले पुस्तक त्यांनी श्री. रा. टिकेकर ह्यांच्या सहकार्याने लिहिले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांत कलेची क्षितिजे (१९४२), मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा (१९७०), पाटणकरांची सौंदर्यमीमांसा (१९७७), आस्वाद (१९७७), वामन मल्हार आणि विचारसौंदर्य (१९७८) ह्यांसारख्या समीक्षात्मक आणि सौंदर्यशास्त्रविषयक ग्रंथांचा समावेश होतो. नवे जग नवी क्षितिजे (१९५३), अगस्तीच्या अंगणात (१९५७), उडता गालिचा (१९५९), तोकोनोमा (१९६१), हिरवी उन्हे (१९६४) ही प्रवासावर्णनेही त्यांनी लिहिली आहेत. व्यक्तिवेध ह्या नावाने त्यांनी लिहिलेली शब्दचित्रे १९७३ मध्ये प्रसिद्ध झाली. निळे दिवस (१९७६) हा त्यांचा वेचक कथांचा संग्रह.
कलेची क्षितिजे ह्या त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथात त्यांनी कलेच्या स्वरूपासंबंधी मूलभूत असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. कलासाहित्यासंबंधीचा मार्क्सवादी दृष्टिकोण, कलासाहित्यातून होणारा मतप्रचार, कला हे निवेदन की आविष्कार, कलासाहित्य आणि विज्ञान ह्यांचे संबंध आदी तत्कालीन अनेक ज्वलंत प्रश्नांचा विचार त्यांनी केला कलाविचारातील काही मौलिक संकल्पनाही त्यांनी त्यांतून मांडल्या. मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा या ग्रंथात मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांची सुसूत्र आणि समतोल मीमांसा त्यांनी केलेली आहे. मर्ढेकरांच्या सौंदर्यविचाराचे मर्म नेमकेपणाने विशद करून मराठीतील कलाविचाराचा ऐतिहासिक दृष्टीने त्यांनी परामर्श घेतला. पाटणकरांच्या सौंदर्यमीमांसेवर त्यांनी केलेले भाष्यही असेच समतोल व मूलग्राही आहे. पाध्यांचा स्वतःचा सौंदर्यविचार कलेची क्षितिजे ह्या ग्रंथातच बीजरूपाने व्यक्त झालेला दिसतो. मनातील चैतन्यशक्तीच्या मूलस्रोताला जाग आणणे हे कलेचे कार्य आहे, हे पाध्यांचे प्रमुख सूत्र होय. कलाक्षेत्रात प्रतिमेचे कार्य प्रतिभेच्या साधनेचे असते कोणतीही कलाकृती, ह्या दृष्टीने पाहता, एक प्रतिमा असते, असे ते मानतात. मराठी कलाविचार प्रगत करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. वामन मल्हार आणि विचारसौंदर्य ह्या आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत पाध्ये यांनी प्रतिभेसंबंधीचा एक नवाच सिद्धान्त मांडला आहे. प्रतिभा व कल्पनाशक्ती ह्या दोन गोष्टी बऱ्याचशा स्वतंत्र आहेत, असे ते मानतात.
पाध्ये यांचे रसिक, बहुश्रुत आणि कल्पक व्यक्तिमत्त्व त्यांच्या प्रवासवर्णनांतून प्रभावीपणे प्रकटले आहे. त्यांनी लिहिलेल्या कथा मुख्यतः वातावरणप्रधान आणि मनोविश्लेषणात्मक आहेत.
एक विचारवंत म्हणून पाध्ये यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर महत्त्वाचे लेखन केले आहे. त्यातील ग्रंथनिविष्ट लेखनात समाजवादाचा पुनर्जन्म (१९५२) आणि युगोस्लाव्हिया (इंग्रजी, १९५२) ह्यांचा उल्लेख करावा लागेल.
१९५० मध्ये झालेल्या गोमंतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५२ मध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले.
जाधव, रा. ग.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..