पादाभ : कोशिकेच्या (पेशीच्या) पृष्ठापासून निघणाऱ्या, हालचाल करू शकणाऱ्या परंतु तात्पुरत्या असणाऱ्या कोशिकीय प्रवर्धांना (वाढींना) पादाभ म्हणतात. ⇨अमीबासारखे आदिम प्राणी (आदिजीव) यांचा उपयोग हालचाल करण्यासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी आणि अन्नग्रहणासाठी करतात. पादाभ हे अमीबांचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. ⇨कशाभिका आणि ⇨पक्ष्माभिकांप्रमाणे पादाभ कायमचे नसतात. एकाच वेळी अनेक पादाभ प्राण्याला निर्माण करता येतात. पादाभांच्या हालचाली आणि निर्मिती सूत्रबद्ध व लयबद्ध नसतात. काही पक्ष्माभिकामय प्राण्यांमध्ये देहगुही (छाती व उदर यांत असलेल्या इंद्रियांच्या म्हणजे अंतस्त्यांच्या भोवतील पोकळी असलेल्या) प्राण्यांतील शोषक अंतस्त्यस्तरामध्ये, तसेच कित्येक प्राण्यांच्या (विशेषतः स्तनी वर्गातील प्राण्यांच्या) रक्तातील पांढऱ्या कोशिकांमध्ये पादाभ आढळून येतात.
पादाभांच्या साहाय्याने करण्यात येणारी हालचाल ही अत्यंत आदिम स्वरूपाची समजली जाते. पादाभांचे आकार आणि आकारानुरूप त्यांची कार्ये वेगवेगळी असतात. अमिबामध्ये असणारे रुंद व बोथट पादाभ हालचाल व अन्नग्रहणासाठी उपयोगी पडतात. ज्या दिशेला अमीबाला जायचे असेल त्या दिशेला पादाभ पसरला जातो व मागील भाग आकुंचित केला जाऊन पुढे ओढला जातो. पुनरावृत्तीने होणाऱ्या या दोन क्रियांमुळे अमीबा इच्छित दिशेला इच्छित स्थळी पोहोचू शकतो. अन्नकणाच्या अस्तित्वाची अमीबाला द्रवातील तरंगांमुळे चाहूल लागली की, अमीबा पादाभांच्या साहाय्याने अन्नकणापर्यंत पोहोचून अन्नकण पादाभांनी संपूर्णपणे झाकून टाकतो. पादाभ अन्नकणाच्या सर्व बाजूंनी पसरून त्याला पूर्णपणे प्राणिशरीरात सामावून घेतात. अन्नकण जीवद्रव्याच्या (जीवनाला आधारभूत असणाऱ्या कोशिकेतील द्रव्याच्या) सान्निध्यात आला म्हणजे त्याचे पूर्ण पचन होते. टेस्टॅशियामध्ये आढळणारे दोरीसारखे लांब पादाभ चिकट द्रवयुक्त असतात. ते कुठल्याही पृष्ठभागाला घट्ट चिकटू शकतात व त्यांच्या साहाय्याने प्राणी स्वतःला पुढे ओढू शकतो. हे पादाभ अन्नकणच्या सान्निध्यात आले की, त्याला चिकटतात आणि मग त्या अन्नकणासकट शरीरात ओढले जातात व त्याचे यथावकाश जीवद्रव्याकडून पचन होते. फोरॅमिनीफेरांमध्ये पादाभांच्या नाजुक शाखांचे जाळेच कोशिकेच्या कवचाबाहेर पसरलेले दिसते. या शाखांच्या जाळ्यातून होणारी जीवद्रव्याची हालचाल स्पष्टपणे दिसून येते. या जाळ्यात अन्नकण अडकून बसतात व ते प्राण्याला अन्न म्हणून उपयोगात आणता येतात.
पादाभांच्या निर्मितीसंबंधी अनेक निरनिराळ्या उपपत्त्या सांगितल्या जातात. त्यांतील सर्वमान्य झालेली उपपत्ती पुढीलप्रमाणे होय : पादाभांची निर्मिती जीवद्रव्याच्या अर्धघनस्थितीतून द्रवस्थितीकडे व द्रवस्थितीकडून पुन्हा अर्धघनस्थितकीकडे या अनुक्रमांनी होणाऱ्या क्रियांचा परिणाम होय. ज्या कोशिका पादाभ निर्माण करतात त्यांच्या भित्ती लवचिक अर्धद्रव पदार्थाच्या बनलेल्या असतात. ज्या वेळी पादाभनिर्मितीची प्रत्यक्ष क्रिया सुरू होते त्या वेळी ज्या बाजूने पादाभ क्षेपित केला जाणार असेल त्या भागातील जीवद्रव्य द्रवस्थितीत जाऊ लागते व ज्या दिशेला पादाभ पसरवायचा असेल त्या दिशेकडे पातळ होऊन पसरू लागते. कोशिकाभित्ती लवचिक असल्यामुळे द्रव जीवद्रव्य तिला पाहिजे तसा आकार देऊ शकते. त्याच वेळी कोशिकेतील बाकीच्या जीवद्रव्याची अर्धघनस्थितीदेखील अनुक्रमे पादाभाकडून पुढच्या बाजूला द्रवस्थितीत क्रमाक्रमाने रूपांतरित होत जाते आणि या सर्व प्रक्रियांमुळे पादाभ जेवढ्या अंतरापर्यंत क्षेपित केला असेल तेवढे अंतर कोशिका पुढे सरकते. कोशिका पुढे आल्यानंतर पुन्हा क्रमाक्रमाने त्याच जीवद्रव्याचे द्रवीकरण, पुढे वाहणे व घनीकरण या क्रिया कोशिकेत घडतात व कोशिकेची हालचाल शक्य होते परंतु तरीही या जटिल क्रियेचा कुठलाही तांत्रिक आधार निश्चितपणे सांगता येत नाही. द्रवीभूत जीवद्रव्यावर पादाभामध्ये वाहत जाण्याइतका रासायनिक दाब नेहमीच असतो.
जोशी, लीना
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..