पादपगृह : नाजूक वनस्पतींचे उष्णता अगर थंडी यांच्या अतिरेकापासून संरक्षण करण्यासाठी ज्या इमारतीत हेतुपूर्वक योजना केलेली असते, तिला पादपगृह असे म्हणतात. ब्रिटन व अमेरिकेत सर्वसाधारणपणे पादपगृह हे हरितगृह (ग्रीनहाऊस) या नावाने ओळखले जाते. ब्रिटनसारख्या थंड देशांत नाजुक वनस्पतींचे थंडीपासून रक्षण करणे हा पादपगृहाचा मूळ उद्देश असतो परंतु उष्ण कटिबंधातील देशांत डोंगराळ भाग वगळता थंडीऐवजी सूर्याच्या प्रखर किरणापासून नाजुक वनस्पतींचे रक्षण करणे व हवेतील आर्द्रता टिकवून ठेवणे, हा पादपगृहांचा उद्देश असतो.
इतिहास व विकास : पादपगृहाचा वापर सतराव्या शतकात ब्रिटनमध्ये सुरू झाला. सुरुवातीची पादपगृहे विटांची अगर लाकडाची असून त्यांची रचना साधी असे. त्यांच्या खिडक्या सर्वसाधारण इमारतीतील खिडक्यांच्या आकारमानाच्याच असत आणि आतील तापमान वाढविण्यासाठी त्या काळी उपलब्ध असलेली साधने वापरण्यात येत. पुढे पादपगृहात वनस्पतींना जास्त प्रकाश उपलब्ध करून देण्याची गरज भासू लागली. याच वेळी काचही स्वस्त झाली आणि तापमान वाढविण्यासाठी नवीन प्रकारची साधनेही उपलब्ध झाली, त्यामुळे मूळच्या पादपगृहाचे काचगृहात रूपांतर झाले. मोठ्या आकारमानाच्या खिडक्या बसविण्यात येऊ लागल्या. एकोणिसाव्या शतकात छप्पर व भिंतीसाठी कमीत कमी लाकूड अगर धातुसामानाचा वापर करून काचेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यात येऊ लागला. परिणामी पादपगृह हे केवळ प्रतिकूल हवामानापासून वनस्पतींचे संरक्षण करण्याचे साधन न राहता त्याचे निरनिराळ्या वनस्पतींच्या हवामानाच्या विशिष्ट गरजेप्रमाणे हवामान नियंत्रित ठेवण्याची सोय असलेल्या अद्ययावत काचगृहात रूपांतर झाले. एकोणिसाव्या शतकात परदेशातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर गोळा करून त्या त्यांच्या मूळ देशांतील हवामानाशी सदृश अशा हवामानात वाढविण्यासाठी काचगृहांचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला.
उपयोग : मूळ उद्देशांखेरीज पादपगृहांचा (काचगृहांचा) वापर पुढील कारणांसाठी करण्यात येतो : (१) पाश्चात्त्य देशांत वर्षांच्या विशिष्ट हंगामात शेतात काही प्रकारचा भाजीपाला अथवा फुले प्रतिकूल हवामानामुळे वाढू शकत नाहीत. अशा भाज्या (उदा., टोमॅटो, घेवडा, वाटाणा) अगर फुलझाडे मोठ्या आकारमानाच्या पादपगृहांत कृत्रिम रीत्या नियंत्रित केलेल्या वातावरणात व्यापारी प्रमाणावर लावतात व अशा प्रकारे उत्पादन केलेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळतो. या कामासाठी बांधलेली पादपगृहे सु. १० ते ४० आर (१ आर=१०० चौ.मी.) पर्यंत क्षेत्राची असतात. (२) निरनिराळ्या प्रकारची नाजूक अथवा शोभेची झाडे राहत्या घराचाच एक भाग असलेल्या पादपगृहात वाढवितात आणि घरातील इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे त्यांचे प्रदर्शन करतात. अशा पादपगृहात जाण्यासाठी रस्ताही राहत्या घरांतूनच असतो. याला ‘कॉन्झर्व्हेटरी’ असे म्हणतात. (३) जगातील निरनिराळ्या हवामानांतील वनस्पती त्यांना लागणारे वातावरण पादपगृहात कृत्रिम तऱ्हेने निर्माण करून वाढवितात आणि त्याचा सखोल अभ्यास करतात. (४) निरनिराळ्या पिकांना आवश्यक असलेल्या पोषक द्रव्यांसंबंधी शेताततील पाहणीवरून काढलेले निष्कर्ष तपासून पाहण्यासाठी पादपगृहात प्रयोग करतात. (५) वनस्पतींच्या रोगांवरील संशोधनासाठी पादपगृहांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. उदा., कपाशीच्या पिकांवरील मर रोग, गव्हावरील तांबेरा रोग व निरनिराळे व्हायरसजन्य रोग. त्या त्या रोगाच्या वैशिष्ट्यामुळे हे संशोधन काचेच्या पादपगृहांत करणे आवश्यक असते. कपाशीवरील मर रोगाच्या कवकाचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीचा) मुळावाटे प्रवेश होतो व मागाहून त्याची वाढ मुळांत व खोडात होते. या रोगाच्या संशोधनासाठी मातीचे आणि हवेचे तापमान नियंत्रित
करावे लागते व ते पादपगृहात करणे शक्य असते. गव्हावरील तांबेरा रोगाच्या कवकाची वाढ पादपगृहात नियंत्रित तापमानात वर्षभर करता येते तसेच बाहेरच्या हवेतील तांबेऱ्याच्या कवकाची बीजे पादपगृहात शिरणार नाहीत अशी तजवीज केलेली असते, त्यामुळे या कवकाच्या जाती-प्रजातींची गव्हाच्या झाडावर वाढ करून त्या शुद्ध स्वरूपात ठेवणे शक्य होते. व्हायरसजन्य रोगांवरील संशोधनात हवेतील व्हायरसवाहक कीटकांचा पादपगृहात प्रवेश हेऊ न देता रोगांचा अभ्यास करणे शक्य होते.
वर्गवारी : उद्यानविद्येच्या दृष्टिकोनातून पाश्चात्त्य देशांत पादपगृहांची पुढीलप्रमाणे वर्गवारी करतात. (१) शीतगृह : यात हवा गरम करण्यासाठी विशेष साधन नसते. बाहेरील हवा आत न जाऊ दिल्यामुळे व सूर्याच्या उष्णतेमुळे गृहात पुरेशी ऊब राहते आणि त्यात वाढणाऱ्या वनस्पती कडाक्याच्या थंडीत टिकाव धरणाऱ्या अशाच असतता. (२) मध्यम शीतगृह : यात किमान तापमान ७°से. ठेवण्यात येते. अशा प्रकारच्या गृहात पुष्कळ प्रकारच्या वनस्पती वाढविता येतात. (३) मध्यम उष्णगृह : यात किमान तापमान १३°से. ते १६°से. असते. यात अनेक प्रकारची आमरे (ऑर्किडे) वाढविता येतात. (४) उष्णगृह : यात किमान तापमान १६°से.च्या वर असते. त्यात उष्ण कटिबंधातील हवामानात वाढणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पती वाढविता येतात.
सोयी व मापे : पाण्याची वाफ नळ्यांतून खेळवून पादपगृहात हवेचे तापमान वाढविण्यात येते आणि ते आपोआप नियंत्रित केले जाण्याची व्यवस्था असते. अलीकडे काचेऐवजी प्लॅस्टिकच्या पातळ पटलाचा (फिल्मचा) वापर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ज्या वेळी उन्हाळ्यात पादपगृहातील तापमान खाली आणणे आवश्यक असते त्या वेळी गृहावर सावली करून व आत विजेच्या पंख्याच्या साहाय्याने पाण्याचे बाष्पीभवन करून आवश्यक तेवढे तापमान ठेवता येते. सावली कमीजास्त केल्याने सूर्यप्रकाशही कमीजास्त करता येतो. वातानुकूलित पादपगृहे फार खर्चाची असतात व विशेष प्रकारच्या संशोधनासाठीच त्यांचा वापर होतो. पाश्चात्त्य देशांतील पादपगृहांची लांबी, रुंदी व उंची आवश्यकतेप्रमाणे व उद्देशाप्रमाणे ठेवण्यात येते. लांबी १५ मी. पासून २४० मी. पर्यंत (सर्वसाधारणपणे १५० मी. पर्यंत) व रुंदी ३·६ मी.पासून ४५ मी. पर्यंत असते (सर्वसाधारणपणे ती १२ ते १५ मी. असते). उंची कमी म्हणजे १·६ ते २·१ मी. पर्यंतच ठेवण्याकडे प्रवृत्ती आहे. निरनिराळ्या उद्देशांसाठी पादपगृहाची रचना आणि त्यात करावयाच्या सोयी याबाबतचे विशेष शिक्षण अमेरिकेतील विद्यापीठांत देण्यात येते.
पादपगृहांची सतत निगा राखणे आवश्यंक असते. स्वच्छतेकडे विशेष लक्ष देतात. दारांच्या व खिडक्यांच्या झडपा नेहमी तपासून त्या सफाईदारपणे बसतील अशा ठेवतात. विजेची वगैरे उपकरणे वारंवार तपासून दुरुस्त स्थितीत ठेवणे आवश्यक असते. पोलादी सामग्री गंजू नये म्हणून वेळच्या वेळी रंग लावतात.
उष्ण कटिबंधातील वनस्पति-उद्यानांत साध्या पद्धतीच्या पादपगृहांचा उपयोग करतात. लाकडी अथवा लोखंडी सांगड्यावर चारही बाजूंना आणि छपरावर तारेची अगल लाकडी पट्ट्यांची अगर बांबूची जाळी बसवून त्यावर पसरणारे वेल सोडतात. छपरावरील व बाजूच्या जाळीवरील वेल फार दाट झाल्यास सूर्यप्रकाशाला अडथळा होतो व हवा खेळती राहत नाही. वेलीमुळे सावली व गारवा उत्पन्न होतो. प्रखर उन्हाळ्यात ज्या वनस्पती उघड्यावर कोमेजतात अशा वनस्पतींना संरक्षण देण्याच्या दृष्टीने ही स्वस्त पादपगृहे फार उपयोगी असतात.
संदर्भ : Bailey, L. H. The Standard Cyclopaedia of Horticulture, Vol. II, New York, 1960.
कुलकर्णी नी. बा.; गोखले, वा. पु.