पातिमोक्ख : बौद्धांच्या ⇨ विनियपिटकातील सुत्तविभंगाचा एक महत्त्वपूर्ण भाग. ‘प्रातिमोक्ष’ हे पातिमोक्ख या शब्दाचे संस्कृत रूप. विनियपिटक म्हणजे बौद्ध संघाचे संविधानच होय. बौद्ध संघाची व्यवस्था, भिक्षू-भिक्षुणींची नित्य-नैमित्तिक कृत्ये इत्यादींसंबंधीचे नियम एकत्रित स्वरूपात आणून शिस्तीबाबत मार्गदर्शन करणे, हा विनियपिटकाचा हेतू. त्या दृष्टीने बौद्ध भिक्षू-भिक्षुणींकडून घडू नयेत अशा विविध अपराधांचा विचार ह्या पिटकात केलेला आहे. हे अपराध पातिमोक्खात नमूद केलेले आहेत तसेच हे अपराध करणाऱ्या व्यक्तीस कोणते शासन करावे, हेही त्यात सांगितले आहे. पातिमोक्खाचे दोन भाग आहेत : भिक्खु-पातिमोक्ख आणि भिक्खुणी-पातिमोक्ख. भिक्खु-पातिमोक्खात एकूण २२७ अपराध सांगितले असून भिक्खुणी-पातिमोक्खात ३११ अपराध नमूद आहेत. भिक्खु-पातिमोक्खात अंतर्भूत असलेल्या अपराधांचे स्थूलपणे केलेले वर्गीकरण असे : (१) पाराजिक : (१) ब्रहाचर्याचे उल्लंघन, (२) चौर्यकर्म, (३) मनुष्यप्राण्याची जाणूनबुजून हत्या करणे किंवा त्यास आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने मरणाचे गोडवे गाणे आणि (४) स्वतःच्या ज्ञानाविषयी वा सामर्थ्याविषयी पोकळ बढाई मारणे, आपण काही अतिमानवी शक्ती संपादन केल्याचा आव आणणे, ह्या अपराधांचा ह्या वर्गात समावेश होतो. हे अपराध अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले असून ते केल्याबद्दल संबंधितास संघातून हाकलून द्यावे, असे सांगितले आहे.(२) संघादिदेस : ह्या वर्गात १३ अपराध येतात. ब्रह्मचर्यभंगाला अनुकूल अशा काही गोष्टी करणे, संघभेद वा त्याला पोषक अशा गोष्टी करणे, संघाने वेळोवेळी दिलेले आदेश धुडकावणे, आपल्या सहकार्यांवर पाराजिक धर्माचे खोटे आरोप करणे, अशा अपराधांचा त्यांत अंतर्भाव होतो. (३) अनियत-धम्मा : परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे सिद्ध करावयाचे दोन अपराध ह्या वर्गात येतात. (४) निस्सग्गिय-पाचित्तिया : ह्यात येणारे अपराध ३० आहेत. आचारधर्माचे उल्लंघन करून काही वस्तू मिळविण्याच्या संदर्भातील हे नियम आहेत. अशा वस्तू, गुन्ह्याची कबुली देऊन परत केल्यास क्षमा होऊ शकेल परंतु तसे न केल्यास संबंधित वस्तू जप्त करण्याची तरतूद आहे. (५) पाचित्तिया : ह्यात ९२ अपराध येतात. त्यांतील काही असे : जाणूनबुजून खोटे बोलणे, सुरापान करणे, जाणूनबुजून प्राण्यांची हत्या करणे, कुचेष्टा करणे, अनादर करणे, इतर भिक्षूंची निंदा करणे, स्त्रियांशी लगट वा सहशय्या करणे, विहाराच्या मालकीच्या वस्तूंची हेळसांड करणे, नेमणुकीवाचून भिक्षुणींना धर्मोपदेश करणे इत्यादी. (६) पाटिदेसनीय : हे अपराध चार आहेत. अनुज्ञेवाचून किंवा आमंत्रणावाचून अन्न घेण्याबाबतचे हे अपराध आहेत. ते केल्यास जाहीर रीत्या दिलगिरी प्रदर्शित करणे आवश्यक मानलेले आहे. (७) अधिकरण-समथ : संघातील वादांचे निराकरण करण्याचे सात प्रकार येथे नमूद केलेले आहेत. ह्या प्रकारांचे उल्लंघन करणे म्हणजे अपराध होय, असे मानले आहे. (८) सेखिया : सादाचारांचे ७५ नियम ह्यात दिलेले आहेत. उदा., भिक्षूने गावात कशा प्रकारे प्रवेश करावा, त्याचे खाणे-पिणे, संभाषण, कपडे वगैरे कसे असावे इत्यादी. ह्या ७५ नियमांचे उल्लंघन म्हणजे ७५ प्रकारचे अपराध होत तथापि हे ७५ नियम पातिमोक्खात नंतर अंतर्भूत केले असावेत, असा अभ्यासकांचा तर्क आहे. भिक्षुणींच्या अपराधांचे वर्गीकरणही वरीलप्रमाणेच आहे. तथापि त्यात आलेल्या अपराधांची संख्या अधिक आहे.