धम्मपद : एक बौद्ध ग्रंथ. बौध्दांच्या पाली त्रिपीटकातील सुत्तपिटकांतर्गत खुद्दकनिकाय म्हणून जो पंधरा ग्रंथांचा समूह आहे. त्यात धम्मपद हा ग्रंथ क्रमाने दुसरा. त्यात एकून ४२३ गाथा असून त्या पुढील २६ वग्गांमध्ये किंवा वर्गांमध्ये विभागलेल्या आहेत. (१) यमक, (२) अप्पमाद, (३) चित्त, (४) पुप्फ, (५) बाल, (६) पंडित, (७) अर्हंत, (८) सहस्स, (९) पाप, (१०) दंड, (११) जरा, (१२) अत्त, (१३) लोक, (१४) बुद्ध, (१५) सुख, (१६) पिय, (१७) कोध, (१८) मल, (१९) धम्मट्‌ठ, (२०) मग्ग, (२१) पकिष्णक, (२२) निरय, (२३) नाग, (२४) तण्हा, (२५) भिकखु, (२६) ब्राह्मण.

ह्या छोट्याशा ग्रंथात बौद्ध धर्माची स्थविर संप्रदायास मान्य असलेली सर्व शिकवण अंतर्भूत झालेली असून तिचे सार एकशेत्र्याऐंशीव्या गाथेत आलेले आहे.

सब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा ।

स-चित्तपरियोदपनं एतं बुद्धान सासनं ।।

सर्व पापांपासून दूर राहणे, सर्व चांगल्या गोष्टींची जपणूक करणे आणि स्वतःचे मन शुद्ध ठेवणे हिच बुध्दांची शिकवण आहे, असा ह्या गाथेचा आशय, ह्या ग्रंथातील गाथांतून आलेल्या उपदेशपर विचारांपैकी काही असे : जगातील सर्व गोष्टी अनित्य व दुखःकारक आहेत त्यामुळे आपले म्हणता येईल असे त्यांत काही नाही. हे सर्व जाणून बुद्धाने शिकविलेल्या दुःख, दुःखाचे मूळ (तृष्णा) दुःखाचा निरोध व दुःखनिरोध प्राप्त करून देणारा अष्टांगिक मार्ग ह्या चार आर्यसत्यांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. जगातील वस्तूंचे विलोभनीय रूप पाहून भूलून न जाता, घृणा निर्माण करणारी त्यांची दुसरी बाजूही लक्षपूर्वक पाहणाऱ्यांस माराचे (मनाच्या दुष्प्रवृत्तींचे) भय नसते. अविद्यां (वस्तूंचे यथार्थ ज्ञान नसणे) ही सर्वांत मोठी अशी मालिन्यकारक गोष्ट आहे. लोभ, द्वेश, मोह ही अकुशलमूले असून ती नाहीशी केली पाहिजेत. वैराने वैर नष्ट होत नाही अवैरानेच ते नष्ट होईल क्रोधावर अक्रोधाने विजय मिळवावा दुष्ट माणसावर चांगुलपणाने जय मिळवावा दान देऊन कद्रू माणसाला जिंकावे सत्याने वागून खोट्यावर जय मिळवावा.

ह्या ग्रंथाची शैलीही समर्पक उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांन्तादी अलंकारांनी युक्त अशी आहे. उदा., बौद्ध भिक्षू जेथे भिक्षा मागतो त्या गावाबद्दल त्याचे वर्तन कसे असावे, ह्याबद्दल मार्गदर्शन करताना ग्रंथकार म्हणतो : ज्याप्रमाणे भुंगा फुलाच्या रंगाला किंवा सुवासाला बाध न आणता रसास्वाद घेऊन निघून जातो, त्याप्रमाणे भिक्षूने गावातील कारभारात ढवळाढवळ न करता आपली भिक्षा घेऊन निघून जावे (४९). आणखी काही उदाहरणे अशी : जो मनुष्य अनेक उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन करतो, पण त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो मनुष्य लोकांची गुरे केवळ चरणावळीला नेणाऱ्या गुराखाप्रमाणे आहे कारण त्या गुराख्यास त्या गुरांची मालकी मिळू शकत नाही (१९). निद्रिस्त गाव महापुराने वाहून न्यावे त्याप्रमाणे पुत्र, पशू ह्यांच्या ठायी आसक्त असलेल्या माणसाला मृत्यू घेऊन जातो (२८७). सुंदर सुभाषितवजा वाक्यांतून सनातन तत्त्वांचा प्रत्यय आणून देण्याचे ग्रंथकाराचे सामर्थ्यही स्पष्टपणे दिसून येते. फुलांचा गंध वाऱ्याच्या दिशेनेच पसरत. परंतु साधुजनांची कीर्ती वाऱ्याच्या उलट दिशेनेही पसरते (५४).

ह्या ग्रंथाच्या प्राकृत पाठाचे एक हस्तलिखित मध्य आशियात त्रुटित स्वरूपात मिळालेले आहे. ह्या ग्रंथाची चार चिनी भाषांतरे उपलब्ध असून ती इ. स. च्या तिसऱ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत निरनिराळ्या काळी झालेली आहेत. श्रीलंका, ब्रह्मदेश आदी देशांतील बौद्ध लोकांत धम्मपद हा छोटा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुष्कळशा बौद्ध भिक्षूंना उपसंपदेच्या दीक्षेपूर्वीच तो मुखोद्‌गत झालेला असतो. ह्या ग्रंथाला केवळ बौद्ध साहित्यातच नव्हे, तर जागतिक साहित्यातही मान्यता प्राप्त झालेली आहे. माक्स म्यूलर, डॉ. राधाकृष्णन्, राहूल साकृत्यायन हे धम्मपदाच्या विख्यात अनुवादक संपादकांपैकी होते. पु. मं. लाड ह्यांनी धम्मपदाचे मराठीत केलेले गद्यमय आणि पद्यमय भाषांतर पु. वि. बापट ह्यांनी संपादिले असून ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाने प्रकाशित केले आहे. (१९७५).

बापट, पु. वि.