पॅरडाइज मासा: ॲनॅबँटिडी मत्स्यकुलातील मॅक्रोपोडस वंशातील माशांना पॅरडाइज मासे म्हणतात. यांपैकी मॅक्रोपोडस क्युपॅनस ही जाती भारतात मलबार आणि कॉरोमांडल किनाऱ्यांवर नदीमुखात, उथळ पाण्यात आणि कालव्याच्या चरांमध्ये आढळते. भाताच्या शेतांमध्ये जरी ती नेहमी आढळत असली, तरी किनाऱ्यापासून फार आतमध्ये सामान्यत: आढळून येत नाही.
शरीर लांबोडे व दोन्ही बाजूंनी दबलेले असून त्यावर मोठे चकचकीत हिरवे खवले असतात. खालच्या बाजूवरील अर (पक्षाला म्हणजे पराला आधार देणारे सांगाड्याचे घटक) लांब व शेंदरी रंगाचे असतात. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) आणि पुच्छपक्ष (शेपटीचा पर) यांवर चकचकीत ठिपके असतात व पुच्छपक्षाच्या बुडाशी मोठा काळा डाग असतो. शरीराची लांबी ८–१० सेंमी. असते.
पॅरडाइज मासा हा एक काटक वायुश्वासी (श्वसनाकरिता सरळ हवेचा उपयोग करणारा) मासा आहे परंतु तो सहसा जमिनीवर येत नाही बहुधा दगडांखाली लपून बसतो आणि मधून मधून श्वास घेण्याकरिता उसळी मारून वर येतो. प्रियाराधन आणि प्रजोत्पादन यांकरिता पाण्याच्या पृष्ठाखाली तो हवेचे बुडबुडे फुंकून त्यांचे एक विशिष्ट प्रकारचे घरटे तयार करतो.
हा मासा सहज माणसाळणारा व चकचकीत रंगांचा असल्यामुळे तो जलजीवालयांत (मत्स्यालयांत) बाळगतात.कीटकांच्या अळ्या तो अधाशीपणाने खातो. याचे मांस रुचकर असल्यामुळे खाण्याकरिताही त्याचा उपयोग करतात.
सूर्यवंशी, वि. ल.