पर्यटन : पर्यटन म्हणजे प्रवास. इंग्रजी भाषेतील ‘टूरिझम’ या संज्ञेचा हा पर्याय आहे. इंग्रजी भाषेत ‘टूरिस्ट’ म्हणजे ‘पर्यटक’ ही संज्ञा ‘ट्रॅव्हलर’ (प्रवासी) या शब्दाऐवजी एकोणिसाव्या शतकारंभी वापरण्यात येऊ लागली. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाल्याचे दिसून येते. देशातील व परदेशांतील पुरावास्तू, इतिहासप्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कलानिर्मितीची केंद्रे, पवित्र तीर्थक्षेत्रे, प्रचंड औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींचे आकर्षण ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा होय. ही प्रेरणा सार्वत्रिक व सर्वकालीन असली, तरी आधुनिक काळातील ज्ञानप्रसाराची व दळणवळणाची सुलभ साधने विकसित झाल्याने आधुनिक पर्यटन-उद्योगास विशेष चालना मिळाली. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित रम्य व भव्य असे इहलोकीचे जे सौंदर्य आहे, त्याची खास आस्था हा आधुनिक माणसाचा धर्म आहे. ते सौंदर्य सर्वांसाठी आहे, अशीही आधुनिक माणसाची धारणा आहे. पर्यटनामागील आधुनिक माणसाची प्रेरणा वरील भूमिकेचा निर्वाळा देते.

आधुनिक काळातील पर्यटकांच्या वर्गात विविध उद्देशांनी प्रवास करणाऱ्‍यांचा अंतर्भाव होतो. मुख्यतः पर्यटनकाळ हा मर्यादित असतो. आठवड्यातील सुट्या, रजा तसेच एखाद्या कार्याचा वा कार्यक्रमाचा भाग म्हणून नियोजित कालावधीत पर्यटन केले जाते. प्रेक्षणीय स्थळे पाहणे, आरोग्यधामात निवास करणे. अभ्यास वा संशोधन करणे, सदिच्छा भेटीचा घटक म्हणून प्रसिद्ध स्थळे पाहणे यांसारख्या विविध हेतूंनी पर्यटकांची ये-जा चालू असते. उत‌्प्रवासी (एमिग्रंट), आप्रवासी (इमिग्रंट) आणि स्थलांतर करणारे मजूर इत्यादींपेक्षा पर्यटक हे वेगळे समजले जातात. आधुनिक अर्थशास्त्रीय परिभाषेत पर्यटक हा सामान्यतः ग्राहक वा उपभोक्ता समजला जातो. तो  उत्पादक नसतो.

पर्यटनाचे क्षेत्र अंतर्देशीय तसेच आंतरराष्ट्रीय असते. जुन्या पर्यटनस्थळांची व्यवस्था राखणे व नवीन पर्यटनस्थळे विकसित करणे, ही पर्यटन उद्योगाची महत्त्वाची अंगे होत. अनुषंगाने देशी-परदेशी पर्यटकांना आकृष्ट करणे, त्यासाठी नियोजनपूर्वक प्रसिद्धियंत्रणा उभी करणे, पर्यटकांना वाहतुकीच्या तसेच निवास-भोजनादी सुखसोयी उपलब्ध करून देणे, हेदेखील पर्यटन उद्योगाचे महत्त्वाचे घटक ठरतात. पर्यटनाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर परस्परांविषयी सामंजस्य व सद‌्भाव निर्माण करण्याचे कार्यही साधले जाते.

आधुनिकपूर्व काळातील प्रवासाची उद्दिष्टे प्राधान्याने धार्मिक, व्यापारी व विद्याध्ययनात्मक असत. पश्चिमी प्रबोधनकाळापासून एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन हा इहलोकनिष्ठ होऊ लागला व सांस्कृतिक, ऐतिहासिक, कालवाङ्मयीन, नव्याजुन्या निर्मितीबद्दल नवे आकर्षण निर्माण झाले. आधुनिक पर्यटनदृष्टीचा आरंभ तेव्हापासूनच झाला, असे म्हणता येईल. ही दृष्टी केवळ धनिक वर्गापुरतीच मर्यादित न राहता, ती सर्वसामान्य लोकांतही निर्माण होऊ लागली.

पश्चिमी प्रबोधनकाळात पर्यटनाचे उद्दिष्ट अधिक मौलिक स्वरूपाचे ठरले. टॉमस कुकने ६०० लोकांची लीसेस्टर ते लाफबरो अशी रेल्वेसहल आयोजित केली, १८५५ च्या पॅरिस प्रदर्शन काळात, कुकने लीसेस्टर-कॅले अशा सहली काढल्या व पुढल्याच वर्षी संबंध यूरोपची भव्य अशी पहिली वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. काही वर्षांनंतर कुकने मोठ्या प्रमाणात पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. अशा तऱ्‍हेने आधुनिकपर्यटनयुगाचा प्रारंभ झाला.

आर्थिक दृष्टिकोन : आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. पर्यटन उद्योगमुळे सेवाउद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. वस्तू, त्यांचे उत्पादन, वितरण व सेवन हेच दीर्घकाळ आर्थिक विश्लेषणाचे प्रमुख चर्चाविषय होते आणि परिणामी सेवाउद्योगांकडे दुर्लक्ष झाले होते. पर्यटनाच्या योगे देशांत-परदेशांत होणारी माणसांची वाढती वर्दळ व हालचाल ह्यांमुळे सेवाक्षेत्राला एकूण उत्पादनाच्या वर्तुळात महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊ लागले. पर्यटनामुळे व्यापाराचे प्रमाण व परिणाम यांचा विस्तार झाला. हिमाच्छादित पर्वतशिखरे, निर्मनुष्य समुद्रकिनारा, निर्मनुष्य वनप्रदेश या उपेक्षणीय गोष्टी पर्यटनक्षेत्रात येऊ लागल्या व त्या प्रथम दर्जाच्या आर्थिक मत्ता ठरल्या.

पर्यटनामुळे जो प्रत्यक्ष पैसा मिळतो, त्याहीपेक्षा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गुणक परिणामामुळे जी भर पडते किंवा पर्यटक खर्चाच्या उलाढालींमुळे निर्माण होणाऱ्‍या पैशाची जी भर पडते, तिचे महत्त्व अधिक असते. याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करता येईल : पर्यटनावर पैशाचा जो प्रत्येक एकक खर्च होत असतो, तो सबंध अर्थव्यवस्थेत फिरत राहतो आणि त्यायोगे त्याच्याशी ज्या ज्या लोकांचा संबंध येत राहतो, त्यांचा वाढीव प्रमाणात फायदा होत राहतो. अर्थशास्त्रज्ञांनी पर्यटनाचा गुणक परिणाम भारताच्या बाबतीत ३·५ एवढा काढला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, एका पर्यटकाचा एक रुपया खर्च झाल्यास, त्यायोगे अर्थव्यवस्थेमध्ये ३·५ रुपये किंमतीची उलाढाल होते.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाप्रमाणेच अंतर्गत पर्यटनाचाही देशाच्या आर्थिक स्थितीवर अनुकूल परिणाम होत असतो. मात्र याबाबतची आकडेवारी आंतरराष्ट्रीय पर्यटनाप्रमाणे सुलभपणे मिळू शकत नाही. ढोबळ अंदाजाप्रमाणे अंतर्गत पर्यटनामुळे जी आर्थिक उलाढाल निर्माण होते, ती आंतरराष्ट्रीय पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्‍या उलाढालीच्या दसपटींनी अधिक असते.


पर्यटनामुळे होणारा आणखी एक अतिशय महत्त्वाचा लाभ म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्‍या रोजगारसंधी. पर्यटन हा श्रमप्रधान सेवाउद्योग असल्यामुळे आणि विकसनशील देशांमध्ये मोठ्या संख्येने श्रमिकांची उपलब्धता असल्याने, पर्यटनउद्योगाचा विकास बेकारी व अर्धरोजगारी या समस्यांचे काही प्रमाणात निराकरण करू शकतो.

पर्यटन क्षेत्रातील रोजगारक्षमतेचा आणखी एक फायदा रोजगाराचे विविधांगी स्वरूप हा होय. लहानमोठ्या वयोगटांतील माणसे, शिक्षित व अशिक्षित, कुशल व अकुशल, नागरी व ग्रामीण अशा प्रकारच्या लोकांना पर्यटनामुळे रोजगार मिळू शकतो. उदा., पर्यटन-प्रतिनिधी (एजंट), सहल-संयोजक, मार्गदर्शक किंवा वाटाड्या, हॉटेल-व्यवस्थापक, स्वागतकार, कारकून, हिशेबनीस, आचारी व त्यांचे साहाय्यक, मनोरंजनकार, जाहिरातदार, छायाचित्रकार, पुष्परचनाकार, सुशोभनकार, हमाल इत्यादी. स्पेनमध्ये कामकरी लोकसंख्येच्या ८% लोक व स्वित्झर्लंड या ६२·९७ लक्ष लोकसंख्येच्या छोट्या देशातील कामकरी लोकांपैकी ५% लोक पर्यटन उद्योगात गुंतलेले आहेत. स्पेन, हाँगकाँग, बहामा, थायलंड यांसारखे देश तर आपल्या अर्थव्यवस्था या उद्योगाभोवतीच गुंफण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात.

बनारसचा सुप्रसिद्ध घाट

पर्यटन उद्योगांपासून मिळणारा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे खास देशी बनावटीच्या हस्तकलात्मक वस्तू बनविणाऱ्‍या लघुउद्योगांच्या व कुटिरोद्योगांच्या विकासास मिळणारे उत्तेजन. विशेषतः विकसनशील राष्ट्रांनी पर्यटन उद्योगाच्या गरजानुकूल असे आपल्या हस्तोद्योगाचे उत्पादनविषयक धोरण ठेवले, तर ते फायदेशीर ठरते. परिणामतः देशाच्या सर्व भागांचा समतोल विकास साधण्याचे कार्यही पर्यटनामुळे सुलभ होऊ शकते.

काझीरंगा (आसाम) अभयारण्यातील फेरफटका

पर्यटन हा एक असा उद्योग आहे, की ज्याच्यायोगे प्रगत व समृद्ध राष्ट्रांकडून अधिकतर झालेली सर्व प्रकारची साधनसामग्री विकसनशील राष्ट्रांकडे संक्रमित होऊ शकते. परदेशी पर्यटकांना आकृष्ट करून घेण्याची स्पर्धा सर्व देशांत चालू असते. भारताच्या एकषष्ठांश क्षेत्रफळ असलेल्या स्पेन सारख्या चिमुकल्या राष्ट्राने १९७३ मध्ये पर्यटन उद्योगाची कास धरून २६१ कोटी डॉ. (१,९५० कोटी रुपये) एवढे परदेशी चलन मिळविले. ही रक्कम म्हणजे त्या देशाला मिळणाऱ्‍या एकूण परदेशी चलनाच्या ४० टक्के होती. पर्यटन उद्योग ज्या देशांनी मोठ्या प्रमाणावर विकसित केला आहे, अशा ग्रीस, आयर्लंड, पोर्तुगाल, यूगोस्लाव्हिया, तुर्कस्तान यांना त्या उद्योगावाटे मिळालेला परदेशी चलनाचा वाटा १९७३ मध्ये अनुक्रमे २१·३%, १७·५%, १६·९%, १४·१% व ६·४% होता. यांच्या तुलनेने भारताचा वाटा अत्यल्प म्हणजे केवळ ०·२५% एवढाच आहे

सांस्कृतिक दृष्टिकोन : आर्थिक लाभांखेरीज पर्यटनाच्या योगे विविध देशांतील भिन्नभिन्न लोक एकत्र येऊ शकतात व एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात. तणावांनी भरलेल्या सध्याच्या जगामध्ये आंतरराष्ट्रीय सदिच्छा व सामंजस्य यांचे वर्धन करण्याच्या कामी  आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा बहुमोल उपयोग होतो. देशांतर्गत पर्यटनासही हीच गोष्ट लागू आहे. भाषा आणि चालीरीती यांचे वैविध्य असलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशात पर्यटन हे राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे प्रभावी साधन होय. 

आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योग : १९५० नंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योग वेगाने विकसित झाला. १९७३ पर्यंत या उद्योगाची गुंतवणूक ३,७०० कोटी रु. होती व त्यात २० कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होता. तथापि तेलाच्या किंमतींमध्ये अतिशय चढी वाढ झाल्याने उलाढालीच्या संदर्भात हा उद्योग तेलउद्योगानंतरचा दुसऱ्‍या क्रमाकांचा उद्योग ठरला आहे. तरीही सबंध जगामध्ये कमाल रोजगार उपलब्ध करून देणारा एकमेव उद्योग म्हणून त्याचा पहिला क्रमांक चुकलेला नाही.

विदेशी पर्यटकांना आकृष्ट करण्याचा हेतू हा केंद्रबिंदू समजून पर्यटनसुविधांच्या विकासाकरिता सरकारी पैसा खर्च करण्यासाठी जगातील प्रत्येक राष्ट्र प्रयत्नशील आहे. काही राष्ट्रांमध्ये या कार्यासाठी एक शासकीय विभागच स्थापण्यात येतो. उदा., इटलीमध्ये ‘एन्ते नॅझिओनेल इतालिआनो तूरिझम’ (एनिट) हा विभाग पर्यटनाला चालना देण्यासाठी १९१९ मध्ये स्थापण्यात आला. सोव्हिएट रशियामधील ‘इन्टूरिस्ट’ (स्था. १९२९) किंवा फ्रान्समधील ‘कमिसारिएत जनरल ऑफ तूरिझम’ (१९२८) हा विभाग सार्वजनिक बांधकामखात्याच्या अखत्याराखाली उभारण्यात आला. इतर काही देशांत पर्यटनकार्यास चालना देण्याकरिता निमशासकीय किंवा ऐच्छिक संघटना उभारण्यात आल्या असून, त्यांना केंद्र शासनाकडून आर्थिक अनुदान दिले जाते. चेकोस्लोव्हाकियाची ‘सेडॉक’ ही संघटना, डेन्मार्कचे ‘डॅनिश टूरिस्ट बोर्ड’, पूर्व जर्मनीचे ‘स्टेट ट्रॅव्हल ब्यूरो’, ग्रीसची ‘नॅशनल टूरिस्ट ऑर्गनायझेशन’, बल्गेरियाचे ‘बाल्कनटूरिस्ट’ (१९४८), ग्रेट ब्रिटनची ‘ब्रिटिश टूरिस्ट ऑथॉरिटी’ ही यांची काही उदाहरणे होत. या संस्था विदेशी पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. त्यांमध्ये जाहिराती, पुस्तिका, पोस्टर, परिपत्रके इत्यादींद्वारा प्रसिद्धी ‘पर्यटक परिचय सेवा’ या विभागाची स्थापना स्थानिक उत्सव, जत्रा-प्रदर्शने यांचे संयोजन प्रवेशपत्राच्या दरांत कपात इत्यादींचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या संवर्धनासाठी व उत्तेजनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पर्यटनसंस्था आणि संघटना कार्य करताना आढळतात : (१) ‘इंटरनॅशनल टूरिंग अलायन्स’ (आयटीए) ही जिनीव्हामध्ये १८९८ साली स्थापलेली संघटना (सध्याचे नाव १९१९ मध्ये बदलण्यात आले.) आंतरराष्ट्रीय पर्यटनविषयक सर्व समस्यांचा अभ्यास करणे, त्यांबाबत सुधारणा सुचविणे, पर्यटनास चालना व प्रोत्साहन देण्याबाबत प्रयत्नशील राहणे आणि विविध देशोदेशींच्या पर्यटनसंस्था-संघटनांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे इ. कार्ये करते. ही संस्था पर्यटनविषयक सूक्ष्मसंदर्भकेंद्र चालविते आणि नकाशे, हॉटेले, निवासालये इत्यादींविषयी मार्गदर्शक पुस्तिकाही प्रसिद्ध करते. ८० देशांतील ३०० लक्षांवरील सभासदांच्या १८० संघटना या संस्थेच्या सदस्य आहेत. (२) ‘यूरोपियन ट्रॅव्हल कमिशन’ (इटीसी) हा आयोग डब्लिन येथे १९४९ मध्ये स्थापन झाला असून यूरोपांतर्गत व यूरोपबाहेर अशा दुहेरी पर्यटनास उत्तेजन देणे, सहकार्यवर्धन व माहितीविनिमय तसेच संशोधन करणे ही या आयोगाची प्रमुख उद्दिष्टे असून, २३ यूरोपीय देशांच्या राष्ट्रीय पर्यटक संघटना या आयोगाच्या सदस्य आहेत. (३) ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजन्सीज’ (वॉटा) ही संस्थादेखील जिनीव्हातच १९४९ मध्ये स्थापन झाली. आंतरराष्ट्रीय पर्यटनविकासासाठी प्रयत्न करणे, सर्व देशांतील पर्यटन संघटनांची सुसूत्र उभारणी करण्याबाबत साहाय्य व सहकार्य देणे, पर्यटनविषयक माहिती संकलित करून ती सर्वत्र प्रसृत करणे, तसेच पर्यटनास उत्तेजन मिळेल अशा सर्व व्यापारी व आर्थिक कार्यांमध्ये (उदा., जत्रा, प्रदर्शने वगैरे) आपला सहभाग देणे ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे असून, ८७ देशांतील पर्यटन संघटनांना या संस्थेच्या सेवा उपलब्ध केल्या जातात. (४) ‘वर्ल्ड टूरिझम ऑर्गनायझेशन’ (डब्ल्यूटीओ) या संघटनेची माद्रिद (स्पेन) येथे १९७४ मध्ये स्थापना झाली असून राष्ट्रीय पर्यटनसंस्था-संघटनांचे पारस्परिक सहकार्य व पर्यटनविषयक समस्यांचा अभ्यास, सदस्य राष्ट्रांमधील पर्यटन सुकर करणे व त्यात अधिकाधिक सुधारणा करणे ही या संघटनेची उद्दिष्टे आहेत. ११५ देश व ८९ संघटना डब्ल्यूटीओच्या सदस्य आहेत. वर्ल्ड ट्रॅव्हल, इंटरनॅशनल ट्रॅव्हल स्टॅटिस्टिक्स, ट्रॅव्हल ॲब्रॉड वगैरे तिची प्रकाशने आहेत. या संघटनेची पहिली सभा एप्रिल १९७५ मध्ये माद्रिद येथे भरली. भारत हा या संघटनेच्या कार्यकारी समितीचा सदस्य आहे. (५) ‘साउथ एशिया रीजनल ट्रॅव्हल कमिशन’ या आयोगाचा भारत एक सदस्य असून या विभागातील सर्व देश या आयोगावर प्रतिनिधित्व करतात. १९७५ मध्ये भारताला या आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. (६) ‘पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल असोशिएशन’ (पॅटा) ही संघटना उत्तर अमेरिकेपासून पॅसिफिक प्रदेशापर्यंतच्या पर्यटनास प्रोत्साहन देण्याकरिता १९५२ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्को येथे स्थापण्यात आली. भारत हा या संघटनेचा सदस्य आहे. पॅटा विपणन व जाहिरातविषयक सेवा आपल्या सदस्यांना उपलब्ध करते. या संघटनेने सदस्यदेशांच्या वतीने अनेक सर्वेक्षण व संशोधन प्रकल्प पार पाडले आहेत. १९६४ पासून भारत पॅटाचा पूर्ण सदस्य आहे. लंडन व मॅनिला येथे पॅटाची विभागीय कार्यालये असून ६३ देशांमधील १,५०० संघटना तिच्या सदस्य आहेत. पॅसिफिक ट्रॅव्हल न्यूज हे नियकालिक पॅटातर्फे प्रसिद्ध करण्यात येते.


भव्य बादामी लेणी

भारत : भारत १९६० च्या सुमारास पर्यटन उद्योगास विशेष चालना मिळाली. भारतात यात्रा वा सहली यांच्या विकासाला चालना देणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत: (१) मध्यमवर्गातील बऱ्‍याच लोकांच्या मालकीच्या मोटारगाड्यांवरून लोकांचे उत्पन्न वा प्राप्ती यांमध्ये झालेली वाढ विशेषपणे प्रकट होते. (२) वर्षाकाठी तीन आठवडे वा त्यांपेक्षा अधिक काळ अर्जित रजा उपलब्ध झाल्याने आणि प्रदीर्घ काळ नोकरीनंतर मिळणाऱ्‍या रजेमुळे लोकांना आराम करावासा वाटू लागला. (३) देशभरच्या नवनवीन विकासप्रकल्पांबद्दल वाटणारे कुतूहल अथवा औत्सुक्य. (४) चांगले रस्ते, अधिक कार्यक्षमतेने धावणारी वाहने, चांगली निवासालये आणि गतिमान प्रवास जंबो जेट विमानांमुळे त्यामध्ये आलेली अधिक गतिमानता.

प्रवास जसजसा अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि जनसामान्यांच्या पातळीपर्यंत येऊन ठेपला, तसतसे खुद्द प्रवासानुभवांवरून पर्यटनाचे मोठ्या प्रमाणावरील सुसंघटित अशा व्यवसायात रूपांतर होऊ लागले. विविध प्रवासी संघटना एकाच प्रकारच्या सुविधा आणि सरसकट सहली (समूह-सहली) (पॅकेज टूर) आयोजित करू लागल्या. परिणामी त्या सर्वांमध्ये तीव्र स्पर्धाही सुरू झाली.

भारतामध्ये नैसर्गिक, वास्तुकलाविषयक व ऐतिहासिक साधनसंपत्तीचे इतके वैपुल्य व विविधता आहे की, त्या विदेशी पर्यटकांना आकृष्ट करून घेतील अशा नीटसपणे व सुबकपणे मांडण्याच्या व पुढे अधिकाधिक विकसित करण्याच्या कलेवर भर देणे महत्त्वाचे ठरेल.भारतीय पर्यटन उद्योगाचा विकास खालील तीन प्रकारांनी करण्यात आला, तर आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्येही भारताला वरचे स्थान मिळविणे शक्य होईल. ते तीन मार्ग असे: (१) पर्यटनस्थळांचा विकास, (२) अध:संरचनात्मक सुविधांची निर्मिती व वाढ आणि (३) विपणन प्रयत्न.

अल्पकालीन उपाय म्हणून ज्या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा प्रवाह वाहतो आहे, त्या स्थळांच्या विकासावर अगोदर लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरते. यामुळे भविष्यकाळात पर्यटनस्थळांबाबत अधिक निर्धाराने विकास कार्यक्रम राबविणे सोयीचे ठरेल. त्याचबरोबर पर्यटनविषयक साधनसंपत्तीचे स्रोत आणि त्यांची पर्यटनविकासक्षमता ह्यांचा समन्वय साधून संभाव्य गरजा भागविण्यासाठी परिप्रेक्ष्य नियोजनाचा विचार आवश्यक ठरतो. एका दशकापूर्वी खजुराहो हे एक अपरिचित असे खेडे होते परंतु आता ते जागतिक पर्यटन नकाशावर आले आहे. पर्यटनस्थळाचा विकास कसा करावयास हवा, त्याचे खजुराहो हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

अधःसंरचनात्मक सुविधांच्या निर्मितीचा विचार करता, हा खरोखरच अवघड प्रश्न असल्याचे लक्षात येते. हा प्रश्न म्हणजे पदार्थ वा वस्तू आणि बाजारपेठ ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्याचा आहे. याचे क्षेत्र विमानतळावरील सुविधा, निवासव्यवस्था आणि अंतर्गत वाहतूक व संदेशवहन ह्यांभोवती गुंफलेले आहे.

भारतीय पर्यटन उद्योगाच्या विकासातील सर्वांत मोठा अडसर म्हणजे हॉटेलांचा तुटवडा (हॉटेल खोल्यांची अनुपलब्धता) हाच होय. कारण एका हॉटेल खोलीच्या योगे ३ प्रत्यक्ष, तर ९ अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. सरकारमान्य २८७ हॉटेलांमधील खोल्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत ८,८०० वरून सु. १८,००० म्हणजे दुपटीहून जास्त झाली असली, तरी त्याच काळात विदेशी पर्यटकांची संख्या १,९०, ००० वरून ६,४०,००० (म्हणजे तिपटीहून अधिक) एवढी झाली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या हॉटेल पुनर्विलोकन व सर्वेक्षण समितीच्या मते, १९८० च्या सुमारास भारतात येणाऱ्‍या १० लक्ष विदेशी पर्यटकांकरिता आणखी २८,००० हॉटेल-खोल्यांची गरज भासणार आहे. भारत सरकारनेही हॉटेल उद्योग हा अग्रक्रम उद्योग म्हणून घोषित केलेला आहे.

झेलमवरील शिकाऱ्‍यांतून दिसणारे चेतोहारी दृश्य

आपल्या देशातील हॉटेले, रेस्टॉरंट व अन्य पर्यटन सुविधा यांमध्ये विदेशी पर्यटकाला आकृष्ट करून घेणारी भारतीय वैशिष्ट्ये प्रकर्षाने प्रतिबिंबित झाली, तर भारतीय पर्यटनविकासाला अधिकाधिक चालना मिळावयास अडचण पडणार नाही. जपानमध्ये ह्या गोष्टींचा फार बारकाईने विचार व कार्यवाही केली जात असल्यामुळेच तो देश फार मोठ्या संख्येने विदेशी पर्यटकांना आपणाकडे आकृष्ट करण्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. 

पर्यटनास अधिकाधिक चालना देण्याच्या कामी १ ऑक्टोबर १९६६ रोजी स्थापन करण्यात आलेला ‘भारतीय पर्यटन विकास निगम’ हा मोठ्या प्रमाणावर भरीव कार्य करीत आहे. पर्यटक आकृष्ट होऊ शकतील अशा प्राचीन, पुरातत्त्वीय स्थळांचा विकास करण्यात येत आहे नवीननवीन पर्यटन स्थळांचा शोध केला जात आहे यांमध्ये सागरतटीय आमोद-प्रमोदाची स्थळे, वन्य पशु-पक्षी यांची अभयारण्ये आणि शरदीय क्रीडास्थाने इत्यादींचा अंतर्भाव आहे.


अशा प्रकारचा एक अभिनव प्रयोग केरळमधील कोवलम् या त्रिवेंद्रमपासून १६ किलोमीटरवरील गावी केला जात आहे. कोवलम् ह्या सागरतटीय स्थानाचे आमोद-प्रमोद स्थानात परिवर्तन करून पर्यटनकेंद्र म्हणून विकास करण्यात येत आहे. भारतीय पर्यटन विकास निगमाने येथे एक मोठे अद्ययावत व सर्व सुविधायुक्त असे हॉटेल बांधले आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील गुलमर्ग हे हिवाळी क्रीडाकेंद्र बनविण्यात आले आहे. 

भारतात वन्य पशु-पक्षी यांचे वैपुल्य असल्याने यांनी समृद्ध अशी जंगले व अभयारण्ये हीदेखील आकर्षक पर्यटनकेंद्रे बनविण्यात आली आहेत. वाघ, चित्ता, सिंह, गेंडा, हत्ती, चित्रविचित्र पक्षी यांच्याकरिता राष्ट्रीय वने व अभयारण्ये बनविण्यात आली आहेत. दांडेली, कान्हा, भरतपूर, गीर, जलदपाडा, काझीरंगा, ताडोबा वगैरेंची याबाबत उदाहरणे देता येतील. या अभयारण्यांत वननिवासालयेही उभारण्यात आली असल्याने पर्यटक त्यांकडे मोठ्या संख्येने आकृष्ट होत असतात. अशा प्रकारची उद्याने पूर्व आफ्रिकेत अतिशय पर्यटकप्रिय झाली आहेत.

भारताच्या उत्तरक्षेत्रात पर्यटकांना लोहचुंबकाप्रमाणे खेचून घेणारे आग्रा येथील ताजमहाल हे एक मोठे पर्यटनस्थळ आहे. यासाठी निगमाद्वारा दिल्ली, आग्रा, खजुराहो व वाराणसी ही शहरे जोडणाऱ्‍या मार्गांवर आधुनिक नवीन हॉटेलांचा विकास करण्यात आला व येत आहे. नवी दिल्लीतील अकबर व कुतुब हॉटेल, आग्रा येथील कोसी हॉटेल व ताज रेस्टॉरंट ही प्रसिद्ध असून खजुराहो व वाराणसी येथे नवीन हॉटेले बांधण्यात येत आहेत. उदयपूर येथील लक्ष्मीविलास पॅलेस हॉटेल अतिशय प्रसिद्ध आहे. पूर्व क्षेत्रावरील हवाई पर्यटकांकरिता सर्व सुविधांनी सुसज्ज असे ‘एअरपोर्ट हॉटेल’ कलकत्ता येथे उभारण्यात आले आहे. जम्मू व काश्मीर राज्यातील जम्मू नगरात ‘जम्मू मोटेल’ बांधलेले असून वैष्णवदेवी यात्रेला जाणाऱ्‍या भारतीयांसाठीही ते अतिशय सोयीचे आहे. अजंठा व वेरूळ यांना भेट देणाऱ्‍या पर्यटकांकरिता औरंगाबादमधील ‘औरंगाबाद हॉटेल’ आपल्या सर्व सुविधांनिशी सुसज्ज आहे. नवी दिल्लीच्या ‘अशोक हॉटेल’ या निगमाच्या अखत्याराखालील हॉटेलमध्ये एकावेळी २,५०० व्यक्तींचे संमेलन, परिषद भरविली जाण्याची व्यवस्था आहे. महाबलीपुर येथे निगमाने मंदिराच्या खाडीप्रदेशात एक आमोदस्थल उभारले आहे. बेलूर आणि हळेबीड या सुप्रसिद्ध स्थळांना भेट देणाऱ्‍या पर्यटकांसाठी हसन येथे ‘हसन मोटेल’ उभारण्यात आले आहे.

कोवलम पुळणीवरील समुद्रस्नानाचा आनंद

निगमाने नवीन पर्यटनस्थलांच्या विकासकार्याबरोबर परदेशांत विविध उपक्रमांद्वारे व प्रचारमाध्यमांतून विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचे मार्ग हाती घेतले आहेत. परदेशांतील प्रचारकार्यास गतिमानता आणण्याकरिता एअर इंडिया तसेच विविध औद्यौगिक व व्यापारी प्रदर्शने, जत्रा यांचे सहकार्य निगम घेत असतो. जिनीव्हा, मिलान, ब्रुसेल्स, स्टॉकहोम, व्हिएन्ना इ. शहरांमध्ये निगमाने पर्यटन कार्यालये उघडली. अशाच प्रकारे ‘ऑपरेशन अमेरिका’ या उपक्रमाखाली अमेरिकेच्या प्रसिद्ध शहरांत कार्यालये उघडण्यात आली. हे दोन्ही उपक्रम यशस्वी झाल्याने ऑस्ट्रेलिया व दक्षिण-पूर्व भागासाठीही अशी कार्यालये उघडण्याच्या योजना आहेत. १९७८ मध्ये पर्थ (ऑस्ट्रेलिया) व बँकाॅक (थायलंड) येथे दोन पर्यटन कार्यालये उघडण्यात आली. प्रचारकार्यात अधिक गतिमानता व प्रभावीपणा आणण्याच्या हेतूने परदेशांमध्ये पर्यटन मंत्रालयाद्वारा प्रदर्शनांमधून रंगीत वृत्तचित्रांची निर्मिती आणि वितरण करण्यात येत आहे. यायोगे अधिकाधिक पर्यटक भारताकडे आकृष्ट होत आहेत.

याशिवाय परदेशी पर्यटकांकरिता निरनिराळ्या योजना कार्यवाहीत आणल्या जात आहेत. जून १९७७ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘इन्डरेल पास’ या योजनेमुळे परदेशी पर्यटकांना ७ ते ९० दिवसांच्या अवधीची भारतीय रेल्वे प्रवासाची तिकिटे, ठराविक डॉलर व पौंड स्टर्लिंग या परदेशी चलनांच्या बदल्यात उपलब्ध करण्यात आली आहेत. आतापर्यंत ११,८३३ परदेशी पर्यटकांनी या नव्या योजनेचा फायदा घेतला असून जानेवारी-मार्च १९७८ या काळात इन्डरेल पास तिकिटांपासून ५० लक्ष रुपये किंमतीचे परदेशी चलन भारतास मिळाले आहे. भारतीय पर्यटन मंत्रालयाने रस्त्याने प्रवास करणाऱ्‍यांसाठी निवडक ठिकाणी ‘पर्यटक ग्रामे’ वसविण्याची योजना कार्यवाहीत आणण्याचे ठरविले आहे. या प्रत्येक ग्रामामध्ये सहा ते आठ पर्यटक कुटीरे आणि १५ तंबुयुक्त निवासालये उभारण्यात येणार असून त्यांमध्ये सु. १०० पर्यटकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यार्थी व तरुण पर्यटकांना स्वस्त, कमी खर्चाची अशी ‘युवा होस्टेले’ देशभर उभारण्यात येत असून आतापर्यंत त्यांची संख्या पंधरा झाली आहे. ही होस्टेले त्रिवेंद्रम, अमृतसर , औरंगाबाद, भोपाळ, डलहौसी (पंजाब राज्य), दार्जिलिंग, गांधीनगर, जयपूर, मद्रास, नैनिताल, पणजी, पत्नीटोप (जम्मू आणि काश्मीर राज्य), पुरी, सिकंदराबाद व पंचकूल्य (हरयाणा राज्य) या ठिकाणी आहेत. या होस्टेलांमधील खाटांची संख्या ४४ ते ४६, तर प्रतिपर्यटक शुल्क ५ रु. (मैदानी स्थळे) व ६ रु (गिरिस्थानीय पर्यटनकेंद्रे) असते. केंद्र व राज्य असे दोन्ही शासनांचे संयुक्त प्रकल्प असले, तरी ही होस्टेले पूर्ण झाल्यावर त्या त्या राज्य शासनाच्या ताब्यात देण्यात येतात. दिल्ली येथे ‘अशोक यात्री निवास’ नावाचे भारतातील पहिले ‘जनता हॉटेल’ बांधण्याच्या कामास १९७८ मध्ये प्रारंभ झाला. अशा प्रकारची जनता हॉटेले सबंध भारतभर पर्यटनक्षम, धार्मिक व सांस्कृतिक ठिकाणी बांधण्याची जनता सरकारची सर्वंकष योजना आहे. तीनुसार केंद्र सरकार मुंबई, दिल्ली, कलकत्ता व मद्रास अशा चार महानगरांमध्ये १५० ते १,२५० खाटांची सुसज्ज हॉटेेले बांधीत आहे. केंद्रीय पर्यटन खाते याच धर्तीवर १००,२५०,६०० व १,२५० खाटांची हॉटेले बांधण्याची योजना तयार करीत आहे.


भारतास १९७७ मध्ये ६,४०,४०० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. ही वाढ गतवर्षीपेक्षा १९·९ टक्क्यांनी अधिक होती. यामुळे भारतास २८३ कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळाले. १९७६ मध्ये विदेशी पर्यटक संख्येत १५% वाढ, पर्यटकसंख्या ५·३ लक्ष आणि परदेशी चलन २२५ कोटी रु. होते. विदेशी पर्यटकांमध्ये ग्रेट ब्रिटनचा पहिला (१३·१%), तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा दुसरा (११·६%) क्रमांक होता. पर्यटन उद्योग हा भारताचा सहाव्या क्रमांकाचा परदेशी चलन मिळविणारा उद्योग समजण्यात येतो.

महाराष्ट्र : पर्यटन विकासामध्ये महाराष्ट्र राज्यही मागे नाही. विदेशी पर्यटकांना मानवी स्वभावानुसार, भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ रहावी असे वाटणे साहजिकच आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच महाराष्ट्र राज्याने सबंध भारतात प्रथमच पर्यटन-स्मरणिका निर्माण करण्याचा पहिला मान पटकावला. या स्मरिका हस्तोद्योगांचे उप्तादन असल्याने त्या लाकूड, धातू, कागद, कापड, मृत्तिकाशिल्प इ. माध्यमांतून निर्माण केल्या जातात. ह्या स्मरणिका प्रसिद्ध स्मारकशिल्पाच्या प्रतिकृती अथवा सर्वोत्कृष्ट कलाकृतींची प्रतिरूपे ह्यांच्या स्वरूपात तयार करण्यात येतात.

मुंबई, पुणे, नासिक, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर ही औद्योगिक तसेच सांस्कृतिक कलाकेंद्रे अजंठा-वेरूळ ही विश्वविख्यात लेण्यांची पर्यटनकेंद्रे चैत्य शिल्पांसाठी प्रसिद्ध असलेली कार्ले, भाजे ही स्थाने अर्नाळा, ताडोबा यांसारखी पक्ष्यांची व पशूंची राष्ट्रीय अभयारण्ये सिंहगड, जंजिरा, रायगड, प्रतापगड, पुरंदर, सिंधुदुर्ग वगैरेंसारखे मराठ्यांच्या शौर्याची आणि अस्मितेची जाणीव करून देणारे किल्ले भंडारदरा, पन्हाळा, महाबळेश्वर, माथेरान यांसारखी थंड हवेची ठिकाणे कोयना, जायकवाडी, राधानगरी यांसारखे धरण-प्रकल्प पंढरपूर, आळंदी, जेजुरी, पाली इ. लाखांनी भरणाऱ्‍या यात्रांची तीर्थक्षेत्रे या सर्वांच्या रूपाने महाष्ट्र राज्य अंतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आवाहन करीत असतो.

अशा प्रकारे पर्यटन उद्योग आपली आयुष्ये आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोनांतून अधिक चांगल्या तऱ्‍हेने घडविण्याच्या अनेक संधी आपणास उपलब्ध करून देत असतो. या संधीचा लाभ उठविण्याकरिता, आपण आपली सर्व कल्पनाशक्ती, प्रदर्शनकला आणि प्रवर्तकीय चातुर्य पणास लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तुंग पर्वतराजी, वन्य प्राणिजीवन प्रकर्षाने भरलेली घनदाट अरण्ये, थंड हिरव्यागार दऱ्‍या व खोरी, सुंदर व रम्य पुळणी यांच्या स्वरूपात निसर्गाने आपल्यावर वरदहस्त ठेवलेला असून अनन्य स्मारकशिल्पे, वैभवशाली सांस्कृतिक वारसा, रंगीबेरंगी मेळे व सण-उत्सव यांच्या स्वरूपात सबंध भारतवर्ष पर्यटकांचे स्वागत करण्यास उत्सुक झाला आहे. आपणास हे सर्व लक्षात येऊन आपला पर्यटन उद्योग अशा तऱ्‍हेने कार्यान्वित करावयास हवा की, येत्या काही वर्षांत जागतिक पर्यटनकारावर भारताचे स्थान ठळकपणे प्रतिबिंबित होऊ शकेल. (चित्रपत्रे १५, ४३).

पहा : हॉटेल उद्योग. 

गद्रे, वि. रा.


वेरूळची अक्षर लेणी, महाराष्ट्र: इंद्राणीचे शिल्प. लुगमन येथील बुद्धमंदिरातील लोकपाल-द्वारपाल-मूर्ती, चीन.
जगप्रसिद्ध खजुराहो, मध्य प्रदेश : लक्ष्मी-नारायण मूर्ती. व्हर्सायच्या राजवाड्यातील शिल्पसुंदर कारंजे, फ्रान्स.
चितोडगढचा उत्तुंग कीर्तिस्तंभ, राजस्थान. निसर्गरम्य आल्प्स परिसराचे विहंगम दर्शन घडविणारा केबलमार्ग, स्वित्झलंड.
ओरिसातील विश्वविख्यात कोनारक मंदिराचे रथचक्र

ताजमहाल, आग्रा, भारत. बद्रिनारायण मंदिर, बद्रीनाथ, भारत. गंगाघाट, वाराणसी, भारत.
राजा-राणी संवादाचे दृश्य, लेणे क्र. १, अजिंठा, भारत. ‘बटेरिया लूप’, दार्जिलिंग, भारत. ‘ओल्ड फेथफुल’ गायझर: यलोस्टोन नॅशनल पार्क, केंटकी, अमेरिका.
मुलांचा किल्ला, डिझ्नी लँड, ॲनाहीम, अमेरिका. ‘क्रिस्टल लेक’, मॅमथ केव्ह नॅशनल पार्क, केंटकी, अमेरिका. कपबश्यांच्या आकृतिबंधातील क्रीडांगण, डिझ्नी लँड, ॲनाहीम, अमेरिका.