परशराम : (सु. १७५४–१८४४). मराठी शाहीर. हा नासिक जिल्ह्यातील वावी ह्या गावाचा रहिवासी व्यवसाय शिंप्याचा. अभंग झाले आहेत आता लावण्या व्हाव्यात, असा स्वप्नात दृष्टान्त झाल्यामुळे तो लावण्या रचू लागला, अशी आख्यायिका आहे. त्याच्या लावण्यांची संख्या सु. १७५ आहे. त्यांतील बऱ्याचशा लावण्या पौराणिक कथांवर व आध्यात्मिक विषयांवर असून त्यांवर संतकाव्याची छाया आहे. सांसारिकांची सुखदु:खे चित्रित करणाऱ्या लावण्याही त्याने लिहिलेल्या आहेत. त्याच्या शृंगारिक लावण्यांत अतिरेक वा अश्लीलता दिसत नाही. प्रासादिक, ओघवती अशी त्याची शैली आहे. लावणीच्या अखेरीस, स्वतःचे नाव घालण्यापूर्वी ‘नामी विट्ठल’, ‘नामे विठ्ठल’ किंवा ‘वरदी विठ्ठल’ अशा प्रकारचे उल्लेख तो करतो. परशरामाला विठ्ठलाचा साक्षात्कार झाला होता म्हणून तो असे उल्लेख करतो, असे काहींचे मत आहे, तर हा उल्लेख विठोबा खत्री ह्या त्याच्या मोक्षद गुरूचा असावा, असे काहींचे म्हणणे आहे. भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे आणि शहरे तो हिंडला होता. तत्कालीन समाजस्थितीचे उत्कृष्ट चित्रण त्याच्या कवनांत आढळून येते. इंग्रजी अमलात ‘लक्ष्मीला मूळ आले वाटते, समुद्रात जाईल दिसता’ हा होरा त्याने व्यक्त करून ठेवला होता. होळकर, गायकवाड, पवार ह्यांसारखे मराठी सरदार इंग्रजी राज्य, अशा विषयांवर त्याने काही पोवाडेही रचिले आहेत.

धोंड, म. वा.