पद्मनाभन्, टी. : (५ फेब्रुवारी १९३१– ). आधुनिक मलयाळम् कथाकार. त्यांचा जन्म केरळमध्ये पळ्ळिक्कुन्नू (जि. कण्णूर) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील कृष्णन् नायर. आईचे नाव देवकी. मंगलोर येथून ते बी. ए. व मद्रास येथून बी. एल. झाले. कायद्याची पदवी घेतल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली. नंतर वकिली सोडून ते एका खतकारखान्याच्या कोचीन विभागात अंबलमेडू (जि. एर्नाकुलम्) येथे व्यवस्थापक म्हणून काम करू लागले.

मलयाळम् साहित्यात, विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील, एक प्रमुख कथाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बहुतांश कथांतील परिसर केरळमधील नाही, तर तो उत्तर भारतीय आहे. भारताची फाळणी व तिच्यातून उद‌्भवलेल्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर त्या लिहिलेल्या आहेत. मलयाळम्‌मधील आधुनिक लघुकथेचे ते प्रमुख प्रतिनिधी मानले जातात. मलयाळम् कथेने आधुनिक काळात जे प्रगत वळण घेतले, त्यात काव्यमय भाषेचा आणि सूचकतेचा विकास झाल्याचे दिसते. प्रतिमांचा वापर हा तिचा  आणखी एक विशेष. अनावश्यक सर्व तपशिलांना तीत फाटा दिलेला आढळतो. या सर्वांचा परिणाम मलयाळम् कथा ही अधिक धारदार, अर्थसघन होण्यात झाला व तिची कलात्मक परिणामकारकताही वाढली. प्रसंगांपेक्षा तिचा भर भावनेवर अधिक आहे. तीत अनुभव जसाच्या तसा गोठवला जातो आणि वाचक त्याचा पुनःप्रत्यय घेऊ शकतो. सुरुवातीच्या काळात मलयाळम् कथा ही गोष्टींनी व प्रसंगांनी लघुकादंबरीसारखी ओतप्रोत भरलेली होती. तिचा भर गोष्टीवर अधिक होता. या मलयाळम् कथेचा कायापालट करून तिला नवे स्वरूप देण्यात पद्मनाभन् यांचा वाटा महत्त्वाचा आहे. संज्ञाप्रवाही कादंबरीचा जनक मानलेला प्रसिद्ध असा लेखक जेम्स जॉइस यांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे त्यांनी स्वतःच कबूल केले आहे. हा प्रभाव मानवाविषयीच्या सखोल आकलनाबाबत तसेच अभिव्यक्तितंत्राबाबत विशेषत्वे दिसून येतो.

त्यांची पहिली कथा १९४८ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांच्या बहुतांश कथा नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांचे काही महत्त्वपूर्ण कथासंग्रह असे : प्रकाशम् परतुन्न ओरु पेण् कुट्टि (१९५५, म. शी. एक प्रकाशदायी मुलगी), ओरु कथाकृत्तु कुरिशिल् (१९५६, म. शी. क्रूसावरील एक कथाकार), एंटे आद्यत्ते कथकळ् (१९५८, म. शी. माझ्या सुरुवातीच्या कथा), मखन् सिंगिटे मरणम् (१९५८, म.शी. माखनसिंगाचा मृत्यू), सहृदयनाय ओरु चेरुप्पक्कारंटे जीवितत्तिल् निन्न (१९६१, म. शी. एका सहृदय तरुणाविषयी) इत्यादी. यांतील बहुतेक संग्रहांची नावे त्यांत आलेल्या एकेका कथेचीच नावे आहेत. १९७१ मध्ये त्यांच्या निवडक कथांचा संग्रह टी. पद्मनामंटे तिरंजेटुत्त कथकळ् नावाने प्रसिद्ध झाला.

पद्मनाभन् यांनी त्यांच्या समकालीन कथाकारांसमवेत मलयाळम् कथेला नवी परिमाणे प्राप्त करून दिली. त्यांच्या कथाक्षेत्रातील आगमनामुळे कुंठित झालेल्या मलयाळम् कथेस नवचैतन्य प्राप्त झाले.

भास्करन्, टी. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)