पत्रवाङ्‌मय: पत्रलेखन हे सामान्यतः विशिष्ट व्यक्ति – प्रसंगांना उद्देशून केले जाणारे खाजगी वा औपचारिक स्वरूपाचे लेखन असते. ललित साहित्यासारखे ते सार्वजनिक आणि सर्व प्रकारच्या वाचकांसाठी केले जात नाही. तथापि अशा खाजगी पत्रलेखनात अनेकदा वाङ्मयीन लेखनाचे गुणविशेष आढळून येतात. पत्रलेखनाचा आत्माविष्कार, काव्यसौंदर्य पत्रलेखकाच्या जीवनातील व काळातील महत्त्वाच्या घटना व सांस्कृतिक विचारप्रवाह यांचे प्रतिबिंब किंवा प्रतिक्रिया यांसारख्या विशेषांमुळे काही व्यक्तींचा पत्रव्यवहार हा केवळ खाजगी ठरत नाही, तर तो सर्व वाचकांच्या दृष्टीनेही लक्षणीय ठरतो. अशा प्रकारचे पत्रलेखन संगृहीत करून प्रकाशित झाले, की ते पत्रवाङ्मयात जमा होते व इतर गद्य वाङ्‌मयप्रकारांप्रमाणेच ते सार्वत्रिक दृष्ट्या वाचनीय व उद्बोधक ठरते. 

पत्रलेखनात पत्रलेखकाचे एक प्रकारचे मनमोकळे आत्मनिवेदन संभवते. आत्मचरित्रातील हिशेबी विवेक त्यात क्वचितच आढळतो. पत्रविषय सामाजिक-राजकीय असेल, तर त्यातूनही तसाच मनमोकळेपणा जाणवतो. पत्रलेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंबही त्यात उमटलेले असते.

  

पत्रांचे पुढीलप्रमाणे स्थूल वर्गीकरण करता येईल : (१) खाजगी पत्रे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस लिहिलेली खाजगी, व्यक्तिगत पत्रे कालांतराने विशिष्ट उद्दिष्टांनी ग्रंथात समाविष्ट होऊ शकतात. (२) व्यक्तींनी संस्था, नियतकालिके ह्यांना लिहिलेली आणि पुढे ग्रंथात समाविष्ट झालेली पत्रे, (३) काल्पनिक पत्रे.

  

प्रकाशित पत्रांची व्याप्ती खूपच मोठी असून, त्यात अगणित प्रकारांचा समावेश करता येईल. बायबलच्या नव्या करारातील पॉल, जेम्स, पीटर, जॉन आणि ज्यूड ह्यांना उद्देशून असलेली एकवीस पत्रे तसेच व्हायकाउंट बॉलिंगब्रुकची (१६७८–१७५१) इंग्लिश चर्चच्या पाद्यांवर टीका करणारी पत्रे यांचा उल्लेख जसा इथे करता येईल, तद्वतच लेसिंगची Briefe, die neueste Literature betreffend (इं. भा. लेटर्स कन्सर्निग द न्यूएस्ट लिटरेचर, १७५९–६५) ही जर्मन पत्रे, चेक लेखक कारेल चापेकची (१८९०–१९३८) Anglicke listy (१९२४, इं. भा. लेटर्स फ्रॉम इंग्लंड,  १९२५), Vylet do Spanel (१९३०, इं. भा. लेटर्स फ्रॉम स्पेन, १९३१), Obrazky Z Holandska (१९३२, इं. भा. लेटर्स फ्रॉम हॉलंड, १९३३) ही पत्ररूप प्रवासवर्णने ही देखील त्यात समाविष्ट होऊ शकतात.

अव्वल इंग्रजी काळातील लोकहितवादींची प्रभाकरात आलेली शतपत्रे (१८४८–५०), बाळशास्त्री जांभेकरांचे देशी शाळांच्या स्थितीबद्दल बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सेक्रेटरी सी. ए. मोरहेड ह्यांना लिहिलेले पत्र (१८४०-४१), जांभेकरांचेच खारेपाटणच्या ब्राह्मी लिपीतील ताम्रपटाबद्दल ‘बाँबे रॉयल एशियाटिक सोसायटी’ च्या अध्यक्षास लिहिलेल पत्र (१८४२), बाळशास्त्री जांभेकर व पुणेकर ब्राह्मण ह्यांची ‘श्रीपत प्रकरण’ संबंधातील पत्रे (१८४४), इंग्रजी राज्य कलियुग नव्हे, असे सांगणारे बाबा पदमनजींनी ज्ञानप्रकाश कर्त्यांना लिहिलेले पत्र (१८५१), रे. अलेक्झांडर डफने डॉ. ट्वीडीला १८५७ च्या बंडाबद्दल लिहिलेली पत्रे (१८५८, ही पत्रे इंडियन रिबेल्यन : इट्स कॉझेस अँड रिझल्ट्स ह्या पुस्तकात संगृहित केलेली आढळतात), पंचहौदमिशन प्रकरणाबाबत सुबोधपत्रिका कर्त्यांना त्या ‘बेचाळीसातील एका’ ने लिहिलेले पत्र (१८९२), र. धों. कर्व्यानी समाजस्वास्थ्य मासिक चालविताना वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी लिहिलेली पत्रे (१९४३–४५), पं. सातवळेकरांनी आचार्य अत्र्यांना ‘पाकिस्तानची योजना’ इ. लेख पाठविताना हिंदु-मुसलमान संबंधांच्या संदर्भात लिहिलेले विचारप्रवर्तक पत्र  (१९४६), सेनापती बापटांचे नॅशनल स्टँडर्डला लिहिलेले पत्र (१९४७) अशी कितीतरी पत्रे ह्या प्रकारात समाविष्ट करता येतील. 

काल्पनिक पत्रांमध्ये लॅटिन कवी हॉरिसची (इ. स. पू. ६५–८) वीस वाङ्‌मयीन पत्रे, इटालियन कवी पीत्रार्क (१३०४–७४), फ्रेंच लेखक रूसो (१८१२–७८) यांची पत्रे, तसेच फ्लीटच्या तुरुंगात असलेला राजघराण्यातील कैदी जेम्स हौएल (१५९४–१६६६) ह्याने लिहिलेली इंग्रजी पत्रे, ऑव्हिडची (इ. स. पू. ४३–इ. स. १८) लॅटिनमध्ये नायिकांनी प्रियकरांना लिहिलेली पद्यमय पत्रे तसेच अमेरिकन वॉशिंग्टन अर्व्हिंग (१७८३–१८५९), आंग्ल कादंबरीकार विल्यम थॅकरी (१८११-१८६३) ह्यांची पत्रे समाविष्ट होतात. पत्रलेखनाचा घाट वापरून सॅम्युएल रिचर्ड्सनने पॅमेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड (१७४०) ही कादंबरी लिहिली. मराठीत वामन मल्हार जोशींची इंदू काळे, सरला भोळे, पु. भा. भावेंची अकुलिना इ. पत्रात्मक कादंबऱ्यांत हाच घाट वापरला आहे.

वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या देशांत निर्माण झालेले पत्रवाङ्‍‌मय विविध व विपुल आहे. प्राचीन ग्रीक साहित्यातील अलेक्झांडर (इ. स. पू. ३५६–३२३) आणि तिसरा डरायस ह्यांचा पत्रव्यवहार उल्लेखनीय आहे. प्रख्यात रोमन पत्रलेखक सिसेरो (इ. स. पू. १०६–४३) ह्याने ८६४ व्यक्तिगत पत्रे लिहिली. ह्या पत्रांतून त्याच्या काळावर उद्बोधक प्रकाश पडतो. आद्य खिस्ती धर्मगुरू आंब्रोझची (सु. ३४०–३९७) राजनीतिविषयक पत्रे उल्लेखनीय आहेत. इंग्रजी साहित्यातील जुना पत्रव्यवहार उपलब्ध आहे, तो नॉरफॉकमधील एका सुखवस्तू कुंटुंबातील मंडळींनी परस्परांना लिहिलेल्या पॅस्टन लेटर्सचा (१४२२–१५०९). पंधराव्या शतकातील परिस्थितीचा त्यावरून बोध होतो. सर टॉमस मोरने (१४७८–१५३५) तुरुंगातून आपल्या कन्येला लिहिलेले पत्र (१५३५) हे एका साहित्यिकाने लिहिलेले आद्य इंग्रजी पत्र होय. याच काळातील जॉन लिली, एडमंड स्पेन्सर, सर वॉल्टर रॅली, फ्रान्सिस बेकन, बेन जॉन्सन इत्यादींची पत्रे उल्लेखनीय आहेत.

जॉन मिल्टनने (१६०८–७४) आपल्या पत्रांतून राजकीय आणि वाङ्‌मयीन विषयांवर लिहिले. डॉरोथी ऑस्‍बर्नने (१६२७–९५) सर विल्यम टेंपलला लिहिलेली प्रेमपत्रे हे त्या काळाचे वैशिष्ट्य होय. जॉन ड्रायडन (१६३१–१७००) व विल्यम काँग्रीव्ह (१६७०–१७२९) ह्या नाटककारांनी भाषांतरापासून विनोदापर्यंत विविध वाङ्‌मयीन विषयांवर केलेला पत्रव्यवहार अतिशय हृद्य आहे. हॉरिस वॉल्पोल (१७१७–९७) हा पत्रलेखकांचा बादशहा मानला जातो. पॅजेट टॉयन्बीसंपादित अशी त्याची ३,०६१ पत्रे असून सर हॉरिस मान, लेडी ऑसोरी, हेन्री कॉन्वे, जॉर्ज माँटाग्यू इत्यादींना ती लिहिलेली आहेत. ह्या पत्रांतून त्याच्या आत्मचरित्राबरोबरच अठराव्या शतकातील साठ वर्षांचा इतिहास साक्षात डोळ्यासमोर उभा राहतो. जॅकोबाईटांची चळवळ व खटले, अमेरिकन युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती ह्या संदर्भातील त्याची पत्रे बोलकी आहेत. पत्रातून सुसूत्र विचार करणारे त्याचे मन, मित्रांविषयीचा जिव्हाळा आणि प्रगल्भ बुद्धी जाणवते. ऑलिव्हर गोल्डस्मिथने (१७३०-७४) प्रकाशक, रंगमंच-व्यवस्थापक इत्यादींना पत्रे लिहिली आहेत. गिल्बर्ट व्हाईटचा (१७२०–९३) नॅचरल हिस्टरी अँड अँटिक्किटीज ऑफ सेलबर्न हा ग्रंथ पत्ररूप आहे. लेडी मेरी वर्टली माँटाग्यू (१६८९–१७६२) ही प्रख्यात पत्रलेखिका असून, तिचा पत्रसंग्रह चार खंडांत उपलब्ध आहे. फॅनी बर्नि (मादाम द आबर्ले), एलिझाबेथ माँटाग्यू (१७२०–१८००), हॅना मोर इ. अन्य पत्रलेखिका होत. डेव्हिड गॅरिक (१७१७–७९) ह्या इंग्लिश रंगभूमीवरील नटाने लिहिलेल्या पत्रांतून त्याचे अन्य नटनट्यांशी असलेले हेवेदावे, स्पर्धा, वेतनाबद्दलच्या तक्रारी इ. गोष्टी समजतात. त्याचा लॉर्ड चॅटम, जॉन्सन बर्क, रेनल्ड्झ, गोल्डस्मिथ, बॉझ्‌वेल, शेरिडन इ. थोर व्यक्तींशी पत्रव्यवहार होता. त्याच्या स्वभावाचा कणखरपणा व डौलदार भाषा ही वैशिष्ट्ये त्याच्या पत्रांतून प्रकट होतात. 


स्वच्छंदतावादाच्या उदयानंतर एकोणिसाव्या शतकात अनेक कविमंडळी मित्रत्वाच्या नात्याने परस्पर सान्निध्यात आली. त्यांच्या वाङ्‌मयविषयक विशिष्ट कल्पनांबरोबरच त्यांची कलंदर आयुष्ये, करुण प्रेमभंग, भावनिक हुरहूर, मृत्यू इत्यादीविषयीचे तपशील त्यांच्या पत्रांतून आढळतात. जॉन कीट्सने (१७९५–१८२१)फॅनी ब्राउनला लिहिलेली पत्रे या संदर्भात लक्षणीय आहेत. पर्सी बिश शेलीची (१७९२–१८२२) पत्रे त्याच्या कवितांइतकीच सौंदर्यपूर्ण आहेत. लॉर्ड बायरनचा (१७८८–१८२४) पत्रव्यवहार प्रचंड असून त्याच्या लेटर्स अँड जर्नल्सचे १३ खंड उपलब्ध आहेत. त्यांत बंडखोर व उपहासात्मक पत्रेही आढळतात. वर्ड्‌स्वर्थची (१७७०–१८५०) वाङ्‌मयीन निर्मिती-संबंधातील पत्रे महत्त्वपूर्ण आहेत. रॉबर्ट ब्राऊनिंग (१८१२–८९) व एलिझाबेथ ब्राउनिंग (१८०६–६१) यांच्यातील विविध विषयांवरील लिहिलेली पण प्रणयाचा स्थायीभाव प्रकट करणारी पत्रेही उल्लेखनीय आहेत. टॉमस डे क्विन्सीच्या (१७८५-१८५९) पत्रांतून त्याच्या अफूबाचीवर प्रकाश पडतो. शार्लट ब्राँटीच्या (१८१६–५५) पत्रव्यवहारातून तिचे चरित्र प्रतिबिंबित होते. मेरी मिटफर्डच्या (१७८७–१८५५) पत्रव्यवहारातून रस्किनचे पूर्वायुष्य कळते. एलिझाबेथ लीने बॉनर व रस्किन यांच्याबरोबरचा तिचा पत्रव्यवहार संपादित केला आहे (१९१५).

मेकॉलेची (१८००–५९) पत्रे त्याच्या वक्तृत्वाप्रमाणेच ठाशीव आहेत. चार्ल्स डिकिन्झने (१८१२–७०) लिहिलेल्या पत्रांतून त्याच्या कादंबऱ्यांमधील स्वभावचित्रे प्रकट झाली आहेत. रुबायांचा भाषांतरकार फिट़सजेरल्ड (१८०९–८३) हा टेनिसन, कार्लाइल इत्यादींना लिहिलेल्या पत्रांतून आपल्या कल्पना, भावना प्रकट करीत असे. लेटर्स अँड लिटररी रिमेन्स हा त्याचा पत्रसंग्रह सात खंडात उपलब्ध आहे. रोसेटीने (१८२८–८२) आपल्या पत्रांतून ‘प्री-रॅफेएलाइट’ संप्रदायाबद्दल, तर सर एड्‌वर्ड बर्न-जोन्झने (१८३३–९८) कलावंताच्या समस्यांबद्दल लिहिले आहे. रूपर्ट ब्रुक (१८८७–१९१५) आणि डब्ल्यू. एच्. ऑडन (१९०७–७३) यांनी पत्रात्मक प्रवासवर्णने लिहिली. डब्ल्यू. बी. येट्सने (१८६५–१९३९) आपल्या पत्रांतून काव्यावर लिहिले आहे (लेटर्स ऑन पोएट्री टू डोरोथी वेलस्ली, १९४०).

व्हॉल्तेअरची (१६९४–१७७८) फ्रेंच भाषेतील १०,००० पत्रे हा एक अद्‌भुत प्रकार मानावा लागेल. व्हॉल्तेअरचे मन, त्याची प्रगाढ व विवेचक बुद्धिमत्ता त्या पत्रांतून निखळपणे प्रत्ययाला येते, ऑग्यूस्तिन सँत्-बव्हची (१८०४–६९) पत्रे त्याचा चिकित्सकपणा दर्शवितात. या दृष्टीने त्याचा Letters a la Princesse (१८७३, इं. शी. लेटर्स टू द प्रिन्सेस) हा पत्रसंग्रह उद्बोधक आहे. डॉस्टोव्हस्की (१८२१–८१) व चेकॉव्ह यांचे रशियन साहित्यातील पत्रवाङ्‌मयम सुप्रसिद्ध आहे. या संदर्भात डॉस्टोव्हस्कीची लेटर्स अँड रेमिनिसन्सेस (इं. भा. १९२३) व चेकॉव्हचे लेटर्स ऑन द शॉर्ट स्टोरी, द ड्रामा अँड अदर लिटररी टॉपिक्स (१९६६) हे पत्रसंग्रह मौलिक आहेत. प्रख्यात नॉर्वेजियन नाटककार हेन्रिक इब्सेनचे (१८२८–१९०६) रंगभूमीविषयीचे क्रांतिकारी विचार त्याच्या पत्रांतूनही प्रकटले आहेत. एक श्रेष्ठ डच चित्रकार व्हिन्सेंट व्हान गॉख (१८५३–९०) याने त्याच्या भावाला लिहिलेल्या पत्रांतून त्याच्या आकांक्षा, चित्रशैली व दैनंदिन जीवन उत्कटपणे प्रतिबिंबित झाले आहे. कंप्लीट लेटर्स ऑफ व्हिन्सेंट व्हान गॉख हा त्याचा समग्र पत्रव्यवहार तीन खंडांमध्ये प्रकाशित झाला आहे (१९५९). रवींद्रनाथ टागोरांची (१८६१–१९४१) अभिजात पत्रे (लेटर्स टू अ फ्रेंड, इं. भा. १९२८)पाश्चात्त्य जगातील व्यक्तीचा मोहरा पूर्वेकडे व विशेषत्वाने भारताकडे वळण्यास उपकारक ठरली आहेत.

मराठीतील पत्रवाङ्‌मयही अत्यंत विपुल आहे. ज्ञानेश्वराला चांगदेवाने लिहिलेले पत्र कोरे होते व मुक्ताबाई चांगदेवाला कोराच असल्याचे म्हणाली होती, तरी त्या कागदावरच चांगदेवपासष्टी लिहिली गेली. मराठीतील ऐतिहासिक पत्रव्यवहार अत्यंत विश्वसनीय स्वरूपाचे सत्यकथन करणारे प्रथम श्रेणीचे साधन म्हणून मानले जाते. त्यात शासकीय पत्रव्यवहार, वाटपपत्रे, शुद्धिपत्रे, वतनपत्रे, निवाडपत्रे, कोटुंबिक पत्रव्यवहार, आश्रितांची पत्रे, आश्रितांना लिहिलेली पत्रे, दानपत्रे, बक्षीसपत्रे, वार्तापत्रे, उपदेशपर पत्रे असे विविध प्रकार अंतर्भूत झाले आहेत. मात्र वाङ्‌मयीन पत्रव्यवहाराचा अभाव जाणवतो. युद्धप्रसंग, राजकीय डावपेच, व्यक्तींचे स्वभाववर्णन, जीवनातील पेचप्रसंग, यशापयश, आध्यात्मिक विवेचन इ. गोष्टी उपर्युक्त पत्रांतून आल्या आहेत. या संदर्भात पुढील पत्रव्यवहार उद्‌बोधक आहे : साने, मोडक, चिपळूणकर संपादित काव्येतिहाससंग्रहातील पत्रव्यवहार, डेक्कन व्हरनॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीने प्रकाशिलेले शाहू व पेशवे रोजकीर्दींचे नऊखंड, पारसनीसांच्या भारतवर्षातील व इतिहाससंग्रहातील पत्रव्यवहार.  पेशव्यांच्या अधिकाऱ्यांनी युद्धाच्या हकीकती सांगणारी व इतर व्यवहारांची पत्रे लिहून पाठवली आहेत. ह्या ऐतिहासिक दस्तऐवजाचे संशोधन वि. का. राजवाड्यांसारख्या संशोधकांनी जिद्दीने केले.

राजवाड्यांची मराठ्यांच्या इतिहासाची साधने (२२ खंड, १८९८ ते १९१७ या काळात प्रकाशित), वासुदेवशास्त्री खरे आणि त्यांचे पुत्र यशवंतराव यांचे ऐतिहासिक लेखसंग्रह (१५ भाग, १८९७ ते १९३० या काळात प्रकाशित), रियासतकार सरदेसाई संपादित पेशवे दप्तराचे ४५ खंड (१९३०–३४), गो. स. सरदेसाई, या. मा. काळे व वि. स. वाकस्कर संपादित काव्येतिहाससंग्रहा प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख (१९३०), गो. स. सरदेसाई, कृ. पां. कुळकर्णी आणि या. मा. काळे यांनी संपादिलेला ऐतिहासिक पत्रव्यवहार (१९३३), महादजी शिंद्यांची कागदपत्रे, भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेले शिवचरित्र साहित्याचे १३ खंड व ऐतिहासिक संकीर्ण साहित्याचे १४ खंड इ. जुन्या मराठीतील पत्रव्यवहारातून सु. ६० हजार पत्रे प्रकाशित झाली आहेत. जे उपलब्ध आहे ते फार थोडे आहे. अजून कितीतरी पत्रव्यवहार सापडू शकेल. रामदासांनी शिवरायाचे गुणवर्णन करणारे, संभाजीला लिहिलेले उपदेशपर पत्र सर्वपरिचित आहे.

इंग्रजी कालखंडातील पत्रव्यवहाराचे संकलन ह. वि. मोटे संपादित विश्रब्ध शारदा (२ खंड, १९७२ व १९७५) या पत्रसंग्रहात केले आहे. पहिल्या खंडात १८१७ ते १९४७ या कालखंडातील पत्रे समाविष्ट असून त्यात ‘महाराष्ट्रीय समाज व साहित्य’ या विषयावरील अनेकविधि क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तींची पत्रे संगृहीत केली आहेत. दुसरा खंड ‘मराठी रंगभूमी’ व ‘महाराष्ट्रातील संगीत’ ह्या संबंधींच्या पत्रांचा आहे. पहिल्या खंडाला दि. के. बेडेकरांची, तर दुसऱ्याला पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना आहे. पहिल्या खंडात सर जमशेटजी जिजीभाई, रेव्हरंड जॉन विल्सन, सर थॉमस अर्स्किन पेरी, मेरी कार्पेंटर, फ्लॉरेन्स नाइटिंगेल, मॅक्स म्यूरल, मौंट स्ट्युअर्ट एल्‌फिन्स्टन इत्यादींची मराठीं जीवनाबद्दल बोलणारी इंग्रजी पत्रे आली आहेत.

बाळशास्त्री जांभेकर, ‘लोकहितवादी’, न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई, आनंदीबाई व गोपाळराव जोशी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, सार्वजनिक काका, लोकमान्य टिळक, आगरकर, सयाजीराव गायकवाड, शाहू छत्रपती, जोतिराव फुले, वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, न. चिं. केळकर, सेनापती बापट, र. धों. कर्वे इत्यादींची पत्रे असून त्यातून त्या त्या लेखकाचे व्यक्तिमत्त्व तर जाणवतेच पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या लोकजीवनात त्या काळात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक चळवळींचा उसळलेला कल्लोळही दृष्टीस पडतो. साहित्यविषयक पत्रांमध्ये रेव्हरंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक, बालकवी ठोमरे, श्री. कृ. कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु. य. देशपांडे, मा. त्रिं. पटवर्धन इत्यादींची पत्रे आहेत. दुसऱ्या खंडात मराठी नाटक मंडळ्या, त्यांमधील जीवन, नटवर्ग व त्याची परिस्थिती, रंगभूमीच्या ऱ्हासकाळातील त्यांची दैना ह्याबद्दलची उद्‌बोधक पत्रे असून विष्णुदास भावे, किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, गडकरी, खाडिलकर, बालगंधर्व, चिंतामणराव कोल्हटकर, बोडस, केशवराव दाते, वरेरकर, र. कृ. फडके, डॉ. भालेराव इत्यादींनी ती लिहिली आहेत.

महाराष्ट्रातील अनेक गायक-संगीतकारांची पत्रे या खंडात आढळतात. त्यात महाराष्ट्राची परंपरा वृद्धिंगत करणाऱ्या, संगीताविषयी प्रेम व अभिमान बाळगणाऱ्या पंडित विष्णू दिगंबर पल्लुस्कर, अब्दुल करीमखाँ, विलायत हुसेनखाँ, वि. ना. भातखंडे, सवाई गंधर्व, गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर, सुंदराबाई, बा. र. देवधर, केशवराव भोळे इत्यादींचा उल्लेख करता येईल. कवी अनिल व कुसुमावती देशपांडे ह्यांच्यातील पत्रव्यवहाराचे कुसुमानिल (१९७२) हे संकलन वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती केवळ प्रणयपत्रे नसून तीत त्यांची परस्परांविषयीची ओढ, मानसिक ताण, घरच्यांचा विरोध, तसेच एकमेकांचे वाचन, वाचलेल्या पुस्तकांवरच्या त्यांच्या प्रतिक्रिया, काव्यावरचे प्रेम इ. विषयांवरील विवेचनही आढळते. हा एक मराठीतील अपूर्व पत्रसंग्रह आहे.  

वर्तक, चंद्रकांत