पणियन : भारताच्या केरळ राज्यातील एक आदिवासी जमात. पणियनांची वस्ती मुख्यतः पालघाट, कोझिकोडे व कननोर या जिल्ह्यांत आढळते. त्यांची लोकसंख्या सु. ४५,५६२ (१९७१) होती. तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांतही त्यांची थोडीफार वस्ती आढळते. त्यांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही पण तत्संबंधी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काहींच्या मते, ते मूळचे आफ्रिकन असून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ते अपघाती परिस्थितीत वस्तीस राहिले. इतर काही तज्ञ त्यांना इप्पी टेकड्यांतील रहिवासी समजतात परंतु या टेकड्यांचे स्थान अज्ञातच आहे. मलबारच्या राजाने आपल्याला वायनाडला आणले, असे पणियन सांगतात. पूर्वी आफ्रिकेतून काही गुलाम आणून ते पश्चिम किनारपट्टीवर विकत असत कदाचित त्यांपैकीच पणियन असावेत, असाही एक समज आहे. रुंद नाक, कुरळे केस, बुटकी शरीरयष्टी व पिंगट काळा वर्ण ही सर्वसाधारण आफ्रिकन जमातीची शारीरिक वैशिष्ट्ये त्यांच्यात आढळतात. पणियन स्त्री-पुरुष बेताचेच कपडे वापरतात. स्त्रिया उरोभाग झाकून गुडघ्यांपर्यंत वस्त्र गुंडाळतात. बहुतेक पुरुष अर्धनग्नच असतात. शेती, शिकार व मच्छीमारी हे ह्यांचे प्रमुख व्यवसाय होत. त्यांचे प्रमुख अन्न भात असून ते उंदीर, साप, माकडे यांसारखे प्राणीही खातात. खेकडे खाल्ल्याने टक्कल पडत नाही व केस पिकत नाहीत, अशी त्यांची समजूत आहे. त्यांच्यापैकी अनेक पणियन शेती व मोलमजुरी करतात. तमिळ व तुळू शब्दांच्या मिश्रणातून तयार झालेली अपभ्रंश मलयाळम् बोली ते बोलतात. हे लोक शेताजवळच बांबूच्या झोपड्या बांधून राहतात. त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असून स्वतंत्र कुळी नाहीत. जमातीतील प्रमुखाला कु़ट्टन म्हणतात. त्याचा सल्ला विवाहादी बाबतींत घेतात. वयात आल्यावर मुलामुलींची लग्ने करतात. लग्नात वधूमूल्य देतात. ते देण्यास वर अपात्र असल्यास तो वधूच्या घरी सेवा करतो. अनेक वेळा वधूमूल्य वा सेवा या दोन्ही गोष्टी वरावर लादण्यात येतात. वधू व तिची आई यांना देणगी म्हणून नवीन वस्त्र द्यावे लागते. त्यांच्यात अपहरण, सहपलायन, जबरी, क्रय इ. सर्व विवाहप्रकार रूढ आहेत. पणियन जमातीत एकपत्नीत्वाची चाल असून घटस्फोटादी प्रकार क्वचितच आढळतात. घटस्फोटित स्त्रीस पुनर्विवाहाची मुभा असते. लग्नात एकत्र जेवणे हा एक मोठा समारंभ असतो. ऋतुकाळात स्त्रिया वेगळ्या राहत नाहीत तसेच गरोदरपणी कोणताही विशिष्ट विधी ते करीत नाहीत. बाळंतीण दहा दिवस विटाळ पाळते. वडील वा ज्येष्ठ व्यक्ती नामविधी पार पाडते. महिन्याच्या आत अपत्याचे कान टोचतात.
पणियन जडप्राणवादी असून निसर्गपूजक आहेत. त्यांपैकी बरेच स्वतःस हिंदू समजतात व त्यांचे सण करतात. काडू भगवती व काली या त्यांच्या प्रमुख देवता असून त्यांचा आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास आहे. भुताखेतांवर ते विश्वास ठेवतात. पणियन मृतांना पुरतात. दफनभूमीजवळ सातव्या दिवशी ते एकत्र जमून गायन-नर्तन करतात. सुतक सोळा दिवस पाळतात. या काळात मांसभक्षण करीत नाहीत तसेच दोन वेळा स्नान करतात. मृतात्म्याची बाधा होऊ नये म्हणून मृत व्यक्तीचा मुलगा हात, पाय व कमरेला मंतरलेला दोरा बांधतो. माघ मासात मृतांसाठी तर्पणविधी करण्याची प्रथा या जमातीत आढळते.
संदर्भ : 1. Ayyappan, A. Report on the Socio-Economic Conditions of the Aboriginal Tribes of the Province of Madras, Madras, 1948.
2. Luiz, A. A. D. Tribes of Kerala, Delhi, 1962.
देशपांडे, सु. र.
“