पट्टेरी मण्यार : हा कैरात प्रकारचा साप असल्यामुळे कैरातांची बहुतेक लक्षणे यात आढळतात. हा साप आणि ⇨ मण्यार एकाच बंगारस वंशातील आहेत पण ते भिन्न जातींचे आहेत. पट्टेरी मण्यारीचे प्राणिशास्त्रीय नाव बंगारस फॅसिएटस आहे. या मण्यारीचे विष अतिशय जहाल असल्यामुळे हिला ‘आगी मण्यार’ असेही म्हणतात. बंगालमध्ये या सापाला ‘शंखिनी’ म्हणतात. भारतात आसाम, नेफा (ईशान्य भारत), मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा आणि उत्तर प्रदेशाचा तराई भाग या प्रदेशांत पट्टेरी मण्यार आढळते. भारताखेरीज ती चीन, मलाया द्वीपकल्प आणि ब्रह्मदेश या प्रदेशांत सापडते.
हा साप बराच मोठा व दिसायला सुबक असतो. लांबी सु. १७० सेंमी. असते पण कधीकथी ती यापेक्षाही जास्त असते. शरीरावर एकाआड एक असे काळे व पिवळे पट्टे असतात. प्रत्येक पट्ट्याची (दोन्ही प्रकारच्या) रुंदी सरासरी ५ सेंमी. असते. मानेवर एक काळी
खूण असून ती डोळ्यापर्यंत पसरलेली असते. कधीकधी डोक्याच्या मध्यावर काळे ठिपके असतात. शरीराच्या वरच्या पृष्ठावर मधोमध एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत गेलेला एक वरंबा (उंचवटा) असून त्याच्यावर मोठ्या षट्कोणी खवल्यांची ओळ असते. शेपटाचे टोक जाड व बोटके असते.
इतर साप खाऊन हा आपली उपजीविका करतो पण उंदीर वगैरेही हा खातो.
पट्टेरी मण्यार अतिशय विषारी असून हिचे विष नागाच्या विषापेक्षा सोळा पटींनी जास्त जहाल असते.
कर्वे, ज. नी.
“