पट्टदकल : कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामधील प्राचीन मंदिरांच्या वास्तुशिल्पशैलीसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. बादामी गावाच्या ईशान्येस सु. २० किमी.वर हे मलप्रभा नदीकाठी वसले आहे. बादामीच्या चालुक्य घराण्याची (इ. स. ५३५–७५७) दुय्यम अथवा उत्तरकालीन राजधानी इथे होती. प्राचीन काळी किसुव्वोळल किंवा पट्टद किसुव्वोळल या नामांतरांनी ते प्रसिद्ध होते. टॉलेमीने (इ. स. १५०) उल्लेखिलेले पेटिर्गल हे भरभराटलेले प्राचीन नगर म्हणजेच पट्टदकल असावे, असेही एक मत रूढ आहे.
चार बाजूंनी बांधलेल्या दगडी भिंतींच्या आत मुख्य शहर वसले असून पूर्व व पश्चिम बाजूंस एकेक दरवाजा आहे. पूर्वी चालुक्यांच्या वेळी नगराच्या परिसरात असंख्य मंदिरे होती. त्यांपैकी आता फक्त दहा मंदिरे अवशिष्ट असून पूर्णतः सुस्थितीत एकदोन मंदिरेच आढळतात आणि विरूपाक्ष मंदिरातच फक्त पूजा-अर्चा इ. विधी चालू आहेत. मात्र इतर भग्न मंदिरांचे अवशेष इतस्ततः विखुरलेले असून कन्नड भाषेत लिहिलेले अनेक शिलालेख तेथे सापडले. त्यांपैकी बहुतेक कन्नड रिसर्च इन्स्टिट्यूट या धारवाडमधील संस्थेत हलविण्यात आले आहेत व त्यांचे वाचनही झाले आहे.
अवशिष्ट मंदिरांत पापनाथ हे सर्वांत जुने (६८०) व विरूपाक्ष हे नंतरचे (७४०) मंदिर असून दोन्ही मंदिरे कलादृष्ट्या प्रेक्षणीय व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. संगमेश्वर, विरूपाक्ष व पापनाथ ही येथील काही मंदिरे वगळता उर्वरित मंदिरे आकाराने लहान व वास्तुकलादृष्ट्या गौण वाटतात. येथे नागरशैली (इंडो-आर्यन) व द्राविडशैली या दोन्ही शैलींतील मंदिरे एकमेकांजवळ बांधलेली असून या शैलींच्या मनोहर संमिश्रणातून त्या काळात उत्क्रांत झालेली ‘चालुक्य’ ही स्वतंत्र उपशैलीही पहावयास मिळते. पापनाथ, जंबुलिंग, काडसिद्धेश्वर व काशीविश्वनाथ ही मंदिरे नागरशैलीत, तर संगमेश्वर, विरूपाक्ष, मल्लिकार्जुन, गलगनाथ, जिनालय इ. द्राविड शैलीत बांधलेली आहेत. पापविनाशन व इतर काही भग्न मंदिरे चालुक्यशैलीत आढळतात. दक्षिण हिंदुस्थानात ख्यातनाम असणाऱ्या ‘गोपुर’ या वास्तूची सुरुवातही येथील देवळांतून झाली असावी, असे तज्ञांचे मत आहे. कारण ज्याला ‘आद्य’ अथवा ‘गर्भ गोपुर’ कल्पना म्हणता येईल, त्याची रूपरेषा येथील विरूपाक्ष मंदिराच्या बांधणीत आढळते.
येथील मंदिरे वरील दोन्ही शैलींची प्रातिनिधिक असून प्रस्तुत शैलींतील वास्तुशास्त्र दृष्ट्या दृग्गोचर होणारी बहुतेक वैशिष्ट्ये त्यांत आढळतात. तथापि पापनाथ मंदिराचा आलेख व उत्सेध यांमधील परस्पर संबंधांत विसंगती आढळते. याशिवाय त्याच्या शिखराची रचना आणि त्याच्या बाहेरच्या भिंतीवरील (मंडोवर) छोट्या गर्भगृहात्मक छज्जांची रेलचेल वास्तुशास्त्र दृष्ट्या काहीशी विसंगत वा अस्थायी वाटते. पापनाथ हे दुसऱ्या कोणत्यातरी देवतेचे मंदिर असावे, असे बहुतेक विद्वानांचे मत आहे. पुढे त्याचे नाव बदलले गेले. विरूपाक्ष आणि त्रैलोक्येश्वर ही मंदिरे दुसऱ्या विक्रमादित्याने (७३३–४५) आपल्या कांचीपुरम्वरील विजयाच्या स्मरणार्थ, त्रैलोक्यमहादेवी या आपल्या राणीच्या आग्रहाने बांधली. त्रैलोक्येश्वर मंदिर आज अस्तित्वात नाही. त्याचे भग्न अवशेष इतस्ततः विखुरलेले आहेत तथापि विरूपाक्ष मंदिर सुस्थितीत असून लोकेश्वर या शिवरूपाला ते प्रथम अर्पण केलेले असल्यामुळे लोकेश्वर या नावाने ते प्रथम प्रसिद्ध होते. सूत्रधारी गुंड या शिल्पीने ते त्रैलोक्यमहादेवीच्या लोकमहादेवी या भगिनीसाठी बांधले, असा शिलालेखांत उल्लेख आहे. पुढे त्याचे विरूपाक्ष हे नाव रूढ झाले. या मंदिरात कन्नड भाषेत लिहिलेले बारा शिलालेख असून त्यांतील एका शिलालेखात ‘श्री गुण्डन अनिवारिताचारी’ या शिल्पीच्या गौरवार्थ दिलेल्या दानांचा आणि उपाधींचा उल्लेख आहे. मिक्रमादित्याने पल्लवांवरील विजयाच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले असले, तरी ते कांचीपुरम् येथील कैलासनाथ मंदिराचीच प्रतिकृती वाटते. याबद्दल आता बहुतेक तज्ञांचे एकमत आहे. एवढेच नव्हे, तर या मंदिरावर पल्लव वास्तुशिल्पशैलींचा प्रभाव आढळतो. विरूपाक्ष मंदिराचे गर्भगृह सभामंडपापासून अलग असून त्याला वेगळा प्रदक्षिणापथ आहे. नंदीमंडपात सोळा एकसंध नक्षीदार स्तंभ असून मंडप दगडी भिंतींनी वेष्टिलेला आहे. तथापि प्रकाशाकरिता दगडी खिडक्या भिंतींतून काढल्या आहेत. येथे चैत्य-गवाक्ष कल्पना सढळ प्रमाणात वापरलेली आढळते. शिखर चौकोनी मनोऱ्यासारखे असून एकावर एक अशा थरांनी शिखराचा उत्सेध साधला आहे. नंदीमंडप मंडपापासून पूर्णतः वेगळा असूनही त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे तो मंदिराचाच एक भाग वाटतो. संगमेश्वर मंदिराचा आराखडा व इतर वास्तुशास्त्रीय तपशील विरूपाक्ष मंदिराप्रमाणेच आहेत, मात्र त्याचा सभामंडप उघडा आहे.
पट्टदकल येथे चालुक्य घरण्याच्या शिल्पकलेचाही बहर पाहावयास मिळतो. याची स्फूर्ती साहजिकच वास्तुकलेप्रमाणे पल्लवांकडून चालुक्य कलाकारांनी आत्मसात केली असावी. त्यांचे अनेक कलाकार हे पल्लव (कांचीपुरम्) प्रदेशातील होते. पल्लवांची बहुतेक ज्ञापके (मोटिफ) चालुक्यांच्या शिल्पकलेत स्पष्ट दिसतात. येथील छतांवर, स्तंभांवर, तोरणांवर तसेच अनेक शिल्पपट्टांतून रामायण – महाभारतातील कथाविषय हाताळलेले आहेत. स्तंभांवर चितारलेली गंगा आणि पूर्ण कलश, अहिल्या व इंद्र यांचे प्रणयाराधन, शरपंजरी भीष्माचार्य, त्यांचे अखेरचे क्षण वगैरे काही विषय लक्षणीय आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पापनाथ मंदिरातील काही प्रणयी युगुले आणि तेथील स्तंभांवरील त्रिपुरांतकाची कथा विशेष उल्लेखनीय व कलात्मक दृष्ट्या अप्रतिम आहे. याशिवाय रामायण, महाभारत, पुराणे यांतील इतर पौराणिक विषयही शिल्पीने विविध स्थळी खोदले असून संपूर्ण रामायण शिल्पांत रेखाटलेले येथे पाहावयास मिळते. याशिवाय शिवाची विविध रूपे व नाग-नागिणी यांचीही उठावदार शिल्पे आढळतात. छतांवरील शिल्पांत सूर्य-रथ, वेटोळे घातलेला नाग इ. शिल्पे सुरेख आहेत.
येथे एक आरोग्यकेंद्र उघडण्यात आले आहे. पर्यटन केंद्र म्हणून पट्टदकल ख्यातनाम आहे. विश्रमधामाचीही व्यवस्था तेथे करण्यात आली आहे.
संदर्भ : 1. Brown, Percy, Indian Architecture (Buddists and Hindu Periods), Bombay, 1959. 2. Cousens, Henry, Chalukyan Architecture of the Kanarese Districts, Calcutta, 1931. 3. Sivaramamurti, C. The Art of India, New York, 1974.
देशपांडे, सु. र.
“