पगोदिन, न्यिकलाय : (? १९००–१९ सप्टेंबर १९६२). सोव्हिएट नाटककार, गुंदरोव्स्काया येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मला. काही काळ (१९२०–२९) वर्तमानपत्रांतून निबंधलेखन केल्यानंतर नाट्यलेखानाकडे वळला. त्येंप (१९३०, इं. शी. टेंपो) ही त्याची पहिली नाट्याकृती सोव्हिएट सरकारच्या पंचवार्षिक योजनेवर आधारलेली होती. सोव्हिएट रशियातील प्रगती आणि तेथील श्रमिकांमध्ये निर्माण झालेल्या नव्या जाणिवा त्याच्या अनेक नाटकांतून त्याने चित्रित केलेल्या आहेत. उदा., पयेमा अ तपरे (१९३०, इं. शी. पोएम अबाउट द एक्स), चिलवेक स रुझयोम (१९३७, इं. शी. मॅन विथ अ गन), क्रिम्ल्योव्हस्किये कुरांती (१९४१, इं. शी. द क्रेमलिन चाइम्स) आणि त्रेत्या पातेतीचेस्काया (१९५८, इं. शी. द थर्ड पथेटिक) ही त्याची लेनिनवरील तीन नाटके विशेष प्रसिद्ध आहेत. १९४१ मध्ये शासकीय पुरस्काराचा आणि १९५९ मध्ये ‘आॅर्डर ऑफ लेनिन’ मिळण्याचा बहुमान त्यास प्राप्त झाला. मॉस्को येथे तो निवर्तला.
पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)