पंचास्तिकाय : दिगंबर जैनांचे महान आचार्य ⇨कुंदकुंदाचार्य ह्यांनी जैन-शौरसेनीत रचिलेला जैन-तत्त्वज्ञानपर ग्रंथ. त्यांनी रचिलेल्या पंचास्तिकाय, प्रवचनसार आणि समयसार ह्या तत्त्वज्ञानपर ग्रंथत्रयीत पंचास्तिकाय हा प्रमुख मानला जातो.
प्रस्तुत ग्रंथाचे दोन श्रुतस्कंध किंवा विभाग असून एकूण गाथासंख्या १७३ आहे. पहिल्या श्रुतस्कंधात सहा ‘द्रव्ये’ आणि पाच ‘अस्तिकाय’ ह्यांचे विवेचन आहे, तर दुसऱ्यात नऊ पदार्थांचे प्ररूपण केलेले असून पुण्य, पाप, जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष इत्यादींचे विवेचन आहे. ह्या ग्रंथावर अमृतचंद्र सूरी आणि जयसेन ह्यांच्या संस्कृत टीका आहेत. रायचंद्र जैन शास्त्रमालेत हा ग्रंथ ह्या टीकांसहित प्रसिद्ध झालेला आहे (१९०४). ए. चक्रवर्ती ह्यांनी त्याचा केलेला इंग्रजी अनुवाद १९२० मध्ये प्रकाशित झाला. चक्रवर्तींच्या या ग्रंथाची डॉ. आ. ने. उपाध्येकृत सुधारित आवृत्ती भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये निघाली.
तगारे, ग. वा.