क्षीरसागर, श्रीकृष्ण केशव : (६ नोव्हेंबर १९०१–२९ एप्रिल १९८०). मराठी लेखक, समीक्षक. जन्म सातारा जिल्ह्यातील पाल (पाली) येथे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टेंभुर्णी व सातारायेथे. साताऱ्याच्या सरकारी शाळेतून ते मॅट्रिक झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी. ए.ची पदवी घेतली. आरंभी भावे स्कूलमध्येते शिक्षक होते. पुढे पुण्याच्या एम्. इ. एस्.महाविद्यालयात ते मराठीचेप्राध्यापक होते. निवृत्तीनंतर विद्यापीठ अनुदान मंडळाच्या योजनेनुसारपुणे विद्यापीठात त्यांची नेमणूक झाली. १९५९ मध्ये मिरज येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्यअकादेमी, दिल्ली येथे मराठी सल्लागार मंडळाचे ते नियुक्त सदस्य होते.
स्वतंत्र विचारांचे टीकाकार व चिंतक म्हणून क्षीरसागर यांची विशेष ख्याती आहे. समाज, संस्कृती व जीवन यांच्या विविध अंगांबद्दल त्यांनी सखोल चिंतन केले असून वाचकांच्या गृहीत कल्पनांना धक्के देणारे आपले विचारही आव्हानपूर्ण शैलीत व तडफदार रीतीने मांडले आहेत. १९४० साली प्रसिद्ध झालेल्या राक्षस विवाह या कादंबरीने ते प्रथम प्रसिद्धीस आले. आकर्षक शैली व प्रक्षोभक विचार यांमुळे त्यांची ही कादंबरी बरीच गाजली. १९४५ साली प्रसिद्ध झालेल्या सुवर्णतुला या ग्रंथाने राज- कारणावरही तत्त्ववेत्त्याच्या भूमिके-वरून लिहिणारे विचारवंत म्हणून त्यांचे नाव झाले. महान व्यक्तींचे मूल्यमापन हा त्यांचा खास विषय. सुवर्णतुलेमधील व त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सागरमंथनमधील व्यक्तिचित्रे वाचली म्हणजे व्यक्तिपरीक्षणाचे नवेच मानदंड त्यांनी निर्माण केले आहेत याची खात्री पटते.
क्षीरसागर यांच्या सामाजिक व वैचारिक निबंधांतून त्यांचे सखोल चिंतन, व्यापक व निकोप दृष्टिकोन व सहृदय अंत:करण दिसून येते. साहित्या-प्रमाणे जीवनाचेही ते सौंदर्यवादी भाष्यकार होते. दै. लोकसत्तामधील ‘सुखसंवाद’ व ‘प्राप्तसंवाद’ या त्यांच्या स्तंभलेखातून त्यांनी आपले सामाजिक, राजकीय, संस्कृतिविषयक व वाङ्मयविषयक विचार मोकळेपणाने मांडले. वादे वादे (१९६२) आणि बायका (१९६२) या लेखसंग्रहांतून त्यांचे प्रसिद्ध झालेले लेख त्यांच्या चिंतनशील वृत्तीची साक्ष देतात.
व्यक्ती आणि वाङ्मय (१९३७), वाङ्मयीन मूल्य, वादसंवाद, साहित्याच्या दरबारात, उमरखय्यामची फिर्याद (१९६१), टीकाविवेक(१९६५), आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकूर (१९७०) हे त्यांचेकाही प्रमुख स्फुट टीकालेखसंग्रह. यांमधून सौंदर्यवाद, गूढवाद, नव-मानवतावाद, वास्तववाद इ. वाङ्मयीन वादासंबंधी त्यांनी केलेली मूलभूत चर्चा उद्बोधक व सखोल आहे. तसेच ‘शोकनाट्या ‘संबंधी त्यांनी केलेले विवेचनही मूलगामी आहे. उमरखय्यामची फिर्याद या ग्रंथात क्षीरसागरयांच्या काव्यात्म टीकेचे नमुने पहावयास मिळतात. विशेषतः त्यातील ‘शरदबाबू’, ‘रवींद्रनाथ’, ‘उमरखय्याम’, ‘मीरा’ यांवर लिहिलेले टीकालेख निर्मितिक्षम टीकेचे सुंदर नमुनेच म्हणावे लागतील.
क्षीरसागर यांनी त्यांच्या सौंदर्यवादी दृष्टीला जे काही अनिष्ट आढळले, त्यावर त्यांनी प्रामाणिकपणे कठोर टीका केली. ‘खरी भाषाशुद्धी व तिचे खरे वैरी’, ‘कला म्हणजे काय’, ‘साहित्यातील सोवळेपणा’ तसेच ‘नवकाव्य’ आणि ‘नवकथे ‘वरील त्यांचे लेख, त्यांची भाषणे त्यांच्या झुंझार वृत्तीची साक्ष देतात. वाङ्मयीन मूल्यांची योग्य जोपासना व्हायलाहवी अशी त्यांची दृष्टी होती. टीकाविवेक या ग्रंथामध्ये त्यांच्या जीवन-विषयक व साहित्यविषयक व्यासंगाचे प्रतिबिंब आहे. त्यामध्ये याग्रंथाच्या पूर्वार्धात त्यांनी आधुनिक टीकेच्या स्वरूपाचे निरूपण केलेअसून ‘साहित्य आणि नीती’, ‘टीका आणि विद्वत्व’, ‘काव्यात्मटीका’ यांसारख्या प्रश्नांची मूलगामी चर्चा केली आहे. उत्तरार्धात अर्वाचीन वाङ्मयातील द्विविध प्रेरणा आणि त्याच्या संदर्भात सौंदर्यवाद, वास्तववाद व गूढवाद यांची मीमांसा केली आहे. या ग्रंथाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे कलाप्रेरणांचे त्यांनी केलेले सूक्ष्म विवेचन. तसबीर आणि तकदीर (१९७६) हे त्यांचे आत्मचरित्र होय.
अदवंत, म. ना.
“