ह्यूम, टॉमस अर्नेस्ट : (१६ सप्टेंबर १८८३–२८ सप्टेंबर १९१७). इंग्रज सौंदर्यशास्त्रवेत्ता, साहित्यसमीक्षक व कवी. तो ⇨ प्रतिमावादी चळवळीतील एक पुरस्कर्ता असून, विसाव्या शतका-तील साहित्य त्यावर त्याचा प्रभाव जाणवतो. जन्म एंडन (स्ट्रॅटफर्डशर) येथे. न्यू कॅसल येथील ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेऊन सेंट जॉन्स कॉलेज (केंब्रिज) येथे त्याने प्रवेश घेतला तथापि गैरवर्तनाबद्दल त्याला कॉलेजातून काढून टाकण्यात आले (१९०४). त्यांनतर त्याने लंडनच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ‘मध्ये प्रवेश घेतला पण पदवी घेण्यापूर्वीच तो कॅनडाला गेला (१९०६). पुढे काही दिवस ब्रूसेल्स (बेल्जियम) येथेवास्तव्य करून तो लंडनला स्थायिक झाला. लंडनच्या साहित्यिक वर्तुळात त्याने स्वतःला प्रस्थापित केले. लंडनमधील साहित्यिक व कलावंत यांचा नेता म्हणून तो ओळखला जाऊ लागला. त्याने प्रतिमावादी प्रणालीच्या चळवळीला गती दिली. त्याने १९०८ मध्ये मांडलेल्या काव्यविषयक सिद्धांतातून प्रतिमावादाचा (इमॅजिनिझम्) उगम झाला. या सिद्धान्तातून त्याने स्वप्नरंजन, भावुकता, धूसरता यांना अजिबात वाव न देणारे, तंत्रशुद्ध, कणखर काव्यतंत्र प्रतिपादिले. ते स्वच्छंदतावादाच्या विरोधी तात्त्विक भूमिका मांडणारे असून, प्रतिमावादाच्या उगमस्थानी होते. विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ आंरी बेर्गसाँ प्रभृतींच्या फ्रेंच ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद त्याने केले. तसेच ⇨ एझरा पाउंड, आस्बर्ट सोरेल, एफ्. एस्. फ्लिंट आणि हिल्डा डूलिट्ल ‘एच्. डी.’ यांच्यासह त्याने प्रतिमावादी चळवळीत प्रमुख भूमिका बजावली. प्रतिमावाद्यांनी पश्चिमी व पौर्वात्य अशा दोन्ही प्रकारच्या काव्य-साहित्यातून प्रेरणा घेतली होती. बोलोन्या येथील तत्त्वज्ञान परिषदेला (१९११) गेला असताना तो बायझंटिन कुट्टिमचित्रे (मोझेइक) पाहण्या-साठी राव्हेना येथे गेला. त्यामुळे त्याचे दृश्यकलांविषयीचे आकर्षणवाढत गेले. नंतर आंरी बेर्गसाँ यांच्या शिफारशीने त्यास पुन्हा केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळाला (१९१२). तेथून तो कलेच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यासासाठी बर्लिनला गेला (१९१३). पहिले महायुद्ध सुरू होताच (१९१४) तो सैन्यात दाखल झाला आणि पुढे तोफखाना अधिकारी झाला युद्धभूमीवर लढत असताना ओस–ड्ंवकर्क बीं येथे तो मारला गेला.
ह्यूम याच्या पाच कविता द न्यू एज (१९१२) मध्ये प्रकाशित झाल्या. डेस् इमेजिस्टेस (१९१४) या एझरा पाउंड यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहामुळेच प्रतिमावादी संप्रदायाचे ‘इमेजिस्ट्स’ हे नामकरण झाले. एडमंड गॉस, हेन्री न्यूबोल्ट अशा नामांकित कवींनी स्थापन केलेल्या ‘पोएट्स क्लब ‘चा तो सचिव होता ‘ऑटम’ आणि ‘सिटी सन्सेट’ या त्याच्या १९०९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितांना पहिल्या प्रतिमावादी काव्यरचनांचा मान मिळाला. १९१३ मध्ये रॉबर्टफ्रॉस्ट त्याच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाला. प्रख्यात समीक्षक ⇨ हर्बर्ट रीड यांनी ह्यूमचे निबंध व काही लेख यांचे संकलन करून स्पेक्युलेशन्स या शीर्षकार्थाने प्रकाशित केले (१९२४). नोट्स ऑन लँग्वेज अँड स्टाइल (१९२९) फ्युचर स्पेक्युलेशन्स (१९५५) ही त्याच्या साहित्यकृतींची संकलने होत. त्यांने फ्रेंचमधून इंग्रजीत केलेल्या भाषांतरांमध्ये आंरी बेर्गसाँ यांचे ॲन इंट्रोडक्शन टू मेटॅफिजिक्स (१९१२) आणि जॉर्ज सॉरेल यांचे रिफ्लेक्शन्स ऑन व्हायलन्स (१९१५) ही भाषांतरे महत्त्वाची आहेत.
ह्यूमने तत्त्वज्ञान, काव्य, सौंदर्यशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांवर ६० लेख प्रकाशित केले. त्यांत सहा प्रतिमावादी काव्यलेखांचा समावेश होता. तो बेर्गसाँच्या तत्त्वप्रणालीचा समर्थक होता. दृश्यकलांच्या क्षेत्रात त्याने अमूर्त कलेचे समर्थन केले आणि परंपरावादी कलेवर टीका केली. सर्व व्हिक्टोरियन मूल्यांना नाकारणारी ह्यूम ही कदाचित पहिली व्यक्ती असावी. टी. एस्. एलियटच्या मते ह्यूम ही विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक विचक्षण व्यक्ती होय.
संदर्भ :Roberts, Michael, T. E. Hulme, London, 1982.
गुडेकर, विजया म.
“