ह्यूबर, रॉबर्ट : (२० फेब्रुवारी १९३७). जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ. सूक्ष्मजंतूमध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेल्या जटिल प्रथि-नाची संरचना निश्चित केल्याबद्दल ह्यूबर यांना योहान डीझेनहोफर आणि हार्टमुट मिखेल यांच्यासमवेत १९८८ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
ह्यूबर यांचा जन्म म्यूनिक (जर्मनी) येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण ह्यूम्नीस्टिश कार्ल्स जिम्नॅशिअम येथे झाले (१९४७–५६). तसेच महाविद्यालयीन शिक्षण म्यूनिक टेक्निकल विद्यापीठात झाले (१९५६– ६३). त्यांनी रसायनशास्त्र विषयातील पदवी (१९६०) व पीएच्.डी. (१९६३) या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर त्यांनी तेथेच संशोधन-कार्य व अध्यापन केले (१९६३–७२). माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री (मार्टिन्सरीड) या संस्थेत त्यांनी संशोधन केले. ते या संस्थेचे संचालक होते (१९७२–२००५) आणि २००६ पासून गुणश्री संचालक आहेत. त्यांनी अधूनमधून म्यूनिक टेक्निकल विद्यापीठातही संशोधन केले (१९७६–२००५). ते बार्सेलोना, सिंगापूर, ड्यूइसबर्ग-इझेन, कार्डिफइ. विद्यापीठांमध्ये अभ्यागत प्राध्यापक होते.
ह्यूबर यांना प्रथिनांसारख्या जटिल रेणूंच्या आणवीय संरचना निश्चित करण्याकरिता क्ष-किरण विवर्तनाचा वापर करण्यात तज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती. प्रथिनाचे क्षपण करून प्रथम त्याचे शुद्ध स्फटिक रूप मिळवितात आणि नंतर त्याची आणवीय संरचना विश्लेषण पद्धतीने ठरवितात. या पद्धतीमध्ये स्फटिकाच्या अणूंमुळे क्ष-किरण शलाकेचे प्रकीर्णन होते. हे तंत्र जटिल प्रथिनाची (प्रकाशसंश्लेषी विक्रियेचा केंद्र) संरचना निश्चित करण्याकरिता ह्यूबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वापरली. हा जटिल प्रथिन काही ठराविक सूक्ष्मजंतूंमध्ये प्रकाशसंश्लेषणाकरिता आवश्यक असतो. या प्रथिनाची पूर्ण आणवीय संरचना स्पष्ट करण्यात हे तीनही शास्त्रज्ञ १८८५ मध्ये यशस्वी झाले. सूक्ष्मजंतूतील प्रकाशसंश्लेषण विक्रिया ही वनस्पतींमध्ये घडणाऱ्या प्रकाशसंश्लेषणापेक्षा अधिक साधी असते. या शास्त्रज्ञांच्या संशोधनकार्यामुळे बहुधा प्रकाशसंश्लेषण यंत्रणेसंबंधीच्या ज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण रीतीने वाढ झाली.
ह्यूबर हे एन्सायक्लोपीडिया ऑफ ॲनॅलिटिकल केमिस्ट्री या ज्ञानकोशाचे प्रमुख संपादक होते. तसेच ते १९७६ पासून जर्नल ऑफ मॉलिक्यूलर बायोलॉजी या नियतकालिकाचे संपादक आहेत. ते बव्हेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ मायक्रोबायोलॉजी इ. संस्थांचे सदस्य आहेत. त्यांनाई. के. फ्रे पदक (१९७२), ओटो हाइन्रिख व्हारबुर्ख पदक (१९७७), एमिल आडोल्फ फोन बेरिंग पदक (१९८२) रिखार्ट कून पदक (१९८७), सर हान्स आडोल्फ क्रेब्ज पदक (१९९२) इ. पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
मगर, सुरेखा अ.
“