ह्यूएल, विल्यम : (२४ मे १७९४–६ मार्च १८६६). इंग्रज तत्त्वज्ञ आणि इतिहासकार. जन्म लँकेस्टर, लँकेशायर येथे. त्याच्या आयुष्याचा बराच भाग त्याने ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे व्यतीत केला. तेथे तो शिकला त्याने शिकविलेही. १८२८–३२ ह्या कालावधीत तो खनिजशास्त्राचा प्राध्यापक होता. नैतिक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणूनही त्याने काम केले (१८३८–५५). केंब्रिज विद्यापीठाचा उपकुलगुरू म्हणूनही तो काही काळ कार्यरत होता. यामिकीपासून (मेकॅनिक्स) गतिकीपर्यंत (डाय्नॅमिक्स) अनेक भौतिकी विज्ञानांत त्याला स्वारस्य होते तथापि नीतिशास्त्र आणि विगमनविषयक प्रणाली (इंडक्टिव्ह थिअरी) ह्यांच्यावरील लेखनासाठी तो विशेष प्रसिद्ध आहे.

ह्यूएलने लिहिलेल्या ग्रंथांत हिस्टरी ऑफ द इंडक्टिव्ह सायन्स फ्रॉम द अर्लिएस्ट टू प्रेझेंट टाइम्स (३ खंड, १८३७) आणि द फिलॉसॉफी ऑफ द इंडक्टिव्ह सायन्सिस फाउंडेड अपाउन देअर हिस्टरी (१८४०) ह्या ग्रंथांचा समावेश होतो. द फिलॉसॉफी… ह्या ग्रंथाचे विस्तृतीकरण पुढे तीन स्वतंत्र ग्रंथांत झाले. ते ग्रंथ असे : हिस्टरी ऑफ सायंटिफिक आयडिआज (२ खंड, १८५८), नोव्हम ऑर्गॅनन रिनोव्हेटम (१८५८) आणि ऑन द फिलॉसॉफी ऑफ डिस्कव्हरी (१८६०). ह्यांपैकी नोव्हम ऑर्गॅनन… हा ग्रंथ ⇨ फ्रान्सिस बेकन ह्याच्या विगमनाधिष्ठित विचार- प्रक्रियेवरील नोव्हम ऑर्गॅनन ह्या ग्रंथाशी निगडित आहे. आधुनिक विज्ञानाची जी विगामी पद्धत आहे, तिचा पाया बेकनने घातला आहे.

सतराव्या शतकापासून विज्ञाने विकास पावू लागली. निरीक्षण आणि प्रयोग हा त्यांचा आधार होता आणि विज्ञानात विशेषेकरून उपयोगात येणाऱ्या अनुमानप्रकारांची वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्ते यांच्याकडून चिकित्सा होऊ लागली. ह्या चिकित्सेतूनच विगमनाचा वा विगामी तर्कशास्त्राचा उदय झाला तथापि विज्ञानाची रीती म्हणून विगमनाचे समर्थन करण्यात काही अडचणी येतात. [→ तर्कशास्त्र, विगामी]. त्यामुळे काही तत्त्वज्ञांनी विज्ञानाची रीती विगमनाधारित असते, हेच अमान्य केले आहे. अशा तत्त्वज्ञांमध्ये विल्यम ह्यूएल आणिकार्ल पॉपर (१९०२– १९९४) अशा काही तत्त्वज्ञांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यांची भूमिका थोडक्यात अशी : विज्ञानात निरीक्षणाने काही पुरावे उपलब्ध होतात. काही गृहीतक कल्पून आपण त्या पुराव्याचा उलगडा करू पाहतो. निरीक्षणाची कसोटी वापरून आपण हे गृहीतक पारखत राहतो. ते पारखण्यासाठी निगमनाने (डिडक्शन) उपलब्ध होणारे निष्कर्ष निरीक्षणाशी जुळतात की नाही हे पाहायचे. ते जुळत नसतील, तर ते गृहीतक बाजूला ठेवावे लागते पण निष्कर्ष निरीक्षणाशी जुळले, तरीही ते गृहीतक सत्य ठरत नाही. फक्त ते बाजूला टाकून दिले जात नाही. त्याचे परीक्षण चालूच राहते. तेव्हा विगमन ही विज्ञानाची पद्धती नसून गृहीतक-निगामी-पद्धती हे विज्ञानाच्या पद्धतीचे स्वरूप होय.

ह्यूएलच्या ईश्वरशास्त्रीय विचारांनी त्याच्या नैतिक प्रणालींना जन्म दिला तथापि विगमनाच्या संदर्भातल्या त्याच्या कामाच्या तुलनेत त्यांचे महत्त्व दुय्यम मानले गेले आहे. नैतिक तत्त्वज्ञानावरील त्याच्या ग्रंथांत द एलिमेंट्स ऑफ मोरॅलिटी इन्क्ल्यूडिंग पॉलिटी (१८८५) आणि लेक्चर्स ऑन सिस्टिमॅटिक मोरॅलिटी (१८८६) ह्यांचा समावेश होतो.

केंब्रिज, केंब्रिजशर येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.