होयसळ वंश : कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध राजवंश. कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील भूप्रदेशात मुख्यत्वे भूतपूर्व म्हैसूर संस्थानात इ. स. अकरावे ते चौदावे शतक यांदरम्यान या वंशाची सत्ताहोती. गंगवाडीच्या वायव्य दिशेला असलेल्या कडूर जिल्ह्यातील मुदगीर तालुक्यात हा वंश एका खेड्यात उदयास आला. त्याच्याविषयीची माहिती मुख्यत्वे शिलालेख, ताम्रपट तसेच प्राचीन संस्कृत, कन्नड व तमिळ वाङ्मयांतून मिळते. यांशिवाय तत्कालीन इब्न बतूता, अमीर खुसरौ, फिरिश्ता यांच्या प्रवासवृत्तांतही या वंशाविषयी काही उत्तरकालीन तपशील आढळतात. तत्कालीन कोरीव लेख व वाङ्मयातून त्याचा उल्लेख होयसण, होयसळ, पोयसळ, चोयसळ आदी नावांनी आढळतो परंतु पुढे होयसळ हेच नाव अधिक रूढ झाले. या वंशाच्या उत्पत्तीविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यांपैकी कोरीव लेखांतून आढळणाऱ्या एका कथेत या वंशाच्या नावाविषयी पुढील वृत्तांत मिळतो : “मुडगिरी तालुक्यातील एका गावात वासंतिकादेवीचे मंदिर होते. त्यात एक यती ध्यानास बसला होता. तेथे अचानक जंगलातून एक वाघ आला. तो यतीवर झडप घालणार इतक्यात तेथे आलेल्या जैन भक्ताकडे पाहून तो यती ओरडला. तेव्हा त्या यतीच्या तोंडून ‘होय/पोय-सोळ’ हे शब्द बाहेर पडले. ते ऐकून त्या जैनभक्ताने कमरेचा खंजीर उपसून त्या वाघाला ठार मारले.” ‘सळ’ हे त्या तरुणाचे नाव होते व ‘होय/पोय’ म्हणजे मार अशी आज्ञा त्या यतीची होती. त्यावरून या वंशास पोयसळ/होयसळ हे नामाभिधान प्राप्त झाले असावे.
नृपकाम (कार. १०२२–४७) हा या वंशातील पहिला ज्ञात पुरुषहोय. तो सोसावीर (शशकपुरा) येथे सेनापथक उभारून राहत असे.त्याने राजमल्ल पेरुमाण अडी ही पदवी धारण केलेली होती. त्याचा मुलगा विनयादित्य (कार. १०४७–११००) हा विक्रमादित्य (सहावा) चालुक्यांचा सामंत असून गंगवाडीच्या वर्चस्वासाठी चालुक्य व चोलयांच्या संघर्षात तो चालुक्यांना मदत करीत होता. इरेयंग हा त्याचा मुलगा त्याच्याबरोबर युद्धात सहभागी असे. प्रथम विनयादित्य सोसावीरमधूनच कारभार पाही. पुढे त्याने दोरसमुद्र (द्वारसमुद्र/हळेबीड) येथे राजधानी स्थापिली (१०६१). शिवाय बेलूर येथेही त्याचे वास्तव्य होते. परमार राजा जगद्देव याने १०९३ मध्ये होयसळनाडवर स्वारी केली. त्याला निकराचा प्रतिकार करून विनयादित्य याने राजधानीचे संरक्षण केले. गंगवाडीवरही त्याने वर्चस्व मिळविले होते. त्याच्यानंतर त्याचा मुलगा इरेयंग (कार. ११०२–०४) राजा झाला. त्याने चालुक्य सहावा विक्रमादित्याचा सामंत म्हणून परमारांची राजधानी धारानगरीवर स्वारी करून ती जिंकली आणि एचळादेवी या चोल राजकन्येशी विवाह करून त्या घराण्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्याच्या मृत्यूनंतर बल्लाळ (कार. ११०४–०८) होयसळनाडच्या गादीवर आला. बेलूर येथून तो राज्यकारभार करी. शिवाय द्वारसमुद्र येथूनही काही दिवस त्याने कारभार पाहिला. ११०४ मध्ये त्याने चांगळांवर आक्रमण केले आणि धाकटा भाऊ बिट्टिदेव (विष्णुवर्धन) याच्या मदतीने नोळंबवाडीवर स्वारी करून पांड्यांचा पराभव केला. बल्लाळने राज्यविस्तार करून चालुक्यांचे मांडलिकत्व झुगारण्याचा प्रयत्न केला. त्याला संतती नव्हती. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ बिट्टिदेव (कार. ११०८–५२) सिंहासनाधिष्ठ झाला. होयसळ वंशातील हा श्रेष्ठ व कलाभिज्ञ राजा होय. तो विष्णूचा भक्त असून त्याने विष्णुवर्धन ही पदवी धारण केली होती. तो पराक्रमी व कुशल योद्धा होता. त्याने प्रथम गंगवाडीवर आक्रमण करून यश मिळविले. तसेच तळकाड हे नगर हस्तगत केले (१११७). त्यानंतर त्याने वीरगंग आणि तळकाडू-गोण्ड या पदव्या धारण केल्या. तसेच पूर्वेकडे कोलारपर्यंतचा प्रदेश पादाक्रांत केला आणि दक्षिण सीमेजवळ असलेली लहान राज्ये जिंकली व राज्याची सीमा कृष्णेपर्यंत नेऊन भिडविली. त्याने द्वारसमुद्राची पुनर्बांधणी करून विष्णूचे भव्य मंदिर बांधले आणि शिवमंदिराला अग्रहार दिला. दक्षिण सीमा सुरक्षित झाल्यानंतर त्याने उत्तरेकडे आक्रमण केले. त्याच्या सेनापतींनीही काही प्रदेश जिंकला, तेव्हा विक्रमादित्याने त्याला मागे रेटले. त्यामुळे विष्णुवर्धनाला चालुक्यांची सत्ता मान्य करावी लागली. त्याच्या राज्याच्या सीमा पूर्वेस नंगिली, दक्षिणेस चेरम अन्नमलयी पर्वत, पश्चिमेस बरकनूर आणि उत्तरेस साविमलयी अशा होत्या. आपल्या विजयश्रीप्रीत्यर्थ त्याने तुलापुरुषनामक महादान केले (११३७). त्याच्या ११३१ च्या कोरीव लेखात गंगवाडी, नोळंबवाडी, बनवासी आणि हानुंगल हे प्रदेश त्याच्या आधिपत्याखाली असल्याची नोंद आहे तथापि त्याच्या कोरीव लेखांवरून तो चालुक्यांचा मांडलिक असल्याचे स्पष्ट होते. तळकाड आणि बंकापूर या त्याच्या दोन प्रशासकीय राजधान्या होत्या.
विष्णुवर्धन धार्मिक दृष्ट्या सहिष्णू असून त्याने मदूरच्या शिवमंदिरास (नरसिंहचतुरवेदिमंगलम्) अनुदान दिले होते. त्याची राणी शांतलदेवी आणि सरसेनापती गंगराज हे जैन धर्मीय असून गंगराजाने हळेबीड येथे एकजैन मंदिर बांधले आणि त्याची प्रतिष्ठापना जैन यती नयकीर्तीच्या हस्ते केली. शिवाय त्याने उद्ध्वस्त झालेल्या जैन बस्तींची पुनर्बांधणी केली. उत्तरेकडील यशस्वी स्वारीनंतर परतताना त्याला लक्ष्मीदेवी या राणीपासून मुलगा झाल्याची वार्ता समजली. तेव्हा त्याने या विजयाप्रीत्यर्थ मुलाचेनाव विजय नरसिंह ठेवले व वरील जैन मंदिराचे विजय पार्श्वनाथ असे नामाभिधान केले. विष्णुवर्धनाने ११४७ पर्यंत बहुतेक शत्रूंवर विजय मिळविले होते. बहुधा तो ११५२ पर्यंत आणि अन्य काही कोरीव लेखांवरून ११५६ पर्यंत गादीवर होता. त्यानंतर त्याचा मुलगा पहिला विजय नरसिंह (कार. ११५६–७३) राजा झाला. त्याच्या मृत्यूनंतर दुसरा बल्लाळ (कार. ११७३–१२२०) राजा झाला. त्याने विष्णुवर्धनाने जे राज्य स्थापिले होते, त्याचे कार्यक्षम रीत्या परिरक्षण केले तथापि त्यासाठी त्याला कलचुरी व नोळंब या चालुक्यांच्या सामंतांशी संघर्ष करावालागला. शिवाय यादव राजांच्या प्रतिकाराला त्याने व त्याच्या सेनापतींनी यशस्वी रीत्या तोंड दिले. बनवासीच्या कदंबांवर त्याने युद्धात विजय मिळविल्यानंतर ११९३ मध्ये स्वतंत्र राज्याची घोषणा केली. तसेच त्याने चोल नृपती तिसरा कुलोत्तुंग व तिसरा राजराजा यांना सुंदर पांड्यांविरुद्ध मदत केली व सुंदर पांड्य राजाला चोलांचा पादाक्रांत केलेला मुलूख परत देण्यास भाग पाडले (१२१७). दुसरा बल्लाळ याच्यानंतर दुसरा नरसिंह( कार. १२२०–३४) होयसळनाडचा राजा झाला. त्याला चोलांचे राज्य वाचविण्याकरिता पाण्ड्य घराण्याशी सतत संघर्ष करावा लागला कारण चोलांची सत्ता दुर्बल झाली होती आणि पहिला मारवर्मा सुंदरपाण्ड्य याने चोलांची तंजावर व उरैयूर ही दोन प्रमुख शहरे जाळलीहोती. चोलांचा दुराग्रही सामंत काडव कोप-पेरुंजिंग याने या संधीचाफायदा घेऊन तिसरा राजराजा यास कैदेत टाकले. दुसऱ्यारसिंहाने महेंद्रमंगलम् येथील युद्धात सुंदर पाण्ड्याचा पराभव केला (१२३१) व राजराजास मुक्त केले. विद्याचक्रवर्तिनच्या गद्यकर्णामृत या रम्याद्भुत ग्रंथात दुसऱ्यारसिंहाबरोबरच्या पाण्ड्य, मगध व पल्लव राजांच्या संयुक्त फौजांच्या युद्धाचे रोमहर्षक वर्णन आढळते. दुसऱ्यारसिंहाने यादवांच्या आक्रमणास यशस्वी रीत्या पायबंद घातला. सिंघणाच्या दोन सेनापतींना त्याने युद्धात कंठस्नान घालून विजय मिळविला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा सोमेश्वर (कार. १२३४–६३) होयसळनाडचा राजा झाला. चोलांच्या दक्षिणेकडील राज्यास पाण्ड्य राजांपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने त्याने कण्णनूर येथे नवीन राजधानी स्थापिली आणि तिला विक्रमपूर हे नावदिले. ती श्रीरंगमपासून ८–१० किमी.वर होती. तेथून तो चोलांच्या प्रबल सामंतांपासून आपले संरक्षण करू शकला. त्याने आपल्या हयातीतच राज्याचा कारभार तिसरा नरसिंह (कार. १२५४–९१) व रामनाथ या मुलांकडे सोपविला आणि राज्याचे दोन भाग केले. त्यांपैकी तिसऱ्यारसिंहाकडे होयसळनाड व रामनाथकडे श्रीरंगमच्या परिसरातील स्वतःजवळचा भाग दिला. दरम्यान सोमेश्वराने आपली कन्या मारवर्मा ही सुंदर पाण्ड्य या राजाला देऊन सख्य केले पण पुढे जटावर्मा सुंदर पाण्ड्य हा राजा झाल्यानंतर पाण्ड्य व होयसळ यांत पुन्हा वितुष्ट आले. जटावर्मायाने चोल राज्यावर स्वारी करून तमिळनाडू व तेलंगणचा काही भाग पादाक्रांत केला. पुढे १२५७ मध्ये त्याने सोमेश्वर व रामनाथ यांचाही पराभव करून कण्णनूर हस्तगत केले पण अल्पावधीतच ते त्यांना परत केले. सोमेश्वराच्या मृत्यूनंतर (१२६३) तिसरा नरसिंह व रामनाथ यांत यादवी माजली. ती पुढे सुमारे वीस वर्षे चालू होती. यादवराजे महादेवव रामदेव यांनी होयसळनाडवर स्वाऱ्या केल्या. रामनाथ यानेही नरसिंहावर स्वारी केली. १२७९ मध्ये सुंदर पाण्ड्य राजाने कण्णनूर जिंकले आणि तिसऱ्यारसिंहावरही आक्रमण करून त्याचा काही प्रदेश हस्तगत केला. तेव्हा तो कुंडाणी येथून राज्य करू लागला. तिसऱ्यारसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा तिसरा वीर बल्लाळ (कार. १२९१–१३४२) राजा झाला. रामनाथाच्या मृत्यूनंतर (१२९५) तिसरा वीर बल्लाळ यास स्थैर्य प्राप्त झाले परंतु त्याच्या काही सामंतांनी सामुदायिक उठाव केला. तो मोडून काढतो तोच त्याला मुसलमानांच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. मुस्लिम आक्रमणामुळे होयसळनाडची जी हानी झाली, ती भरून येण्यास काही वर्षे लागली. त्याने राज्यात सत्ता दृढ करून तुंगभद्रेपर्यंतच्या प्रदेशावरपुन्हा आपली सत्ता स्थापण्याचे प्रयत्न केले. कांपिलीवर यशस्वी स्वारी केली. त्याने पेनुगोंडा येथे आपला भाचा मचेय दंडनायक याची नेमणूक केली. पुढे त्याने १३३३ मध्ये तुळुव देशातील आळुपवंशी राणीशीविवाह केला आणि तुळुव देश होयसळनाडमध्ये विलीन केला. त्यामुळे तिसरा वीर बल्लाळ याने पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत होयसळांची सत्ता प्रस्थापित केली. कांची नगरीतही त्याचे वास्तव्य होते. पुढे १३३८ नंतर विजयानगरच्या राजांशी होयसळांचा संघर्ष सुरू झाला. यात विजयानगरच्या राजांनी त्याचा काही प्रदेश जिंकला. अखेर मदुरेच्या सुलतानाशी लढताना त्रिचनापल्ली येथे तो मारला गेला. त्यानंतर चौथा बल्लाळ (कार. १३४३–४६) हा वीरुपाक्ष बल्लाळ या नावाने राज्यारूढ झाला. तो दुबळा होता. विजयानगरच्या राजांनी होयसळनाड जिंकून त्याचा अंतर्भाव विजयानगरच्या राज्यात केला.
राज्यव्यवस्था : होयसळांची राज्यव्यवस्था दक्षिण हिंदुस्थानातील इतर घराण्यांप्रमाणेच होती. सुरुवातीला होयसळ राजे कल्याणीच्या चालुक्यांचे सामंत म्हणून महामंडलेश्वर या उपाधीने स्थानिक कारभार पाहत असत. चालुक्यांच्या अधःपतनानंतर ते स्वतंत्र झाले. होयसळांच्या राज्यव्यवस्थेची माहिती तत्कालीन कोरीव लेखांवरून मिळते. राजा हा सर्वसत्ताधारीअसून अंतिम न्याय देई. त्याच्या मदतीस पाच मंत्र्यांचे पंचप्रधानमंडळअसून पंतप्रधानास सर्वाधिकारी म्हणत. विष्णुवर्धनाच्या काळी मारियान आणि भारत असे दोन बंधू सर्वाधिकारी होते. होयसळ राजांनी, विशेषतः दुसरा वीर बल्लाळ याने, समस्तभुवनेश्वर, महाराजाधिराज, श्री पृथिवीवल्लभ, परमेश्वर आदी उपाध्या वा पदव्या धारण केल्या होत्या. राज्यातील उच्चाधिकाऱ्यांत सर्वाधिकारी, महाप्रधान, सेनापती, दण्डनायक, महाप्रचंड-दण्डनायक, युवराज आदींचा समावेश असे. कारभाराच्या सोईकरिता सर्व राज्याची जिल्ह्यांत विभागणी केली होती. जिल्ह्यास नाड म्हणत वप्रत्येक जिल्ह्यावर एक महाप्रधानाच्या हाताखालील समस्तसेनाधिपती हा प्रमुख असे. काही प्रमुख जिल्ह्यांवर युवराजांची राज्यपाल म्हणून नेमणूक केली जात असे. विषय, देश, प्रांत अशा विभागांवर दण्डनायकनामक अधिकारी असे. या वेळी न्यायव्यवस्था पूर्वापार रूढीनुसार चालत होती. महाजन मंदिराच्या पूजाअर्चा व देखभालीसाठी जकातीद्वारे काही रक्कमजमा करीत. खेड्यास नाडू म्हणत व त्यांची महासभा कर गोळा करीत असे. खेड्यात ग्रामसभा असून ग्रामांना महसूल गोळा करण्याचा व काही बाबतींत न्याय देण्याचा अधिकार होता. काही गावुण्डांनी व प्रभूंनी देवालयांना ग्रामस्थांमार्फत देणग्या दिल्याचे पुरावेही आहेत. सर्व राज्यव्यवस्था कमीअधिक फरकाने चालुक्यांप्रमाणेच होती. कधी कधी खेड्यांच्या सीमांच्या संदर्भात वाद निर्माण होत. त्या वेळी संबंधित नाडूंच्या नागरिकांची महासभा भरविली जाई व त्यात न्यायनिवाडा होई. कोरीव लेखात अशा प्रकारच्या नऊ नाडूंनी सीमांचे परीक्षण करून न्यायनिवाडा केल्याचा उल्लेख आहे. होयसळांच्या राज्यात युद्धभूमीवर मरण पावलेल्या सैनिकाच्या (वीराच्या) कुटुंबासाठी ‘अम्बाळी’ नामक करमुक्त जमीन-जुमला दिला जात असे.
धार्मिक स्थिती : बहुतेक होयसळ वंशी राजे जैन धर्मीय असून त्यांनी अनेक जैन पंडितांना व विद्वानांना आश्रय दिला होता. विनयादित्याच्या कारकीर्दीत वर्धमानदेव ह्या जैन साधूस होयसळांच्या व्यवस्थापनात अनन्यसाधारण स्थान होते. इरेयंग आणि पहिला बल्लाळ यांच्यावर जैन अध्यात्मगुरूंचा प्रभाव होता. या राजांनी जैन मंदिरांना सढळ हाताने देणग्या दिल्या होत्या. या राजांपैकी विष्णुवर्धन हा पराक्रमी, शूर व श्रेष्ठराजा होता. त्याचे गुरू रामानुजाचार्य यांनी या जैन राजाला वैष्णव धर्माची दीक्षा दिली (१११६) आणि विष्णुवर्धनदेव असे त्याचे नवे नामकरणकेले. या राजाच्या मदतीने मेलकोटे येथे विष्णूचे मंदिर बांधले. तसेच तळकाड व तोन्नर (रामानुजाचे गाव) या ठिकाणी विष्णूची मंदिरे बांधली. वैष्णवांना व ब्राह्मणांना अग्रहार दिले. बेलूर येथे विजय नारायण मंदिर बांधले तथापि जैन धर्माबद्दलची त्याची सहिष्णू वृत्ती त्याने ११२५ मध्ये जैन साधू श्रीपाल त्रैविद्यादेव यांना दिलेल्या भेटीवरून आणि छल्य येथे बांधलेल्या जैन बस्तीवरून आढळते. याशिवाय काही जैन बस्त्यांना व यतींना त्याने देणग्या दिल्या. शिवाय बेलूरच्या मल्ली जिनालयाला ११२९ मध्ये देणगी दिली. तसेच द्वारसमुद्र या राजधानीतील जैन मंदिराचे नाव विजय पार्श्वनाथ ठेवले. त्याची राणी शांतालदेवी आणि सरसेनापतीगंगराज हे निस्सीम जैन भक्त होते. राणीचा आध्यात्मिक गुरू प्रभाचंद्र सिद्धान्तदेव (मेघचंद्र त्रैविद्यादेव या साधूंचा शिष्य) असून सल्लेखना-नामक प्रायोपवेशनाद्वारे सर्वसंगपरित्याग करून तिने देहत्याग केला (११३१). विष्णुवर्धनाचे अनेक सेनापती आणि मंत्री जैन धर्मीय होते. त्यांपैकी गंगराजाने अनेक जैन बस्त्या बांधल्या, काहींची पुनर्बांधणी केली आणि अनेक जिनालयांना देणग्या दिल्या. त्याची पत्नी लक्ष्मीमती जैन धर्माच्या सल्लेखनानुसार अनंतात विलीन झाली. श्रवणबेळगोळ येथे गंगराजाने तिच्या स्मरणार्थ समाधिलेख कोरून घेतला. बोप्प, पुनिस, मनियने आणि भरतेश्वर या सेनापतींच्या जैन श्रद्धेचा उल्लेख कोरीव लेखांत निर्दिष्ट झाला आहे. पहिल्या नरसिंहाने श्रवणबेळगोळला भेट देऊन देणगी दिली होती आणि त्याने हळ्ळ या आपल्या सेनापतीद्वारे चतुर्विंशती नावाची बस्ती बांधून घेतली. नंतरचे होयसळ राजेसुद्धा निस्सीम जैन भक्त असून त्यांचे गुरू जैन यती होते. एकूण होयसळ वंशाच्या काळी राजांव्यतिरिक्त सरदार, महाजन, व्यापारी व सामान्य जन यांनी जैन मंदिरे, जिनालये, बस्त्या बांधल्या व त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी दाने दिली.
कला : संगीत, शिल्पकला, वास्तुकला इत्यादींची या सुमारास खूपच प्रगती झालेली आढळते. नृत्य व संगीत यांना होयसळांनी उत्तेजन दिले. राजघराण्यातील स्त्रिया या अनेक कलांत निष्णात असून वाद्यसंगीतातहीत्या कुशल होत्या. मरियानेच्या तीन कन्या व पहिल्या बल्लाळाच्या राण्याही कलाभिज्ञ होत्या. पहिला बल्लाळ याची पट्टराणी पद्मला ही संगीत वनृत्याची शौकीन असून स्वतः गायन व नृत्य करीत असे. तसेच राणी शांतलदेवीला नृत्य व संगीताचे उत्तम ज्ञान होते. नृत्याच्या शिक्षिकेला पात्र-जग-दळे म्हणजे नृत्यांची प्रमुख मानीत. मंदिरांवरील शिल्पांतून अनेक नृत्यांगना व वाद्ये यांचे अलंकरण आढळते. होयसळांची वास्तुकला व शिल्पकला त्यांच्या मंदिरांतून आढळते. होयसळ वंशातील राजांनी सुमारे ऐंशी मंदिरे बांधल्याचे उल्लेख कोरीव लेखांत आहेत. बेलूर, हळेबीड, सोमनाथपूर येथील मंदिरे वास्तुशिल्पशैलीसाठी प्रसिद्ध असून या मंदिरांच्या वास्तुशिल्पशैलीत चालुक्यशैलीच्या वास्तुगुणविशेषांचे मिश्रण आढळते. त्यामुळे कलासमीक्षक तिला चालुक्य-होयसळ असे संयुक्त नाव देतात.दोड्ड बसाप्पा (डंबल) मंदिराव्यतिरिक्त बहुतेक मंदिरे तारकाकृती विधानाची असून गदग येथील सरस्वती मंदिराव्यतिरिक्त सर्वांच्या पीठावर प्रदक्षिणा पथ आहे. अवशिष्ट मंदिरांत हसन जिल्ह्यातील बेलूर, हळेबीड, दोड्डगड्डहळ्ळी, आर्सिकेरे, हर्जहळ्ळी, नुग्गीहळ्ळी, होळेनरसीपूर, हुळ्ळेकेरे, आराकेरे, जगवल, बेलवडी इ. ठिकाणी आणि म्हैसूर जिल्ह्यातील सोमनाथपूर व धारवाड जिल्ह्यातील डंबल, नागलपूर, रामनाथपूर, भद्रावती इ. ठिकाणी आढळतात. मात्र बेलूर, हळेबीड व सोमनाथपूर येथील मंदिरे या सर्वांत लक्षणीय असून कलात्मक, अलंकृत, वैविध्यपूर्ण शिल्पांनी नटलेली प्रातिनिधिक मंदिरे होत. त्यांपैकी लक्ष्मीदेवी हे सर्वांत प्राचीन (१११३) असून ते कुल्लहान राऊत नावाच्या व्यापारी पतिपत्नीनी बांधले. हरिहर हेही (दोड्डगड्डहळ्ळी) सुरुवातीचे एक मंदिर आहे. हर्जहळ्ळी येथील सोमेश्वर व नुग्गीहळ्ळी येथील लक्ष्मीनरसिंह ही मंदिरे होयसळांच्या अखेरच्या काळातील होत. चेन्नकेशव (बेलूर) हे अत्यंत अलंकृत मंदिर असून होयसळ वास्तुशिल्प-शैलीचा परिपक्व आविष्कार येथे दृग्गोचर होतो. हळेबीड येथे होयसळेश्वर व केदारेश्वर ही दोन उल्लेखनीय मंदिरे असून होयसळेश्वर हे चालुक्य-होयसळ शैलीतील सर्वांगीण आविष्कार दर्शविणारे, सर्वांगांनी अलंकृत असलेले या शैलीतील आकाराने सर्वांत मोठे मंदिर होय. ते बिट्टिदेव ऊर्फ विष्णुवर्धन याने बांधले असून सुरुवातीस होयसळेश्वर व त्याच्या शेजारी शांतलेश्वर अशी दोन स्वतंत्र मंदिरे होती. नंतर ती जोडून एक केली गेली. होयसळ शैलीतील तिसरे प्रसिद्ध मंदिर सोमनाथपूर येथे असून ते सोमनाथनामक सेनापतीने १२६८ मध्ये बांधले. हे मंदिर उत्तर होयसळ स्थापत्यशैलीचे उत्तम नमुनेदार उदाहरण होय. ते होयसळेश्वर व चेन्नकेशव मंदिरांपेक्षा आकाराने लहान आहे. होयसळ मंदिरांच्या भिंतींवर, स्तंभांवर, पीठावर विपुल शिल्पांकन आहे. चौथऱ्याचे अनेक विभाग करून त्यांत निरनिराळ्या प्रकारच्या आकृत्या, पशु-पक्षी, पाने, फुले, शरभ, हत्ती वगैरे कोरलेले आहेत. विमानाच्या खालील भागात असंख्य महिरपी कोनाडे असून त्यांत देवदेवता, मदनिका, सुरसुंदरी यांच्या अत्यंत रेखीव मूर्ती आहेत. एकूण मूर्ती बुटक्या, विपुल, अलंकार ल्यालेल्या व स्थूल आहेत.
पहा : कर्नाटक बेलूर सोमनाथपूर हळेबीड.
संदर्भ : 1. Anand, Mulk Raj Ed. Marg, Vol. XXXI, No. 1, Bombay, 1977,
2. Coelho, William, The Hoyasal Vamsa, Bombay, 1950.
3. Derret, J. Duncan M. The Hoysalas : A Medival Indian Rayal Family, Madras, 1957.
४. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.
देशपांडे, सु. र.
“