होनोलूलू : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील हवाई राज्याची राजधानी व पॅसिफिक महासागरावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या ४,०२,५०० (२०१४). हे शहर ओआहू बेटाच्या आग्नेय किनाऱ्यावर सु. १६ किमी. लांब व सु. ६ किमी. रुंद मैदानी क्षेत्रात, कोओलाऊ पर्वत पायथ्याशी वसलेले आहे. याच नावाच्या कौंटीचे हे मुख्यालय असून हवाई व सागरी मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. यास ‘क्रॉसरोड ऑफ द पॅसिफिक’ असे संबोधण्यात येते. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे राज्याचे प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर आहे.
होनोलूलूमध्ये इ. स. ११०० पासून वसती असावी असे संशोधक मानतात. हे शहर कॅप्टन कुक व त्याच्या आधीच्या समन्वेषकांच्या नजरेतून दुर्लक्षिले गेले होते. कॅप्टन विल्यम ब्राउन हा १७९४ मध्ये येथे आला. १८२० नंतर ओआहू बेटावरील व्यापार केंद्र म्हणून यास महत्त्व प्राप्त झाले. पुढे चंदन व व्हेल माशाच्या व्यापारामुळे हे भरभराटीस आले. येथे रशियनांचे आगमन झाले. तसेच हे शहर १८४३ व १८४९ मध्ये अनुक्रमे ब्रिटिशांच्या व फ्रेंचांच्या अखत्यारित होते. तद्नंतर तिसरा कामेहामेआ याच्या ताब्यात हे शहर आले व त्याने ३१ ऑगस्ट १८५० रोजी आपले राज्याची राजधानी येथे केली. हवाई प्रजासत्ताक अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये राज्य म्हणून समाविष्ट झाल्यानंतर हवाई राज्याची राजधानी येथेच आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानने होनालूलूच्या नजीकच्या पर्ल हार्बरवर ७ डिसेंबर १९४१ रोजी हवाई बाँबहल्ला केला होता. दुसऱ्या महायुद्धात तसेच कोरियन व व्हिएटनाम युद्धाच्या वेळी होनोलूलूस लष्करी दृष्ट्या मोक्याचे स्थान म्हणून महत्त्व प्राप्त झाले.
होनोलूलूमध्ये होणारा सैनिकी खर्च हा येथील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच हे अ.सं.सं.चे पॅसिफिक महासागरातील सैनिकी केंद्र आहे. येथे अननस फळप्रक्रिया, साखर, कपडे, पोलाद, ॲल्युमिनियम, सिमेंट, काचेच्या वस्तू, कातडी, प्लॅस्टिक इ. निर्मिती उद्योग विकसित झालेले आहेत.
हे शैक्षणिक केंद्र असून येथे हवाई विद्यापीठ (१९०७), कँमिडे विद्यापीठ (१९५५) व हवाई पॅसिफिक विद्यापीठ आहे. पर्यटन हा येथील अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे. येथील निसर्गसौंदर्य, आल्हाददायक हवामान, करमणुकीची साधने इत्यादींमुळे अनेक पर्यटक यास भेट देतात. येथील वाईकीकी पुळण, कावाईआहू चर्च (१८४१), आयओलान्नी राजवाडा (१८८२), द बेर्निके पी. बिशप म्यूझियम (१८८९), होनोलूलू कला अकादमी (१९२७), बुद्ध मंदिर, नगरभवन, अला मोॲना पार्क, कॅपीओलान्नी पार्क, सी लाइफ पार्क, द फॉस्टर बोटॅनिकल गार्डन, डायमंड हेड ज्वालामुखी कुंड, स्टेट कॅपिटॉल, मिशन हाउस, क्विन एमा समरपॅलेस, जॉन एफ्. केनेडी थीएटर, हवाई विद्यापीठाचे ग्रंथालय इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.
पवार, डी. एच्.