होनीआरा : पॅसिफिक महासागराच्या नैर्ऋत्य भागातील सॉलोमन बेटे या स्वतंत्र देशाची राजधानी. लोकसंख्या ६४,६०२ (२००९). हे सॉलोमन द्वीपसमूहातील ग्वॉदल कॅनल बेटाच्या उत्तर भागात मटॅनिको नदीमुखाशी वसलेले आहे. 

 

दुसऱ्या महायुद्धात अ. सं. सं.च्या सैन्याचे मुख्यालय येथे होते. त्यानंतर या सैन्यतळाभोवती शहराची वाढ झाली होती. देशाची राजधानी १९५२ मध्ये तूलागीवरून येथे हलविण्यात आली. येथे अनेक शासकीय कार्यालये, अनेक संस्थांची प्रधान कार्यालये आहेत. येथे नारळ, लाकूड, मासे व काही अंशी सोन्याचा व्यापार सुरू आहे. १९९० नंतर येथेझालेल्या वांशिक दंगलीचा शहराच्या विकासावर विपरीत परिणाम झालेला आहे. 

 

होनीआरा हे दळणवळणाचे केंद्र असून देशाचे प्रमुख बंदर म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथे शहराच्या पूर्वेस १६ किमी.वर हेंडरसन हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथे साउथ पॅसिफिक विद्यापीठ आहे. येथील राष्ट्रीय संसद इमारत, होनीआरा वस्तू संग्रहालय, होनीआरा चिल्ड्रेन्स पार्क, ग्वॉदल कॅनल अमेरिकन मेमोरियल, सॉलोमन पीस मेमोरियल पार्क, लॉसन टामा स्टेडियम, वनस्पतिशास्त्र उद्यान इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. 

 

पवार, डी. एच्.