हेव्हेशी, झॉर्झ शार्ल दे : (१ ऑगस्ट १८८५–५ जुलै १९६६). हंगेरियन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी किरणोत्सर्गी समस्थानिक ( भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या आणि अणुक्रमांक तोच परंतु भिन्न द्रव्यमानांक असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांची) मार्गण तंत्रे विकसित केली. ही तंत्रे जीव प्रक्रियेचे रासायनिक स्वरूप समजण्यास अत्यंत प्रगत अशी आहेत [→मार्गण मूलद्रव्ये]. या संशोधनकार्याबद्दल हेव्हेशी यांना १९४३ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. तसेच त्यांनी डच भौतिकीविज्ञ डिर्क कॉस्टर यांच्यासोबत संशोधन करून ⇨ हाफ्नियम या मूलद्रव्याचा १९२३ मध्ये शोध लावला.
हेव्हेशी यांचा जन्म हंगेरीतील बूडापेस्ट येथे झाला. त्यांचे शिक्षणबर्लिन येथील टेक्निकल कॉलेज-मध्ये आणि फ्रायबर्ग विद्यापीठात झाले. त्यांनी १९०८ मध्ये रसायन-शास्त्रातील पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. ते कार्लझ्रूए विद्या- पीठात (१९१०-११), मँचेस्टर विद्यापीठात (१९११-१२) आणि व्हिएन्ना विद्यापीठात (१९१२–२०) रसायनशास्त्राचे अध्यापक होते. तसेच ते कोपनहेगन विद्यापीठात (१९२०–२६), फ्रायबर्ग विद्यापीठात (१९२६–४३) आणि स्टॉकहोम विद्यापीठात (१९४३–६६) प्राध्यापक होते. ते गेंट विद्यापीठात (१९४९–६६) फ्रँक्वी प्राध्यापक होते.
हेव्हेशी यांनी १९११ मध्ये मँचेस्टर विद्यापीठात ⇨ अर्नेस्ट रदरफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली रेडियमाचे रासायनिक पृथक्करण करण्यास सुरुवात केली. जरी त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नसले, तरी किरणोत्सर्गी सम-स्थानिकांचा उपयोग मार्गणक म्हणून करता येत असल्याबद्दलचा शोध लावण्यास त्यांना प्रेरणा मिळाली. १९१२ मध्ये त्यांनी व्हिएन्नातीलफ्रीड्रिख पॅनेथ यांच्याबरोबर मार्गण संशोधनात लक्षणीय प्रगती केली. १९२० मध्ये त्यांना कोपनहेगन विद्यापीठात आमंत्रित करण्यात आले.तेथे ⇨ नील्स हेन्रिक डेव्हिड बोर यांनी सुचविल्याप्रमाणे हेव्हेशी व कॉस्टर यांनी संशोधन करून झिर्कोनियमाच्या झिर्कॉन या धातुकामध्ये हाफ्नियम या मूलद्रव्याचा शोध लावला.
हेव्हेशी यांनी फ्रायबर्ग विद्यापीठात असताना रासायनिक मूलद्रव्यांची सापेक्ष विपुलता शोधून काढण्यास सुरुवात केली. १९३४ मध्ये त्यांनी अनेक शरीरक्रियात्मक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी फॉस्फरसाच्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचा वापर शरीरामध्ये करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रयोगांद्वारे शरीरातील घटकांची क्रियाशील अवस्था उघड केली. किरणोत्सर्गी समस्थानिक मार्गण तंत्राचा उपयोग जैव व वैद्यक शास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.
हेव्हेशी यांचे प्रकाशित झालेले संशोधनकार्य ॲडव्हेंचर्स इन रेडिओआयसोटोप रिसर्च (१९६२) या ग्रंथात दोन खंडांमध्ये समाविष्ट आहे. त्यांना अनेक मानसन्मान व पदके मिळाली. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : रॉयल सोसायटी, लंडन याचे कॉप्ली पदक (१९४९), फॅराडे पदक (१९५०), नील्स बोर पदक (१९६१), रोमचे कान्नीद्झारो पारितोषिक (१९२९) इत्यादी. तसेच त्यांना अनेक विद्यापीठांची सन्माननीय पीएच्.डी. पदवी मिळाली. ते रॉयल सोसायटी (लंडन), स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, गॉथनबर्ग ॲकॅडेमी इ. अकरा संस्थांचे सदस्य होते.
हेव्हेशी यांचे फ्रायबर्ग इम ब्राइसगाऊ (जर्मनी) येथे निधन झाले.
मगर, सुरेखा अ. सूर्यवंशी, वि. ल.
“