हेर्डर, योहान गोट्फ्रीट फोन : (२५ ऑगस्ट १७४४–१८ डिसेंबर १८०३). जर्मन समीक्षक, ईश्वरविद्यावेत्ता आणि तत्त्वज्ञ. जन्म मोहसंगेन, पूर्व प्रशिया (आता मोराग), पोलंड येथे एका गरीब कुटुंबात. स्थानिक शाळांतून त्याचे शिक्षण झाले. १७६२ मध्ये केनिंग्झबर्ग येथे तो ईश्वरविद्या, तत्त्वज्ञान आणि साहित्य ह्या विषयांचे अध्ययन करू लागला. येथे तो विख्यात जर्मन तत्त्वज्ञ ⇨ इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४) आणि योहान गेओर्ग हामान (१७३०–८८) ह्या तत्त्वज्ञांशी त्याचा निकटचा संबंध आला.
हेर्डर १७६४ च्या नोव्हेंबरात हेर्डर रिगा (त्या वेळी रशियन साम्राज्याचा भाग असलेले) येथे धर्मोपदेशक म्हणून गेला. त्याचे आरंभीचे ग्रंथ तेथेच प्रसिद्ध झाले. ‘फ्रॅगमेंटस ऑन मॉडर्न जर्मन लिटरेचर’ (१७६६-६७, इं. शी.), ‘फॉरेस्ट्स ऑफ क्रिटिसिझम’ (१७६९, इं. शी), ‘एसेज ऑन द ऑरिजिन ऑफ लँग्वेज’ (१७७२, इं. शी.), शेक्सपिअर (१७७३), ‘व्हॉइसीस ऑफ द पीपल इन साँग्ज’ (१७७८, इं. शी.), आयडियाजऑन द फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी ऑफ मनकाइंड (४ खंड, १७८४–९१) हे त्याचे उल्लेखनीय ग्रंथ.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बुद्धिवादाला विरोध करून संस्कृति-संवर्धनाच्या प्रक्रियेत मानवी भावनेचेही मोल ओळखले पाहिजे व्यक्तित्वाचा पूर्ण विकास साधायचा असेल, तर बुद्धी आणि भावना यांचा सुसंवाद झाला पाहिजे, अशी भूमिका घेणाऱ्या स्टुर्म उंड ड्रांग (इं. अर्थ स्टॉर्म अँड स्ट्रेस) ह्या चळवळीस हेर्डरचे मोलाचे योगदान झाले.
विश्वविख्यात जर्मन साहित्यिक ⇨ गटे (१७४९–१८३२) ह्याच्यावरही हेर्डरचा प्रभाव पडला. परिणामतः आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात गटेवर स्टॉर्म अँड स्ट्रेस ह्या चळवळीचा प्रभाव पडला होता.
हेर्डरच्या मते साहित्याचे कार्यक्षेत्र केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसूनते राष्ट्रीय जीवनाला व्यापून टाकीत असते. वाङ्मय आणि कला याकाही साहित्यिक कलावंतांच्या वैयक्तिक बाबी नव्हेत. त्यात खरे पाहता जनतेच्या जीवनाचे, राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतिबिंब पडू दिले पाहिजे. राष्ट्राच्या परंपरा, संस्कृतीची वैशिष्ट्ये, जनतेच्या श्रद्धा, निसर्गसृष्टीची रूपे इत्यादींचा साहित्यिकाच्या मनोवृत्तीवर आणि वाङ्मयकृतींवर प्रभाव पडणे हे अनिवार्य तसेच आवश्यक असते. जातिवंत काव्य हे सहजस्फूर्त असते. ते उसनवारीने अथवा नसत्या खटाटोपाने प्रसविता येत नाही. भोवतालच्या परिस्थितीशी तादात्म्य पावलेल्या कवीच्या मनात ते आपोआप जागे होते. प्राचीनकाळी मानवाच्या मुखावाटे जे आर्ष, आद्य वाङ्मय बाहेर पडले, ते तर अभिजात साहित्याचे अत्युत्कृष्ट उदाहरण मानले पाहिजे.
हेर्डरने मानवी इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन अवलंबिला. त्या काळी उत्क्रांतिवाद जन्मास आलेला नव्हता. तरीही हेर्डरने आपल्या इतिहासविषयक तसेच अन्य विवेचनात वैकासिक पद्धतीचा अवलंबकेला. इतिहास म्हणजे मानवजातीच्या विकासाचा, प्रगतीचा वृतान्त होय, असे तो मानीत असे. विकासाच्या वरवरच्या पायऱ्यांवर अधिकाधिक विविधता आणि व्यक्तिवैशिष्ट्ये प्रकट होत असतात, असे त्याचे मुख्य सूत्र होते. मानवजात मुळात एकच आहे तथापि देशकालपरिस्थित्यनुसार राष्ट्राराष्ट्रांत भेद निर्माण झाले. प्रत्येक राष्ट्राला आगळे स्वरूप, स्वतःचे वैशिष्ट्य प्राप्त झाले. यास्तव सुबुद्ध व्यक्तींनी आपापल्या राष्ट्रीय वैशिष्ट्यांचे जतन करणे जरूरीचे आहे. अशा राष्ट्रवादाचा हेर्डरने पुरस्कार केला परंतु त्याचा राष्ट्रवाद विसाव्या शतकातल्या नाझींच्या राष्ट्रवादाप्रमाणे संकुचित स्वरूपाचा नव्हता. नाझींचा राष्ट्रवाद वांशिक भेदांवर, मानवा-मानवांमधल्या उच्चकनिष्ठतेच्या कल्पनांवर आधारलेला होता तर हेर्डरचा राष्ट्रवाद मानवजातीच्या मूलभूत एकात्मतेवर उभारलेला होता.
विश्वाची एकात्मता प्रमाण मानणाऱ्या हेर्डरला ब्रूनो (१५४८–१६००) आणि स्पिनोझा (१६३२–७७) यांच्या अद्वैतवादाचे विशेष आकर्षणवाटत असे. विशेषतः विश्वामध्ये विरोधी तत्त्वे अविरोधाने नांदत असतात. हे ब्रूनोचे सूत्र त्याला फार प्रिय होते. कांटने आपल्या ज्ञानप्रक्रियेच्या विवेचनात इंद्रियवेदन आणि प्रज्ञा, आशय आणि आकार या दोहोंत द्वैत कल्पून मानवी मनाच्या एकात्मतेवर घाला घातला, असा त्याचा कांटच्या तत्त्वज्ञानावर प्रधान आक्षेप होता.
पहा : जर्मन साहित्य.
केळशीकर, शं. हि. कुलकर्णी, अ. र.
“