तांबूल : नागवेलीच्या म्हणजे विड्याच्या पानाचा विडा. नागवेलीची पाने, चुना, कात, सुपारी, वेलदोडा, जायपत्री, कस्तुरी, कापूर, कंकोळ, लवंग इ. तांबूलाची घटकद्रव्ये होत. तरी साधारणतः पहिले तीनचार पदार्थ सर्वसामान्य जनता वापरते.
ज्या नागवेलीपासून रुचकर पाने मिळतात, त्या वेलीस स्कंदपुराणात ‘अमृतोद्भव’ असे म्हटले आहे. तांबूलसेवनाची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून रूढ असल्याचे सांगण्यात येते. आयुर्वेदाच्या चरक संहिता, सुश्रुत संहिता इ. ग्रंथांत तांबूलाचे गुणधर्म सांगितले आहेत. पण ही प्रथा गुप्तकालात (३२१–५५०) जावा, सुमात्रा इ. आग्नेयीकडील द्वीपांतून भारतात आली असावी, असे कित्येकांचे मत आहे. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील समजला जात असल्यामुळे या मतास दुजोरा मिळतो. मांदसरच्या (मंदसौर) रेशमी विणकरांच्या इ. स. ४७३ च्या कोरीव लेखावरून हेच दिसून येते. इसवी सनाच्या थोडे पूर्वी किंवा आरंभकाळी दक्षिण हिंदुस्थानात तांबूलाचा वापर सुरू झाला असावा व तेथून तो उत्तरेकडे प्रसृत झाला असावा, असे डॉ. पां. वा. काणे यांचे मत आहे. वात्स्यायनाचे कामसूत्र, वराहमिहिराची बृहत्संहिता इ. जुन्या वाङ्मयात जो तांबूलविषयक उल्लेख आला आहे, त्यावरून तांबूल सेवनाची प्रथा खास करून भारतीयच दिसते. तांबूल व तांबूलद्रव्ये यांवर परिश्रमपूर्वक संशोधन करणारे डॉ. प. कृ. गोडे यांनीही साधारणतः असाच निष्कर्ष काढला आहे. भारताप्रमाणे जावा, सुमात्रा, मलाया, मालदीव, निकोबार, दक्षिण अरबस्तान इ. प्रदेशातही प्राचीन काळापासून तांबूलसेवनाची प्रथा दिसून येते. पाश्चिमात्त्य देशांत, विशेषतः यूरोप–अमेरिकेत ही प्रथा दिसून येत नाही.
तांबूल हा किंचित तिखट, कडवट, उष्ण, मधुर, खारट, तुरट, वातकफहारक, दुर्गंधिनाशक, उद्दीपक, सुगंधी, सौंदर्यवर्धक व मुखशुद्धिकारक आहे. त्यास रसिकतेचे तसेच मंगलतेचेही प्रतीक मानण्यात येते. लग्नादी समारंभात पानसुपारी देण्याचा प्रघात आहे. सन्मान वा स्वागत करताना किंवा निरोप देतेवेळीही तांबूल देण्याचा शिष्टाचार आहे. एखादी गोष्ट पैजेने करण्याचा निर्धार व्यक्त करण्याकरिता विडा उचलण्यास शपथ घेण्याइतकेच महत्त्व आहे. पितरांना द्यावयाच्या पिंडांनाअक्षता, गंध, पुष्पादीबरोबरच पानाचा विडा देणेही धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. तांबूलाचा समावेश आठ भोगांत केला आहे. पूर्वी राजामहाराजांकडून विडा मिळणे बहुमानाचे समजण्यात येई. नियमित पण मर्यादित स्वरूपात केलेले तांबूलसेवन आरोग्याला हितावह असते.
असे असले, तरी तांबूलाचे अतिरेकी सेवन हे इतर अतिरेकी सेवनासारखेच हानिकारक आहे. पानाबरोबर तंबाखू खाणाऱ्याला बहुधा हे अतिसेवनाचे व्यसन जडते. त्यातून मग नाना प्रकारचे रोग निर्माण होणे शक्य असते.
तांबूल खाऊन कोठेही थुंकण्याने रस्ते, चांगल्या इमारतींच्या भिंती, मुताऱ्या घाण केल्या जातात. थुंकण्याची आवश्यकता पडल्यास पिकदाणीचा उपयोग करण्यात येतो वा यावा. सार्वजनिक जागेवर पिंक टाकणे अनिष्ट आहे.
तांबूल केव्हा सेवन करावा, याचेही संकेत आहेत. प्रातःकाळी, जेवल्यानंतर, स्त्री समागमाच्या पूर्वी व शेवटी, त्याचप्रमाणे विद्वत्सभेत व राजसभेत तांबूलसेवन करण्याचा संकेत आहे. झोपेतून उठल्यावर, जेवणानंतर, स्नानानंतर, ओकारीनंतर पान खाणे हितावह असते, असे वाग्भटाचे म्हणणे आहे. व्रतस्थाच्या जीवनात तांबूलसेवन निषिद्ध मानण्यात आले आहे. स्मृतिप्रकाश या धार्मिक ग्रंथात यती, ब्रह्मचारी, विधवा, रजस्वला यांनी तांबूल किंवा तांबूलसंबंधी कोणतेही पदार्थ – उदा., सुपारी–सेवन करणे, निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. उपवासाच्या दिवशीही तांबूलसेवन वर्ज्य मानण्यात येते. तांबूलाविषयी काही गमतीदार समजुती शिवदास या ग्रंथकाराच्या ज्योतिर्निर्बंध या ग्रंथात विशद केल्या आहेत.
भारतात विभिन्न भागांत निरनिराळ्या प्रकारची विड्याची पाने आढळतात. त्यांपैकी काही कडक वा मऊ, लहान वा मोठी, रुक्ष किंवा बेचव, नरम किंवा लवचिक असतात. चवीलाही ती भिन्नभिन्न असतात. औषधी गुणधर्मांच्या दृष्टीनेही त्यांच्यात भिन्नता असते. ‘गोविंद विडा’ किंवा ‘त्रयोदशगुणी विडा’ प्रसिद्ध आहे. देश, गंध इत्यादींवरून त्यांचे गुणधर्म दाखविणारी नावेही प्रचलित आहेत, उदा., बंगाली, रामटेकी, बनारसी, जगन्नाथी सांची, कपुरी, मालवी, मद्रासी, मगही, मंगेरी इत्यादी.
पानाचा भारतात होत असलेला वापर आणि त्याला दैनंदिन जीवनात प्राप्त झालेले महत्त्व यांमुळे तांबूलसेवन हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंग झाले आहे.
संदर्भ : Gode, P. K. Studies in Indian Cultural History, Vol. I, Hoshiarpur, 1961.
खोडवे, अच्युत