तर्पण : तृप्त करणे, पोषण करणे, कृश शरीर पुष्ट करण्याकरिता द्यावयाचे अन्नपानविहार. वांती, रेच इ. देऊन किंवा लंघनाने शरीर शुद्ध झाल्यावर लगेच नेहमीचे अन्न देऊ नये कारण त्याने अग्नी अशक्त होतो. भूक तीव्र लागली म्हणजे अग्नी प्रखर असला, तरी अशक्त असतो. त्याला नेहमीचे अन्न व ते नेहमीच्या प्रमाणात पचवता येणार नाही म्हणून अशा वेळी सवयीनेच अन्न पेजेपेक्षाही पातळ करून द्यावे लागते व ते उत्तरोत्तर भुकेच्या वेळी दाट करीत द्यावे लागते. प्रथम सुरुवात लाह्यांच्या तरवण्यापासून करावी लागते, हेच व्यवस्थित निर्दोष पचते, पौष्टिक होते आणि शरीर व अग्नी यांचे बलही वाढते. हेच तरवणे तर्पण होय व ते निर्दोष निर्मल शरीराचे तर्पण (तृप्ती, पुष्टी) करते. तर्पणापासून आरंभ करून क्रमाने नित्याच्या आहारावर आणण्याच्या क्रमाला तर्पणादिक्रम म्हणतात.

जोशी, वेणीमाधवशास्त्री