तर्कदोष : आपण युक्तिवाद करतो ते एखादे विशिष्ट विधान सत्य आहे असे दाखवून देण्यासाठी किंवा ते सत्य आहे हे इतरांना पटविण्यासाठी. जे विधान सत्य आहे असे आपण युक्तिवादाने दाखवून देऊ पाहतो, त्याला त्या युक्तिवादाचा निष्कर्ष म्हणतात आणि ज्या पुराव्याच्या आधारावर आपण निष्कर्ष सिद्ध करू पाहतो, तो मांडणाऱ्या विधानांना त्या युक्तिवादाची आधारविधाने म्हणतात. निष्कर्ष सत्य म्हणून सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेल्या युक्तिवादाला प्रमाण युक्तिवाद म्हणतात पण अनेकदा युक्तिवादात काही गफलती झालेल्या असतात, काही दोष राहून गेलेले असतात आणि त्यामुळे आपला निष्कर्ष सत्य म्हणून सिद्ध करण्यात युक्तिवाद अयशस्वी झालेला असतो. ज्या गफलतीमुळे किंवा स्खलनामुळे युक्तिवादाला आपला निष्कर्ष सत्य आहे हे दाखवून देण्यात अपयश येते, त्यांना तर्कदोष म्हणतात. युक्तिवाद करताना ज्या प्रकारचे तर्कदोष आपल्या हातून वारंवार आणि स्वभाविकपणे घडतात, त्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न तर्कशास्त्रज्ञांनी केला आहे.
तर्कदोषांचे वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न ॲरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४–३२२) केला. हे वर्गीकरण अजूनही बरेचसे रूढ आहे व तर्कदोषांचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात येणारी बरीचशी परिभाषाही ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणावर आधारलेली आहे. हे वर्गीकरण समजून घ्यायचे, तर पुढील गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. एखादे निगामी अनुमान आपण घेतले, तर त्याच्या प्रामाण्याच्या अटी केवळ दोन असतात. ह्या दोन्ही अटींचे समाधान जर निगामी अनुमानाने केले असेल, तर त्याचा निष्कर्ष सत्य म्हणून सिद्ध झालेला असतो. एक तर त्या अनुमानाची सर्व आधारविधाने वस्तुतः सत्य असली पाहिजेत. आधारविधानांपैकी एक जरी आधारविधान असत्य असले, तरी त्यांच्यावर आधारलेला निष्कर्ष असत्य असण्याची शक्यता राहते. दुसरी अट अशी, की त्या अनुमानाचा तार्किक आकार प्रमाण असला पाहिजे. आकारिक तर्कशास्त्रात अनुमानांचे तार्किक आकार प्रमाण कधी असतात, ह्याचे निश्चित नियम स्पष्ट केलेले असतात. अनुमानाच्या तार्किक आकाराकडून जर ह्या कोणत्याही नियमाचा भंग झाला असेल, तर तो आकार व म्हणून ते अनुमान अप्रमाण ठरते. आकारिक तर्कशास्त्राच्या नियमांचा भंग केल्यामुळे जे तर्कदोष घडतात, त्यांना आकारिक तर्कदोष म्हणतात.
अनेकदा युक्तिवाद जो फसतो तो आकारिक किंवा भाषिक तर्कदोषांमुळे फसत नाही, तर विचार करताना आपल्या हातून सहजपणे ज्या चुका घडतात, त्यांच्यामुळे तो फसतो. उदा., एखादा सामान्य सिद्धांत एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा प्रसंगाला काही विशेष कारणांमुळे लागू पडत नाही हे ध्यानी न घेता आपण तो लावतो आणि निष्कर्ष काढतो अथवा एखादे विधान सिध्द करण्यासाठी नेमका कोणत्या प्रकारचा पुरावा आवश्यक आहे हे ध्यानी न घेता, वेगळ्याच प्रकारच्या पुराव्यापासून ते सिद्ध झाले आहे असे आपण मानतो. ह्या स्वरूपाचे तर्कदोष आकारिकही नसतात किंवा भाषिकही नसतात. त्यांना आशयिक तर्कदोष म्हणतात.
आकारिक तर्कदोष : पारंपारिक तर्कशास्त्रात संवाक्य हाच प्रमुख अनुमानप्रकार मानीत व याशिवाय एकाच विधानापासून परिवर्तन, प्रतिवर्तन इ. अव्यवहित अनुमानप्रकारांना गौण मानीत. संवाक्याची व्याख्या स्पष्ट करणारे नियम सोडले, तर त्याच्या प्रामाण्याचे नियम चार आहेत ते असे : (१) संवाक्याचे मध्यमपद एका तरी आधारविधानात व्याप्त असले पाहिजे. (२) जर संवाक्याचे कनिष्ठ किंवा ज्येष्ठ पद त्याच्या निष्कर्षात व्याप्त असेल, तर ते आधारविधानातही व्याप्त असले पाहिजे. (३) संवाक्याची दोन्ही आधारविधाने नास्तिवाची असता कामा नयेत. (४) संवाक्याची दोन्ही विधाने अस्तिवाची असली, तर त्याचा निष्कर्षही अस्तिवाची असला पाहिजे व जर त्याचे एक आधारविधान नास्तिवाची असेल, तर निष्कर्षही नास्तिवाची असला पाहिजे . ह्यांपैकी कोणत्याही नियमाचा भंग झाला, तर संबंधित आकारिक तर्कदोष निर्माण होतो. हे चार आकारिक तर्कदोष म्हणजे अनुक्रमे : (१) अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष (२) कनिष्ठ / ज्येष्ठ पदाच्या अवैध व्याप्तीचा तर्कदोष (३) दोन नास्तिवाची आधारविधानांचा तर्कदोष (४) दोन अस्तिवाची विधानांपासून नास्तिवाची निष्कर्ष काढण्याचा किंवा एक नास्तिवाची आधारविधान असतांना अस्तिवाची निष्कर्ष काढण्याचा तर्कदोष. उदा., ‘सर्व कादंबऱ्या मनोरंजक असतात. हे पुस्तक कादंबरी नाही. ... हे पुस्तक मनोरंजक नसणार’. ह्या अनुमानात ज्येष्ठ पदाच्या अवैध व्याप्तीचा तर्कदोष घडला आहे तर ‘सर्व कादंबऱ्या मनोरंजक असतात. हे पुस्तक मनोरंजक आहे. ... हे पुस्तक कादंबरी आहे’, ह्या अनुमानात अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष घडला आहे.
वरील नियमांतील दुसरा नियम म्हणजे जे पद निष्कर्षांत व्याप्त असते ते आधारविधानातही व्याप्त असले पाहिजे. हा नियम अव्यवहित अनुमानांवरही बंधनकारक आहे. एखाद्या अव्यवहित अनुमानाकडून जर त्याचा भंग झाला, तर अवैध व्याप्तीचा तर्कदोष त्या अनुमानाकडून घडतो. उदा., ‘सर्व कादंबऱ्या मनोरंजक पुस्तके असतात. ... सर्व मनोरंजक पुस्तके कादंबऱ्या असतात.’ ह्या अनुमानात ‘मनोरंजक पुस्तक’ हे पद निष्कर्षामध्ये अवैध रीतीने व्याप्त आहे.
अव्यवहित अनुमाने व संवाक्ये ह्यांच्या व्यतिरिक्त जे कित्येक अनुमानप्रकार पारंपारिक तर्कशास्त्रात ओळखण्यात आले आहेत, त्यांच्यात अनुलंब संवाक्य हाही प्रकार आहे आणि त्याच्याशी संबंधित असे दोन आकारिक तर्कदोष आहेत. अनुलंब संवाक्याचे स्वरूप असे असते :
जर क तर ख
क ∴ ख |
‘जर क तर ख’ ह्या अनुलंब विधानातील ‘क’ ह्या विधानाला त्याचे पूर्वांग म्हणतात आणि ‘ख’ ह्या विधानाला उत्तरांग म्हणतात. आता ‘जर क तर ख’ ह्या अनुलंब विधानाचे पूर्वांग सत्य म्हणून स्वीकारले, तर त्याचे उत्तरांगही सत्य म्हणून स्वीकारणे योग्य ठरते आणि जर त्याचे उत्तरांग नाकारलेले असले, तर त्याचे पूर्वांगही नाकारणे योग्य ठरते. तेव्हा अनुलंब संवाक्याचे पुढील दोन आकार प्रमाण आहेत :
जर क तर ख |
जर क तर ख |
क |
ख नाही |
... ख |
... क नाही |
पण अनुलंब संवाक्याचे उत्तरांग सत्य म्हणून स्वीकारले आहे, ह्या आधारावर त्याचे पूर्वांग सत्य म्हणून स्वीकारणे अयोग्य असते आणि त्याला उत्तरांगविधी दोष म्हणतात. तसेच त्याचे पूर्वांग नाकारले आहे, म्हणून त्याचे उत्तरांग नाकारणे गैर ठरते व ह्याला पूर्वांगनिषेध दोष म्हणतात. उदा., पुढील अनुमाने तर्कदुष्ट आहेत : ‘जर डोंगरात पाऊस पडला असेल, तर नदीला पूर येईल. नदीला पूर आला आहे. ... डोंगरात पाऊस पडला असणार’. ह्याच्यात उत्तरांगविधी हा दोष आहे. हा युक्तिवाद तर्कदुष्ट आहे. कारण त्याची आधारविधाने सत्य असली, तरी निष्कर्ष असत्य असणे शक्य आहे. डोंगरात पाऊस न पडता धरण फुटल्यामुळे नदीला पूर आला असेल. तसेच ‘जर डोंगरात पाऊस पडला असेल तर नदीला पूर येईल. डोंगरात पाऊस पडलेला नाही. ... नदीला पूर येणार नाही.’ हे अनुमान पूर्वांगनिषेधाची चूक करते. पाऊस न पडताही धरण फुटल्यामुळे नदीला पूर येणे शक्य आहे.
आधुनिक आकारिक तर्कशास्त्रात पारंपरिक तर्कशास्त्राशी त्याची तुलना करतात, निगामी किंवा आकारिक अनुमानांचा कितीतरी अधिक व्यापक दृष्टीने विचार होतो. पारंपरिक संवाक्याचे जसे काही विशिष्ट नियम आणि त्यांच्याशी संबंधित असे विशिष्ट तर्कदोष ओळखण्यात आले आहेत, तसे सर्व आकारिक अनुमानांचे नियमन करणारे काही विशिष्ट नियम आधुनिक आकारिक तर्कशास्त्रात ओळखण्यात येत नाहीत पण सामान्यपणे असे म्हणता येईल, की आकारिक अनुमानांचे नियम दोन प्रकारचे असतात. ‘आणि’, ‘किंवा’ इ. वैधानिक संबंधकांच्या अर्थावर आधारलेले वैधानिक नियम आणि ‘सर्व’, ‘काही’ इ, संख्यापकांच्या अर्थावर आधारलेले संख्यापनीय नियम. आधुनिक आकारिक तर्कशास्त्रात असे काही वैधानिक व काही संख्यापनीय नियम प्रमाण म्हणून स्वीकारून (व त्यांच्या प्रामाण्याचे समर्थन करून) त्यांच्यापासून इतर वैधानिक व संख्यापनीय नियम निष्पन्न करून घेण्यात येतात. अशा कोणत्याही नियमाचा भंग करणारे आकारिक अनुमान तर्कदुष्ट असते [⟶ तर्कशास्त्र, आकारिक].
भाषिक तर्कदोष : ॲरिस्टॉटलने ओळखलेले भाषिक तर्कदोष पुढे दिल्याप्रमाणे आहेत : (१) शब्दच्छल : जेव्हा युक्तिवादात एकच शब्द दोन अर्थांनी वापरण्यात आलेला असतो, तेव्हा शब्दच्छल हा तर्कदोष घडतो, उदा., ‘अश्वथाम्याला (एका हत्तीला) ठार करण्यात आले आहे’, असे धर्मराजाने सांगितल्यावरून ‘अश्वथाम्याला (द्रोणपुत्राला) ठार करण्यात आले आहे’. असा जो निष्कर्ष द्रोणाचार्यांनी काढला त्याच्यात हा तर्कदोष घडला आहे. (२) वाक्यच्छल : हा तर्कदोष युक्तिवादात एक वाक्य दोन अर्थांनी घेतल्यामुळे घडतो. उदा., ‘तुम्ही सर्व माणसांना सर्व काळ फसवू शकत नाही’. ह्या वाक्याचे दोन अर्थ होतात. एक असा, की सर्व माणसे घेतली तर त्यांना तुम्ही फक्त काही काळ फसवू शकता, सर्व काळ फसवू शकत नाही. दुसरा अर्थ असा की कोणताही माणूस तुम्ही घेतला तर त्याला तुम्ही सर्व काळ फसवू शकता असे नाही. तुम्ही फक्त कित्येक माणसांनाच सर्व काळ फसवू शकता. आता आधारविधानात हे वाक्य एका अर्थाने घेतले आणि निष्कर्ष काढताना दुसऱ्या अर्थाप्रमाणे काढला, तर वाक्यच्छलाचा तर्कदोष घडेल. (३) समाहार : समाहार आणि पुढे येणारा विभाजन हे दोन तर्कदोष परस्परांशी संबंधित आहेत. अनेक घटकांचा मिळून बनलेला एखादा पूर्ण जर आपण घेतला आणि त्याच्या प्रत्येक घटकाच्या अंगी एक विशिष्ट धर्म आहे म्हणून त्या पूर्णाच्या ठिकाणीही तो धर्म असला पाहिजे असा युक्तिवाद केला, तर त्याला समाहार हा तर्कदोष म्हणतात. उलट त्या पूर्णाच्या ठिकाणी एक विशिष्ट धर्म आढळतो. म्हणून त्याच्या प्रत्येक घटकाच्या ठिकाणीही तो धर्म असला पाहिजे असा निष्कर्ष आपण काढला, तर त्याच्यात विभाजन हा तर्कदोष घडतो. भाषेच्या दृष्टीने पाहता ‘सर्व’ ह्या शब्दाच्या दोन भिन्न अर्थांशी ह्या तर्कदोषांचा संबंध पोहोचतो. ‘सर्व’ ह्याचा एक अर्थ ‘सर्व एकत्रित किंवा मिळून घेतले असताना होणारा समूह’ असा होतो. उदा., ‘ही सर्व पुस्तके नीट ठेवायला दोन कपाटे लागतील’, ह्या विधानाचा अर्थ ‘ही एकंदर पुस्तके एकत्र केली, तर होणारा पुस्तकांचा समूह नीट ठेवायला दोन कपाटे लागतील’ असा होतो. ह्या अर्थाला समष्टिवाचक अर्थ म्हणू. ‘सर्व’ ह्याचा दुसरा अर्थ ‘प्रत्येक’. ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ ह्या विधानाचा अर्थ ‘प्रत्येक किंवा कोणताही माणूस मर्त्य आहे’ असा होतो. ह्या अर्थाला व्यक्तिवाचक अर्थ म्हणू. आधारविधानात जर ‘सर्व’ हा शब्द व्यक्तिवाचक अर्थाने घेतला असेल पण निष्कर्षात तो समष्टिवाचक अर्थाने घेतला असेल, तर समाहार हा तर्कदोष घडतो. उदा., ‘प्रत्येक माणूस स्वतःचे हित साधू पाहतो’ हे विधान ‘सर्व माणसे सर्व माणसांचे हित साधू पाहतात’ असे जर आपण मांडले आणि त्याच्यापासून, ‘प्रत्येक माणूस सर्व माणसांचे हित (म्हणजे समाजाचे हित) साधू पाहतो’ असा निष्कर्ष काढला, तर हा समाहाराचा तर्कदोष घडतो. (४) विभाजन : उलट आधारविधानात ‘सर्व’ जर समष्टिवाचक अर्थाने घेण्यात आला असेल पण निष्कर्षात तो जर व्यक्तिवाचक अर्थाने घेण्यात आला असेल, तर तो विभाजनाचा दोष ठरतो. उदा., ‘भारतीय जनता (म्हणजे भारतीय असलेल्या सर्व व्यक्तिंचा समूह) सार्वभौम आहे’ यापासून ‘प्रत्येक भारतीय व्यक्ती सार्वभौम आहे’ असा निष्कर्ष काढण्यात आला, तर येथे विभाजनाचा दोष घडलेला आहे. (५) आघात : वाक्याचा अर्थ लावताना भलत्याच शब्दाला जर महत्त्व देण्यात आले, म्हणजे त्याच्यावर आघात दिला तर हा तर्कदोष घडतो. ह्याचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘तू शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको’ हा आदेश. ह्या आदेशात प्रामुख्याने खोटी साक्ष द्यायला प्रतिबंध करण्यात आला आहे. पण कुणी जर ‘शेजाऱ्याविरुद्ध’ या शब्दावर भर दिला आणि ह्या आदेशात शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष द्यायला प्रतिबंध केला आहे पण इतरांविरुद्ध खोटी साक्ष द्यायला मोकळीक ठेवली आहे’. असा अर्थ लावला तर ते आघाताचे उदाहरण ठरेल. (६) व्युत्पत्तिदोष : शब्दांना पूर्वप्रत्यय–उदा., ‘प्रति’, ‘सम्’ इ.–लावून त्यांच्यापासून वेगळ्या अर्थांचे शब्द आपण बनवितो. उदा., ‘प्रतिक्रांती’, ‘संवाद’ इ. अनुप्रत्ययांचा उपयोग करूनही ही गोष्ट आपण साधतो. उदा., ‘मरणोत्तर’, ‘काळजीपूर्वक’ इ. अशा प्रत्ययांचा चूक अर्थ लावून जर शब्दांचा भलताच अर्थ आपण लावला, तर हा तर्कदोष घडतो. उदा., ‘अ’ किंवा ‘अन्’ हा प्रत्यय नास्तिवाची आहे. उदा., ‘अपूर्व’ किंवा ‘अनिष्ट’. पण म्हणून ‘अमूल्य’ ह्याचा अर्थ ‘ज्याला मूल्य नाही ते’ असा कुणी घेतला तर व्युत्पत्तिदोषाचे ते उदाहरण ठरेल.
आशयिक तर्कदोष : आशयिक तर्कदोषांची ॲरिस्टॉटलने दिलेली यादी अशी : (१) उपाधी तर्कदोष : ह्याचे ॲरिस्टॉटलने दिलेले एक उदाहरण असे : ‘हा कुत्रा बाप आहे, हा कुत्रा तुझा आहे. ... हा कुत्रा तुझा बाप आहे’. ह्या तर्कदोषाचे ॲरिस्टॉटलने दिलेले स्पष्टीकरण असे आहे : ॲरिस्टॉटल वस्तूचे जे गुण तिच्या सत्त्वात मोडतात आणि जे गुण तिच्या ठिकाणी असतात पण केवळ उपाधी म्हणून असतात, त्यांच्यात भेद करतो. उदा., प्राणी असणे हा धर्म कुत्र्याच्या सत्त्वात मोडतो पण एखाद्याची मालमत्ता असणे हा गुण त्याची केवळ उपाधी असते. आता वस्तुविषयी जे विधेय करता येते (उदा., बाप असणे) ते विधेय तिच्या उपाधीविषयी (उदा., तुझा ह्याविषयी) करता येत नाही. पण उपाधी तर्कदोषाच्या स्वरूपाचा हा उलगडा फारसा समाधानकारक नाही. अलीकडच्या काळात उपाधी तर्कदोष आणि ज्याला ॲरिस्टॉटल ‘सामान्य–विशेष–संभ्रम’ म्हणत असे तो तर्कदोष, ह्यांच्यात भेद करीत नाहीत. (२) सामान्य–विशेष–संभ्रम : सामान्य नियम जेव्हा आपण विशिष्ट वस्तूंना किंवा घटनांना उद्देशून लावतो, तेव्हा त्याचे हे उपयोजन काही अटींनी मर्यादित झालेले असते असे आपण मानतो. पण अनेकदा आपण ह्या अटी स्पष्टपणे नमूद करीत नाही. उदा., ‘प्रत्येक माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो,’ हे सामान्य तत्त्व जर आपण घेतले, तर माणसाला वेड लागलेले नाही, तो शुद्धीवर आहे इ. अध्याहृत अटी त्याचे उपयोजन मर्यादित करतात. अशा सामान्य तत्त्वाच्या उपयोजनावर मर्यादा घालणाऱ्या अटी लक्षात न घेता, जर ते तत्त्व एका विशिष्ट वस्तूला लावले, तर तो सामान्य–विशेष–संभ्रम तर्कदोष होय. उदा., दारूच्या धुंदीत असलेल्या माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो असा निष्कर्ष मी काढला, तर हा तर्कदोष घडेल. (३) खंडनाज्ञान तर्कदोष : म्हणजे असंबंधित किंवा गैरलागू युक्तिवाद करण्याचा तर्कदोष. ह्याचे चार प्रमुख प्रकार मानण्यात आले आहेत: (अ) व्यक्तियुक्ती : ह्याच्यात विरोधकाच्या मतांचे खंडन न करता त्याच्या स्वभावावर किंवा वर्तनावर टीका करण्यात आलेली असते विशेषतः विरोधकाचे वर्तन त्याने प्रतिपादन केलेल्या मतांविरुद्ध आहे असे दाखवून देण्यात आले असते. उदा., दारूबंदी असावी ह्या मतांवर टीका करताना दारूबंदीचे पुरस्कर्ते स्वतः दारू पीत असतात हे दाखवून देणे. (आ) दंडयुक्ती : ह्याच्यात आपले मत पुराव्याच्या आधारावर सिद्ध न करता बळाच्या वापराची भीती दाखवून लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केलेला असतो. उदा. ‘संततिनियमनाचे धोरण अयोग्य आहे कारण त्याचा प्रचार चालू राहिला तर त्याला विरोध करायला लाखो लोक शस्त्र हाती घेतील’. (इ) लोकभावना–युक्ती : ह्याच्यात आपला मुद्दा युक्तिवादाने सिद्ध न करता लोकांच्या भावनांना आवाहन करून त्यांचे मत त्याला अनुकुल करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उदा., अमूक एक शहर महाराष्ट्रात आलेच पाहिजे कारण हा चार कोटी महाराष्ट्रीयांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. (ई) आदर–युक्ती : ह्याच्यात एखादे मत स्वीकारार्ह आहे हे योग्य त्या पुराव्याचा आधार देऊन सिद्ध न करता, लोकांच्या मनात ज्यांच्याविषयी आदर आहे अशा थोर व्यक्तींनी त्या मताचा पुरस्कार केला आहे असे दाखवून ते लोकांना पटविण्याचा प्रयत्न केलेला असतो. उदा., ‘चातुर्वर्ण्य गैर कसे असेल? थोर ऋषिमुनींनी त्याचा पुरस्कार केलेला आहे’. (४) चक्रयुक्ती : ह्या युक्तिवादात जे विधान निष्कर्ष म्हणून सिद्ध करावयाचे आहे तेच आधारविधानात सत्य म्हणून सुप्तपणे गृहीत धरलेले असते. उदा., ‘भिकाऱ्यांना भिक्षा घालणे योग्य आहे कारण दानधर्माची कृत्ये करणे योग्य असते’. ह्या युक्तिवादात भिकाऱ्यांना भिक्षा घालणे हे दानधर्माचे कृत्य आहे हे गृहीत धरलेले आहे. पण जे लोक भिकाऱ्यांना भिक्षा घालायला विरोध करतात त्यांना भिकाऱ्यांना भिक्षा घालणे हे दानधर्माचे कृत्य असते हे मतच गैर आहे, असे वाटते. तेव्हा हे मत गैर नाही हेच त्यांना अगोदर पटवून द्यावे लागेल. अनेकदा एखादे विधान ज्या आधारविधानांपासून प्राप्त करून घेऊन सिद्ध केलेले असते, त्यांपैकी एखादे आधारविधान सिद्ध करताना त्याच विधानाचा आधारविधान म्हणून उपयोग केलेला आढळतो. अशा युक्तिवादात चक्रयुक्ती दोषाचे स्वरूप स्पष्टपणे प्रकट झालेले असते. उदा., ‘वेद प्रमाण आहेत कारण ते ईश्वराचे बोल आहेत. पण वेद ईश्वराचे बोल कशावरून आहेत?’ ‘कारण वेद ईश्वराचे बोल आहेत’ असे विधान वेदात आढळते आणि वेद प्रमाण असल्यामुळे त्यांतील प्रत्येक विधान सत्य आहे. (५) अयुक्त–कारण–दोष : ह्याचे ॲरिस्टॉटलने केलेले स्पष्टीकरण असे आहे : समजा क ह्या विधानापासून ख हा निष्कर्ष निष्पन्न होतो आणि ख हे विधान आत्मविसंगत किंवा विपरीत आहे असे आपण दाखवून दिले, तर ह्यापासून क चे खंडन होते. आता समजा ख हे विधान आत्मविसंगत आहे किंवा विपरीत आहे हे आपण दाखवून दिले, आणि ह्या आधारावर क चे खंडन करू गेलो, पण समजा ख हे विधान क ह्या विधानापासून निष्पन्न होत नाही मग ख विपरीत आहे ह्या आधारावर आपण क चे खंडन करू गेलो, तर तो अयुक्त–कारण–दोष होतो. ह्याचे एक प्रसिद्ध उदाहरण असे आहे: ‘जग सपाट असणे शक्य नाही कारण जर जग सपाट असते तर ते अनंत असते आणि जग अनंत आहे हे म्हणणे हास्यास्पद आहे कारण जगाला प्रदक्षिणा घालण्यात आली आहे’. आता जग सपाट आहे ह्यापासून जग अनंत असले पाहिजे , हे निष्पन्न होत नाही. जग सपाट असूनही सान्त असू शकेल. म्हणून जग अनंत आहे हे विधान अनुभवाशी विसंगत आहे असे जरी दाखवून दिले, तरी त्यामुळे जग सपाट आहे ह्या विधानाचे खंडन होत नाही. पण नंतरच्या अनेक तर्कशास्त्रज्ञांनी अयुक्त–कारण–दोषाचा वेगळा अर्थ केला आहे. अ ह्या घटनेनंतर ब ही घटना घडली म्हणून अ ही घटना ब ह्या घटनेचे कारण आहे असे मानणे, म्हणजे अ आणि ब ह्यांच्यात क्रम आहे म्हणून त्यांच्यात कार्यकारणसंबंध आहे असे काकतालीय न्यायाने मानणे, असा अयुक्त–कारण–दोषाचा त्यांनी अर्थ लावला आहे. (६) उत्तरांगविधी दोष : ह्याचे विवेचन आपण वर केलेच आहे. (७) बहुप्रश्न दोष : कित्येक प्रश्न असे असतात, की अगोदरच्या एका प्रश्नाला एक विशिष्ट उत्तर देण्यात आले आहे असे गृहीत धरले तरच ते उपस्थित होतात नाहीतर नाहीत. उदा., ‘त्याने दारू प्यायचे सोडून दिले का?’ हा प्रश्न ‘तो दारू पीत असे का?’ ह्या अगोदर विचारलेल्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर आले असले तरच उपस्थित होतो. ह्यामुळे जो माणूस कधीच दारू पीत नसे त्याच्याविषयी ह्या प्रश्नाचे होकारार्थी किंवा नकारार्थी काहीच उत्तर देता येणार नाही. कारण कोणतेही उत्तर दिले, तरी आपण पूर्वी दारू पीत होतो अशी कबुली त्याच्याकडून दिली जाईल. एका प्रश्नाचे एक विशिष्ट उत्तर गृहीत धरल्यामुळे उपस्थित होणारा प्रश्न जर एकदम विचारला तर बहुप्रश्न दोष घडतो.
तर्कदोषाची ही यादी परिपूर्ण किंवा संपूर्ण आहे असे म्हणता येणार नाही. आपण विचार करताना केवळ निगामी अनुमाने करतो असे नाही. विशिष्ट वस्तूंचे, घटनांचे निरीक्षण करून त्यांच्यापासून विगमनाने सामान्य नियमांचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, वस्तूंचे वर्गीकरण करतो, संकल्पनांचा अर्थ निश्चित करण्यासाठी त्यांच्या व्याख्या करतो इत्यादी. हे सर्व वैचारिक व्यवहार कसे पार पाडावेत, ह्याविषयी काही नियम शोधून काढण्यात आले आहेत. अशा कोणत्याही नियमाचा भंग करणे म्हणजे तर्कदोष करणे होय. तसेच विचाराच्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अमूक एका प्रकारची चूक करण्याकडे आपली प्रवृत्ती असली, तर तिच्याकडे लक्ष वेधावे म्हणून त्या प्रकारच्या चुकीला किंवा तर्कदोषाला तत्त्ववेत्ते एक विशिष्ट नाव देतात. उदा., अनेकदा तत्त्ववेत्ते केवळ वर्णनपर विधानांपासून मूल्यवाचक निष्कर्ष काढताना आढळतात. जी. ई. मूर ह्यांचे म्हणणे असे आहे, की असे करणे चूक आहे पण असे करण्याकडे आपली एक स्वाभाविक प्रवृत्तीही आहे. ह्या चुकीला मूर ह्यांनी ‘प्रकृतिवादीय तर्कदोष’ असे नाव दिले आहे आणि ह्या तर्कदोषाच्या स्वरूपाविषयी आणि हा खरोखरच तर्कदोष आहे का ह्याविषयीही बराच ऊहापोह अलीकडच्या तत्त्वज्ञानात झाला आहे.
२. वाडेकर, दे. द. तर्कशास्त्राचीं मूलतत्त्वे : भाग १ : निगमन पुणे, १९६३.
“