तरुयूका (ऑनिस्कस): पृष्ठीय दृश्य : (१) शृंगिका,(२)शीर्ष, (३)वक्ष, (४) उदर,(५) पुच्छखंड, (६) पुच्छपाद.

तरुयूका : (ऑनिस्कस ). क्रस्टेशिया (कवचधारी प्राण्यांच्या) वर्गाच्या मॅलॅकोस्ट्रॅका या उपवर्गातील आयसोपोडा गणात तरुयूकेचा समावेश होतो. ही ऑनिस्कस  वंशाची असून या वंशात कित्येक जाती आहेत. हे प्राणी भूचर व वायुश्वासी आहेत. जमिनीवर राहण्याकरिता त्यांच्या शरीराचे पूर्णपणे अनुकूलन (ज्या प्रक्रियेने प्राणी विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य होतो ती प्रक्रिया) झालेले असते.

दमट उष्ण प्रदेशात या विपुल असतात. कुजणाऱ्या लाकडाच्या किंवा पाचोळ्याच्या खाली, झाडांच्या साली खाली व दमट जागी या राहतात. हिचे शरीर चपटे असून त्याची लांबी ०·५–३·०० सेंमी. असते. काहींची पाठीकडची बाजू बरीच उत्तल (बहिर्गोल) असते. शरीराचे शीर्ष, वक्ष आणि उदर असे स्पष्ट तीन भाग असतात. पुष्कळदा उदर वक्षापेक्षा बरेच अरुंद असल्याचे दिसून येते. नर आणि मादी सारखीच दिसतात. अगदी पुढचे पाच खंड आणि पहिला वक्षीय खंड यांच्या सायुज्यनाने (एकत्रीकरणाने) शीर्ष बनलेले असते. शीर्षावर सूक्ष्म लघुशृंगिकांची (सांधे असणाऱ्या लहान स्पर्शेंन्द्रियांची) एक जोडी, लांब शृंगिकांची एक जोडी आणि अवृंत (देठासारखा भाग नसलेल्या) संयुक्त नेत्रांची [⟶ डोळा] एक जोडी असते. या शिवाय मुखांगांच्या जंभ (अन्नाचे चर्वण करण्यासाठी असलेला अवयव), पहिली व दुसरी जंभिका (जंभाच्या मागे असणारा अवयव) आणि जंभपाद अशा चार जोड्या असतात. जंभांवर स्पर्शक (सांधे असलेले संवेदनाग्राही अवयव) नसतात.

वक्ष सात स्वतंत्र खंडाचे बनलेले असून प्रत्येक खंडावर चालण्याकरिता उपयोगी पडणाऱ्या संधियुक्त पायांची एक जोडी असते. मादीमध्ये पहिल्या पाच जोड्यांतील प्रत्येक पायाच्या बुडापासून एक पटल निघते. ही पटले परस्परव्यापी असून त्यांच्या मांडणीमुळे वक्षाखाली भ्रूणकोष्ट तयार होतो. मादी त्यात अंडी ठेवते.

उदराचे पाच खंड आणि एक शेवटचा पुच्छखंड असतो. उदराच्या पाच खंडांवर उपांगांची प्रत्येकी एक जोडी असून त्यांना प्लवपाद म्हणतात. पुच्छखंडावरही उपांगांची एक जोडी असून त्यांना पुच्छपाद म्हणतात. प्लवपाद द्विशाखी असून तकटांसारखे असतात. त्यांच्या अंतःपादांशाची रचना क्लोमांसारखी (कल्ल्यांसारखी) असून ते श्वसनाचे कार्य करतात. तरुयूका वायुश्वासी असली, तरी तिला आर्द्रतेची आवश्यकता असते. पुच्छपादही द्विशाखी असतात, पण त्यांच्या दोन्ही शाखा कंटकांसारख्या असतात. नराच्या प्लवपादांच्या पहिल्या दोन जोड्यांच्या अंतःपादांशांचे मैथुन-कंटिकांमध्ये रूपांतर झालेले असते.

तरुयूकांची पिल्ले प्रौढांसारखीच असतात, पण त्यांना पायाची शेवटची जोडी नसते.

कर्वे, ज. नी.