तमाल : (हिं. तेजपात क. उत्तमहोगे सं. तेजपत्र इंडियन कॅसिया लिग्निया, कॅसिया सिनॅमॉन लॅ. सिनॅमोमम तमाला कुल-लॉरेसी). हा सदापर्णी, सुगंधी व ८-९ मी. उंच वृक्ष हिमालयात ९३०–२,४१८ मी उंचीपर्यंत आढळतो. सिल्हेट, खासी टेकड्या व जैंतिया टेकड्या येथे विपुल असून खासियात याची लागवडही केली जाते. याचा परीघ १·५ मी. पर्यंत वाढतो. साल पातळ, उदी आणि सुरकुतलेली असते. पाने साधी, समोरासमोर, लहान देठाची, ५–७ सेंमी, लांब, आयत किंवा कुंतसम (भाल्यासारखी), प्रकुंचित (निमुळत्या टोकाची), जाड, लोमश (केसाळ) व चकचकीत असून मुख्य शिरा तीन असतात. पानांना ‘तमालपत्र’ म्हणतात. फुले एकलिंगी, पांढरी, असंख्य, लहान, बहुधा एकाच झाडावर असतात. परिदले छेदित असून नंतर गळून पडतात केसरदलावरील परागकोश झडपांनी उघडतात [⟶फूल]. मृदुफळ दीर्घवृत्ताकृती, परिदलनलिकेने वेढलेले, मांसल आणि काळे असते. इतर सामान्य लक्षणे ⇨लॉरेसी अथवा तमाल कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
खोडाच्या सालीला तेजपत्र (कॅसिया बार्क) असे व्यापारी नाव असून तिच्यापासून काढलेले सुवासिक तेल साबणात वापरतात. ते सालीत ७% असते. पाने सुगंधित असून मसाल्यात फार वापरतात. त्यांनाच ‘तेजपात’ ही म्हणतात. शिर्क्याच्या निर्मितीत, खाद्यपदार्थात व आसवांना सुगंध आणण्यास वापरतात. रंगविणे व कापड छपाईसाठी हिरड्याबरोबर तमालपत्रे वापरतात. साल व पाने कातडी कमाविण्यास उपयुक्त असतात. पानांतील तेलात ७८% यूजेनॉल, तर सालीतील तेलात ७०–८५% सिनॅमिक आल्डिहाइड असते. साल व पाने औषधी आहेत. सालीची पूड परम्यावर, जठराच्या दुर्बलतेवर व प्लीहापवृद्धीवर (पांथरीच्या वाढीवर) परिणामकारक असते. मज्जाविकार व हृदयविकार यांवरही उपयुक्त पाने उत्तेजक, कृमिनाशक असून संधिवात, शूल, अतिसार यांवर गुणकारी असून वृश्चिकदंशावरही उपयुक्त असल्याचे सांगतात. काश्मीरात तांबुलाच्या पानांप्रमाणे तमालाची पाने उपयोगात आहेत.
पहा : दालचिनी.
कानिटकर, उ. के.
“