तडित् : वीज किंवा विद्युत्. विजेचा लखलखाट दिसणे, प्रचंड गडगडाट ऐकणे किंवा वीज पडणे हा नैसर्गिक आविष्कार अनादिकालापासून चालत आलेला आहे. विज्ञानपूर्व काळात तडित्विषयक अनेक देशांत तऱ्हेतऱ्हेच्या शुभाशुभ कल्पना आणि लोकसमजुती प्रचलित होत्या. विज्ञानाच्या सध्याच्या प्रगतावस्थेत या नैसर्गिक आविष्काराचे खरे स्वरूप शोधून काढण्यात शास्त्रज्ञांस बरेचसे यश प्राप्त झाले आहे.
क्षणिक उच्च विद्युत् प्रवाहयुक्त व कित्येक किलोमीटर मार्ग असलेले विद्युत् विसर्जन (साठलेले किंवा साठवून ठेवलेले विद्युत् भार मोकळे होऊन जाणे) अशी तडितेची व्याख्या करता येईल. वातावरणातील काही भागात पुरेसा मोठा विद्युत् भार निर्माण होऊन त्यामुळे तयार झालेल्या विद्युत् क्षेत्राने हवेचे विद्युत् विभंजन (कुसंवाहकाचा रोध उच्च विद्युत् दाबाने नष्ट होऊन घडणारी विद्युत् विसर्जन क्रिया) होते व तडितुद्भव होतो. तडित् निर्माण होण्याचा सर्वसाधारण उगम म्हणजे गर्जन्मेघ [उत्तुंग वाढणाऱ्या मेघाचा प्रकार→ गडगडाटी वादळ] होय. तथापि हिमाच्या व वाळूच्या वादळांत, तसेच उद्रेकावस्थेत (स्फोट चालू असण्याच्या स्थितीत) असलेल्या ज्वालामुखीच्या वरच्या भागातील ढगात तडितुद्भव होतो. निरभ्र व स्वच्छ वातावरणातही तडित् दिसल्याचे आणि पडल्याचे उल्लेख आहेत. प्रयोगशाळेतही २० लक्ष व्होल्टचा विद्युत् वर्चोभेद (विद्युत् स्थितींतील फरक) निर्माण करून तडित् आविष्कार निर्माण करण्यात यश मिळाले आहे.
तडितेचा लखलखाट व गडगडाट वातावरणाच्या विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतो. लखलखाटाबरोबर नेहमीच गर्जना होते असे नाही. तडितेपासून संरक्षण होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचा विचार ‘तडित् संरक्षण’ या नोंदीत केला आहे.
तडितेचे विविध प्रकार : (१) रेखीय व शाखायुक्त, (२) फितीसारखी, (३) गोटीदार, (४) उन्हाळी हवेतील, (५) स्तररूप, (६) गोलाकार असे तडितेचे वेगवेगळे प्रकार आहेत.
रेखीय व शाखायुक्त तडित् : हा नेहमी दिसणारा प्रकार आहे. ढगाढगांतील, ढग व पृथ्वी यांमधील अथवा ढग व सभोवतालचे वातावरण यांमधील विद्युत् विसर्जनामुळे हा प्रकार निर्माण होतो [आ. १ (अ)].
फितीसारखी तडित् : हा नेहमीच्या तडितेचाच प्रकार आहे परंतु वाऱ्याच्या वेगामुळे तडित् मार्ग काही वेळा सरकला जाऊन डोळ्यांना तो फितीसारखा दिसून येतो [आ. १ (आ)].
गोटीदार तडित् : तडित् फुटून तीतून लहान तेजाळ गोटीसारखे भाग दिसून येतात. हा प्रकार बराच वेळ जोरदार पाऊस पडत असताना दिसतो. सुरुवातीस अखंड रेखीय प्रकार असून नंतर दीप्ती (प्रकाश तीव्रता) कमी होते व मार्ग खंडित होऊन त्यात गोटीदार तेजाळ भाग दिसू लागतात [आ. १ (इ)].
उन्हाळी हवेतील तडित् : हाही रेखीय तडितेचा मुख्यत्वेकरून उन्हाळ्याच्या दिवसात दिसणारा असा एक प्रकार आहे [आ. १ (ई)]. पृथ्वीवर न पडता ढगापासून क्षैतिज दिशेने हिचा मार्ग १५–१६ किमी. इतका दूरवर जातो. फार अंतरामुळे गर्जना ऐकू येत नाहीत. काही वेळा एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे हिचा मार्ग जातो.
स्तररूप तडित् : या प्रकारात आकाशाचा बराच मोठा भाग प्रकाशित झाल्याचे दिसते. उच्च आणि नीच पातळीच्या ढगांमधील विद्युत् विसर्जनामुळे हा प्रकार निर्माण होत असावा.
गोलाकार तडित् : ढगातून, जमिनीजवळून वा हवतेतून सु. १० ते २० सेंमी. व्यास असलेला विजेचा गोळा पाहिल्याचे अनेक उल्लेख आहेत. तसेच त्या गोळ्याला सर्वसाधारणपणे तांबडा, नारिंगी किंवा पिवळा रंग असून तो ५–६ सेकंदांपर्यंत दिसतो. तो गडगडाट न होता किंवा प्रचंड गडगडाट होऊन नाहीसा होतो. तो गोळा जमिनीवर पडल्यावर उशी घेऊन उघड्या खिडक्यांतून इमारतीतही शिरतो, असेही काही चमत्कृतीपूर्ण उल्लेख आहेत. तथापि या तडित् प्रकारासंबंधी समाधानकारक खुलासा करणारी कोणतीच उपपत्ती अस्तित्वात नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते हा दृष्टिभ्रम असावा, तर काहींच्या मते यासंबंधीच्या जमा झालेल्या विस्तृत माहितीत थोडे बहुत तथ्य असावे असे वाटते.
गोलाकार तडितेविषयी अनेक लोकांकडून प्रत्यक्ष तो आविष्कार पाहिल्याचे वृत्त येतच आहे. त्यामुळे त्याबद्दल शास्त्रीय उपपत्ती देण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यात रशियन शास्त्रज्ञ पीटर काप्यिट्स यांची उपपत्ती जास्त समाधानकारक वाटते. या उपपत्तीनुसार तडिताघातामुळे अतिउच्च कंप्रतेचे (दर सेकंदास होणाऱ्या कंपनसंख्येचे) विद्युत् चुंबकीय तरंग निर्माण होत असावेत. त्याचे विद्युत् संवाहक पृष्ठावरून परावर्तन होत असावे. मूळ तरंग व परावर्तित तरंग यांच्यामध्ये व्यतिकरण (दोन किंवा अधिक तरंगमालिका एकमेकींवर येऊन पडतात तेव्हा घडून येणारा आविष्कार) होऊन स्थिर तरंग निर्माण होत असावेत. या स्थिर तरंगांतील प्रस्पंद बिंदूवर (तरंगाचा परमप्रसर कमाल असेल अशा बिंदूवर) अतितीव्र विद्युत् क्षेत्रे केंद्रित होऊन तेथील हवेचे आयनीकरण (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगटांत रूपांतर) होत असावे व अशा तऱ्हेने प्रकाशमान गोल तयार होत असावा. हा गोल मग प्रस्पंद बिंदूपासून निस्पंद बिंदूकडे (परमप्रसर शून्य असेल अशा बिंदूकडे) जात असावा परंतु तडिताघातामुळे असे अति–उच्च कंप्रतेचे विद्युत् चुंबकीय तरंग निर्माण होत असल्याबद्दल निःसंदिग्ध पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही, हे या उपपत्तीतले मोठेच वैगुण्य आहे. प्रतिद्रव्याच्या (ज्यातील अणूंमधील कण साध्या द्रव्यातील अणूंमधील कणांच्या विरुद्ध विद्युत् भाराचे आहेत अशा द्रव्याच्या) सूक्ष्म अशनीमुळे हा आविष्कार होत असावा, अशीही एक उपपत्ती आहे परंतु सर्वस्वी समाधानकारक अशी उपपत्ती अद्यापही सापडलेली नाही.
तडिताघाताचे परिणाम : जेव्हा तडिताघात होतो तेव्हा तडित् मार्गावरील हवेच्या दाबात एकदम प्रचंड वाढ होते व त्यामुळे मेघगर्जना होते. हा हवेचा दाब वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे प्रचंड विद्युत् प्रवाहामुळे तडित् मार्गात निर्माण होणारी प्रखर उष्णता व त्यामुळे निर्माण होणारा प्रचंड दाब ही होत. या प्रचंड दाबामुळे आसमंतातील इमारतींच्या खिडक्यांची तावदाने फुटू शकतात. प्रत्यक्ष इमारतीवरच तडिताघात झाल्यास इमारतीला धक्का पोहोचतो. उंच इमारतीवर किंवा झाडावर तडिताघात होण्याचा संभव अधिक असतो, म्हणून तडित् निवारक साधने वापरून अशा इमारतीचे संरक्षण करावे लागते.
तडिताघाताने मनुष्यास व इतर प्राण्यांस मृत्यू येणे संभवनीय असते परंतु सौम्य स्वरूपाचा आघात झालेल्या व्यक्तीस कृत्रिम श्वासोच्छ्वासादी प्रथमोपचारांनी सावध करता येते. तडिताघात झालेल्या व्यक्तीस स्पर्श करणे धोक्याचे आहे, असा जो समज आहे तो चुकीचा आहे. तडिताघातामुळे मनुष्य भाजला जातो व त्याला विजेचा धक्का बसतो आणि तो बेशुद्ध पडतो परंतु त्याच्या अंगात विद्युत् संचय होत नाही.
विमानावर तडिताघात झाल्यास उतारूंना त्याचा परिणाम जाणवत नाही. परंतु लखलखाटामुळे डोळे दिपून वैमानिकास काही दिसेनासे होणे शक्य असते. विमानातील विद्युत् व चुंबकीय उपकरणांत बिघाड होणेही संभवनीय असते.
तडिताघाताच्या वेळी प्रचंड विद्युत् प्रवाह निर्माण होतात. शिवाय विद्युत् प्रवाहातील वाढ अत्यंत त्वरेने होत असल्यामुळे अतितीव्र चुंबकीय क्षेत्रे निर्माण होतात व त्यामुळे निर्माण होणारा दाब एवढा मोठा असतो की, त्याने विद्युत् वाहक नळ्यांचा पुष्कळदा संपूर्ण चुराडा होतो. तडित् मार्ग जर लाकूड, दगडी भिंत इ. कुसंवाहकातून अगर अर्धसंवाहकातून गेला, तर त्यामुळे स्फोटक परिणाम होतात. ज्वालाग्राही पदार्थातून तडित् मार्ग गेल्यास आगी लागतात. त्याचप्रमाणे जंगले, इमारती, रासायनिक व खनिज तेलांचे कारखाने इत्यादींवर तडिताघात झाल्यास आगी लागण्याचा संभव असतो.
तडितेचे स्वरूप : तडित् म्हणजे विद्युत्च होय, हे प्रथम बेंजामिन फ्रँक्लिन या शास्त्रज्ञांनी अठराव्या शतकातच सिद्ध केले. ढग व पृथ्वी, दोन ढग अथवा ढग आणि सभोवतालचे वातावरण यांमधील वर्चोभेद प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे वातावरणातून विद्युत् भाराच्या विसर्जनाने तडित् निर्मिती होते, गर्जन्मेघावर विद्युत् भार कसा निर्माण होतो, यासंबंधी अनेक उपपत्त्या आहेत. प्रयोगशाळेतील प्रयोगांवरून पाण्याच्या वा बर्फाच्या कणावर निरनिराळ्या तऱ्हेने विद्युत् भार निर्माण होतो, हे दिसून आले आहे. वाऱ्याच्या जोरदार प्रवाहाने पाण्याचे थेंब फुटून किंवा हवेतील आयनांचा ग्रास करून अथवा बर्फ कणांच्या घर्षण व स्पर्श परिणामांमुळे वीज निर्माण करता येते.
गर्जन्मेघावर विद्युत् भार उत्पन्न कसा होतो, याबद्दल सर्वमान्य अशी एखादी उपपत्ती अद्याप मिळालेली नाही. जे. लेथम आणि बी.जे. मेसन यांची उपपत्ती त्यातल्या त्यात जास्त समाधानकारक वाटते.
लेथम आणि मेसन उपपत्ती : बर्फाच्या तुकड्यातील दोन भागांत जर तापमानाचा चढ–उतार असेल (किंवा प्रस्थापित करणे शक्य असेल), तर त्या तुकड्यात विद्युत् वर्चोभेद निर्माण होतो, हे फार पूर्वीपासून ठाऊक होते. गरम भाग थंड भागाच्या सापेक्ष ऋण असतो. यावरून भिन्न तापमान असलेले बर्फाचे दोन तुकडे क्षणभर एकमेकांस चिकटवून नंतर वेगळे केले, तर गरम तुकडा ऋण विद्युत् भारित व थंड तुकडा धन विद्युत् भारित बनतो, असे दिसून येते.
या उपपत्तीप्रमाणे बर्फाच्या दोन भागांत तापमानाचा चढ–उतार असला, तर विद्युत् वर्चोभेद निर्माण होण्यास पुढील भौतिक वस्तुस्थिती कारणीभूत असतात : (१) बर्फात H+ किंवा OH— आयन असतात. (२) आयनांची सांद्रता (एकक घनफळात असलेली कणांची संख्या) बर्फाच्या तापमानावर अवलंबून असते जसजसे तापमान कमी होत जाते तसतशी सांद्रता शीघ्रतेने कमी होते. (३) H+ आयनांची गतिशीलता OH—आयनांच्या गतिशीलतेपेक्षा सु. १० पटींनी अधिक असते.
बर्फाच्या चकतीवर दोन बाजूंस एकाएकी तापमानाचा चढ–उतार प्रस्थापित केला, तर तीमध्ये आयनांच्या सांद्रतेचाही चढ–उतार प्रस्थापित होतो. दोन्ही प्रकारच्या आयनांची सांद्रता गरम भागाकडे सर्वांत जास्त असते. H+ आयनांची गतिशीलता जास्त असल्यामुळे ते थंड भागाकडे जाऊन त्या भागावर धन विद्युत् वाढत राहते आणि कमी गतिशीलता असलेले OH— आयन गरम भागाकडे राहून तेथे ऋण विद्युत् भाराचे आधिक्य होते. बर्फाच्या दोन बाजूंवर तापमानाचा सूक्ष्म फरक ठेवला, तर त्यामुळे निर्माण होणारा वर्चोभेद हा तापमानातील फरकास सम प्रमाणात असतो, असे प्रायोगिक रीत्या सिद्ध झाले आहे.
गार खाली पडत असताना अतिशीत पाणी तिच्या पृष्ठभागावर गोठते व तिचे आकारमान वाढत जाते. प्रयोगांनी असे सिद्ध झाले आहे की, गारेवर ऋण विद्युत् तयार होते व अतिशीत पाणी गोठण्याची क्रिया चालू असताना बर्फाचे लहान तुकडे फेकले जातात व त्या तुकड्यांवर धनविद्युत् तयार होते. पाण्याच्या बिंदूचे आकरमान ५० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०—४ सेंमी.) वाढत जाईपर्यंत विद्युत् भारही सारखा वाढत असतो. ५० ते ८० मायक्रॉनच्या दरम्यान विद्युत् भाराची वाढ स्थिर राहते. अशा रीतीने गारेवरील अतिशीत पाण्याच्या गोठण्यामुळे आणि गोठण क्रिया चालू असताना उडणाऱ्या बर्फाच्या तुकड्यांनी दोन्ही प्रकारचा विद्युत् भार वाढत जातो व –६° से. ते —१७° से. या तापमान मर्यादेत त्यावर काही परिणाम होत नाही. या उपपत्तीप्रमाणे विद्युत् विसर्जनास लागणारा आवश्यक विद्युत् भार गर्जन्मेघावर त्याला लागणाऱ्या कालावधीत तयार होतो.
गर्जन्मेघ व त्यातील विद्युत् भाराचे वितरण : आ. २ मध्ये गर्जन्मेघात विद्युत् भाराचे वितरण (वाटप) कसे असते, हे त्याच्या उंची व तापमानासह दाखविले आहे.
या प्रकारचे विद्युत् भार वितरण असलेला मेघ हा एक प्रचंड विद्युत् द्विध्रुवच बनेल. या मेघामुळे निरनिराळ्या ठिकाणी विद्युत् क्षेत्र तीव्रता किती आहे ते प्रत्यक्ष प्रयोगांनी मोजले आहे. क्षेत्र तीव्रतेचे यावरून मिळणारे वितरण द्विध्रुवाच्यामुळे मिळणाऱ्या वितरणाशी चांगलेच मिळतेजुळते येते. त्यामुळे मेघामधील विद्युत् भाराचे हे वितरण आता सर्वमान्य झाले आहे.
तडिताघाताचे स्वरूप : तडिताघात होत असताना एकच सलग चमक आपल्या डोळ्यांना दिसते परंतु शीघ्रगती छायाचित्रणाच्या साह्याने ही चमक अभ्यासिली असता असे दिसून येते की, ती एकच सलग चमक नसून एकामागोमाग तयार होणाऱ्या वाढत्या लांबीच्या चमकांची बनलेली असते (आ. ३ अ). ढग आणि पृथ्वी यांमधील वर्चोभेद पुरेसा वाढल्यावर ढगापासून एक चमक निघून पृथ्वीच्या दिशेने साधारण ५० मी. पर्यंत सरासरीने प्रती सेकंदाला १०५ मी. या वेगाने जाते व थांबते. अंदाजे ५० दशलक्षांश सेकंदानंतर पुन्हा दुसरी चमक पहिल्या चमकेच्या टोकापासून निघून त्याच वेगाने सु. १०० मी. अंतरापर्यंत जाते व थांबते. ही क्रिया पुनःपुन्हा घडून अखेर ती चमक पृथ्वीपर्यंत पोहोचते आणि त्याच क्षणाला पृथ्वीपासून उलट चमक निघून ढगांपासून आलेल्या चमकेच्याच मार्गाने ढगात शिरते. ही उलट चमक मात्र एकच सलग चमक असून टप्प्याटप्प्यांची नसते व तिचा वेग प्रती सेकंदास १०७ मी. पर्यंत असतो आणि तिची दीप्ती अत्यंत प्रखर असते. सु. ०·०१ सेकंदाच्या अंतराने दुसरी चमक पूर्वीच्याच मार्गाने जाते, परंतु या वेळी ढगाकडून पृथ्वीकडे जाणारी चमकसुद्धा टप्प्याटप्प्याने वाढत न जाता बाणाप्रमाणे एकाच तडाख्यात पृथ्वीपर्यंत पोहोचते. एकदा तयार झालेल्या मार्गातून ३० ते ४० पर्यंतही चमका जाऊ शकतात. सर्वसाधारणपणे जरी ढगापासून चमकेस सुरुवात होत असली, तरी पृथ्वीकडूनही चमकेची सुरुवात होऊ शकते. विशेषतः उंच इमारतीपासून चमकेची सुरुवात झाल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. या प्रकारातही पृथ्वीपासून प्रथम निघालेली चमक टप्प्याटप्प्यानेच ढगापर्यंत पोहोचते आणि इतरही सर्व घटना वरीलप्रमाणेच होत असतात (आ. ३ आ). सु. ९० टक्के तडितांमध्ये ढगाकडून खाली येणाऱ्या चमकांमुळे ऋण विद्युत् भार पृथ्वीकडे येतो, तरी परत वर जाणारी चमक ही धनविद्युत् भार वर जाण्यामुळे तयार होते. या वर जाणाऱ्या चमकेचा प्रकाश फार प्रखर असतो.
दोन ढगांमधील चमकाही अशाच प्रकारे तयार होतात परंतु काही वेळा या प्रकारात उलट चमक गेल्याचे दिसत नाही. दोन ढगांतील चमकांची लांबी पुष्कळदा प्रदीर्घ असते. १६ ते ४८ किमी. लांबीच्या चमकाही दिसून आल्या आहेत. ढग आणि पृथ्वी यांमधील चमकांची लांबी १·३ किमी. पेक्षा क्वचितच अधिक असते. एकाच ढगातील वेगवेगळ्या भागांतही चमका तयार होऊ शकतात.
उलट चमकेतील विद्युत् प्रवाह सु. ६ दशलक्षांश सेकंदात जास्तीत जास्त २०,००० अँपिअरपर्यंत वाढतो परंतु क्वचित प्रसंगी १·८ ते २ लाख अँपिअरपर्यंतही हा प्रवाह वाढल्याची उदाहरणे आहेत. सरासरीने ४० दशलक्षांश सेकंदात हा प्रवाह निम्म्याने कमी होतो. चमकेतील सरासरी प्रवाह अंदाजे १०,००० अँपिअर असतो. दोन चमकांमधील वेळांत सु. ५०० अँपिअर विद्युत् प्रवाह तडित् मार्गात वाहत राहतो. चमकेतील एकूण विद्युत् भार सरासरीने १८ कुलंब इतका असतो. जास्तीत जास्त १६५ कुलंब इतका विद्युत् भार मोजण्यात आला आहे. चमकांतील विद्युत् प्रवाह व काळ मोजण्यासाठी ऋण किरण दोलनलेखक [⟶ इलेक्ट्रॉनीय मापन] या साधनाचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे त्या प्रवाहामुळे विशिष्ट पदार्थात निर्माण होणारी चुंबकीकरण तीव्रता मोजून तीवरूनही विद्युत् प्रवाह काढता येतो.
उलट चमकेच्या तडित् मार्गाचा सरासरी व्यास १६ सेंमी. असतो. तडित् मार्गाचे तापमान बहुधा १५,०००°–३०,०००° से. किंवा त्याहून अधिक असते. या प्रचंड उष्णतेमुळे तडित् मार्गात सापडणाऱ्या धातूंच्या पदार्थांचीसुद्धा वाफ होऊन जाते. तडित् मार्गातील ही उष्णता एकाएकी वाढत असल्यामुळे मार्गातील हवेचा दाबही स्फोटक तीव्रतेने वाढतो व त्यामुळे तडित् गर्जना निर्माण होते. जर तडिताघात जवळपासच झाला, तर एकच कर्णकर्कश कडकडाट ऐकू येतो. आवाजाच्या मंद गतीमुळे निरनिराळ्या अंतरांवरून येणाऱ्या गर्जना अनेक सेकंद टिकणारा गडगडाट निर्माण करतात. केव्हा केव्हा वेगवेगळ्या येणाऱ्या गर्जनांचे व्यतिकरण होऊन कमीअधिक तीव्रतेचे आवाज ऐकू येतात. विशेषतः डोंगर–पर्वतातील प्रतिध्वनीमुळे गडगडणारा आवाज निर्माण होतो.
रंगीत तडित् : तडित् मार्गातील प्रचंड विद्युत् प्रवाहामुळे ऑक्सिजन व नायट्रोजन वायूंचे आयनीकरण होते व या दोन वायूंचे विद्युत् प्रवाहामुळे झालेले वर्णपट एकत्रित होऊन नेहमीची पांढऱ्या रंगाची चमक दिसते परंतु पाण्याच्या वाफेचे आयनीकरण झाल्यास हायड्रोजन वर्णपटाच्या निर्मितीने तांबूस अथवा गुलाबी रंगाची चमकही निर्माण होते. हवेत धुळीचे प्रमाण फार असल्यास पिवळ्या व लाल रंगाच्या चमकाही दिसू शकतात. क्वचित प्रसंगी जांभळ्या व हिरव्या रंगाच्या चमकाही दिसल्याचे सांगण्यात येते.
गडगडाटी वादळ : प्रत्येक गडगडाटी वादळाबरोबर प्रचंड प्रमाणात विद्युत् निर्मिती होते. गर्जन्मेघाच्या वरील व खालच्या भागांत कित्येक दशलक्ष व्होल्टचा वर्चोभेद निर्माण होतो त्यामुळे तडिताघात होतो. अशा तडित् वादळाबरोबर जोराचा पाऊस पडतो व क्वचित प्रसंगी हिम व गारांचाही वर्षाव होतो. तडित् वादळात विशिष्ट लक्षणांचे ढग आढळून येतात. गर्जन्मेघांचा (ऐरणी मेघांचा) भरणा तडित् वादळात मुख्यत्वेकरून असतोच परंतु काही काळानंतर वादळी क्षेत्रात तंतुमेघ, मध्यस्तरी मेघ (ज्या मेघांचा तळ मध्यम उंचीवर आहे असे) आणि निम्नस्तरी (ज्या मेघांचा तळ कमी उंचीवर आहे अशा) मेघांचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तडिताघातामुळे प्रतिवर्षी अतोनात नुकसान होते.
गडागडाटी वादळाशी निगडित असलेल्या गर्जन्मेघातील वायुप्रवाहाचा वेग सर्वसाधारणपणे प्रतिसेकंदाला ८ ते १५ मी. इतका असतो. परंतु कित्येकदा याच्या अनेक पटीनेही हा वेग वाढू शकतो. पृथ्वीवर कोणत्याही एका क्षणी सु. १८०० गडगडाटी वादळे होत असावीत असा अंदाज आहे. प्रत्येक वादळ सरासरीने १ तास टिकते. या सर्व वादळांमुळे प्रतिसेकंदाला शंभराहून अधिक तडिताघात होत असतात व प्रत्येक तडिताघातापासून मुख्यत्वे ऋण विद्युत् जाते व त्याच प्रमाणात धन विद्युत् ⇨ आयनांबरात जाते. परंतु वादळे शमताच पृथ्वीवरील विद्युत्ही हळूहळू आयनांबरात जाऊ लागते.
बहुतेक गर्जन्मेघाच्या खालच्या बाजूला ऋण विद्युत् असते आणि वरच्या बाजूला धन विद्युत् असते परंतु काही वेळा उलटही परिस्थिती असते. काही ठिकाणी वरच्या आणि खालच्या बाजूला धन विद्युत् व मध्यभागी ऋण विद्युत् असलेले गडगडाटी वादळाचे ढगही आढळून येतात. ढग आणि पृथ्वी यांच्यामधील वर्चोभेद मोठ्या प्रमाणात वाढल्यास वातावरणातील आयनांच्या हालचालींना प्रचंड वेग प्राप्त होतो त्यामुळे हवेचा नेहमीचा विद्युत् रोध संपुष्टात येऊन तडिताघात होतो.
तडिताच्या मार्गात तीव्र आयनीकरण झालेले असते. त्यामुळे तेथून रडार तरंगांचे परावर्तन होते. या परावर्तित रडार तरंगांवरून तडित् होणारी जागा म्हणजेच गडगडाटी वादळाचे स्थान निश्चित करता येते.
पहा : गडगडाटी वादळ.
संदर्भ : 1. Malan, D. J. Physics of Lightning, London, 1963.
2. Uman, M. A. Lightning, New York, 1969.
सुर्वे, बा. गो.