न्यास – २ : (ट्रस्ट). कायदेशीर रीत्या एकाची मालकी असलेल्या मालमत्तेचा दुसऱ्याच्या हिताकरिता कारभार पाहणारी कायदेशीर संस्था.
या विषयातील तज्ञ प्रा. कीटन ह्यांनी केलेली व्याख्या पुढीलप्रमाणे देता येईल : एक व्यक्ती जेव्हा कुठल्याही मालमत्तेवर दुसऱ्या व्यक्तीच्या हितासाठी किंवा फायद्यासाठी कायद्याच्या हुकुमामुळे ताबा ठेवते, तेव्हा त्या दोन व्यक्तींत निर्माण होणाऱ्या नात्यास ‘न्यास’ म्हणतात. न्यास हा व्यक्तींसाठी किंवा एखादे सार्वजनिक उद्दिष्ट – उदा., समाजसेवा, स्त्रीशिक्षण, वैद्यकीय सेवा इ.– साधण्याकरिता निर्माण करण्यात येतो. भारतीय न्यास अधिनियम १८८२ च्या कलम ३ मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार मालमत्तेच्या स्वामित्वाशी संलग्न असलेली व मालकाने दुसऱ्याच्या किंवा दुसऱ्याच्या व स्वतःच्या फायद्याकरिता ठेवलेल्या व स्वीकृत केलेल्या किंवा घोषित व स्वीकृत केलेल्या विश्वासातून निर्माण होणारी ही जबाबदारी असते. कायदेशीर मालकी एकाच्या हातात व समन्यायी मालकी दुसऱ्याच्या हातात असणे, हे न्यास व्याख्येत प्रमुख घटक आहेत.
आधुनिक कायद्याने निर्माण केलेल्या अतिव्यापक संस्थांपैकी न्यास ही एक आहे. स्वामित्वास किंवा हस्तांतरितास सक्षम असणाऱ्या कोणत्याही मालमत्तेचा न्यास असू शकतो. जगातील पुष्कळसे विधी निरनिराळ्या प्रकाराने न्यायसंस्थेस आज मान्यता देत असले, तरी तिच्या विकासाची कामगिरी अँग्लो-अमेरिकन कायद्याने प्रामुख्याने केली आहे.
आधुनिक न्यासाची जननी मध्ययुगीन काळातील वहिवाट ही आहे. इंग्लंडमधील सरंजामी कायद्यांनी जमिनीचे संपूर्ण मालक असलेल्या जमीनदारांवर काही बंधने घातली व जबाबदाऱ्या लादल्या. यांतूनच न्यासाला जन्म देणाऱ्या वहिवाटीच्या कल्पनेची निर्मिती झाली. सोळाव्या शतकापर्यंत पूर्ण मालकीच्या जमिनीचे मृत्युपत्र करण्याची कायद्यात तरतूद नव्हती परंतु दुसऱ्याला जमीन देण्याची प्रथा मात्र वाढली जी दात्याने वहिवाटीकरिता दिलेली म्हणून संबोधिली जात असे. ज्याला जमीन देण्यात येत असे, तो दात्याने घोषित केलेल्या उद्दिष्टांकरिता जमीन बाळगीत असे. मालमत्तेच्या व्यवस्थेची ही नुसती वैध पद्धतीच नव्हती, तर धनको व सरंजामदार यांना त्यांच्या ऋणाच्या पैशांबद्दल फसविण्याचा व प्रत्यक्ष मालक होऊ न शकणाऱ्या जमिनीपासून धार्मिक संस्थांना फायदा होऊ देण्याचा, हा एक उपायही होता. जवळजवळ १५० वर्षांपर्यंत मालमत्ता ज्या व्यक्तीच्या भरवशावर सोडण्यात येत असे, त्याच्या सदसद्विवेकबुद्धीवर वहिवाटीचा फायदा देणे अवलंबून असे कारण न्यायालयाकडे दाद मागण्याच्या दृष्टीने कोठल्याही प्रकारचा न्यायलेख अस्तित्वात नव्हता तथापि चौदाव्या शतकाच्या शेवटी समन्यायाची अंमलबजावणी करणाऱ्या चॅन्सलरने त्यांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने हुकूमनामे काढण्यास सुरुवात केली व ही वहिवाट केवळ भूषण न राहता, तिचे अंमलात आणण्यायोग्य जबाबदारीत रूपांतर झाले.
सरंजामदारांना व अंतिमतः राजांना त्यायोगे नुकसान भोगावे लागले. त्यामुळे ‘वहिवाट’ बंद करण्याच्या उद्देशाने १५३५ चा ‘वहिवाट संविधी’ संमत करण्यात आला तथापि संविधीच्या विश्लेषणामुळे व न्यायालयाच्या निर्णयामुळे काही प्रकारच्या वहिवाटी संविधीच्या कचाट्यातून सुटू शकल्या. या संविधीमुळे वहिवाटीकरिता संविधी होऊ शकत नसे परंतु १५४० च्या मृत्युपत्र संविधीने मालकीच्या जमिनीचे मृत्युपत्र करण्यास प्रथमच परवानगी दिली. पुढील २०० वर्षांत समन्यायी न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांनी आधुनिक न्यासाची वैशिष्ट्ये प्रस्थापित केली.
मध्ययुगीन वहिवाटीतून आजच्या न्यायसंस्थेची निर्मिती जरी झाली असली, तरी या दोन संस्थांमध्ये महत्त्वाचा फरक आहे. वहिवाटीचा विकास जमिनीपुरताच मर्यादित होता. न्यास सर्व मालमत्तेला लागू होऊ शकतो. समन्यायी न्यायालयांनी समन्यायी नियम विकसित केले व न्यासधारीच्या प्रशासकीय अधिकारांचे विवरण केले. मागच्या शतकात यासंबंधीचे बहुतेक नियम अमेरिका, इंग्लंड व राष्ट्रकुल कुटुंबातील देशांनी स्वीकृत केले. भारतातील न्यास अधिनियमही इंग्लंडच्या धर्तीवरच तयार करण्यात आले आहेत.
न्यासनिर्मितीस तीन पक्षांची जरूरी असते : (१) न्यासकर्ता – जो मृत्युपत्राने किंवा कागदपत्राने एखाद्यावर विश्वास ठेवून दुसऱ्याच्या फायद्याकरिता मालमत्ता देतो. (२) न्यासधारी – जो हा विश्वास स्वीकारून मालमत्तेचे नियंत्रण करतो. (३) न्यासहिताधिकारी – ज्याच्या हिताकरिता मालमत्तेचा उपयोग केला जातो.
न्यासनिर्मितीस ज्याप्रमाणे तीन पक्षांची गरज असते, त्याप्रमाणे तीन गोष्टींची निश्चितताही असावी लागते : (१) शब्दांची निश्चितीन्यास निर्माण करणाऱ्या शब्दांवरून काय करावयास पाहिजे, हे निश्चितपणे समजले पाहिजे. (२) वस्तूची निश्चिती – ज्या मालमत्तेसंबंधी – स्थावर वा जंगम – न्यास निर्माण केला असेल, ती निःसंदिग्धपणे लक्षात यावसाय पाहिजे. (३) व्यक्तीची निश्चिती – उद्दिष्ट अथवा न्यासहिताधिकारी याची निश्चिती असावसाय पाहिजे.
न्यासकर्ता अनुदान किंवा देणगी देऊन न्यास निर्माण करू शकतो. त्यास न्यासधारीकडून मोबदल्याची किंवा स्वीकृतीची आवश्यकता नसते. न्यासधारी काम करण्यास नकार देऊ शकतो. अशा स्थितीत दुसरा न्यासधारी शोधावयास पाहिजे. विशिष्ट किंवा निश्चित केल्या जाणाऱ्या न्यासहिताधिकाऱ्याकरिता मालमत्ता जवळ बाळगीत असणाऱ्या मालकाच्या साध्या घोषणेनेही न्यास निर्माण होऊ शकतो.
जर न्यासधाऱ्याने न्यासधारी बनण्यास नकार दिला, किंवा तो आवश्यक ती अर्हता प्राप्त करून घेऊ शकला नाही, किंवा मृत किंवा इतर तऱ्हेने अयोग्य झाला, तर न्यायालय इतर कोणालाही न्यासधारी म्हणून नेमू शकते. कारण न्यासधाऱ्याच्या अभावी समन्याय न्यास निष्फळ होऊ देणार नाही, पण जर न्यासहिताधिकारी मिळू शकला नाही, तर मात्र न्यास निष्फळ होतो आणि समन्यायी हक्क वैध हक्कात मिसळून जातो.
न्यासकर्त्याने सांगितल्याप्रमाणे मालमत्ता किंवा मालमत्तेचे उत्पन्न न्यासहिताधिकाऱ्याला उपलब्ध करून देणे व मालमत्तेचा कारभार हुशारीने व प्रामाणिकपणे पाहणे, हे न्यासधारीचे कर्तव्य आहे. न्यासकर्त्याच्या निर्देशनापासून त्याने विचलित होऊ नये, त्याचप्रमाणे त्यात त्याने काही सुधारणाही करू नये. ज्या उद्दिष्टांकरिता न्यास निर्माण झाला असेल, त्यांकरिताच न्यास पैशाचा विनिमय व उपयोग करणे आवश्यक असते. ही बाब त्याच्या मर्जीवर अवलंबून नसते. रक्कम विशिष्ट अटींवर व विशिष्ट उद्दिष्टांकरिता त्याच्या हवाली केलेली असते. या दोन्हींपैकी कोणत्याही गोष्टीची अवहेलना तो करू शकत नाही.
न्यासाचे दोन प्रकार आहेत : (१) खाजगी न्यास व (२) सार्वजनिक न्यास. खाजगी न्यास हा विशिष्ट व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या हितासाठी केलेला असतो. उदा., आपल्या मुलाकरिता पित्याने निर्माण केलेला न्यास. सार्वजनिक न्यास हा विशिष्ट समाजातील, गावातील किंवा प्रांतातील किंवा राष्ट्रातील व्यक्तींच्या हितांसाठी केलेला असतो. उदा., गावातील लोकांना प्रकाश किंवा शिक्षण देण्याकरिता निर्माण केलेला न्यास.
न्यास अभिव्यक्त किंवा गर्भितही असतात. गर्भित न्यास हे फलद्रूप होणारे प्रलक्षित न्यास असतात. कायद्याने प्रलक्षित न्यास ज्यास म्हणतात, ते प्रत्यक्षतः न्यास नसतात परंतु विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट व्यक्तींच्या ताब्यातील विशिष्ट मिळकतीसंबंधी, त्या त्या व्यक्ती न्यासधारीच आहेत, असे कायदा मानतो व त्या मिळकती दुसऱ्या कोणा विशिष्ट व्यक्तीच्या हिताकरिता धारण करण्याची जबाबदारी कायद्याने टाकली जाते, तेव्हा प्रलक्षित न्यास अस्तित्वात आल्याचे समजण्यात येते. ज्या उद्दिष्टांकरिता न्यास निर्माण करण्यात येतो, त्या उद्दिष्टांच्या नावानेही न्यासाला संबोधण्यात येते. उदा., धार्मिक कारणाकरिता निर्माण करण्यात आलेल्या न्यासास धार्मिक न्यास म्हणून संबोधण्यात येते. अशा न्यासांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने अधिनियम करण्यात आले आहेत.
इंग्लंडच्या धर्तीवर १८८२ साली भारतीय न्यास अधिनियम तयार करण्यात आला. इंग्लंडात न्यास, न्यासधारी आणि न्यासहिताधिकारी यांसंबंधी समन्यायाच्या आधारे न्यायालयांनी जी तत्त्वे प्रस्थापित केली, ती पूर्णतः भारतीय न्यासाच्या अधिनियमात समाविष्ट करण्यात आली आहेत. विशेषतः प्रलक्षित न्यासाबद्दल ८१ ते ९४ या कलमात प्रलक्षित न्यास केव्हाकेव्हा मानावे यासंबंधी तरतूद केली आहे. धर्मार्थ अनुदान अधिनियम, मुस्लिम वक्फ अधिनियम, धर्मार्थ व धार्मिक न्यास अधिनियम इ. अधिनियम वेळोवेळी संमत करण्यात आले. न्यासासंबंधी सर्व अधिनियमांत न्यासधारीवरील जबाबदाऱ्या, न्यासहिताधिकाऱ्याचे हक्क व न्यासांचे नियंत्रण, त्याचप्रमाणे न्यायालयात करावयाचे अर्ज, दावे इत्यादींसंबंधी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
संदर्भ : 1. Lewis, J. R. Outlines of Equity, Butterworth, 1968.
2. Megarry, R. E. Baker, P. V. Principles of Equity, London, 1960.
खोडवे, अच्युत
“