न्यायनिर्णय : (जज्मेंट). न्यायनिर्णय म्हणजे न्यायालयाने बनविलेल्या मतांची कारणासह अभिव्यक्ती. तो सर्वसाधारणपणे कार्यवाहीची सुनावणी संपल्यावर देण्यात येतो. सदसद्विवेकबुद्धीला स्मरून काढलेल्या निष्कर्षांना समर्पक कारणांसह पुष्टी देणे, हा न्यायनिर्णयाचा उद्देश होय. त्याची भाषा समतोल, स्पष्ट व सुबोध असावी. दुर्बोध असल्यास अपील न्यायालय त्यात सुबोधता आणण्यासाठी प्रकरण खाली पाठवू शकते. न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात दिनांक घालून व सही करून सुनावणी झाल्याबरोबर किंवा पुढे नेमलेल्या दिवशी घोषित करावा लागतो. परंतु निर्णय झाल्याबद्दलची सूचना पक्षकारांना द्यावी लागत नाही.
फौजदारी प्रकरणातील न्यायनिर्णयात निर्धारणीय प्रश्न, त्यांच्या वरील निष्कर्ष व कारणे द्यावयाची असतात. आरोपीला देहान्ताची शिक्षा द्यावयाची असल्यास जीव जाईपर्यंत त्याच्या मानेला फास लावावा, असे लिहावे लागते आणि अपिलाची मुदतही नमूद करावी लागते. निर्णय एकदा घोषित झाल्यानंतर त्यात अभावितपणे झालेल्या चुका दुरुस्त करण्यापुरतचा फेरफार करता येतो.
दिवाणी वादातील न्यायनिर्णयामध्ये वादप्रतिवादांचा सारांश काढलेले मुद्दे व त्यांवरील कारणांसह निष्कर्ष देणे जरूर असते. त्यांतील विवेचन वादप्रतिवादामधील कथनाबाहेर जाऊ नये. लघुवाद न्यायालयाच्या निर्णयामध्ये विचारार्थ प्रश्न व त्यांवरील निष्कर्ष दिले तरी चालते. पूर्वीच्या न्यायाधिशाने लिहिलेला न्यायनिर्णय त्याच्या जागी आलेल्या दुसऱ्या न्यायाधिशाला घोषित करता येतो. निर्णय एकदा घोषित झाल्यानंतर त्यात पक्षकारांना फेरफार पाहिजे असल्यास पुनर्विलोकनाचा अर्ज करावा लागतो पण हस्तदोष, अंकगणितीय प्रमाद किंवा अभावित चुका किंवा लोपन पक्षकारांच्या अर्जावरून किंवा विनाअर्जसुद्धा न्यायाधिशाला दुरुस्त करता येतात. हुकूमनामा न्यायनिर्णयाशी जुळता असावा लागतो.
एकदा दिवाणी कामातील न्यायनिर्णय दिला गेला, की तीच भूमिका धारण करणारे तेच पक्षकार अगर त्यांच्यामार्फत हक्क सांगणाऱ्या व्यक्ती यांच्या दरम्यान त्याच विषयासंबंधी दुसरा वाद चालत नाही. त्याला प्राङ्न्यायाचा म्हणजे ‘निर्णित वस्तू’ या तत्त्वाचा बाध येतो. मात्र तो येण्यासाठी पहिले न्यायालय दुसरा वाद ऐकावयाला समक्ष असले पाहिजे आणि पहिला वाद सुनावणी होऊन अंतिमतः निर्णित झाला असला पाहिजे. हा बाध फक्त वादालाच येतो असे नाही, तर मुद्यालाही लागू होतो.
काही न्यायनिर्णय फक्त पक्षकारांवर बंधनकारक असतात, त्यांना व्यक्तिबंधक म्हणतात आणि काही सर्वांवर बंधनकारक असतात, त्यांना सर्वबंधक म्हणतात.
श्रीखंडे, ना. स.