न्यायचौकशी : (ट्रायल). दिवाणी व फौजदारी कार्यवाहींच्या न्यायाधिकरणाकडून होणाऱ्या परीक्षेला न्यायचौकशी म्हणतात. कार्यवाहीचे सर्व टप्पे न्यायचौकशीत तत्त्वतः अंतर्भूत होत असले, तरी सामान्यपणे साक्षीदारांची तपासणी, कागद दाखल करणे व युक्तिवाद एवढ्यांपुरतीच ती मर्यादित करण्याची प्रथा आहे.
फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे समन्स प्रकरणामध्ये आरोपीला दंडाधिकाऱ्यापुढे उभा केला, की न्यायचौकशी सुरू होते. अधिपत्र प्रकरणात प्रथमदर्शनी पुराव्यावरून दोषसिद्धी शक्य असल्यासच आरोप ठेवून न्यायचौकशीला प्रारंभ होतो. काही दर्जाच्या दंडाधिकाऱ्यांना काही गुन्ह्यांबाबात न्यायचौकशी संक्षिप्त रीत्या करण्याचा अधिकार दिलेला आहे. सुपूर्दकारी दंडाधिकाऱ्यांपुढील कार्यवाही न्यायचौकशी नव्हे. त्यांनी सुपूर्द केलेली प्रकरणेच उच्च न्यायालयापुढे किंवा सत्र न्यायालयापुढे चालतात.
फिर्यादीतर्फेच्या साक्षीदारांचा तपास, त्यातून आरोपीविरुद्ध उघड झालेली परिस्थिती त्याच्या नजरेला आणून देणारे न्यायालयीन प्रश्न, आरोपीचे साक्षीदार असल्यास त्यांची तपासणी व युक्तिवाद, ही फौजदारी न्यायचौकशीची प्रमुख अंगे होत. इच्छा असल्यास शपथेवर साक्ष देण्याची मुभा आरोपीला १९५५ सालापासून देण्यात आली आहे. प्रत्येक आरोपीविरुद्ध प्रत्येक आरोपाबाबत भिन्न न्यायचौकशी हा नियम आहे तथापि प्रसंगोपात्त संयुक्त न्यायचौकशीची तरतूद प्रक्रिया संहितेत केलेली आहे. एका न्यायचौकशीत दोषमुक्ती वा दोषसिद्धी झाल्यास, त्याच गुन्ह्याबाबत दुसरी न्यायचौकशी प्रतिसिद्ध आहे. दिवाणी प्रकरणांमध्ये वादप्रतिवाद कथने, मुद्दे व नंतर सुनावणी हा स्थूलमानाने क्रम असतो. पक्षकारांच्या अनुपस्थितीत केलेल्या निर्णयाला तसेच प्रथम सुनावणीच्या वेळी म्हणजे मुद्दे काढण्याच्या टप्प्याला वादप्रश्नांच्या अभावी, केलेल्या निर्णयाला न्यायचौकशीचा भाग समजत नाहीत. मुद्दे काढल्यानंतर पक्षकारांच्या उपस्थितीत न्यायाधीश पुरावा लेखनबद्ध करतात, तेव्हा न्यायचौकशी सुरू होते. एकाच न्यायचौकशीमध्ये अनेक पक्षकार व/वा वादाकरणे यांचा अंतर्भाव करण्याबाबत दिवाणी-प्रक्रिया संहितेमध्ये तरतुदी आहेत.
श्रीखंडे, ना. स.