नौलाखी : गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्याच्या मालिया तालुक्यातील एक छोटे बंदर. कच्छच्या आखातावरील हे बंदर मालियाच्या नैर्ऋत्येस सु. ४६ किमी., तर मोरवीच्या पश्चिम वायव्येस सु. ४० किमी.वर आहे. पश्चिमेस ३२ किमी.वर असलेल्या कांडला बंदराच्या अधिकाधिक विकासामुळे या बंदराचे महत्त्व कमी झाले. कांडला बंदराशी येथून फेरी बोटीने वाहतूक चालते तर वांकानेरवरून पश्चिम लोहमार्गाचा एक फाटा नौलाखीपर्यंत जातो. येथून कापड, मीठ, वनस्पती तेल, लोकर, खनिज तेल, धान्य यांची निर्यात तर लाकूड, नारळ, कौले यांची आयात होते. या बंदरातून वर्षाला सु. एक लाख टन मालाची वाहतूक केली जाते. येथे डाक व तार कार्यालय, प्राथमिक शाळा, दवाखाना, धर्मशाळा इ. सोयी आहेत. याच बंदरात नौसेनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी टी. एस्. नौलाखी नावाची नाविक जहाजशाळा आहे.

सावंत. प्र. रा.