नेयवेली : तमिळनाडू राज्याच्या द. अर्काट जिल्ह्यातील एक औद्योगिक नगर. लोकसंख्या ५८,२८५ (१९७१). येथील लिग्नाइट कोळशाच्या उपलब्धतेमुळे विविध कारखान्यांची स्थापना होऊन पूर्वीच्या या लहान गावाचा अधिकाधिक विस्तार झाला आणि गेल्या दहा वर्षांत येथील लोकसंख्याही जवळजवळ वीस पटींनी वाढून त्याचे आता नगरात रूपांतर झाले आहे. १९४८ मधील राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार येथील २५९ चौ. किमी. क्षेत्रात सु. २०० कोटी टन लिग्नाईट कोळसा असावा परंतु अलीकडील पाहणीनुसार येथील ४८० चौ. किमी. क्षेत्रात ३३० कोटी टन लिग्नाइटाचे साठे असावेत, असा अंदाज आहे. नेयवेली प्रकल्प २०० कोटी रुपयांचा असून त्या प्रकल्पानुसार या कोळसा क्षेत्रातून प्रतिवर्षी ३५ लक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. २० मे १९५७ रोजी पंडित नेहरूंच्या हस्ते लिग्नाईट खाणीचे उद्‌घाटन झाले प्रत्यक्ष लिग्नाईट उत्पादनास मात्र ऑगस्ट १९६१ मध्ये प्रारंभ झाला. १९७५–७६ मध्ये सु. ३५ लक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले. येथील कोळशापैकी जवळच उभारलेल्या ६०० मेवॉ. क्षमतेच्या औष्णिक विद्युत् केंद्रात १५ लक्ष टन, तर १,५२,००० टन वार्षिक उत्पादन क्षमतेच्या प्रसिद्ध युरिया खत कारखान्यात ५ लक्ष टन कोळसा वापरण्यात येणार आहे. युरिया उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी लिग्नाइटऐवजी इंधनतेलाचा वापर करण्याची योजना असून त्याकरिता जागतिक बॅंकेने ११ कोटी रुपयांचे (एकूण योजना खर्च १४ कोटी रु.) कर्ज मंजूर केले आहे. येथेच युरियासाठी लागणाऱ्या द्रवरूप अमोनियाचा प्रतिदिनी २८५ टन उत्पादनक्षमतेचा कारखाना आहे. १९७६–७७ मध्ये ९५,५०७ टन युरियाचे उत्पादन झाले. लिग्नाइटाचा वापर करणारा नेयवेली येथील युरिया खत कारखाना हा सध्या जगात या प्रकारचा एकमेव कारखाना समजला जातो. येथेच लोह-पोलाद उद्योग उभारण्याची योजना आहे.

नेयवेली रासायनिक खतप्रकल्प : अमोनियाचे प्रचंड हॉर्टन गोल. ← युरियाच्या गुठळ्या बनविण्याचा मनोरा.

लिग्नाइटचा वापर केला जाणाऱ्या भारतातील येथील एकमेव औष्णिक विद्युत् केंद्रातून तमिळनाडू राज्यात वापरल्या जाणाऱ्या एकूण विद्युत्‌शक्तीच्या ४० टक्के विद्युत्‌निर्मिती केली जाते. त्यापासून १९७५ व १९७६ मध्ये अनुक्रमे २०८·४ कोटी व २८१·५ कोटी एकक वीज उत्पादन झाले. औष्णिक विद्युत् केंद्र रशियाच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने उभारण्यात आलेले असून युरिया खत कारखान्यास लागणारी सामग्री प. जर्मनी व इटली यांच्याकडून उपलब्ध झाली. याशिवाय या प्रकल्पक्षेत्रातच ‘लेको’ (LECO) या व्यापारी नावाने विकल्या जाणाऱ्या कार्बनी लिग्नाईट विटांचे उत्पादन करणारा कारखाना १९६६ मध्ये सुरू झाला असून, त्याची उत्पादनक्षमता प्रतिवर्षी सु. ३·२७ लक्ष टन आहे. यांचा रसायन व प्लॅस्टिक उद्योगात मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. त्याचप्रमाणे ‘नेकोलिन’ (NEKOLIN) या व्यापारी नावाने विकल्या जाणाऱ्या श्वेत चिकणमातीचे उत्पादन करणारा कारखाना येथे (वार्षिक उत्पादन क्षमता सु. ६,००० टन) असून तिचा उपयोग विद्युतीय निरोधक, मृत्तिकापात्रे यांच्या निर्मितिउद्योगात व कापडगिरण्यांत केला जातो. नेयवेली लिग्नाईट कॉर्पोरेशनची विस्तार योजना तीन टप्प्यांमध्ये कार्यान्वित व्हावयाची असून केंद्र सरकारने त्यासाठी ८७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. लिग्नाईट उत्पादन प्रतिवर्षी ३५ लक्ष टनांवरून ६५ लक्ष टनांवर नेणे, हा योजनेचा उद्देश आहे.

येथील एकूण लोकसंख्येपैकी सु. १७,९०० लोक कामगार असून त्यांतील काही शेजारच्या जिल्ह्यांतून, तर काही केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांतून आलेले आहेत. येथे १५ शाळा असून त्यांपैकी बारा नेयवेली लिग्नाईट कॉर्पोरेशनतर्फे, तर इंग्रजी माध्यमाची एक शाळा मिशनतर्फे चालविली जाते. कॉर्पोरेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या दवाखान्यात २८ डॉक्टर व २०० खाटांची सोय असून रुग्णांना मोफत औषध दिले जाते.

चौधरी, वसंत