नेफ्रोलेपिस : (इं. सोअर्ड फर्न कुल-पॉलिपोडिएसी). खऱ्या नेचांपैकी (फिलिकेलीझ) एका सामान्य वंशाचे नाव, ग्रीक भाषेत ‘नेफ्रॉस’ म्हणजे मूत्रपिंड आणि ‘लेपिस’ म्हणजे खवला (शल्क) या वंशात आढळणाऱ्या बीजुककोशांच्या (सूक्ष्म प्रजोत्पादक घटक धारण करणाऱ्या पिशव्यांच्या) पुंजावर मूत्रपिंडाकृती खवल्यासारखे आच्छादन (पुंजत्राण) आढळते त्यावरून ह्या वंशाला त्या अर्थाचे नाव दिले आहे. सु. ३० ओषधीय [→ ओषधि] जातींचा त्यात अंतर्भाव असून त्या स्थलवासी किंवा ⇨ अपिवनस्पती आहेत. त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधात आहे. बहुतेक सर्व जाती ओलसर जागी व सावलीत आढळतात. बागेत शोभेकरिता जमिनीवर, कुंड्यात किंवा लोंबत्या कुंड्यांत लावतात. अनेक जाती व प्रकार, विशेष रीतीने सावलीत वाढविण्यास विशिष्ट ‘नेचा-गृह’ बनवितात. यातच सिलाजिनेला, ॲरेसी व पामी कुलांतील व इतर काही जातीही वाढवितात. भारतात नेफ्रोलेपिसच्या सहा जाती आढळतात. सर्वच देशांत ह्या वंशातील चार जाती लोकप्रिय आहेत. त्यांपैकी नेफ्रोलेपिस एक्साल्टाटा ही महत्त्वाची जाती असून तिचे अनेक प्रकार व उपप्रकार उद्यानात लावण्यास सुलभ असतात. यांपैकी बहुतेक सर्व नेफ्रोलेपिस एक्साल्टाटा प्रकार बोस्टॉनिएन्सिस व तिचे उपप्रकार आहेत [→ नेचे]. व्यापारात त्यांना भिन्न जातिवाचक नावे दिली आहेत. सर्व जाती काटक असून धुमारे, ग्रंथिक्षोड (कंद), तिरश्चर (मुख्य खोडापासून आडव्या जमिनीसरपट वाढणाऱ्या फांद्या) इ. भागांचा उपयोग करून त्यांची अभिवृद्धी करता येते. बहुतेक सर्वच जातींत मूलक्षोड (जमिनीतील जाडजूड खोड) लहान, आखूड, उभट असून त्यावर वा त्यापासून निघणाऱ्या भिन्न प्रकारच्या फांद्यांवर आगंतुक मुळे येतात. पाने मोठी, अवसंवलित (टोकापासून तळाकडे गुंडाळलेली) संयुक्त व पिसासारखी असून देठ व पाते यांमध्ये सांधा नसतो मात्र दलांच्या तळाशी सांधा असतो. पानांचा झुबका हा ठळक व दर्शनीय भाग असणे हे या जातींचे वैशिष्ट्य आहे. दलातील बाजूच्या शिरा द्विशाखी व खालच्या पृष्ठभागांवर दोन्ही कडांनी बीजुककोशांचे पुंज असतात व त्यावर वर उल्लेख केल्याप्रमाणे पुंजत्राण असते. पुढे वर्णन केल्याप्रमाणे ने.एक्साल्टाटाची सामान्य लक्षणे थोड्याफार फरकांनी इतर जातींना लागू पडतात.

ने. एक्साल्टाटा ही जाती जंगली अवस्थेत वा बागेत लावलेली आढळते. मूलक्षोड तिरपे, लहान, अर्धवट जमिनीखाली असून कठीण व तपकिरी दिसते. त्यावर अनेक शल्ककेश (पातळ खवल्यासारखे केस), पडून गेलेल्या पानांचे किण (वण) व देठांचे अवशेष असतात. कोवळी पाने खोडाच्या टोकास व जून खाली असतात. जाड तारेप्रमाणे अनेक फांद्या (तिरश्चर) जमिनीसरपट वाढतात व त्यांवरच्या कळ्यांपासून नवीन पाने व मुळे फुटून अभिवृद्धी होते. आगंतुक मुळांचे झुबके या फांद्यांवरच येतात. ह्या फांद्या व पाने ह्यांवर शल्ककेश असतात. पाने संयुक्त ०·३ – ०·९ मी. X ७ – १५ सेंमी. व ५–८ दले ०·६ X १·२ सेंमी., भाल्यासारखी, काहीशी चिवट, दातेरी, टोकदार, तळाशी पालिवत (पाळेदार), दोन रांगांत, एकाआड एक आणि पर्णाक्षाशी सांधलेली असून प्रत्येक दलावर कडेने पांढऱ्या सूक्ष्म ठिपक्यांची ओळ असते.

आ.१. बीजुककोशाचा विकास : (१) बीजुककोश, (२) स्फोटकर वलय.

प्रजोत्पादन : जून झालेल्या प्रत्येक दलाच्या मागील बाजूस असलेल्या बहिर्गोल बीजुककोशांतून पक्वावस्थेत ते कोरड्या हवेत तडकल्यामुळे अनेक सूक्ष्म व सारखी बीजुके (सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) बाहेर पडतात. ओलसर जागी बीजुक रुजून एक लहान, पातळ, हिरव्या व हृदयाकृती पानांसारखी (०·८ सेंमी.) कायकाभ (ज्यांच्या शरीराचे मूळ, खोड यांमध्ये विभेदन झालेले नाही अशी) वनस्पती बनते, तिला गंतुकधारी (जननेंद्रिये धारण करणारी) म्हणतात. कारण तिच्यावर मागील बाजूस जननेंद्रिये (रेतुकाशये म्हणजे ज्यांत पुं-जनन पेशी निर्माण होतात ती इंद्रिये आणि अंदुककलश म्हणजे अचल स्त्री-जनन पेशी धारण करणारे कलशासारखे भाग) निर्माण होतात[→ नेचे वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग].

प्रत्येक बीजुककोश पानाच्या दलावर मागील बाजूस बीजुकाधानीच्या (बीजुके निर्माण करणाऱ्या उंचवट्यासारख्या भागाच्या) एका कोशिकेपासून (पेशीपासून) बनतो (लेप्टोस्पोरॅंजिएटी पद्धत) त्याचे आवरण कोशिकांच्या एका थराचे असते. बीजुककोशाचा देठ लांब (आ.१) असतो. त्यात प्रथम सोळा बीजुकजनक कोशिका असतात. त्या प्रत्येकीतील द्विगुणित प्रकलांची प्रथम न्यूनीकरण व नंतर समविभाजन पद्धतीने विभागणी होऊन [→ कोशिका] चौसष्ट एकगुणित बीजुके बनतात. बीजुककोशाच्या आवरणाच्या एका बाजूस विशिष्ट प्रकारे बनलेल्या जाड आवरणाच्या कोशिकांचे वलय (स्फोटकर वलय) बनते. हे वलय उभे व अपूर्ण असून (पॉलिपोडिएसी कुलातील सर्व जातींतल्याप्रमाणे) त्याने कोरड्या हवेत घडवून आणलेल्या स्फोटामुळे बीजुककोश आडव्या रेषेत तडकतो व सर्व बीजुके बाहेर फेकली जातात. एका पुंजातील सर्वच बीजुककोश एकाच वेळी पक्व होत नाहीत म्हणून याला ‘मिश्र पुंज’ म्हणतात.

आ.२. गंतुकधारीचा विकास : (१) बीजुक, (२) गंतुकधारी, (३) रेतुकाशय, (४) अंदुकाशय, (५) मूलकल्प.

वर सांगितल्याप्रमाणे योग्य तापमान व ओलावा मिळाल्यावर बीजुक रुजून एकगुणित गंतुकधारी आणि त्यावर तशीच बहुकोशिक जननेंद्रिये बनतात (आ. २). प्रत्येक जननेंद्रिय गंतुकधारीच्या अपित्वचेमधील (पाने व खोड यांच्या पृष्ठभागावरील आवरणासारख्या थरामधील) एका कोशिकेपासून बनते (आ. ३ व ४). ही कोशिका दोन भिन्न जननेंद्रियांबाबत भिन्न प्रकारे पण समविभाजनाने आडव्या, उभ्या किंवा तिरप्या पडद्यांनी विभागून अनेक कोशिका बनतात व त्यांमध्ये प्रभेदन (विशिष्ट कार्यासाठी रूपांतर होण्याची क्रिया) घडून येते. परिणामी दोन स्वतंत्र आणि भिन्न जनेंद्रिये (रेतुकाशये व अंदुककलश) निर्माण होतात.

आ. ३. रेतुकाशयाचा विकास : (१) रेतुकाशय, (२) रेतुक.

रेतुकाशय गोलसर व अंदुककलश काहीसा सुरईसारखा असून चररेतुके (चल पुं-जनन कोशिका) बहुकेसली व बत्तीस, पण अंदुक (अचल स्त्री-जनन कोशिका) एकच असते. अंदुककलशात याशिवाय अंदुकाजवळ औदरमार्ग कोशिका आणि पुढे ग्रीवामार्ग (मानेसारख्या मार्गातील) कोशिका असतात. अंदुककलश पक्व झाला म्हणजे त्यात फक्त अंदुक असते. गंतुकधारीच्या आसपास असलेल्या पाण्यातून रेतुके आपला मार्ग काढून अंदुकाशयातून वाहणाऱ्या रासायनिक द्रवामुळे अंदुकाकडे आकर्षित होतात. याला रसायनानुचलन [ → वनस्पतींचे चलनवलन] म्हणतात. रेतुकाचा अंदुकाशी संयोग होऊन द्विगुणित रंदुक बनते.

आ. ४. अन्दुककलशाचा विकास : (१) अपक्क अन्दुककलश, (२) अन्दुककोशिका, (३) औदरमार्ग कोशिका, (४) ग्रीवामार्ग कोशिका, (५) पक्क अन्दुककलश (फलनपूर्व अवस्था), (६) अंदुक, (७) रेतुके.

रंदुकाची पुनःपुन्हा विभागणी (समाविभाजन) ठराविक रित्या होते आणि शेवटी पद, आदिमूळ, दलिका, सूक्ष्म खोड इत्यादींनी युक्त असलेला (विकसित) गर्भ बनतो व त्यापासून लहान नेचाची वनस्पती (बीजुकधारी पिढी) वाढू लागते. याप्रमाणे एकगुणित गंतुकधारी पासून द्विगुणित बीजुकधारी आणि त्यापासून बीजुकाद्वारे पुन्हा गंतुकधारी, असे पिढ्यांचे एकांतरण होते [→ एकांतरण, पिढ्यांचे]. कधीकधी गंतुकांचा लोप होऊन गंतुकधारीपासून शाकीय पद्धतीने (फक्त खोड, पान किंवा मूळ यांसारख्या पोषणाशी संबंधित असलेल्या अवयवांपासून पुनरुत्पादन होण्याच्या पद्धतीने) बीजुकधारी व त्यापासून बीजुकाशिवाय प्रत्यक्ष गंतुकधारी निर्माण होतो, याला अनुक्रमे ‘अगंतुकजनन’ व ‘अबीजुकजनन’ म्हणतात. क्वचित फलन न होता अंदुकापासून गर्भ व बीजुकधारी बनतो, त्याला ‘अनिषेकजनन’ म्हणतात. या तिन्ही प्रकारांमुळे ‘एकगुणित बीजुकधारी’ व ‘द्विगुणित गंतुकधारी’ असे अनित्य प्रकार बनतात. तसेच यामुळे जीवनचक्र संक्षिप्त होते [→ आनुवंशिकी प्रजोत्पादन].

आ. ५. गर्भविकास : (१) रंदुक-विभाजन, (२) अविकसित गर्भ, (३) विकसित गर्भ, (४) सूक्ष्म खोड, (५) पद, (६) आदिमूळ, (७) दलिका.

शारीर : नेफ्रोलेपिसच्या मुळाची सर्वसाधारण अंर्तरचना [→ शारीर, वनस्पतींचे] इतर उच्च वनस्पतींच्या मुळांप्रमाणे असते पण येथे द्विसूत्र (दोन जुडगे) व बहिर्वर्धी प्रकाष्ठ (जलीय विद्राव वाहून नेणे व वनस्पतीला आधार देणे ही कार्ये करणारा कोशिका समूह बहिवर्धी म्हणजे आदिप्रकाष्ठाच्या अक्षाच्या मध्यापासून दूर असलेले) असते. वाहक वृंद (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणारे जुडगे) अरीय (त्रिज्येवर) आणि ⇨ परिरंभ व ⇨ अंतस्त्वचा यांनी पूर्णपणे वेढलेले असतात. मूलकेश सतत राहणारे आणि मूलाग्रावर फक्त एक विभाजी कोशिका असते. दलाच्या वरच्या अपित्वचेत त्वग्रंध्रे (त्वचेतील छिद्रे) नसतात. (आ.७).

आ.६. मुळाचा आडवा छेद : (१) अपित्वचा व मूलकेश, (२) मध्यत्वचा, (३) अंतस्त्वचा, (४) परिरंभ, (५) परिकाष्ठ, (६) प्रकाष्ठ.

आ.७. बीजुककोशपुंजातून जाणारा दलाचा आडवा छेद : (१) अपित्वचा, (२) मध्योतक, (३) त्वग्रंध्र, (४) वाहक वृंद, (५) पुंजत्राण, (६) बीजुककोश व त्याजवळ सुटी बीजुके.उपत्वचा (अपित्वचेच्या कोशिकांच्या बाहेरील भिंतीवरील जलरोधक मेणचट द्रव्याचा बाह्य थर) फार पातळ असते. दोन्ही कडांच्या आतील बाजूंस अनेक रूपांतरित अपित्वचा-कोशिकांपासून बनलेले जलप्रपिंड (पाण्याच्या ग्रंथी) असतात. त्यांतून स्त्रवणारे पाणी सुकून त्यात पूर्वी विरघळलेला चुना तेथे पांढऱ्या ठिपक्यांच्या स्वरूपात आढळतो, म्हणून ह्या प्रपिंडांना ‘चूर्णक प्रपिंड’ म्हणतात. मध्योतकातील [पानाच्या खालील व वरील आपित्वचेच्या मध्ये असणाऱ्या व मुख्यत्वे प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करणाऱ्या ऊतकातील → मध्योतक] सर्वच कोशिकांचे विरलोतक (स्पंजासारखा कोशिकासमूह) बनते आणि त्यात हरित्कण विपुल असतात. खालच्या अपित्वचेत त्वग्रंधे असतात. मध्यशिरेतील वाहक वृंदाभोवती अंतस्वतेचा असून प्रकाष्ठ एकमध्य व केंद्रवर्ती असते.

आ. ८. मूलक्षोडाचा आडवा छेद : (१) रंभ, (२) पर्णलेश

मूलक्षोडाच्या आडव्या क्षेदात अंतस्त्वचा व परिरंभ यांचा अभाव असून तीन ते सहा रंभस्वरूप वाहक वृंद असतात. (आ. ८), त्यांना रंभ- खंड म्हणतात. वाहत वृंदात ⇨ऊतककर नसतो. द्वितीयक वृद्धीही [→ शारीर, वनस्पतींचे] नसते. प्रकाष्ठात वाहिन्या नसतात तसेच परिकाष्ठात सहचरी कोशिका नसतात. तिरेश्चरात एकच मध्यवर्ती रंभ आणि तारकाकृती प्रकाष्ठ व त्याभोवती परिकाष्ठ असते. मध्यत्वचेच्या बाहेरच्या भागात दृढोतक (मऊ भागांना आधार आणि संरक्षण देणारा कोशिकासमूह) व आतील बाजूस ⇨ मृदूतक असते. खोडाच्या बाबतीत तळापासून टोकापर्यंत छेद घेऊन पाहिले असता वाहक तंत्र रंभाच्या विकासाच्या सर्व अवस्थांतून गेलेले आढळते. [आद्यरंभ ते जालरंभ → रंभ].

नेफ्रोलेपिस बायसेरॅटा(ने. क्यूटा) ह्या भारतात सामान्यपणे आढळणाऱ्या मोठ्या जातीचे मूलक्षोड न्यू गिनीत व कोवळा पाला जावामध्ये खातात. ने. कार्डफोलियाचे खोड सरळ, काही शाखा ग्रंथिल व पाने लांबट (०·६ मी). आणि चिवट असून ताज्या पानांचा काढा खोकल्यावर देतात. ही जाती भारतात सर्वत्र (१,५००) मी. उंचीपर्यंत) व अपिवनस्पतीसारखीही आढळते. दोन्ही जाती बागेत लावतात. नेफ्रोलिपिसची अनेक लक्षणे प्रागतिकता दर्शवितात म्हणून त्याचा अंतर्भाव पॉलिपोडिएसी या प्रगत कुलात केला जातो. चिंचेच्या पानासारख्या पानांमुळे या वनस्पतीस (ने. एक्साल्टाटा) ‘चिंच फर्न’ असे कोणी म्हणतात, तर ‘आपर्णांग नेचा’ असेही कोणी म्हणतात.

पहा : ऑफिओग्लॉसेलीझ नेचे वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग.

संदर्भ : 1. Blatter, E. D’ Almeida, J. F. R. Ferns of Bombay, Bombay, 1922.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.

           3. Eames, A. J. Morphology of Vascular Plants : Lower Groups, New York, 1964.

           4. Parandekar, S. A. Tare, N. B. Patil S. D. A Class Book of Botany, Poona, 1962.

परांडेकर, शं. आ.