नेपाळी भाषा : नेपाळी ही इंडो-यूरोपियन कुटुंबाच्या भारतीय गटातील एक नव-आर्यभाषा आहे. ती बिहार व उत्तर प्रदेश यांच्या उत्तरेला आणि तिबेटच्या दक्षिणेला पूर्वपश्चिम पसरलेल्या लांब अरुंद पट्‌ट्यात बोलली जाते. तिचे व्याप्तिक्षेत्र नेपाळ व नेपाळच्या दक्षिणेकडील काही भारतीय प्रदेश हे आहे. नेपाळातील जवळजवळ ७० टक्के लोकांची ती मातृभाषा असून इतर १५–२० टक्के लोकही ती समजू व बोलू शकतात.

खुद्द नेपाळी लोक आपल्या भाषेला खसकुरा (खस जमातीची भाषा) किंवा गोरखाली (गोरख्यांची भाषा) म्हणतात. नेपाळी हे नाव भौगोलिक असून ते पाश्चात्त्यांनी दिलेले आहे. याशिवाय पर्बतिया व पहाडी (डोंगरी) या नावानीही ती ओळखली जाते.

सोळाव्या शतकात मुसलमानांच्या जुलमाला कंटाळून बाहेर पडलेल्या रजपुतांनी शस्त्रबळाच्या जोरावर अठराव्या शतकाच्या मध्याला नेपाळमधील राजसत्ता स्थापन केली. या लोकांची भाषिक परंपरा म्हणजेच नेपाळी होय, असे मानले जाते. नेपाळी भाषेचे एकंदर स्वरूप पाहिले असता हे मत खरे वाटते.

वास्तविक नेपाळचे मूळ रहिवासी आर्यवंशीय किंवा आर्यभाषिक नाहीत. ते खस जमातीचे असून ही जमात पूर्वेकडून हिमालयाच्या पायथ्या पायथ्याने नेपाळात आली.

प्राचीन भारतीय साहित्यात नेपाळसंबंधी उल्लेख सापडतात. कौटिलीय अर्थशास्त्रात ‘नेपालिकम्‌’ हा शब्द आला असून त्याचा अर्थ ‘एका विशिष्ट जातीच्या मेंढ्याच्या लोकरीपासून बनवलेले पांघरूण’ असा आहे.

भारतात ही भाषा बोलणारे लोक दहा लाखांहून अधिक असून त्यातील सर्वांत अधिक अनुक्रमे पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि महाराष्ट्र या राज्यांत आहेत.

ध्वनिविचार : नेपाळची वर्णव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे:

स्वर : अ आ इ उ ए ओ (शुद्ध व अनुनासिक) 

व्यंजने : स्फोटक –क, ख, ग, घ

ट, ठ, ड, ढ

त, थ, द, ध 

प, फ, ब, भ

अर्धस्फोटक – च, छ, ज, झ (तालव्य)

अनुनासिक – ङ, न, म

अर्धस्वर – य, व 

कंपक – र

पार्श्विक – ल

घर्षक – स, ह

लिपी : नेपाळी भाषा नागरी लिपीचा वापर करते. तिच्यातील सर्व स्वरचिन्हे, लृ हे चिन्ह सोडल्यास नागरी अक्षरमालेसारखीच आहेत. व्यंजनचिन्हेही क पासून ह पर्यंत नागरीच आहेत. त्यांतील ञ, ण, श व ष ही चिन्हे वर्णमालेत ते ध्वनी नसल्यामुळे अनावश्यक आहेत.

व्याकरण : एकंदर व्याकरण बहुतांश नव-आर्यभाषांसारखे असून त्यातही ते हिंदीला अधिक जवळचे दिसते.

नामात पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे भेद असून वचने दोन आहेत. विभक्त्या पाच आहेत : प्रथमा, द्वितीया, तृतीया, षष्ठी आणि सप्तमी. ‘भाइ’ या नामाची रूपावली पुढीलप्रमाणे :

 

एकवचन 

अनेकवचन 

प्रथमा 

भाइ 

भाइहरु 

द्वितीया 

भाइलाइ 

भाइहरुलाइ 

तृतीया 

भाइले 

भाइहरुले 

षष्ठी 

भाइको 

भाइहरुको 

सप्तमी 

भाइमा 

भाइहरुमा 

सर्वनामे पुढीलप्रमाणे :

 

एकवचन 

अनेकवचन 

प्र. पु. 

म 

हामी 

द्वि. पु. 

ता 

तिमी, तपाई 

तृ. पु. 

यो 

यिमिहरु 

 

त्यो 

तिनीहेरु 

 

उ 

उनीहरु 


क्रियापददर्शक प्रत्यय नु हा आहे. तो मराठी णेप्रमाणे धातूला लागतो गर = ‘कर’ – – – गर्नु = ‘करणे’. छ = ‘अस’- – – या धातूंची रूपे अशी :

 

एकवचन 

नकारवाचक 

प्र. पु. 

मछु

छय्‌न 

द्वि. पु. 

ता छस 

छय्‌नस 

तृ. पु. 

त्यो छ 

छय्‌न 

 

अनेकवचन 

नकारवाचक

प्र. पु. 

हामी छंव

छयनंव 

द्वि. पु. 

तिमी छव 

छयनव 

तृ. पु. 

तिनीहरु छम् 

छयनन 

 बसनु = ‘बसणे’ या क्रियापदाची रूपे :

वर्तमान

होकारवाचक 

नकारवाचक 

बस्छु

बस्तिनं 

बस्छस 

बस्तय्‌नस 

बस्छ 

बस्तय्‌न 

बस्छवं

बस्तय्‌नंव

बच्छव

बस्तय्‌नव

बस्छन

बस्तय्‌नन

भूत

बसें 

बसिनं 

बसिस

बसिनस 

बस्यो 

बसेन 

बस्यंव 

बसेनंव 

बस्यव

बसेनव

बसे

बसेनन

 काही वाक्ये –

तिम्रा नाम के हो ?    ‘तुमचं नाव काय आहे ?’

मेरो नाम प्रकाशमान मूल हो.     ‘माझं नाव प्रकाशमान मूल आहे.’

उहां के काम गुर्न हुछ ?       ‘ते काय काम करतात ?’

तिम्रो घरमा अरु को को छन ?      ‘तुमच्या घरी आणखी कोण कोण आहे ?’

हिजो म बिरामी थिएं.      ‘काल मी आजारी होतो’.

अब तिमीलाइ कस्तो छ ?        ‘आता तुम्हाला कसं आहे ?’

मलाइ अहिल्ये स्टेशन जानुछ.       ‘मला आत्ताच्या आत्ता स्टेशनवर जायचं आहे.’

अहिले प्रशस्त समय बाकि छ.      ‘अजून भरपूर वेळ शिल्लक आहे.’

हुंछ त, केही वेर बाटो हेरो.      ‘ठीक आहे, काही वेळ वाट पाहू.’

अब हामी पर्खन सक्तैन नौ.      ‘आता आम्ही वाट पाहू  शकत नाही.’

नेपाळीचा अभ्यास : ब्रिटिशांच्या सैन्यात गुरखा सैनिकांची भरती मोठ्या प्रमाणावर दोनशेपेक्षा अधिक वर्षे चालू होती. या निमित्ताने अनेक व्याकरणे, पुस्तके व शब्दकोश तयार झाले. भारतीय आर्यभाषांना तौलानिक दृष्टीने उपयोगी पडणारा सर राल्फ टर्नर यांचा नेपाळी कोश यातूनच जन्माला आला.

संदर्भ : 1. Clark, T. W. Introduction to Nepali, Cambridge, 1963.

            2. Dasgupta Karmacharya, Nepali Self-taught, Calcutta, 1964.

            3. Srivastava, D. Nepali Language, Its History and Development, 1962.

 

कालेलकर, ना. गो.