निष्कर्षण : घन अथवा द्रव पदार्थाबरोबर मिश्रणाच्या रूपात असलेला पदार्थ वेगळा करण्याची एक प्रक्रिया. या प्रक्रियेत वेगळा करावयाचा पदार्थ किंवा त्यापासून रासायनिक विक्रियेने बनविलेले विद्राव्य (विरघळणारे) संयुग विद्रावाच्या रूपात अलग केले जाते. नंतर तो पदार्थ हवा असेल, तर त्याच्या विद्रावापासून स्फटिकीकरणाने (ज्यात जास्त पदार्थ विरघळणार नाही असा विद्राव बनवून व त्याचे तापमान कमी करून वेगळे झालेले स्फटिक काढून घेणे) किंवा ऊर्ध्वपातनाने (विद्राव बंद पात्रात तापवून त्यातील विद्रावक–विरघळविणारा पदार्थ–किंवा विरघळलेला पदार्थ बाष्परूपाने बाहेर काढणे) व संयुगाच्या रूपात विद्रावात असेल, तर त्या संयुगाचे विघटन (घटक वेगळे करणे) करून इष्ट पदार्थ मिळविता येतो. उदा., कॅलिचेनामक नैसर्गिक खनिज मिश्रणात (चिलीतील नायट्रेट निक्षेपात–खनिज साठ्यात) असलेले सोडियम नायट्रेट पाण्यात विरघळवून वेगळे करतात. सोने मिळविण्याच्या सायनाइड पद्धतीत खनिजावर पोटॅशियम सायनाइडाच्या जलिय विद्रावाची विक्रिया घडवितात. त्यामुळे सोन्याचे पोटॅशियम सायनाइडाबरोबर एक जटिल संयुग बनते ते पाण्यात विरघळणारे असल्यामुळे विद्रावरूपाने वेगळे होते. जटिलाचे विघटन केले म्हणजे सोने मिळते [⟶ जलिय धातुविज्ञान].
निष्कर्षण करावयाचे मिश्रण घनरूप असेल, तर या प्रक्रियेस घनद्रव निष्कर्षण व द्रवरूप असेल, तर द्रव–द्रव निष्कर्षण किंवा विद्रावक निष्कर्षण असे म्हणतात. ही प्रक्रिया पूर्वीपासून अनेक क्षेत्रांत वापरण्यात असल्यामुळे ती वेगवेगळ्या नावांनीही ओळखली जाते. उदा., अपक्षालन (लीचिंग), प्रक्षालन (वॉशिंग), निवळी काढणे (डिकॅंटेशन), परिगलन (परकोलेशन), भिजवण (मॅसरेशन), विद्रावण (डिझोल्यूशन). परंतु यातील मूलभूत तत्त्व एकच आहे. नेहमीच्या वातावरणीय दाबास किंवा त्यापेक्षा कमी दाबास केलेले ऊर्ध्वपातन जेव्हा पदार्थ वेगळा करण्यासाठी वापरता येत नाही अशा ठिकाणी ही प्रक्रिया फार उपयोगी पडते.
विद्रावक व प्रक्रिया परिस्थिती : विद्राव बनविण्यासाठी पाणी, कार्बनी विद्रावके, तसेच हायड्रोक्लोरिक व सल्फ्यूरिक अम्ले, दाहक (कॉस्टिक) सोडा, सोडियम कार्बोनेट, अमोनिया, पोटॅशियम सायनाइड इत्यादींचे जलीय विद्राव वापरले जातात.
सामान्यतः निष्कर्षण नेहमीच्या तापमानास व वातावरणीय दाबास घडवून आणतात परंतु कित्येक ठिकाणी उच्च तापमान व वातावरणापेक्षा उच्च दाब यांचाही वापर केला जातो [⟶ जलीय धातुविज्ञान].
प्रयोगशाळेतील लहान प्रमाणावर केली जाणारी द्रव–द्रव निष्कर्षणे पृथक्कारी नसराळ्याच्या (द्रवांचे, एकावर दुसरा असे असलेले थर वेगळे करण्याची योजना असलेल्या उपकरणाच्या) साहाय्याने करतात. निष्कर्षण करावयाचे मिश्रण नसराळ्यात घेऊन त्यात योग्य तो विद्रावक (सामान्यतः ईथर अथवा अन्य कार्बनी विद्रावक) मिसळतात व बूच लावून मिश्रण हालवितात. त्यामुळे मिश्रण व विद्रावक यांचा निकट संपर्क घडतो आणि विद्राव्य पदार्थ विद्रावकात निष्कर्षित होऊन त्याचा विद्राव बनतो. त्यानंतर नसराळे उभ्या स्थितीत काही वेळ निवांत ठेवतात. त्यामुळे विद्राव व निष्कर्षण होऊन उरलेले मिश्रण यांचे भिन्न थर बनतात आणि ते नसराळ्याला असलेल्या तोटीमुळे सुलभतेने वेगळे काढता येतात. वेगळ्या काढलेल्या विद्रावाला चिटकून आलेले निष्कर्षित मिश्रण पाण्याने किंवा अन्य विद्रावकाने, याच उपकरणात घालून, धुवून काढतात व शुद्ध विद्रावापासून इष्ट पदार्थ उर्ध्वपातनाने अथवा अन्य प्रक्रियेने मिळवितात. साध्या सोप्या मिश्रणाच्या निष्कर्षणासाठी वापरावयाच्या कृतीचे हे ढोबळ वर्णन आहे. त्यात प्रसंगविशेषी योग्य ते बदल करावे लागतात.
घन–द्रव निष्कर्षणासाठी प्रयोगशाळेत सॉक्सलेट निष्कर्षण संच नावाचे उपकरण वापरतात (आ. २). यामध्ये तीन भाग असतात. सर्वांत खालचा भाग म्हणजे एक चंबू असून त्यात प्रथम विद्रावक भरलेला असतो. चंबूच्या वर व त्याच्या तोंडात बसविलेला एक नळकांड्यासारखा भाग असतो. त्यामध्ये निष्कर्षण करावयाचे मिश्रण, गाळण कागदाच्या टोपणात भरून ठेवतात. या भागाला दोन नळ्या जोडलेल्या असतात. एकीने चंबूतील विद्रावकाची वाफ यात प्रवेश करते. दुसऱ्या नळीच्या योगाने यात बनणारा विद्राव ठराविक मर्यादेइतका वाढला की, वक्रनलिका तत्त्वाने सर्वच्या सर्व खालच्या चंबूत निघून जातो. तिसरा भाग म्हणजे पश्ववाही संघनित्र (वाफ थंड करून त्याचा द्रव बनविणे व तो परत निघालेल्या ठिकाणाकडे वाहू लागेल अशी योजना) असते. चंबू तापकावर राहील अशा तऱ्हेने उपकरण उभे ठेवून वापरतात. विद्रावक उकळू लागला म्हणजे त्याची वाफ दुसऱ्या भागातून वर संघनित्रात शिरते. तेथे द्रवरूप बनून विद्रावक गाळण कागदाच्या टोपणातील मिश्रणावर पडतो व त्याचे निष्कर्षण घडवितो. निष्कर्ष वक्रनलिकेच्या माथ्यापर्यंत साठला म्हणजे चंबूत जमा होतो व पुन्हा हीच क्रिया सुरू होते. त्यामुळे संहत (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण उच्च असलेला) निष्कर्ष मिळतो.
मोठ्या प्रमाणावर करावयाच्या निष्कर्षणासाठी (१) मिश्रणाचा विद्रावकाशी यथायोग्य प्रकारे संपर्क घडवून आणणे व (२) तयार झालेला निष्कर्ष मिश्रणापासून वेगळा काढणे, या दोन टप्प्यांनी प्रक्रिया करावी लागते.
घन-द्रव निष्कर्षण : घनरूप मिश्रणांचे दोन प्रकार आढळतात: (१) भरड पोत असलेली व (२) घट्ट पोताची.
भरड पोताच्या मिश्रणांचे निष्कर्षण : भरड पोताच्या मिश्रणात विद्रावक सुकरतेने प्रवेश करून विद्राव्य पदार्थाचा विद्राव करू शकतो. अशा मिश्रणाच्या निष्कर्षणासाठी उपयोगी पडणारे साधे उपकरण म्हणजे एक प्रकारची टाकी होय. अशा टाकीच्या खालच्या भागात, तळापासून काही अंतरावर भोके असलेला एक आभासी तळ (खोटा तळ) असतो. त्यावर आवश्यक असेल, तर गाळण कापड बसविता येते. त्यामुळे त्याच्या खाली जमणाऱ्या विद्रावात मिश्रण जात नाही. हा विद्राव काढून घेता येईल अशी योजना असते. निष्कर्षण पूर्ण झाल्यावर उरलेला चोथा काढून टाकण्यासाठी टाकीच्या बाजूला द्वार ठेवलेले असते. निष्कर्षण करताना ते बंद असते.
निष्कर्षण करावयाचे मिश्रण आभासी तळावर राहील अशा तऱ्हेने भरल्यावर त्यावर वरून विद्रावक सोडतात. तो मिश्रणातून झिरपतो व त्याच वेळी विद्राव्य बनवितो. विद्राव्य पदार्थ जास्तीत जास्त निष्कर्षित व्हावा म्हणून विद्रावक टाकीत भरल्यावर आवश्यकतेप्रमाणे टाकी काही काळ तशीच राहू देतात. त्यानंतर निष्कर्ष तळातून काढून घेतात. काही ठिकाणी ही क्रिया अनेकदा करावी लागते. निष्कर्षणानंतर चोथा काढून टाकून टाकी पुन्हा निष्कर्षण करण्यासाठी सिद्ध करतात.
या कृतीने मिळणारा विद्राव विरल (विद्राव्य पदार्थाचे प्रमाण थोडे असलेला) असतो. त्यामुळे विद्राव्य पदार्थ मिळविण्याच्या दृष्टीने ते गैरसोयीचे असते. संहत विद्राव मिळविण्यासाठी प्रतिप्रवाह पद्धत वापरतात. या पद्धतीत टाक्यांची एक मालिका लागते. टाक्यांची संख्या आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त होते. या पद्धतीची कल्पना पुढील वर्णनावरून येईल.
तीन टाक्या घेऊन त्यांना क्रमांक द्यावेत. क्र. १ या टाकीत अगोदरच दोनदा निष्कर्षण झालेले मिश्रण व विद्रावक, क्र. २ च्या टाकीत एकदा निष्कर्षण झालेले मिश्रण व विद्रावक आणि क्र. ३ च्या टाकीत निष्कर्षण मुळीच न झालेले मिश्रणच फक्त भरून सुरुवात करावी व पुढील टप्प्यांनी निष्कर्षण घडवावे (आ. ३).
साठविलेले विद्राव (क), (ख) व (ग) एकत्र करावे आणि विरघळलेला पदार्थ मिळविण्यासाठी वापरावेत.
प्रतिप्रवाह निष्कर्षण पद्धतीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरा विद्रावक प्रथम अगोदरच बरेचसे निष्कर्षण झालेल्या मिश्रणात सोडला जातो व विरल विद्राव पुन:पुन्हा निष्कर्षण करण्यासाठी वापरले जातात.
टप्पा (अ) :
टाकी (२) मधील विद्राव काढून तो टाकी (३) मध्ये भरावा टाकी (१) मधील विद्राव काढून तो टाकी (२) मध्ये घ्यावा. टाकी (१) मध्ये विद्रावक घालावा.
टप्पा (आ) :
टप्पा (इ) :
वरील पद्धतीत निष्कर्षण करावयाचे मिश्रण एकाच जागी असून विद्रावक त्यावरून वाहतो परंतु मिश्रणाचा थरही स्थलांतर करील व त्यावरून विद्रावक प्रवाहित होईल अशा तऱ्हेच्या यांत्रिक योजनाही उपलब्ध आहेत. बोलमन निष्कर्षण उपकरण अशांपैकी एक आहे (आ. ४).
या उपकरणात तळाला छिद्रे असलेली अनेक तसराळी असून ती रहाटगाडग्याप्रमाणे आणि सव्य दिशेने (घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने) फिरतील अशी योजना असते. उपकरणाचे दोन भाग असतात. उजवीकडच्या भागात अ येथे एक द्वार असून त्यातून मिश्रण तसराळ्यात सोडले जाते. त्यानंतर तसराळे जेव्हा आ या ठिकाणी येते तेव्हा त्यावर विद्रावक पडतो. हा विद्रावक कोरा नसतो, तर अगोदरचा विरल विद्राव असतो. तसराळ्यातील मिश्रणातील विद्राव्य अंश त्यात विरघळतो व बनलेला विद्राव तळाच्या छिद्रातून खालच्या तसराळ्यात मिश्रणावर पडतो व त्यानंतर त्यामधून त्या खालच्या तसराळ्यात पडतो. याच वेळी वरच्या तसराळ्यातील विद्राव त्यावर पडत असतो. त्यामुळे अखेर तसराळे जेव्हा इ या ठिकाणी येते तेव्हा त्यातील मिश्रणाचे निष्कर्षण पुष्कळसे झालेले असते. हे संहत विद्राव तळातील ई या भागात जमतात व साठविले जातात. त्यानंतर तसराळे उ या ठिकाणी येते तेव्हा त्यावर कोरा विद्रावक सोडला जातो. त्यामुळे मिश्रणात उरलेला विद्राव्य पदार्थाचा अंश निष्कर्षित होतो व त्यापासून बनणारा विरल विद्राव तळभागातील ऊ या ठिकाणी जमतो. तेथून तो पंपाने आ या ठिकाणी वापरण्यासाठी आणला जातो. तसराळे अखेरीस ए या ठिकाणी आल्यावर तिरपे होऊन मिश्रणाचा चोथा बाहेर पडतो. या उपकरणाच्या साहाय्याने निष्कर्षण अखंडपणे करता येते.
घट्ट पोताच्या मिश्रणांचे निष्कर्षण : अशी मिश्रणे बहुधा वनस्पतीमध्ये असतात. विद्राव्य घटक कोशिकांच्या (पेशींच्या) आत असतो. मिश्रणाचे चूर्ण केले, तरी सर्व कोशिकाभित्तींचा भंग होत नाही. त्यामुळे अंतर्भागात प्रवेश करून पदार्थ विद्रावरूपात आणणे सोपे नसते. अशा तऱ्हेच्या मिश्रणांचे निष्कर्षण कसे करतात हे बीट कंदापासून साखरेचा विद्राव बनविण्याच्या कृतीच्या उदाहरणाने दाखविता येईल. यासाठी विशेष प्रकारचे उपकरण (आ. ५) वापरावे लागते. याची रचना प्रतिप्रवाहाच्या तत्त्वावर केलेली असते. विद्रावक (पाणी) वापरताना दाब निर्माण होईल व तो मिश्रणातून रेटला जाईल अशी आणि साखर विरघळण्याचे प्रमाण वाढावे म्हणून विद्रावक गरम करता येईल अशी व्यवस्था असते.
ह्या उपकरणातील निष्कर्षणपात्रे बंद असतात. त्यामुळे त्यांतून पाण्याचा प्रवाह वाहताना दाब निर्माण होतो. अशी अनेक पात्रे एकापुढे एक जोडलेली असतात व त्यामधून पहिल्यातून दुसऱ्यात याप्रमाणे क्रमाने पाणी अथवा विद्राव आत सोडता येईल किंवा बाहेर काढता येईल अशी योजना असते. पात्रात भरण्यापूर्वी कंदांचे लांब व एका टोकास निमुळते असे इंग्रजी V या अक्षरासारखे तुकडे करतात. त्यामुळे निष्कर्षण क्रिया सोपी होते. आकृतीत दाखविलेल्या (१) या पात्रात अगोदरच ज्यामधील साखरेचे बरेचसे निष्कर्षण झालेले आहे असे तुकडे भरतात. (२) या पात्रातील तुकड्यांमधील साखरेचे निष्कर्षण पात्र (१) मधील तुकड्यांइतके
झालेले नसते व (३) या पात्रामधील तुकड्यांचे मुळीच झालेले नसते. निष्कर्षण क्रिया सुरू करताना ऊन पाणी पात्र (१) मध्ये अ येथून आत येते. त्याचा पात्रातील तुकड्यांशी संपर्क होतो व नंतर बनलेला विद्राव आ या मार्गाने बाहेर पडतो व पात्र (२) मध्ये इ येथून शिरून व तेथील तुकड्यांवरून वाहतो. तेथून तो ई या मार्गाने (४) या पाणी तापविण्याच्या योजनेत प्रवेश करतो आणि नंतर उ येथून पात्र (३) मध्ये शिरतो. पात्र (३) मध्ये
पाण्याचा मार्ग अशा तऱ्हेने बदलण्याचे कारण पात्र (३) मधील तुकड्यांमध्ये हवा कोंडलेली असते व ती बाहेर काढणे आवश्यक असते. त्याकरिता येथे व्यवस्था असते. शिवाय पाण्याची उष्णता निष्कर्षण पूर्ण होईपर्यंत टिकावी म्हणून या ठिकाणी (४) या तापविण्याच्या योजनेने ते तापवून घ्यावे लागते. अशा तऱ्हेने पात्रे भरल्यानंतर लवकरच प्रवाह मार्गातील झडपांची स्थिती आ. ६ मध्ये दाखविल्याप्रमाणे बदलतात. त्यामुळे पात्र (३) मधील विद्राव आ. ६ मध्ये बाणाने दाखविलेल्या दिशेने ऊ येथून बाहेर पडतो. तो पुढील प्रक्रियेकरिता साठवितात. पात्र (१) मधील तुकड्यांचे संपूर्ण निष्कर्षण होईपर्यंत वरील क्रिया चालू ठेवतात. त्यानंतर आणखी एका पात्राचा योजनेत समावेश करतात. ते पात्र क्र. ४ चे हाईल. पात्र (१) मधील तुकडे काढून टाकून ते मोकळे करतात. आता पात्र (२) पासून सुरुवात वरीलप्रमाणेच कृती करतात. बीटच्या कंदांपासून साखरेचा विद्राव मिळविण्यासाठी अशा प्रकारची १० ते १५ पात्रे वापरावी लागतात.
एखादे मिश्रण चूर्णरूप करून विद्रावकाबरोबर ढवळीत ठेवले असता तरंगत राहणारे व ढवळणे थांबविल्यावर तळाशी बसणारे असेल, तर त्यांच्या निष्कर्षणासाठी ढवळण्याची यांत्रिक योजना असलेल्या टाक्या वापरतात. त्यांमध्ये मिश्रण भरून आणि विद्रावक घालून इष्ट काल ढवळतात व नंतर विद्राव संथ राहू देतात. विद्राव निवळीच्या रूपात वर राहतो तो काढून घेतात. निष्कर्षण झालेले मिश्रण तळाशी बसते. त्याला विद्रावांचा काही अंश चिकटलेला असतो. तो काढून घेण्यासाठी पुन्हा विद्रावक मिसळून वरील क्रियेची पुनरावृत्ती केली म्हणजे कार्यभाग साधतो. निष्कर्षण झालेले मिश्रण पूर्णपणे वेगळे होत नसेल, तर विद्राव गाळावा लागतो. त्यासाठीही अनेक योजना उपलब्ध आहेत.
द्रव–द्रव निष्कर्षण : (विद्रावक निष्कर्षण). एका द्रवात मिश्र असलेला पदार्थ दुसऱ्या द्रवाने विरघळून काढून घेण्याच्या प्रक्रियेला ही संज्ञा लावतात. निष्कर्षणासाठी वापरावयाचा विद्रावक मूळ द्रवात न विरघळणारा वा अत्यंत अल्प प्रमाणात विरघळणारा असावा लागतो.
या निष्कर्षण प्रकाराचेही घन-द्रव निष्कर्षणाप्रमाणेच दोन टप्पे असतात : (१) द्रव मिश्रणाचा विद्रावकाशी योग्य प्रकारे संपर्क घडविणे आणि (२) निष्कर्षणानंतर विद्राव व शेष-द्रव (निष्कर्षण झाल्यानंतर राहिलेले मिश्रण) हे वेगळे करणे. त्यानंतर विद्रावातील विद्रावक पुन्हा वापरण्यासाठी परत मिळविला जातो.
द्रव मिश्रणात असलेला पदार्थ बाष्पनशील (वाफ होणारा) नसेल किंवा त्याची व मिश्रणाची बाष्पनशीलता सारखीच असेल अगर तो पदार्थ उष्णतेने बिघडणारा असेल किंवा अल्प प्रमाणात उपस्थित असेल, तर या प्रक्रियेचा उपयोग तो मिळविण्यासाठी होतो.
उपकरणे : या प्रक्रियेसाठी ढवळण्याची यांत्रिक योजना असलेल्या टाक्या वापरल्या जातात. त्यांमध्ये मिश्रण व विद्रावक भरून चांगले ढवळतात आणि नंतर ढवळणे थांबवून टाकी काही काळ संथ राहू देतात. त्यामुळे विद्राव आणि शेष-द्रव यांचे थर वेगळे होतात. तळातून ते काढून घेता यावे व त्या वेळी एक थर संपून दुसरा केव्हा सुरू होतो हे कळावे यासाठी एकदाच ही क्रिया करून निष्कर्षण पूर्ण होत नाही तेथे ती अनेकदा करून आणि तसेच प्रतिप्रवाह पद्धत वापरून कार्यभाग साधता येतो.
विद्रावक आणि द्रव मिश्रण यांच्या घनतेत फरक असला म्हणजे निष्कर्षणानंतर विद्राव व शेष-द्रव यांच्या थरांची सीमा लवकर व स्पष्ट दृष्टिगोचर होते परंतु त्यांचे पायस (दोन द्रव एकमेकांत मिसळून बनलेले दुधासारखे मिश्रण) बनत असेल, तर ते नाहीसे व्हावे म्हणून ते जाळीतून किंवा काचतंतूंच्या जाड थरातून जाऊ देतात. त्यामुळे विद्राव व शेष-द्रव वेगळे होतात. पायस स्थिर असेल, तर केंद्रोत्सारण यंत्राचा [⟶ केंद्रोत्सारण] उपयोग करून त्याचे घटक वेगळे करावे लागतात.
प्रतिप्रवाहाच्या तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी विशेष रचनेचे मनोरे वापरले जातात. या रचनांमुळे मिश्रण आणि विद्रावक यांचा निकटचा संपर्क होणे साध्य होते. मनोऱ्यांचे काही प्रकार पुढे दिले आहेत.
फवाऱ्याचा मनोरा : अशा मनोऱ्याच्या तळभागातून हलका द्रव (मिश्रण अथवा विद्रावक यांपैकी जो हलका असेल तो) फवाऱ्याने सूक्ष्म बिंदुरूपात आणून आत सोडला जातो. मनोऱ्याच्या माथ्यातून जड द्रवाचा अखंड प्रवाह खाली येत असतो. मनोऱ्यात त्यांचा एकमेकांशी संपर्क होतो व हलक्या द्रवाचे बिंदू वरच्या भागात एकत्र येऊन साठतात. जड द्रव तळ भागात जमतो.
याच्या उलट रचना करून जड द्रव फवाऱ्यातून वरच्या भागातून खाली पडेल व हलका द्रव खालून वर चढविला जाईल अशी व्यवस्था करता येते. यानंतर विद्राव व शेष द्रव वेगवेगळे साठवितात.
अडथळ्याचा मनोरा : या तऱ्हेच्या मनोऱ्यामध्ये द्रवाच्या प्रवाहाला जागोजाग अडथळा आणतील अशा आडव्या पट्ट्या बसविलेल्या असतात. जड द्रव मनोऱ्याच्या माथ्यातून खाली सोडला म्हणजे या पट्ट्यांवरून खाली खाली वाहतो. हलका द्रव मनोऱ्याच्या तळातून निघून पट्ट्यांच्या खालून वर चढत जातो. जड द्रव पट्ट्यांवर साचतो व तो पट्ट्यांच्या कडांवरून खाली वहात जात असताना हलक्या द्रवातून जातो आणि त्याच वेळी त्यांचे मिश्रण होते. या योजनेमुळेही विद्रावक व मिश्रण यांचा संपर्क चांगल्या प्रकारे घडून येतो.
उपयोग : निओबियम व टँटॅलम या धातू खनिजात एकत्र आढळतात. त्या वेगळ्या करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या एका पद्धतीत, जलीय विद्रावात त्यांचे आयन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) असताना, विशिष्ट संहतीत हायड्रोक्लोरिक व हायड्रोफ्ल्युओरिक अम्ले घालून मिथिल आयसोब्युटिल कीटोन या कार्बनी विद्रावकाने त्या जलीय विद्रावाचे निष्कर्षण करतात. टँटॅलम कार्बनी विद्रावकात जाते आणि निओबियम जलीय विद्रावात राहते. त्यानंतर कार्बनी विद्रावाचे पाण्याने निष्कर्षण केले, तर टँटॅलम जलीय विद्रावात जाते व त्यापासून अलग करता येते.
कनिष्ठ दर्जाच्या खनिजापासून युरेनियम मिळविण्यासाठी अशाच एका प्रक्रियेचा उपयोग करतात. युरेनियम नायट्रेट असलेल्या जलीय विद्रावाचे मिथिल आयसोब्युटिल कीटोन किंवा ट्रायब्युटिल फॉस्फेटाने निष्कर्षण म्हणजे युरेनियम कार्बनी विद्रावकात जाते. नंतर त्या विद्रावाचे पाण्याने निष्कर्षण केले म्हणजे युरेनियम पाण्यात उतरते आणि त्या विद्रावापासून शुद्ध रूपात मिळविता येते.
खनिज तेलाच्या परिष्करणातील एडेलेन्यू या प्रक्रियेत द्रवरूप सल्फर डाय-ऑक्साइड विद्रावक वापरून अशुद्ध तेलातील गंधकाची संयुगे, अस्फाल्टिने इ. पदार्थ वेगळे केले जातात.
वनस्पतिज तेलातील असंतृप्त (ज्यामध्ये द्विबंध किंवा त्रिबंध आहेत असे) घटक फुरफुराल विद्रावक वापरून निष्कर्षणाने काढून टाकतात.
अनेक औषध, सुगंधी पदार्थ, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) द्रव्ये यांच्या निर्मितीत व संश्लेषण (घटक द्रव्ये एकत्र आणून कृत्रिम रीतीने तयार करण्याच्या) क्रियांत निष्कर्षण प्रक्रिया फार आवश्यक असते.
पहा : बाष्पनशील तेले.
संदर्भ : 1. Brown, G. G. and associates, Unit Operations, London, 1962.
दीक्षित, व. चिं. केळकर, गो. रा.
“