निरंतर शिक्षण : शिक्षणशास्त्रातील एक आधुनिक कल्पना. औपचारिक शिक्षणव्यवस्थेच्या प्रचलित स्वरूपात विशिष्ट वयोगटांसाठी, ठराविक जागी, ठराविक वेळी, ठराविक अभ्यासक्रम शिकविण्याची सोय असते. तथापि व्यक्तिगत विकास व सामाजिक उन्नती ही जी शिक्षणाची सर्वसामान्य उद्दिष्टे आहेत, त्यांची प्रक्रिया ही निरंतर चालू असते. ह्या निरंतर प्रक्रियेशी संगती राखण्यासाठी शिक्षणव्यवस्था हीदेखील निरंतर असावी, असा शिक्षणशास्त्रातील नवा विचार आहे. अर्थात निरंतर शिक्षणाची ही कल्पना एका अर्थाने फार नवीन नाही. प्राचीन काळी राजदरबारी पंडित, राजगुरू, त्याचप्रमाणे पुढे विकसित झालेली गुरुसंस्था इ. निरंतर शिक्षणदानाचे कार्य करीत असल्याचे दिसते. नव्याने निर्माण होणारे व्यक्तिगत-सामाजिक प्रश्न आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे विषय पारंपरिक धर्मसंस्थेकडून हाताळण्यात येत असत. तथापि आधुनिक काळात वैज्ञानिक-तांत्रिक प्रगतीमुळे तसेच सामाजिक शास्त्रांच्या विकासामुळे समाजाच्या व व्यक्तीच्या नव्या नव्या अपेक्षांना आणि अडचणींना तोंड देण्यासाठी निरंतर शिक्षण विशेष आवश्यक ठरले आहे. विशेषतः गतिमान सामाजिक परिसराशी व्यक्तीला जे समायोजन साधावे लागते, त्यासाठी अशा शिक्षणाची गरज आहे. औपचारिक शिक्षणव्यवस्था कितीही अद्ययावत आणि कार्यक्षम असली, तरी व्यक्तीच्या व समाजाच्या अमर्याद गरजांच्या तुलनेने ती मर्यादितच असते. या परिस्थितीत शिकण्यासाठी विविध संस्थांचा आणि साधनांचा उपयोग करून घेण्याची क्षमता मिळविणे व कसे शिकावे, हे शिकणे महत्त्वाचे ठरते. यासाठी अनौपचारिक शिक्षण, ⇨ प्रौढ शिक्षण, ⇨ पत्रद्वारा शिक्षण, ⇨ मुक्त विद्यापीठे अशा कल्पना पुढे आल्या. निरंतर शिक्षण ही अशीच एक नवी कल्पना होय.
अनेकांना परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, आधुनिक तंत्रशिक्षण मिळविता येत नाही, विविध कारणांमुळे शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागते. ग्रामीण भागातील लोकांना, विशेषतः स्त्रियांना, मनात असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रौढपणी शिकावे असे वाटले, तरी औपचारिक शिक्षणव्यवस्था उपलब्ध असतेच असे नाही. अशा सर्व व्यक्तींना निरंतर शिक्षण योजनेखाली कोणत्याही वयात शिक्षण घेता येते.
निरंतर शिक्षणाचे कार्यक्रम आपल्या देशातील व परदेशांतील बऱ्याच विद्यापीठांतून सुरू झालेले आहेत. हे कार्यक्रम व्यक्तीच्या आणि समुदायाच्या विशिष्ट गरजांवर आधारित असतात. त्यातील बहुतेक अभ्यासक्रम फक्त विषय शिकण्यासाठी योजलेले असतात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही आणि पदवी अथवा पदविका देण्यात येत नाहीत. मात्र काही अभ्यासक्रम संबंधित विद्यापीठाची मान्यता घेऊन चालविले जातात आणि त्यांची परीक्षा घेऊन प्रमाणपत्रे दिली जातात. पाश्चात्य देशांत या योजनेचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यांतून अनेक अभ्यासक्रम, लोकांच्या सोयीनुसार उपलब्ध करून दिले जातात. परीक्षा किंवा पदवी हे ध्येय न ठेवता ज्ञान-संपादन आणि कौशल्यप्राप्ती ही उद्दिष्टे ठेवली जातात. आपल्या सोयीनुसार आणि गरजांनुसार विद्यार्थ्यांना विषय निवडता येतात. वर्गांची योजना सोयीनुसार केली जाते. उदा., रोज सायंकाळी, शनिवारी-रविवारी अथवा सुट्ट्यांच्या दिवशी वर्ग घेतले जातात. सर्वच बाबतींत निर्बंध कमीत कमी करून व शिक्षणाचा आवश्यक दर्जा सांभाळून उमेदवारांची जास्तीत जास्त सोय पाहिली जाते. अर्थात याच्या जोडीला नेहमीची औपचारिक शिक्षणव्यवस्था ही असतेच. साचेबंद शिक्षणव्यवस्थेतून शिक्षण घेणाऱ्यांपेक्षा निरंतर शिक्षण योजनेद्वारे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या पाश्चात्य देशांत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात तरी जास्त आहे, असे दिसून आले आहे.
निरंतर शिक्षणव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अभ्यासक्रमांची आणि माध्यमांची विविधता. कोणताही विषय या कार्यक्रमात समाविष्ट होऊ शकतो. त्यासाठी कोणतेही अवडंबर माजविले जात नाही शिक्षकांना अभ्यासक्रम तयार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्याची व्याप्ती अतिशय मर्यादित म्हणजे काही तासांपुरती असू शकते अथवा तो वर्षभरसुद्धा चालू शकतो. पुणे विद्यापीठात चाललेल्या काही अभ्यासक्रमांच्या विषयांवरून या विविधतेविषयी कल्पना येऊ शकेल. उदा., सभोवतालच्या प्राणिजगताची ओळख पक्षीदर्शन ग्रंथालय व्यवस्थापन प्रयोगशाळा सहायक प्रशिक्षण योगविद्या रेडिओ, दूरचित्रवाणी, स्कूटर, विजेवर चालणारी यंत्रे यांची दुरूस्ती विक्रयकला खरेदी आणि भांडार व्यवस्थापनतंत्र भाषाविषयक अभ्यासक्रम आहारशास्त्र बालसंगोपन आरोग्यशिक्षण ग्रामीण शिक्षण इत्यादी. अशा अभ्यासक्रमांच्या विविधतेबरोबर शिक्षणाच्या माध्यमांची विविधता हेही निरंतर शिक्षणव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. सर्वच भर व्याख्यानांवर न देता चर्चा, प्रदर्शन, पर्यटन, रेडिओ, दूरचित्रवाणी, पत्रद्वारा शिक्षण, वृत्तपत्रे आणि नियतकालिके इत्यादींपैकी कोणत्याही माध्यमाचा यात मुक्तपणे उपयोग करण्यात येतो.
निरंतर शिक्षणयोजना वेगवेगळ्या स्वरूपात पाश्चात्य देशांत विसाव्या शतकाच्या आरंभापासून सुरू झाली. भारतामध्ये ही योजना १९६० च्या सुमारास प्रथम राजस्थान विद्यापीठात सुरू झाली. त्यानंतर महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबई विद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांतून ती चालू करण्यात आली. १९७७-७८ या शैक्षणिक वर्षाअखेरीस भारतातील सु. पंधरा विद्यापीठांत ही योजना अंमलात होती. १९७६-७७ या वर्षी पुणे विद्यापीठात १,५१४ विद्यार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेतला. या योजनेखाली विद्यापीठ अनुदान मंडळ, भारत सरकार, राज्यसरकार यांच्याकडून साहाय्यनिधी मिळतो. काही विद्यापीठांत त्या त्या विद्यापीठीच्या अंतर्गत निधीतून या योजनेवर खर्च करण्यात येतो. काही वेळा विद्यापीठ व त्याच्यासाठी संलग्न असलेली महाविद्यालये यांच्या संयुक्त जबाबदारीवर विविध अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठांनी यासाठी वेगळ्या व्यवस्थापकीय समित्या नेमलेल्या असून शिक्षणशास्त्राच्या प्राध्यापकांची विभागप्रमुख म्हणून सामान्यतः नेमणूक केली जाते. अभ्यासक्रमाच्या स्वरूपाप्रमाणे शुल्क असते. जास्त खर्चाच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ अनुदान देते. अशीच तरतूद ग्रामीण विभागातील व दुर्बल घटकांसाठी आखलेल्या अभ्यासक्रमांच्या बाबतीत असते. व्यवस्थापकीय समिती वा महाविद्यालये प्राध्यापकांच्या नेमणुकी करतात व या योजनेत काम करणाऱ्या प्राध्यापकांना मानधन दिले जाते.
निरंतर शिक्षण हा प्रत्येकाने आजन्म विद्यार्थी म्हणून राहण्याचा प्रयोग आहे. यात शिक्षणसंस्था व शिकविणे या गोष्टींएवजी शिक्षणार्थी आणि त्याचे स्वतःचे प्रयत्न यांना अधिक महत्त्व असते. शिक्षणसंस्था आणि शिक्षणार्थी या दोहोंच्या सहकार्याने निरंतर शिक्षणव्यवस्था सफल होऊ शकते.
2. Bordia, A. and Others, Adult Education in India, Bombay, 1973.
3. Houle, C. O. Continuing Your Education, New York, 1964.
4. Roy. N. R. Adult Education in India and Abroad, New Delhi, 1967.
5. Smith, R. M. and others, Handbook of Adult Education, London, 1970.
पलसाने, म. न.