नॉव्हायाझीमल्या : (रशियन–नवीन भूमी). रशियाच्या आर्केंजल प्रांतात समाविष्ट असेलली, आर्क्टिक महासागरातील सेव्हर्नामा व यूझनी या दोन प्रमुख व इतर लहानलहान बेटांचा समूह. क्षेत्रफळ ८२,६०० चौ. किमी. विस्तार ७०° ३१ उ. ते ७७° उ. व ५१° ३५ पू. ते ६९° १२ पू. यांदरम्यान. लांबी सु. १,००० किमी., रुंदी सु. ५० ते १५० किमी. याच्या पूर्वेस कोरा व पश्चिमेस बॅरेंट्सचा समुद्र असून दोन बेटांदरम्यान अरुंद माटचकिन शार सामुद्रधुनी व दक्षिणेस कार्स्किया व्हरॉट सामुद्रधुनीच्या पलीकडे वायगाश बेट व मुख्य भूमी आहे. उरल पर्वताची पैखोय शाखा येथे विस्तारली असून तिची कमाल उंची १,५९० मी. आहे. दक्षिणेकडील प्रदेश ऊर्मिल व टेकड्यांचा आहे. येथे अग्निजन्य, गाळाचे, चुनखडीचे व स्लेटचे खडक आढळतात. येथे उन्हाळ्यात, २·२° ते ६·४° से. व हिवाळ्यात –१६° ते –२२° से. तपमान व २५ सेंमी. पर्यंत वृष्टी, असे थंड सागरी हवामान आहे. बेटांचा सु. २५% प्रदेश वर्षभर बर्फाच्छादित व बाकीचा आर्क्टिक ओसाडीत समाविष्ट आहे. धुके वारंवार पडते व नाव्होझेमल्यास्का बोरा हे जोराचे वारे वाहतात. वनस्पती टंड्रा प्रकारची असून झुडुपे ही क्वचितच आढळतात. रेनडियर, खोकड, लेमिंग, क्वचित ध्रुवीय अस्वले, देवमासा, सील, वॉलरस व आर्क्टिक चार, सॅमन आणि कॉड हे मासे, तऱ्हेतऱ्हेचे विपुल पक्षी व भरपूर कीटक असे येथील प्राणिजीवन आहे. अकराव्या शतकापासून, नॉर्वेच्या व रशियाच्या शिकाऱ्यांस हा प्रदेश माहीत असला, तरी १५५३ मध्ये विलोबी, १५५६ मध्ये स्टीव्हेन बरो व १५९४ मध्ये व्हिलेम बॅरेंट्स हे तेथे गेले होते. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत याचे समन्वेषण झाले. १८८७ मध्ये रशियाने येथे काही सॅमोयिडांची वस्ती केले. १९५० मध्ये येथे सॅमोयिड फासेपारधी व मासेमार आणि रशियन हवामान निरीक्षक व संशोधक मिळून सु. ४०० लोक होते. या बेटांवर तांबे, शिसे, जस्त, पायराइट व अस्फाल्टाइट ही खनिजे आहेत. क्रास्कीन येथे प्रमुख वस्ती आहे.

डिसूझा, आ. रे.