नॉटिलॉइडिया : ⇨ मॉलस्का म्हणजे मृदुकाय प्राण्यांच्या संघाच्या ⇨ सेफॅलोपोडा वर्गातील गणांपैकी सर्वांत जुन्या गणाचे नाव. या गणातील प्राणी सेफॅलोपोडांपैकी आदिम (आद्य) गणले जातात. त्यांचा अवतार कँब्रियन कल्पाच्या (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) उत्तर काळात आणि परम उत्कर्ष ऑर्डोव्हिसियन कल्पात (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षापूर्वीच्या काळात) झाला. त्यांच्या शेकडो जाती त्या काळातील समुद्रात राहत असत व त्यांच्यापैकी काहींची कवचे ५ मी. इतकी लांब असत. पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) अखेरीस त्यांचे बहुतेक वंश निर्वंश झाले व मध्यजीव महाकल्पात (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) थोडेच नवे वंश अवतरले. नॉटिलॉइडियांचा ⇨ नॉटिलस हा एकच वंश आता उरलेला आहे, पण सु. ३०० पेक्षा अधिक वंशांच्या व २,५०० पेक्षा अधिक जातींच्या नॉटिलॉइडियांचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) मिळालेले आहेत. या प्राण्यांना कॅल्शियम कार्बोनेटाचे सप्रकोष्ठ (कप्पेयुक्त) कवच असे व कवचांच्या साम्यावरून त्यांचे शारीर (शरीररचना) व राहणी ही आजच्या नॉटिलसासारखी असावीत, असे मानले जाते.
निरनिराळ्या वंशांच्या कवचांचे आकार निरनिराळे असतात (आकृती पहा). काही कवचे सरळ, काही वक्राकार व काही एका पातळीत सर्पिल असतात. क्वचित अंशत: सर्पिल किंवा मळसूत्राकार कवचेही आढळतात. पुराजीव महाकल्पातील व ट्रायासिक कल्पातील बहुसंख्य वंशांची कवचे सरळ वा जवळजवळ तशी असतात. कवचांचे पृष्ठ सामान्यत: साधे, विशेष नक्षी नसलेले असे असते. कवचांच्या द्वारकांचे पार्श्वीय (तोंडाच्या बाजूचे) काठ सरळ किंवा किंचित तरंगाकार असतात. बऱ्याचशा वंशांच्या कवचांच्या द्वारकांच्या बाहेरच्या काठात नॉटिलसाच्या अधोनाली खातासारखे (द्वारकांच्या बाहेरच्या अंगाच्या काठाच्या अंतर्गोल भागासारखे) आखात असते म्हणजे काठ सरळ नसून आखाताप्रमाणे मागे नेलेला असतो [→ नॉटिलस]. कवचांची द्वारके सामान्यत: शरीरप्रकोष्ठाच्या पुढच्या भागाइतकी विस्तीर्ण असतात पण द्वारकांच्या काठांची आतील बाजूंकडे वाढ होऊन द्वारके आकुंचित झाल्याची उदाहरणेही आढळतात उदा., गाँफोसेरस. बऱ्याचशा वंशांची निनालिका (सर्व वायुप्रकोष्ठांतून जाणारा शरीराच्या मागील भागाचा दोरीसारखा जिवंत फाटा) पटांच्या (पडद्यांच्या) मध्याजवळ पण काहींची आतल्या व काहींची बाहेरच्या कडेजवळ असते. पटग्रीवा (निनालिका ज्यांतून जाते ते पटाचे नसराळ्यासारखे भाग) मागे वाढलेल्या असतात. सेवनी (पट व कवचाचे आतील पृष्ठ यांच्या सांध्यांच्या रेषा) सरळ किंवा किंचित तरंगाकार असतात.
केळकर, क. वा.
“