नाट्यगीत : हा खरोखर भावगीताचाच (लिरिक) एक विशिष्ट प्रकार आहे. त्याला नाट्यगीत हे नाव प्रख्यात इंग्रज कवी रॉबर्ट ब्राउनिंग (१८१२–८९)ह्याच्या ‘ड्रॅमॅटिक लिरिक’ वरून देण्यात आलेले आहे. त्याने नाट्यात्मक एकभाषितासारखे (ड्रॅमॅटिक मोनोलॉग) आणखीही काही नाट्यात्मक काव्यप्रकार हाताळले आहेत. नाट्यगीतामध्ये अंतर्भूत असलेले भावगीताचे विशेष महत्त्वाचे अंग म्हणजे प्रायः एकाच भावनेचा उत्कट, एकजिनसी आणि आटोपशीर आविष्कार आणि त्यामुळेच ते भावगीतही ठरते. सामान्य भावगीतामध्ये ही भावना प्रत्यक्ष-परोक्षपणे कवीची स्वतःची असतेतथापि नाट्यगीतामध्ये मात्र ती कवीची स्वतःची नसून त्याने पाहिलेल्या अथवा कल्पिलेल्या दुसऱ्या कोणातरी स्त्री वा पुरुष व्यक्तीची असते. नाटकात ज्याप्रमाणे लेखक कोठेही स्वतः दिसत नाही, त्याने निर्मिलेल्या व्यक्तीच दिसतात, तसेच ब्राउनिंगनिर्मित नाट्यात्मक काव्यामधूनही होते. म्हणूनच त्याने निर्मिलेल्या उपरिनिर्दिष्ट सर्वच काव्यप्रकारांना त्याने ‘ड्रॅमॅटिक’ हे विशेषण लावलेले आहे. ‘ड्रॅमॅटिक लिरिक’ला म्हणूनच नाट्यगीत म्हणता येईल.

नाट्यगीत म्हणजे नाटकातील किंवा नाटकातील चालीवर लिहिलेले कोणतेही गीत नव्हे. सामान्य भावगीताला जेवढी गेयता आवश्यक, तेवढीच नाट्यगीताला वस्तुतः पुरेशी असते. क्वचित ती अतिरिक्त असली तरी, ते तिचे आवश्यक अंग नव्हे. नाटक संवादाद्वारे व्यक्त होते. म्हणून संवादात्मक कविता म्हणजेही नाट्यगीत नव्हे. कविवर्य भा. रा. तांबे यांची ‘डोळे हे जुलमि गडे!’ही कविता हे उत्तम नाट्यगीत आहेपरंतु ते नाटकातील पदाच्या चालीवर रचले आहे म्हणून नव्हे, तर त्यात एका नवोढा युवतीची (स्वतःची नव्हे) भावना ते व्यक्त करीत आहेत म्हणून आहे. नाट्यगीत म्हणजे वा. ना. देशपांड्यांच्या ‘कपटवेश’ सारखे नाट्यकाव्यही नव्हे, किंवा अलीकडे ज्यांना ‘संगीतिका’ असे संबोधण्यात येते, असे दीर्घ संवादात्मक काव्यही नव्हे. कारण मुळात ही ‘भाव’ गीते नाहीत. मराठीमधील ‘नाट्यछटा’ हा प्रकार घाट आणि एकभावनात्मकता या दृष्टींनी नाट्यगीतास जवळचा मानता येईलपरंतु त्यात नाट्य असले,तरी गीतत्व नाही. नाट्यछटेतील स्फुरण ब्राउनिंगच्या एकभाषितात (मोनोलॉग) आहे.

कविवर्य तांबे यांच्या ‘पन्नास वर्षांनंतर’, ‘अवमानिता’ किंवा ‘वाटेच्या वाटसरा’ (पहिल्या चार ओळींचा अपवाद) ह्या कविता नाट्यगीताची चांगली उदाहरणे ठरतील. अथवा माधव जूलियन् यांची ‘अर्थोऽहि कन्या परकीय अ‍ेव’ ही कविताही नाट्यगीताचे उदाहरण मानता येईल. त्यातून कविकल्पित व्यक्तीच्या भावना भावगीतरूप घेऊन प्रकट झाल्या आहेत.

वरील अन्वयव्यतिरेकी अथवा विधिनिषेधरूप व वर्णनावरून नाट्यगीताचे स्वरूप कळण्यास साहाय्य होईल.

जोग, रा. श्री.