नव्य कला: (आर्ट नूव्हो). पश्चिमी कलेच्या इतिहासात सु. १८९० ते १९१० या कालखंडात विकसित झालेला एक कलासंप्रदाय. वास्तू, पुस्तके व नियतकालिके, काचपात्रे, फर्निचर तसेच आरेख्यक निर्मिती इत्यादींच्या अलंकरणावर नव्य कलेत भर दिला जातो. पॅरिसमध्ये १८९६ मध्ये गृहशोभनासाठी एक स्वतंत्र कलावीथी उघडण्यात आली, तिच्या नावात ‘आर्ट नूव्हो’ हे शब्द होते. इंग्लंड, जर्मनी, इटली, स्पेन इ. देशांत या संप्रदायाला वेगवेगळ्या संज्ञा रूढ होत्या. वेलबुटी किंवा चित्रवेल या उपमानकाला आणि अनुषंगाने वेलीसारख्या सजीव, नागमोडी, मांसल रेषेला नव्य अलंकरणात महत्त्वाचे स्थान आहे. फुलांचे आकृतिबंधही नव्य अलंकरणात वारंवार योजण्यात आले. नव्य कलेची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. तिची परंपरा पूर्व–रॅफेलाइट चित्रपरंपरेत दाखविली जाते. इंग्लंडमध्ये वास्तुकला तसेच सचित्र नियतकालिकांतून नव्य सजावटीचा विशेष प्रसार करण्यात आला. चार्ल्‌स रेनी मॅकिंटॉश हा वास्तुविशारद नव्य वास्तुकलेचा एक उल्लेखनीय प्रवर्तक होय. वास्तुरचना, कारागिरीच्या वस्तू व ग्रंथसजावट यांच्या अलंकरणांना बेल्जियममध्ये महत्त्व आहे. बेल्जियन रेषा नव्य कलेत उल्लेखनीय मानली जाते. फ्रान्समध्ये जडजवाहीर व काचपात्रे यांच्यावर नव्य आकृतिबंधाचा प्रभाव दिसत असला, तरी पॅरिस मेट्रोस्टेशनच्या द्वाराचा हेक्टर गीमार याने केलेला अभिकल्प नव्य कलेच्या इतिहासात उल्लेखनीय मानला जातो. स्पेनमधील बार्सेलोना हे नव्य वास्तुकलेचे व प्रसिद्ध नव्य वास्तुकलावंत आंतोन्यो गॉदी याचे कार्यक्षेत्र होते. गॉदीचे वास्तुकल्प नव्य कलामीमांसेत अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जर्मनीत नव्य कलेचा आविष्कार नियतकालिके व उपयुक्त कला यांच्या क्षेत्री झालेला आढळतो. बेल्जियम प्रभावातून जर्मनीत वास्तुसजावटीवरही नव्य अलंकरणाचा ठसा उमटला. अमेरिकेत विशेषतः लूइस कंफर्ट टिफानी याने काचपात्रावरील आकृतिबंधांतून नव्या शैलीचे अलंकरण साधले. ऑस्ट्रिया, इटली या देशांतही नव्य कलानिर्मितीस चालना मिळाली होती.

कॅसा मिला वास्तूचा दर्शनी भाग, वास्तुकार आंत्तोन्यो गॉदी, (१८५२-१९२६)

नव्य कला ज्या नवेपणाच्या शोधासाठी पुढे आली, ते नवेपण बाह्य सौंदर्यदृष्टीचे व म्हणून अलंकरणापुरते प्रभावी ठरले. तथापि त्यामुळेच उपयुक्त कलांमार्फत तिचे लोण व्यवहाराच्या व्यापक क्षेत्रात पोहोचू शकले. वास्तुशोभनातील काही प्रयोग आरेख्यक कला व अनुषंगाने ग्रंथादींची सजावट यांतून नव्या कलादृष्टीचा कायमचा ठसा उमटला. पहिल्या महायुद्धाच्या सुमारास हा संप्रदाय निष्प्रभ ठरला असला, तरी त्याच्या कार्याचे मूल्य पुढेही वेळोवेळी मान्य करण्यात आल्याचे दिसते. आधुनिक (मॉर्डन) कलांच्या उदयाची पार्श्वभूमी तयार करण्यातही नव्य कलेचा वाटा आहे.

संदर्भ : Schmutzler, R. Trans. Roditi, E. Art Nouveau, London, 1964.

जाधव, रा. ग.