नवरंग

नवरंग: या भपकेदार, आकर्षक, आखूड शेपटीच्या कस्तुरासारख्या पक्ष्याचा समावेश पिट्टिडी या पक्षिकुलात होतो. नवरंग हे याचे नाव हिंदी नावावरून आलेले आहे. याचे शास्त्रीय नाव पिट्टा ब्रॅकियूरा असे आहे. त्याचा प्रसार भारतातील अरण्यमय प्रदेशात, हिमालयात ८२५ मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात आणि श्रीलंका व बांगला देश यांत झाला आहे. तो भारतातील कायमचा रहिवाशी असून स्थानिक स्थलांतर करणारा आहे. याच्या पिसांचा रंग हिरवा, निळा, पिंगट, काळा व पांढरा असून पोट आणि शेपटीची खालची बाजू किरमिजी रंगाची असते. उडताना त्याच्या पंखांच्या टोकाजवळ एक पांढरा ठिपका स्पष्ट दिसतो. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हा मुख्यतः भूचर पक्षी असून झाडांवर रात्री विश्रांती घेतो. याला अरण्यमय  प्रदेश, कोरडे नाले व झुडपांची गुंतागुंत असलेल्या घळी किंवा दऱ्या आवडतात. कस्तुराप्रमाणेच उड्या मारीत तो वाळलेली पाने खालीवर करून व दमट जमीन उकरून आपले भक्ष्य–कीटक आणि अळ्या-शोधीत असतो. तो आपली आखूड शेपटी हळूहळू व जाणूनबुजून वरखाली हलवीत असतो. तो मुख्यतः सकाळी व संध्याकाळी मोठ्या आवाजात ‘व्हीट-ट्यु’ अशी शीळ घालतो. आकाश अभ्राच्छादित असल्यास तो वारंवार शीळ घालतो. तीन किंवा चार पक्षी निरनिराळ्या दिशांनी एकमेकांना साद घालतात. त्याचे स्थलांतर नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्यांनी नियंत्रित होत असावे, असे दिसते. तो मे–ऑगस्टमध्ये घरटे तयार करतो. ते मोठे, गोलसर असून काटक्या, गवत, मुळे इत्यादींचे बनविलेले असते. ते झुडपाच्या तळाशी किंवा सामान्यतः लहान वृक्षाच्या दुबेळक्यात असते. त्यात मादी ४–६ अंडी घालते. ती चकचकीत पांढऱ्या रंगाची असून त्यांवर मळकट किंवा गर्द जांभळे ठिपके व केसासारख्या सूक्ष्म रेषा असतात.

जमदाडे, ज. वि.