नवमानवतावाद: प्रख्यात भारतीय राजकीय विचारवंत आणि क्रांतीचे धुरंधर ⇨ मानवेंद्रनाथ रॉय ह्यांनी आपल्या वैचारीक आणि राजकीय जीवनाच्या अखेरच्या पर्वात पुरस्कारिलेले राजकीय तत्त्वज्ञान ‘नवमानवतावाद’ किंवा ‘मूलगामी मानवतावाद’ – रॅडिकल ह्यूमॅनिझम-म्हणून प्रसिद्ध आहे. मार्क्सवादाप्रमाणेच नवमानवतावाद ही एक मूलगामी आणि सामाजिक जीवनाच्या सर्व अंगांचा उलगडा करून त्यांचे मार्गदर्शन करू पाहणारी अशी सर्वस्पर्शी विचारसरणी आहे.
‘नवमानवतावाद’ हे नाव स्वीकारून रॉय ह्यांनी आपल्या विचारसरणीचा मानवी संस्कृतींतील, विशेषतः आधुनिक यूरोपीय संस्कृतीतील उदा., प्रबोधनकाळामधील मानवतावादी प्रेरणांशी जवळचा संबंध जोडला पण त्याबरोबरच नवमानवतावाद मार्क्सवादाच्या पलीकडे जातो, असा त्यांचा दावा आहे आणि हे ‘पलीकडे जाणे’, ज्याच्या पलीकडे जाणे असते त्याला स्वतःमध्ये सामावून घेऊन पलीकडे जाणे असते. व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांच्या स्वीकारावर आधारलेल्या संसदीय लोकशाहीच्या चौकटीत व्यक्ती-व्यक्तीमधील स्पर्धेला अनिर्बंध वाव देणाऱ्या भांडवलशाही समाजात व्यक्तीचे स्वातंत्र्य एक उपचार म्हणून राहतो आणि अन्याय, निर्घृण पिळवणूक व व्यक्तीच्या माणुसकीचे अपहरण सातत्याने आणि स्वाभाविकपणे घडून येत असते. ही स्थिती मार्क्सने उघडी केली होती आणि तिच्यावर विदारक टीका केली होती. नवमानवतावाद ही टीका प्रमाण म्हणून स्वीकारतो पण संसदीय लोकशाहीवर आधारलेली समाजव्यवस्था सदोष आणि म्हणून त्याज्य आहे, म्हणून मार्क्सने प्रतिपादन केलेला पर्याय निर्दोष आणि स्वीकारार्ह आहे असे ठरत नाही. नवमानवतावादाच्या दृष्टीने मार्क्सवाद अनुभवाच्या आणि तर्काच्या कसोटीला संपूर्ण उतरत नाही आणि म्हणून सिद्धांत म्हणून तो ग्राह्य ठरत नाही. शिवाय व्यवहारातही तो पूर्णपणे अपेशी ठरला आहे. मार्क्सवादामागची प्रेरणा आदर्शवादी, नैतिक आणि मानवतावादी होती. भांडवलशाही समाजव्यवस्थेत माणसांची पिळवणूक घडून येत असते व बहुसंख्य व्यक्ती आर्थिक गुलामगिरीत जगत असतात. ह्या अन्यायपर आणि अमानुष समाजव्यवस्थेच्या जागी ज्या समाजात सर्व व्यक्ती आर्थिक दास्यातून मुक्त झाल्या आहेत आणि स्वतंत्रपणे स्वतःच्या मानवी प्रकृतीचा विकास साधायला, स्वतःचे भवितव्य घडवायला मोकळ्या आहेत, अशा साम्यवादी समाजाची स्थापना मार्क्सला करायची होती परंतु प्रत्यक्षात मार्क्सवादी म्हणण्यात येणाऱ्या रशियन क्रांतीनंतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जी समाजपद्धती अस्तित्वात आली तिच्यात व्यक्तीस्वातंत्र्य चिरडून टाकण्यात आले. मार्क्सने भाकित केल्याप्रमाणे राज्यसंस्था सुकून जाण्याऐवजी अतिशय प्रबळ झाली. प्रथम काही काळ लोकांवर एका पक्षाची – कम्युनिस्ट पक्षाची– आणि पक्षावर एका पुढाऱ्याची अनियंत्रित आणि नैतिक दृष्ट्या कोडगी अशी हुकूमशाही प्रस्थापित झाली आणि समाजात अधिक न्याय्य आणि समताधिष्ठित आर्थिक व्यवस्था निर्माण होण्याऐवजी सर्व आर्थिक सत्ता राज्यसंस्थेकडे केंद्रित झाली आणि तिने मुक्रर केलेल्या आर्थिक धोरणांपुढे व्यक्तींच्या हितसंबंधाचा बळी देण्यात आला. सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांवर आधारलेली, व्यक्तीच्या प्रतिष्ठेला जपणारी, तिच्या मुक्त विकासाला अनिर्बंध वाव देणारी जी समाजव्यवस्था मार्क्सला अभिप्रेत होती, तिचे हे क्रूर विडंबन झाले. आता अलीकडे वैयक्तिक हुकूमशाही संपली आहे परंतु पक्षीय हुकूमशाही अजून शिल्लक राहिली आहे.
तेव्हा नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारलेली समाजव्यवस्था घडविण्यासाठी संसदीय लोकशाहीने तत्त्वज्ञान आणि मार्क्सच्या अनुयायांनी त्याच्या विचारांपासून विकसित केलेले आणि अधिकृत म्हणून मांडलेले मार्क्सवादी तत्त्वज्ञान या दोहोंहून एका वेगळ्या सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञानाची आवश्यकता होती. मानवी प्रकृतीची घडण, तिच्यात समाविष्ट असलेल्या मूलगामी शक्ती आणि प्रेरणा व मानवाची समग्र परिस्थिती ह्यांच्या सम्यक आकलनावर हे तत्त्वज्ञान आधारलेले असले पाहिजे. ‘नवमानवतावाद’ ह्या नावाने रॉय ह्यांनी डिसेंबर १९४६ मध्ये हे तत्त्वज्ञान सुप्रसिद्ध बावीस सूत्रांच्या स्वरूपात जगापुढे मांडले.
(१) माणूस हा नियमबद्ध आणि सुसंवादी अशा निसर्गव्यवस्थेचा घटक आहे आणि ह्या स्वरूपाच्या निसर्गातून त्याचा उदय झाला आहे म्हणून माणूस मूलतः किंवा स्वभावतःच विवेकी (रॅशनल) आहे. विवेक म्हणजे अनुभवांमध्ये सुसंवाद साधण्याची प्रेरणा आणि शक्ती. नीती ही विवेकावर आधारली आहे किंवा नीती हे विवेकाचे व्यावहारिक रूप आहे कारण नीती म्हणजे व्यक्तीव्यक्तींमध्ये सुसंवादी संबंध असणे, मानवाची विवेकशीलता आणि त्याची नैतिक प्रेरणा म्हणजे नियमबद्ध निसर्गाची मानवी जाणिवेत पडलेले प्रतिबिंब होय. तेव्हा विवेकाला आणि नीतीला वैश्विक अधिष्ठान आहे. (२) नवमानवतावादाचा दुसरा मूलभूत सिद्धांत असा की, व्यक्ती हे समाजाचे मूळ आहे. समाज व्यक्तींचा बनलेला असतो आणि सुख, ज्ञान, स्वातंत्र्य इ. सर्व मूल्ये व्यक्तीत वसत असतात. समूह ही प्राथमिक वास्तवता आहे आणि समूहाचा अविभाज्य घटक म्हणूनच व्यक्तीला अस्तित्व आणि मूल्य असते, असा दृष्टिकोण हेगेलच्या प्रभावामुळे मार्क्समध्ये आढळतो. नवमानवतावादाला तो पूर्णपणे अमान्य आहे. व्यक्ती मूलभूत आणि प्रधान आहे आणि राष्ट्र, वंश, वर्ग इ. सर्व प्रकारचे समूह गौण व दुय्यम आहेत. स्वतंत्र, सार्वभौम व्यक्तींनी परस्परांशी सुसंवादी आणि परस्परांना हितकर असे संबंध प्रस्थापित करून घडविलेला समाज म्हणजे आदर्श समाज तेव्हा कोणत्याही समूहाच्या, वर्गाच्या किंवा राष्ट्राच्या कल्याणासाठी किंवा महिम्यासाठी व्यक्तींच्या हिताचा बळी देणे अनैतिक आहे. माणसात स्वातंत्र्याची आणि त्याचप्रमाणे ज्ञानाची प्रेरणा स्वभावतःच आहे. स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणजे स्वतः असण्याची प्रेरणा. इतर प्राण्यांप्रमाणे स्वतःचे अस्तित्व टिकवून धरण्याची एक मूलगामी प्रेरणा माणसाच्या ठिकाणी असते आणि ह्या प्रेरणेचे सजाण स्वरूप म्हणजेच स्वातंत्र्याची प्रेरणा. तेव्हा आपल्या स्वातंत्र्यात सतत वाढ करीत राहणे, ही माणसाची सर्वकष प्रेरणा आहे असे मानावे लागते. तसेच आपल्या परिसराचे यथार्थ ज्ञान करून घेऊनच आपण आपले अस्तित्व टिकवून धरू शकतो आणि म्हणून ज्ञानाची इच्छा ही एक मूलभूत मानवी प्रेरणा आहे. आपल्या परिसराला तोंड देऊन आपले अस्तित्व टिकवून धरायला ज्ञान – म्हणजे सम्यक ठरलेल्या कल्पना – उपयुक्त असतात आणि म्हणून ज्ञानाला मूल्य आहे पण माणसाने एकदा ज्ञान मिळविले की ते स्वतःच्या स्वभावधर्माला अनुसरून – अनुभव आणि तर्क यांच्यावर आधारलेल्या नियमांना अनुसरून – विकास पावते आणि ह्या वाढत्या ज्ञानाचा उपयोग करून माणूस आपल्या भौतिक आणि सामाजिक परिसराला आणि स्वतःलाही वळण देऊ शकतो. म्हणून माणूस आपल्या भवितव्याचा शिल्पकार असतो. माणसाची जाणीव, त्याचे विचार हे उत्पादनपद्धतीवर आधारलेल्या सामाजिक संबंधांचे त्याच्या मनात पडलेले केवळ प्रतिबिंब असते, विचार हे सामाजिक व विशेषतः आर्थिक परिस्थिती घडवीत नाहीत, तर सामाजिक आणि विशेषतः आर्थिक परिस्थिती विचारांना घडविते, काही अनिवार्य ऐतिहासिक नियमांना अनुसरून उत्पादनपद्धती विकसित होत जाते आणि ह्या विकासाचे प्रतिबिंब म्हणून मानवी जाणीव विकसित होत जाते, हा मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकतावादी सिद्धांत नवमानवतावाद सदोष मानतो. त्याऐवजी सामाजिक, आर्थिक परिस्थिती व विचार हे तुल्यबळ असतात कित्येकदा सामाजिक, आर्थिक परिस्थिती विचारांना घडविते. त्याच्या उलट कित्येकदा विचार हे सामाजिक, आर्थिक परिस्थितीला घडवितात ते परस्परावलंबीही आहेत, असे नवमानवतावाद मानतो.
ह्या सिद्धांतावर आधारलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पुनर्रचनेच्या कार्यक्रमाचे स्वरूप असे राहील माणूस आपल्या ज्ञानाच्या आणि नैतिक प्रेरणेच्या बळावर आपल्या स्थितीला आणि भवितव्याला इष्ट ते वळण देऊ शकत असल्यामुळे विज्ञानाचा, विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञानाचा आणि नीतीचा–म्हणजे परस्पर सहकारावर आणि सुसंवादावर आधारलेल्या नीतीचा–समाजात सतत प्रसार केला पाहिजे हे सामाजिक शिक्षण. सहकाराच्या तत्त्वावर आधारलेली इतरांच्या पिळवणुकीला थारा न देणारी अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे. व्यक्तींना स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा प्रत्यय येईल अशा लहान स्वायत्त समूहात संघटित केले पाहिजे. म्हणजे जेथे व्यक्ती इतरांशी विचारविनिमय करून आपल्या समूहाविषयी स्वतः निर्णय घेऊ शकतील, अशा स्वायत्त समूहांत त्यांना संघटित करून अशा समूहांना राज्याचा पाया मानले पाहिजे. अशा समूहांच्या प्रतिनिधींची मंडळे, ह्या मंडळांच्या प्रतिनिधींची मंडळे अशी पिरॅमिडसारखी रचना करून राज्यसंस्थेला आकार दिला पाहिजे. अशा समाजात खरीखुरी लोकशाही असेल कारण त्यातील सर्व व्यक्ती बऱ्याच प्रमाणात स्वयंशासित असतील. कित्येक वर्षांनी आपला प्रतिनिधी निवडून त्याच्याकडे आपले सार्वभौमत्व संक्रांत करून इतरांनी घेतलेले निर्णय ह्या व्यक्ती पाळणार नाहीत तर स्वतःच्या प्रत्यक्ष जीवनात आपल्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा प्रत्यय त्यांना वाढत्या प्रमाणात येईल.
सारांश, सर्वच नियोजनाचे उद्दिष्ट व्यक्तीची निर्णयशक्ती अधिकाधिक प्रगल्भ करणे आणि तिचा स्वतःच्या व समाजाच्या जीवनात अधिकाधिक उपयोग करायला अवसर देऊन स्वातंत्र्यात वाढ करणे हे असले पाहिजे.
संदर्भ : 1. Roy, M. N. New Humanism, Calcutta, 1961.
२. रॉय, एलन रे, शिवनारायण अनु. पारीख, गोवर्धन, मानवाचा आदर्श, वाई, १९५६.
३. रॉय, मानवेंद्रनाथ अनु. पारीख, गोवर्धन, नवमानवतावाद, वाई, १९५५.
रेगे, मे. पुं.