नग्नसंप्रदाय : शारीरिक नग्नतेचा पुरस्कार करणारा एक आधुनिक संप्रदाय. उघडा मानवी देह हितावह असून त्यात अश्लील किंवा कामोत्तेजक असे अंगभूतपणे काहीही नाही व म्हणून समाजात लिंगभेद न करता नग्न वावरणे स्वाभाविक ठरते  असे या संप्रदायाच्या पुरस्कर्त्यांचे मत आहे. स्त्रीपुरुषांच्या मानसिक व शारीरिक निकोपतेसाठी आणि मुलांच्या निकोप संवर्धनासाठीही नग्नतेची गरज आहे  त्यामुळे लैंगिक विषयासंबंधीचे विकृत कुतूहल तसेच इतरही लैंगिक विकृती कमी होतात. सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा यांचा हितकर असा लाभ शरीराला होतो नग्नतेमुळे सौंदर्य, आरोग्य यांचा उपभोगही चांगल्या प्रकारे घेता येतो  नग्नतेमुळे इंद्रियदमन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते इ. मतांचा पुरस्कार या संप्रदायात केला जातो. जननेंद्रियांसह संपूर्ण शरीर उघडे ठेवणे यालाच नग्नता समजण्यात येते.

नग्न देहाचा पुरस्कार एका विशिष्ट मर्यादित प्राचीन काळापासून केल्याचे दिसून येते. आदिम जमातीमधील तसेच काही प्रगत समाजातील काही धार्मिक विधींशी व आचारांशी नग्नता निगडित होती. कलेच्या क्षेत्रातही स्त्रीपुरुषांची नग्न शिल्पे, चित्रे त्याचप्रमाणे साहित्यांतर्गत वर्णने यांतून स्त्रीपुरुषांच्या नग्न देहाचे उघड दर्शन घडते. जैनातील दिगंबर पंथात मोक्षप्राप्तीकरिता नग्नतेचा पुरस्कार केला जातो. त्यांच्या तीर्थंकरांच्या मूर्ती व आदर्श साधू वस्त्रविहीनच असतात.

आधुनिक नग्न संप्रदायाचे मूळ रिचर्ड उंगेव्हिटर या जर्मन विचारवंताने लिहिलेल्या ‘नेकेडनेस’ (इं. शी.) या पुस्तकात (१९०६) आढळते. विसाव्या शतकाच्या आरंभापासून यूरोपीय देशात ‘फ्री बॉडी कल्चर’ या नावाने नग्नतेचा पुरस्कार उद्याने किंवा निवासस्थाने यांसारख्या मर्यादित क्षेत्रात करण्यात आला. अमेरिकेत १९२९ साली कुर्ट बार्टेल या जर्मन आप्रवाशाने न्यूयॉर्कमध्ये पहिली नग्न सहल काढली. यातूनच ‘अमेरिकन लीग फॉर फिजिकल कल्चर’ या नग्‍नसंप्रदायी संस्थेचा जन्म झाला (१९२९). पुढे ही संस्था ‘इंटरनॅशनल न्यूडिस्ट कॉन्फरन्स’ मध्ये रूपांतरित झाली. १९३७ मध्ये याच संस्थेचे ‘अमेरिकन सन-बेदिंग असोसिएशन’ असे नामांतर झाले. अमेरिकेत १५० हून अधिक नग्‍न संप्रदायी उद्याने आहेत. यूरोपमध्ये नग्‍न संप्रदायाला ‘नेचरिस्ट’ अशी संज्ञा असून डेन्मार्कमध्ये यर्टशज येथे ‘इंटरनॅशनल नेचरिस्ट फेडरेशन’ या संस्थेचे कार्यालय आहे. ही संस्था तेरा देशांचे प्रतिनिधित्व करते.

कायद्याच्या दृष्टीने नग्‍नसंप्रदायी चळवळीचा अनुभव उलटसुलट असला, तरी स्थूलमानाने ही चळवळ कायदेशीर मानण्याकडेच अधिक कल दिसतो. या चळवळीची प्रकाशनेही अश्लीलतेच्या आरोपातून, विशेषतः अमेरिकेमध्ये, मुक्त झालेली आहेत. एका समग्र नग्‍न समाजाचे ध्येय मात्र नग्‍नसंप्रदायी तत्त्वज्ञानात आढळत नाही.

जाधव, रा. ग. खोडवे, अच्युत